Category: होम

जबाबदारी कर्मचाऱ्यांची, ताबा खासगींचा

४९० वसतिगृहांवरून कास्ट्राईब आक्रमक! आंदोलनाच्या इशाऱ्याने आदिवासी विभागाची धावपळ; आयुक्त लीना बनसोड यांची चार तास बैठक अशोक गायकवाड नाशिक :आश्रमशाळा व वसतिगृहांतील विद्यार्थ्यांच्या जीवित, आरोग्य आणि सुरक्षेचा प्रश्न गंभीर असताना ४९० वसतिगृहांच्या खासगी व्यवस्थापनाचा करार तातडीने रद्द करा, या मागणीवरून महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ आक्रमक झाला आहे. ५ सप्टेंबरपासून बेमुदत आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर आदिवासी विकास विभागाने आंदोलनाची दखल घेतली. आयुक्त लीना बनसोड यांनी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांसोबत तब्बल चार तास बैठक घेऊन विविध मागण्यांवर सविस्तर चर्चा केली. महासंघाचे अध्यक्ष अरुण गाडे आणि अतिरिक्त महासचिव सुशील तायडे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत राज्यभरातील कर्मचारी, गृहपाल, अधीक्षक आणि प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले. सुमारे सहा लाख विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी कर्मचाऱ्यांवर टाकली जात असताना त्यांना पुरेसे मनुष्यबळ, अधिकार आणि सुरक्षा व्यवस्था दिली जात नसल्याचा संताप महासंघाने व्यक्त केला. ४९० वसतिगृहांचे खासगी व्यवस्थापन तातडीने रद्द करून ती शासनाच्या ताब्यात घ्यावीत, सर्व अनुदानित आश्रमशाळा व वसतिगृहे शासनाने चालवावीत, तसेच आश्रमशाळा व वसतिगृहे तालुका आणि जिल्हा मुख्यालयांच्या ठिकाणी स्थलांतरित करावीत, अशी ठाम मागणी करण्यात आली. गृहपालांना राजपत्रित अधिकाऱ्याचा दर्जा देऊन कार्यालयप्रमुख घोषित करणे, रिक्त पदे तातडीने भरणे, मृत पदे पुनर्जीवित करणे, चोवीस तास पाळीनुसार कामाची व्यवस्था करणे, कर्मचाऱ्यांचे कामाचे तास व साप्ताहिक सुट्ट्या निश्चित करणे आणि विद्यार्थ्यांच्या जीवित, आरोग्य व सुरक्षेबाबत शासनाने लेखी हमी द्यावी, अशी मागणी करण्यात आली. राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने निश्चित केलेली राष्ट्रीय वसतिगृह नियमावली राज्यातील सर्व आश्रमशाळा व वसतिगृहांमध्ये लागू करण्याची मागणीही महासंघाने केली. धोरणात्मक मागण्यांवर संबंधित मंत्र्यांसोबत बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा केला जाईल, असे आयुक्त लीना बनसोड यांनी स्पष्ट केले. मागण्यांवर सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन देत त्यांनी आंदोलन स्थगित करण्याची सूचनाही केली. त्यामुळे आता महासंघाच्या पुढील भूमिकेकडे राज्यभरातील कर्मचारी व पालकांचे लक्ष लागले आहे. बैठकीस अपर आयुक्त दिगंबर चव्हाण, अर्पिता ठुबे, सहआयुक्त संतोष दुबे, उपायुक्त शशिकला अहिरराव, विनिता सोनवणे, राजेंद्र हिवाळे, कपिल पवार, सहसंचालक दिलीप खोखले यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. आदिवासी कास्ट्राईब महिला संघटनेच्या सुवर्णा इंगोले, प्रा. एकनाथ मोरे, आराध्या क्रांतिकर, रेखा पवार, कविता निंबाळकर, साळवी तसेच राज्यभरातील कर्मचारी प्रतिनिधी सहभागी झाले.

भाजपा नगरसेवक डॉ. नितेश राजहंस सिंह यांच्या दहीहंडीला उत्स्फूर्त प्रतिसाद

मुंबई  : उत्तर-मध्य मुंबईतील कालिना विधानसभा मतदारसंघात भाजपा नगरसेवक डॉ. नितेश राजहंस सिंह यांच्या वतीने वाकोल्यातील हनुमान मंदिर परिसरात भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले. त्यास गोविंदा पथकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…

स्नायू वाढविण्याच्या नावाखाली प्रतिबंधित इंजेक्शन्स!

 जिम ट्रेनरवर गुन्हा दाखल मिरा -भाईंदर : स्नायू मजबूत करणे, वाढविणे यासाठी तरुण बॉडीबिल्डर्स डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय किंवा वैध परवान्याशिवाय प्रतिबंधित औषधे विकत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अन्न व औषध प्रशासन (FDA) आणि नयनगर पोलिसांच्या संयुक्त कारवाईत, मीरा रोड रेल्वे स्टेशनजवळ असलेल्या ‘के-५ फिटनेस अँड वेलनेस’ या दुकानातून ‘टर्मिवा’ इंजेक्शनचा साठा जप्त करण्यात आला आहे. नयनगर पोलीस ठाण्यात जिम ट्रेनरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे दुकान बेकायदेशीरपणे हानिकारक औषधे विकत असल्याची माहिती FDA अधिकाऱ्यांना मिळाली होती. FDA अधिकारी आणि नयनगर पोलिसांनी दुकानावर छापा टाकून ‘टर्मिवा’ इंजेक्शन जप्त केले. हे औषध ‘शेड्यूल एच’ श्रेणीत येते आणि डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय व वैध परवान्याशिवाय त्याच्या विक्रीस मनाई आहे. अयोग्य किंवा अनधिकृत वापरामुळे रक्तदाब वाढण्यासह गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात. हे इंजेक्शन कथितरित्या तरुण बॉडीबिल्डर्सना स्नायू वाढवण्यासाठी विकले जात होते. एफडीए निरीक्षक जोसेफ मॅथ्यू चिरामल यांच्या तक्रारीच्या आधारे, जिम ट्रेनर कृष्णा वकील कानोजिया यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरुणांना प्रतिबंधित किंवा परवाना नसलेली औषधे खरेदी करण्यासाठी कोणत्याही प्रकारे प्रोत्साहित केले गेले किंवा त्यांची दिशाभूल केली गेली का, याचाही पोलीस तपास करत आहेत. ००००

वरळी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोडली नाशमुक्तीची दहीहंडी

केतन खेडेकर दहीहंडी म्हणजे केवळ उत्सव नाही, तर उत्साह, एकजूट आणि सामूहिक प्रयत्नांची ऊर्जा अनुभवण्याचा क्षण आहे. याच उत्साहात माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत वरळी येथील जांबोरी मैदानावर भाजपा मुंबईचे पदाधिकारी अॅड. संतोष पांडे यांच्या पुढाकाराने आयोजित ‘परिवर्तन दहीहंडी उत्सव २०२६’ मध्ये नाशमुक्तीची दहीहंडी फोडण्यात आली. यावेळी गोविंदा पथकांचा उत्साह वाढवत त्यांना मनापासून शुभेच्छा दिल्या. उंचच उंच मानवी मनोरे रचताना दिसणारी त्यांची जिद्द, मेहनत आणि एकजूट खरोखरच प्रेरणादायी आहे. याप्रसंगी भाजपा मुंबई अध्यक्ष आमदार अमित साटम, विधानपरिषदेचे उपसभापती सचिन अहिर , सांस्कृतिक मंत्री अॅड. आशिष शेलार यांसह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

नवघर मैदानात दहीहंडीची ८ थरांची चुरस

मिरा -भाईंदरमध्ये लाखोच्या बक्षिसांची उधळण अरविंद जोशी मिरा -भाईंदर : गोपाळकाला उत्सव मिरा -भाईंदर शहरात यंदा अभूतपूर्व उत्साहात साजरा झाला. शहरात विविध राजकीय पक्ष आणि नेत्यांकडून लाखो रुपयांच्या बक्षिसांच्या दहीहंड्या उभारण्यात आल्या होत्या, त्यात भाईंदर पूर्वेतील नवघर मैदानातील ‘संस्कृती युवा प्रतिष्ठान’ची दहीहंडी मुख्य आकर्षण ठरली. मंत्री प्रताप सरनाईक यांच्या संस्कृती युवा प्रतिष्ठान आणि वंदना विकास पाटील जनहित संस्थेच्या संयुक्त विद्यमाने भाईंदर पूर्वेच्या नवघर मैदानावर विश्वविक्रमी संस्कृती दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी तब्बल ५० लाख रुपयांपर्यंतची बक्षिसे जाहीर करण्यात आली होती. यंदा थर रचण्यासाठी गोविंदा पथकांमध्ये जोरदार चुरस पाहायला मिळाली. भाईंदरच्या जय मल्हार गोविंदा पथक आणि जय महाराष्ट्र गोविंदा पथक या दोन स्थानिक पथकांनी शिस्तबद्ध पद्धतीने ८ थरांची यशस्वी सलामी देत उपस्थितांची मने जिंकली. ९ थर लावणाऱ्या स्थानिक पथकाला ५ लाख रुपये व ट्रॉफी, तर बाहेरील पथकाला २ लाख रुपये. ८ थरांसाठी स्थानिक पथकाला ५० हजार (बाहेरील पथकाला २५ हजार), ७ थरांसाठी १० हजार रुपये आणि केवळ सलामी देणाऱ्या पथकाला ५ हजार रुपयांचे रोख पारितोषिक. या उत्सवात बिग बॉस फेम प्रसिद्ध आगरी-कोळी गायक व संगीतकार दादूस यांच्या लोकगीतांच्या कार्यक्रमाने रंगत वाढवली. शहरात ठिकठिकाणी मोठ्या दहीहंड्या लावण्यात आल्या होत्या. मीरा रोडच्या शांती पार्क येथील सेंटर प्लाझा हॉलजवळ ३० लाखांहून अधिक रकमेची दहीहंडी उभारण्यात आली होती. तिथे ९ थर लावणाऱ्या पथकासाठी ५१ हजारांचे बक्षीस होते. भाईंदर पश्चिमेला नगरभवनाजवळ मनसे उपशहर प्रमुख अभिनंद चव्हाण यांच्यावतीने ११,११,१११ रुपयांची, तर बावन जिनालय जैन मंदिराशेजारी आमदार नरेंद्र मेहता यांच्यावतीने ७,७७,७७७ रुपयांची दहीहंडी उभारण्यात आली होती. डीजेच्या तालावर, फटाक्यांच्या आतषबाजीत आणि ‘गोविंदा आला रे’च्या जयघोषात संपूर्ण मिरा -भाईंदर दुमदुमून गेले होते.

सुलतान पटेल हे कामगारांचे स्वातंत्र्य दूत

मिरा -भाईंदर : श्रमजीवी रयत कामगार संघटनेचे कार्याध्यक्ष सुलतान अयुब पटेल यांना श्रमजीवी संघटनेच्या वतीने मानाचा ‘स्वातंत्र्यदूत पुरस्कार’ आणि पदक प्रदान करण्यात आले. ठाणे आणि पालघर जिल्ह्यांतील कष्टकरी, उपेक्षित आणि…

मल्लिकार्जुन खर्गे शुद्धीकरणाच्या प्रकाराविरोधात युवक काँग्रेसचा एल्गार

 कल्याणमध्ये निदर्शने करत व्यक्त केला निषेध कल्याण : कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या सभेनंतर करण्यात आलेल्या शुद्धीकरणाच्या संतापजनक प्रकाराविरोधात कल्याणमध्ये युवक काँग्रेसच्या वतीने आज जोरदार निषेध आंदोलन करण्यात आले. युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष जपजीत सिंग यांच्या नेत्तृत्वाखाली  कल्याणच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात निदर्शेन करण्यात आली. यावेळी आंदोलनकर्त्यांनी निदर्शेने केल्यानंतर भाजपा कार्यालयासमोर आंदोलन करण्यासाठी कूच केली, मात्र पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले. खर्गे यांचा अपमान हा केवळ एका व्यक्तीचा अपमान नाही, तर सामाजिक समानता आणि संविधानिक मूल्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या मानसिकते विरोधातील लढा आहे. भारतातील प्रत्येक नागरिकांना जे हक्क मिळाले आहेत ते संविधानामुळे मिळाले असून हे सरकार दलित विरोधी असल्याचा आरोप जपजीत सिंग यांनी केला. त्यांनी हि दलित विरोधी विचारधारा न सोडल्यास त्यांचे शुद्धीकरण युवक कॉंग्रेस करणार असल्याचा इशारा देखील यावेळी सिंग यांनी दिला. यावेळी कॉंग्रेस गटनेत्या कांचन कुलकर्णी, युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. ०००००

– ठाण्यात रंगणार ‘गोकुळ दहीहंडी २०२६’

 गोविंदा पथकांसाठी ५५ लाखांची बक्षिसे  उत्सवात `नशामुक्त महाराष्ट्र’ ची होणार जनजागृती ठाणे -भारतीय जनता पार्टी, ठाणे शहर (जिल्हा) व शारदा संकल्प प्रतिष्ठान, ठाणे यांच्या वतीने ‘गोकुळ दहीहंडी २०२६’ चे आयोजन…

महावितरणचे वसई -विरार परिसरात समाधान शिबीर

४१२ तक्रारींचा तात्काळ निपटारा वसई : महावितरणच्या वसई मंडळ कार्यालयाच्या वतीने मागील आठवड्यात वीज ग्राहकांसाठी आचोळे, नालासोपारा, विरार परिसरात समाधान शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात परिसरातील ७७० वीज ग्राहकांनी हजेरी लावली. या शिबिरात ४१२ वीज ग्राहकांच्या वाढीव देयकाच्या संदर्भातील तक्रारींचे तात्काळ निराकरण करण्यात आले. तसेच स्मार्ट मीटर संदर्भात असलेल्या अनेक शंकांचे उपस्थित तांत्रिक अधिकाऱ्यांनी प्रात्यक्षिक दाखवून स्मार्ट मीटरची उपयोगिता समजावून सांगितली. या सोबतच वीज ग्राहकांच्या समाधानासाठी ३५८ ठिकाणी समानांतर मीटर लावण्यात आले. यामुळे स्मार्ट मीटर वेगाने फिरते हा गैरसमज दूर होण्यास मदत झाली वसई -विरार, नालासोपारा,  परिसरातील वीज ग्राहकांच्या समाधानासाठी यापुढे देखील समाधान शिबीर आयोजित करण्यात येणार आहे. तसेच ग्राहकांनी मागणी केली तर समानांतर मीटर लावण्यास महावितरण तयार असल्याची माहिती अधिक्षक अभियंता माणिक राठोड यांनी दिली. ००००००