स्पर्धेची व्याप्ती वाढविण्यासाठी सर्व यंत्रणांना समन्वयाने काम करण्याचे सुनेत्रा अजित पवार यांचे आवाहन
पुणे, दि. १२ : यावर्षी प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या ‘पुणे ग्रँड टूर’ सायकल स्पर्धेच्या यशस्वी आयोजनानंतर आता पुढील वर्षीच्या स्पर्धेला अधिक व्यापक, दर्जेदार आणि आंतरराष्ट्रीय स्वरूप देण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी केले. स्पर्धेच्या पूर्वतयारीचा आढावा घेताना त्यांनी स्पर्धेसाठी स्वतंत्र नियामक परिषद (गव्हर्निंग कौन्सिल) स्थापन करण्याचे निर्देश दिले.
विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले, पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम, पिंपरी-चिंचवड मनपा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, क्रीडा व युवक सेवा आयुक्त दीपक सिंगला यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
सुनेत्रा पवार म्हणाल्या की, ‘पुणे ग्रँड टूर २०२७’ चे उद्दिष्ट केवळ मागील वर्षाच्या यशाची पुनरावृत्ती करणे नसून या स्पर्धेला नवी उंची देणे आहे. पुणे हे जागतिक दर्जाच्या क्रीडा स्पर्धांचे केंद्र बनावे, युवकांना सायकलिंग सारख्या क्रीडा प्रकारांसाठी व्यासपीठ मिळावे आणि पुण्याची ओळख आंतरराष्ट्रीय क्रीडा नकाशावर निर्माण व्हावी, हा या स्पर्धेमागील व्यापक दृष्टिकोन आहे.
त्यांनी सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठबळामुळे आणि विविध यंत्रणांच्या समन्वयामुळे गतवर्षीची स्पर्धा यशस्वी झाली. अत्यंत कमी कालावधीत प्रशासन, पोलीस, स्थानिक स्वराज्य संस्था, स्वयंसेवक आणि सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाने केलेल्या उत्कृष्ट कामामुळे स्पर्धेला आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रशंसा मिळाली.
आगामी स्पर्धेच्या नियोजनासाठी राज्य शासन, स्थानिक स्वराज्य संस्था, नागरी संस्था आणि सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या प्रतिनिधींचा समावेश असलेली नियामक परिषद स्थापन करण्यात यावी. या परिषदेने दरमहा बैठक घेऊन तयारीचा आढावा घ्यावा तसेच आयोजन समिती स्थापन करून प्रत्येक विभागाच्या जबाबदाऱ्या स्पष्ट कराव्यात, असे निर्देश त्यांनी दिले. स्पर्धेच्या आयोजनासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नसल्याचे स्पष्ट करताना त्यांनी सर्व महानगरपालिका आणि संबंधित यंत्रणांनीही आर्थिक सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले.
यावेळी विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले यांनी स्पर्धा मार्गावरील गावांमध्ये स्वच्छता आणि घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प राबविण्याचा प्रस्ताव मांडला. तसेच इको-टुरिझमला चालना देण्यासाठी बांबूपासून तयार वस्तूंचा वापर करण्याची सूचनाही त्यांनी केली. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी गतवर्षीच्या यशस्वी वाहतूक व्यवस्थापनाचा उल्लेख करत यंदा अधिक लोकसहभाग वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे सांगितले.
जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी सादरीकरणाद्वारे माहिती देताना सांगितले की, गतवर्षीच्या यशस्वी आयोजनामुळे जागतिक सायकलिंग संघटना ‘युनियन सायकलिस्ट इंटरनॅशनल’ (यूसीआय) ने स्पर्धेचा दर्जा यूसीआय २.२ वरून २.१ असा उन्नत केला आहे. यंदा स्पर्धेचे टप्पे चारवरून सहा करण्यात आले असून एकूण १,०९९ किलोमीटर अंतराची ही स्पर्धा असणार आहे. बैठकीत गतवर्षी स्पर्धेच्या यशस्वी आयोजनात योगदान देणाऱ्या विविध अंमलबजावणी यंत्रणांचा प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार करण्यात आला.
00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *