Category: होम

 सिंधुदुर्गातील सर्व १,५३९ अंगणवाड्यांमध्ये पाणी-शौचालय सुविधा १०० टक्के!

आठही तालुक्यातील आंगणवाड्यांची स्थिती समाधानकारक राजन चव्हाण सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंगणवाडी केंद्रामध्ये मूलभूत सुविधांच्या बाबतीत समाधानकारक चित्र समोर आले आहे. महिला व बाल विकास विभागाने अलिकडेच केलेल्या सर्वेक्षणानुसार जिल्ह्यातील सर्व १,५३९ कार्यान्वित अंगणवाडी केंद्रांमध्ये शौचालय तसेच पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध आहे. दोन्ही सुविधांचे प्रमाण तब्बल १०० टक्के आहे. जिल्ह्यात एकूण १,५३९  आंगणवाड्या मंजूर असून त्यापैकी सर्व १,५३९ अंगणवाड्या कार्यान्वित आहेत. या सर्व केंद्रांमध्ये शौचालयाची सुविधा उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे सर्व अंगणवाड्यांमध्ये पिण्याचे पाणीही उपलब्ध असल्याचे या अहवालात  नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे शौचालय किंवा पाण्याची सुविधा नसलेली एकही  आंगणवाडी जिल्ह्यात नाही ही जिल्ह्याच्या दृष्टीने आभिमानास्पद आणि कौतुकाची बाब आहे असे म्हणावे लागेल. तालुकानिहाय विचार करता सावंतवाडी २४७, कणकवली २४४, मालवण २२८, वैभववाडी १४७, कुडाळ २६८, वेंगुर्ला ९७, देवगड २०७ आणि दोडामार्ग १०१  आंगणवाडी केंद्रे आहेत. या आठही तालुक्यांतील प्रत्येक  आंगणवाडीमध्ये शौचालय व पिण्याच्या पाण्याची सुविधा १०० टक्के उपलब्ध असल्याचे सर्व्हेक्षणात आढळून आले आहे. दरम्यान जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण सभापती अनुराधा नारकर  यांनी अलिकडेच दोडामार्ग आणि सावंतवाडी तालुक्यातील आंगणवाड्यांना भेटी दिल्या असून  पोषण आहाराची तपासणी तसेच  तेथील पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छतागृह आदी व्यवस्थेची पाहणी करण्यात येत आहे. जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबूडकर, महिला बालकल्याण अधिकारी प्रतीक उगारे हेही  अंगणवाड्यांना भेटी देऊन एकूण व्यवस्थेची पाहणी करत आहेत. तालुकानिहाय आकडेवारीत कुडाळ तालुका २६८ अंगणवाड्यांसह प्रथम क्रमांकावर आहे. त्यानंतर सावंतवाडी (२४७), कणकवली (२४४), मालवण (२२८), देवगड (२०७), दोडामार्ग (१०१), वेंगुर्ला (९७) आणि वैभववाडी (१४७) अशी संख्या आहे. आंगणड्यांमध्ये येणाऱ्या बालकांसाठी आरोग्य, पोषण आणि पूर्वप्राथमिक शिक्षणाबरोबरच स्वच्छता व सुरक्षित पिण्याचे पाणी या मूलभूत सुविधा महत्त्वाच्या आहेत. या दोन्ही सुविधांबाबत जिल्ह्याची आकडेवारी शंभर टक्के असल्याने सिंधुदुर्गच्या अंगणवाडी व्यवस्थेतील ही सकारात्मक बाब ठरली आहे. सिंधुदुर्गातील १,५३९ अंगणवाड्यात १०,७७२ बालके असून ६३ अंगणवाड्यांची पटसंख्या शून्य आहे. ६८१  आंगणवाड्यांमध्ये  पाचपेक्षा कमी मुले आहेत. जिल्ह्यातील आंगणवाड्यांच्या पटसंख्येची स्थिती पाहता अनेक  आंगणवाड्यांमध्ये अत्यल्प मुले  असल्याचे स्पष्ट झाले आहे. तब्बल ६३  आंगणवाड्यांमध्ये एकही मूल  नाही, तर ६८१  आंगणवाड्यांमध्ये केवळ १ ते ५ मुले आहेत. जिल्ह्यात ४०१ आंगणवाड्यांची पटसंख्या ६ ते ९, तर ३३५  आंगणवाड्यांची पटसंख्या १० ते २० आहे. २० पेक्षा अधिक लाभार्थी असलेल्या ५१, तर ३० पेक्षा अधिक पटसंख्या असलेल्या आठ अंगणवाड्या आहेत. त्यामुळे काही ठिकाणी अत्यल्प पटसंख्या, तर काही  आंगणवाड्यांमध्ये तुलनेने अधिक पटसंख्या असे चित्र दिसून येते. तालुकानिहाय विचार करता कुडाळमध्ये सर्वाधिक २६८ आंगणवाड्या असून तेथे २,१७८ मुले आहेत. सावंतवाडी तालुक्यात  २४७  आंगणवाड्या व १,८१८ मुले, कणकवलीत २४४  आंगणवाड्या व १,९०९ मुले , तर देवगडमध्ये २०७  आंगणवाड्या व १,५२० मुले  आहेत. मालवणमध्ये २२८  आंगणवाड्या असून ९९७ मुले आहेत. चौकट आंगणवाडीत ‘हिरकणी’ कक्ष सिंधुदुर्ग जिल्हा मुख्यालयाजवळ असलेल्या ओरोस  देऊळवाडा इथल्या  आंगणवाडीत तर गर्भवती मातांसाठी ‘हिरकणी ‘कक्ष आहे.या कक्षाला बरीच वर्ष झाली असून असा कक्ष असलेली ही जिह्यातील पहिलीच  आंगणवाडी. ००००

सीएसएमटी-सावंतवाडी रोड एक्सप्रेस सुरू

 कोकण वासीयांसाठी दिलासादायक बातमी राजेंद्र साळसकर मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे. कोकणाकडे जाणाऱ्या विशेष रेल्वे गाड्यांचे आरक्षण मोठ्या प्रमाणात फुल झाल्याने निर्माण झालेली अडचण लक्षात घेऊन…

कल्याण पूर्वेत मातोश्री गुंजाई फाउंडेशनची भव्य दहीहंडी उत्साहात

महिला गोविंदा पथकांना विशेष प्राधान्य; २०० हून अधिक पथकांचा सहभाग कल्याण :  कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघातील मातोश्री गुंजाई चौक, संतोषनगर येथे शिवसेना व युवासेना कल्याण पूर्व यांच्या वतीने मातोश्री गुंजाई फाउंडेशनच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेली भव्य दहीहंडी उत्साहात पार पडली. या उत्सवात २०० हून अधिक गोविंदा पथकांनी सहभाग नोंदवत सलामी दिली, तर महिला गोविंदा पथकांना यंदा विशेष प्राधान्य देण्यात आले. सहभागी पथकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे परिसरात दिवसभर दहीहंडीचा जल्लोष पाहायला मिळाला. दहीहंडी उत्सवाच्या माध्यमातून पारंपरिक गोविंदा संस्कृतीला प्रोत्साहन देतानाच महिला गोविंदा पथकांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आयोजकांकडून करण्यात आला. उत्सवासाठी २५ लाख रुपयांचे बक्षीस तसेच विविध आकर्षक पारितोषिकांची घोषणा करण्यात आली होती. उत्सवस्थळी सलामी देणाऱ्या प्रत्येक गोविंदा पथकाचा आयोजक प्रमुख तथा शिवसेना संपर्कप्रमुख आणि विद्यमान नगरसेवक महेश गायकवाड, नगरसेवक कैलास जोशी यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व रोख रक्कम देऊन गौरव करण्यात आला. युवासेना विधानसभा अध्यक्ष अजय गायकवाड यांच्यासह शिवसेना व युवासेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि आयोजकांनी उत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेतले. मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या गोविंदा पथकांमुळे मातोश्री गुंजाई चौक परिसरात दिवसभर उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. ०००००००

 द्वारका येथील अतिक्रमित जागा महापालिका ताब्यात घेणार

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ६० दुकानदारांना नोटिसा हरिभाऊ लाखे नाशिक : द्वारका चौकातील महापालिकेच्या मालकीच्या चार एकर जागेवरील अतिक्रमणे हटविण्याची प्रक्रिया महापालिका प्रशासनाने सुरू केली आहे. संबंधित जागेचा ताबा सर्वोच्च न्यायालयाने महापालिकेच्या बाजूने कायम ठेवत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून जागा रिकामी करण्याचे निर्देश दिल्यानंतर अतिक्रमण निर्मूलन विभागाने कारवाईला वेग दिला आहे. त्यानुसार नाशिक पूर्व विभागाने ६० दुकानदारांना जागा रिकामी करण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत. द्वारका चौकातील सर्व्हे क्रमांक ४८९ मधील फायनल प्लॉट क्रमांक २८२ ही सुमारे चार एकर जागा महापालिकेच्या मालकीची आहे. नाशिक नगरपालिका अस्तित्वात असताना १९७३ पासून ही जागा भाडेतत्त्वावर दुकानदारांना दिली होती. सद्यःस्थितीत या जागेवर १०९ दुकानदार व्यवसाय करीत आहेत. रस्ता रुंदीकरणात अडथळा ठरत असल्यामुळे महापालिकेने २०१५ मध्ये संबंधित दुकानदारांना नोटिसा बजाविल्या होत्या. त्यानंतर दि. २९ फेब्रुवारी २०२० रोजी अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या उपायुक्तांनी संबंधित दुकाने अनधिकृत ठरवित १५ दिवसांमध्ये जागा रिकामी करण्याचे महानगरपालिका आदेश दिले होते. या कारवाईविरोधात दुकानदारांनी न्यायालयात धाव घेतली. जिल्हा न्यायालयाने दि. ५ जानेवारी २०२३ रोजी महापालिकेच्या बाजूने निकाल दिल्यानंतर ४० दुकानदारांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. महापालिकेने अतिक्रमण हटविताना आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली नसल्याचे निरीक्षण नोंदवित उच्च न्यायालयाने दुकानदारांच्या बाजूने निकाल दिला. त्यानंतर महापालिकेने सर्वोच्च न्यायालयात अपील केले होते. आयुक्त मनीषा खत्री यांच्या आदेशान्वये दाखल या अपिलात महापालिकेची बाजू ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. तुषार मेहता यांनी मांडली. सर्वोच्च न्यायालयाने कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून संबंधित जागा रिकामी करण्याचे निर्देश दिल्यामुळे महापालिकेने त्यानुसार नोटिसांची कार्यवाही सुरू केली आहे. द्वारका सर्कल परिसरात मोठी लोकवस्ती, व्यावसायिक आस्थापना आणि सातत्याने मोठी वाहतूक असते. या परिसरात बँका, रुग्णालये, शाळा, व्यावसायिक संकुले आणि हॉटेल्स आहेत. नाशिक – पुणे मार्ग तसेच मुंबई – आग्रा राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा हा महत्त्वाचा चौक असल्याने वाहतूक कोंडी आणि अपघातांची समस्या निर्माण होत असल्याचे नोटिसांमध्ये नमूद केले आहे. दुकानदारांना थेट जागा रिकामी करण्याचे निर्देश देतानाच त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी दिली आहे. २१ ते २३ सप्टेंबर २०२६ दरम्यान सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत सुनावणीसाठी उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत. संबंधित दुकानदारांचे म्हणणे ऐकून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर पुढील कारवाई होणार आहे. द्वारका सर्कल परिसरात मोठी लोकवस्ती, व्यावसायिक आस्थापना आणि सातत्याने मोठी वाहतूक असते. या परिसरात बँका, रुग्णालये, शाळा, व्यावसायिक संकुले आणि हॉटेल्स आहेत. नाशिक – पुणे मार्ग तसेच मुंबई – आग्रा राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा हा महत्त्वाचा चौक असल्याने वाहतूक कोंडी आणि अपघातांची समस्या निर्माण होत असल्याचे नोटिसांमध्ये नमूद केले आहे ००००

 तुकड्यातील जमिनींचा गुंता सुटणार!

१५ ऑक्टोबर २०२४पर्यंतचे व्यवहार अटींसह नियमित – फेरफार नोंदींचाही मार्ग मोकळा-जमीनधारकांना मोठा दिलासा अशोक गायकवाड अलिबाग :  तुकडेबंदी कायद्याच्या कचाट्यात अडकलेल्या हजारो जमीन धारकांसाठी राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. १५ ऑक्टोबर २०२४पर्यंत प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्राच्या जमिनींचे झालेले पात्र व्यवहार आता ठरावीक अटींची पूर्तता करून नियमित करता येणार आहेत. त्यामुळे वर्षानुवर्षे कागदोपत्री व्यवहार करूनही महसूल अभिलेखात नाव न लागलेल्या जमीनधारकांच्या मालकी हक्काचा मार्ग मोकळा होणार आहे. याबाबतची माहिती अपर जिल्हाधिकारी सचिन ढोले यांनी दिली. तुकडे पाडण्यास प्रतिबंध आणि तुकड्यांचे एकत्रीकरण करण्याबाबतच्या कायद्यातील तरतुदींमुळे प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी जमिनीचे हस्तांतरण अथवा विभाजन झालेले व्यवहार अडचणीत आले होते. दस्तऐवज हातात असतानाही फेरफार नोंदी रखडल्याने जमीन धारकांना मालकी हक्क सिद्ध करण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. आता अशा व्यवहारांना विहित प्रक्रियेत आणण्याची संधी उपलब्ध झाली आहे. नोंदणी बंद झाल्यानंतर गरजेपोटी अनोंदणीकृत दस्तऐवजांच्या आधारे झालेले व्यवहारही आवश्यक कागदपत्रांसह अर्ज करून कायदेशीर प्रक्रियेत आणता येणार आहेत. संबंधित प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर महसूल अभिलेखात फेरफार नोंद करण्याचा मार्ग खुला होईल. महानगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत, एमएमआरडीए तसेच अन्य महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या हद्दीतील जमिनींसह विशेष नियोजन प्राधिकरणांच्या क्षेत्रातील आणि प्रादेशिक योजनेत निवासी, वाणिज्यिक, औद्योगिक किंवा अन्य अनुज्ञेय वापरासाठी निश्चित जमिनींनाही या निर्णयाचा लाभ मिळणार आहे. तुकड्याच्या नोंदणीकृत दस्ताच्या आधारे फेरफार मंजूर झाला; मात्र खरेदीदाराचे नाव चुकीच्या हक्कात किंवा ‘इतर हक्क’ सदरी नोंदले गेले असेल, तर ३ नोव्हेंबर २०२५च्या अध्यादेशातील सुधारणांनुसार आवश्यक दुरुस्ती करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. १५ ऑक्टोबर २०२४पर्यंत झालेले पात्र व्यवहार ग्राम महसूल व मंडळ अधिकाऱ्यांनी संकलित करून नोंदणी विभागाकडे पाठवायचे आहेत. नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर फेरफार नोंद ऑनलाइन पद्धतीने पुढे नेण्याची कार्यवाही करावी लागणार आहे. विशेष म्हणजे, हक्क अभिलेखात खरेदीदाराचे नाव नोंदवल्यानंतर त्या जमिनीच्या पुढील हस्तांतरणावर कोणताही प्रतिबंध राहणार नाही. त्यामुळे तुकडेबंदीच्या गुंत्यात अडकलेल्या जमीनधारकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

नाशिक येथे उपोषणाला बसलेल्या विद्यार्थ्यांना समर्थन देत मुरबाड तालुक्यात एकदिवसीय लाक्षणिक उपोषण

राजीव चंदने मुरबाड : नाशिक येथील आदिवासी आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांनी आपल्या न्याय्य मागण्यांसाठी सुरू केलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अध्यक्ष प्रमोद पवार आणि कार्याध्यक्ष सुनील लोणे यांच्या मार्गदर्शनाने भूमिपुत्र एल्गार संघटनेने आज मुरबाड तहसील कार्यालय येथे  लक्षवेधी उपोषण आंदोलन केले. राज्यभर दहीहंडीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असताना, भूमिपुत्र एल्गार संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मात्र आदिवासी विद्यार्थ्यांच्या हक्कांच्या लढ्यासाठी रस्त्यावर उतरले होते. नाशिकमधील आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देत संघटनेने शासनाकडे निवेदन सादर केले. विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणावर मर्यादा आणणारा शासन निर्णय तात्काळ रद्द करावा, विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य कराव्यात तसेच राज्यातील आश्रमशाळांमध्ये झालेल्या विद्यार्थी मृत्यूंची स्वतंत्र एस. आय. टी. मार्फत चौकशी करण्यात यावी, अशा प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या. यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, “दहीहंडीचा उत्सव आनंदाचा असला तरी आदिवासी विद्यार्थ्यांचे भविष्य अधिक महत्त्वाचे आहे. हजारो विद्यार्थी आपल्या हक्कांसाठी संघर्ष करत असताना त्यांच्या पाठीशी उभे राहणे हेच आमचे सामाजिक कर्तव्य आहे.” या आंदोलनात ठाणे जिल्हा सरचिटणीस दिनेश जाधव, जिल्हा उपाध्यक्ष सूरज राजपूत, ता. अध्यक्ष जगदीश शिद , अनिस अतार, बुधाजी खंडागळे, दया हिलम, बाळा दळवी, राहूल वाघ, कैलास खंडागळे, भरत जाधव, भगवान जाधव, सोन्या पवार या कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदविला. “दहीहंडीच्या जल्लोषापेक्षा आदिवासी विद्यार्थ्यांचे भविष्य महत्त्वाचे आहे; त्यांच्या हक्कांच्या लढ्यात आम्ही सदैव सोबत आहोत,” असा ठाम संदेश या आंदोलनातून देण्यात आला. -००००

वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या रिक्षाचालकांवर विशेष कारवाई

पनवेल  : पनवेल शहरात वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या रिक्षाचालकांवर पनवेल शहर वाहतूक शाखा व प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने विशेष रिक्षा कारवाई मोहीम राबविण्यात आली. शनिवारी सकाळी ९.३० ते ११.३० वाजेपर्यंत पोलीस निरीक्षक सुभाष पुजारी, पनवेल शहर वाहतूक शाखा व अनिल गेळे, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक, प्रादेशिक परिवहन विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली सदर संयुक्त कारवाई करण्यात आली. या विशेष मोहिमेदरम्यान फ्रंट सीट बसविणे, गणवेश न घालणे, मीटरप्रमाणे रिक्षा न चालविणे तसेच इतर वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रिक्षाचालकांवर कारवाई करण्यात आली. एकूण १६६ रिक्षांवर कारवाई करण्यात आली असून, एकूण ₹२,७७,६५०/- इतका दंड आकारण्यात आला. सदर कारवाईदरम्यान पनवेल शहर वाहतूक शाखेचे अधिकारी व अंमलदार उपस्थित होते. पनवेल शहरातील नागरिकांची सुरक्षितता व वाहतूक व्यवस्था अधिक सुरळीत करण्याच्या दृष्टीने यापुढेही पनवेल शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी अशाच प्रकारच्या विशेष रिक्षा तपासणी व कारवाई मोहिमा सातत्याने राबविण्यात येणार आहेत. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या रिक्षाचालकांविरुद्ध नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येईल. रिक्षाचालकांनी प्रवाशांची सुरक्षितता व सुविधा लक्षात घेऊन वाहतुकीचे सर्व नियम पाळावेत, गणवेश परिधान करावा आणि मीटरप्रमाणे भाडे आकारावे.“वाहतुकीचे नियम पाळा, सुरक्षित प्रवास करा!” ०००००

कुडाळ एमआयडीसीतील भूखंडावरून ग्रामस्थ आक्रमक

उद्योगासाठी घेतलेली जमीन मंगल कार्यालय, मंदिरासाठी देण्यास विरोध; भूखंड वाटपाच्या चौकशीची मागणी कुडाळ : कुडाळ एमआयडीसीतील उद्योगांसाठी राखीव असलेल्या भूखंडावर मंगल कार्यालय आणि रामदेव बाबा मंदिर उभारण्याच्या हालचाली सुरू असल्याचा आरोप…

हनुमान क्रीडा मंडळ कुर्लाचे पहिले आठ थर

मुंबई: कुर्ला येथील  हनुमान क्रीडा मंडळ यांनी राहुल शेवाळे यांच्या राधा फाउंडेशन चेंबूर येथे आठ थर लावून सलामी दिली.  हनुमान क्रीडा मंडळ कुर्ला तील नावाजलेले मंडळ असून १९६५ पासून दहीहंडी उत्सव जोशात…

शालेय विद्यार्थ्यांना मोफत शालोपयोगी वस्तूंचे वाटप

मुंबई – ग्राहकांच्या न्याय हक्कांसाठी लढणाऱ्या लोककल्याण ग्राहक संरक्षण संस्थेच्या वतीने साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०६व्या जयंतीनिमित्त संस्थेचे मुंबई महानगर उपाध्यक्ष रमेश साहेबराव गुडेकर यांच्या वतीने विक्रोळी, भांडूप,मुलुंड विभागातील…