Category: महाराष्ट्र

Maharashtra News

अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य

प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक मुंबई,: महाराष्ट्रातील रिक्षा, टॅक्सी तसेच ओला ,ऊबर इ-बाईक टॅक्सी सारख्या इतर व्यावसायिक अमराठी वाहनचालकांनी प्रवाशांशी मराठीतून संवाद साधणे अनिवार्य करण्याच्या निर्णयाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य शासनाने ठोस पावले उचलली आहेत. या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञ, साहित्यिक आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांसमवेत विशेष बैठक आयोजित केली आहे. शासनाने २०१९ मध्ये घेतलेल्या निर्णयानंतरही अनेक ठिकाणी त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याच्या तक्रारी पुढे आल्या आहेत. विशेषतः परप्रांतीय वाहनचालकांकडून प्रवाशांशी मराठीत संवाद साधला जात नसल्यामुळे प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे निदर्शनास आले आहे. याच पार्श्वभूमीवर हा विषय गांभीर्याने घेत राज्य शासनाने पुढाकार घेतला आहे. परिवहन विभागाच्या वतीने ‘महाराष्ट्र दिना’चे औचित्य साधत या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे. मराठी भाषेला नुकताच ‘अभिजात भाषा’ दर्जा मिळाल्याने या उपक्रमाला अधिक महत्त्व प्राप्त झाले असून, हा निर्णय केवळ प्रशासकीय न राहता अमराठी वाहनचालकांमध्ये मराठी भाषेबद्दल आत्मीयता निर्माण करणारा ठरावा, यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. या उपक्रमांतर्गत अमराठी वाहनचालकांना मराठी भाषेचे प्रशिक्षण देण्यासाठी अभ्यासक्रम तयार करण्यावर भर दिला जाणार आहे. मुंबई मराठी साहित्य संघाच्या अध्यक्षा श्रीमती उज्ज्वला मेहेंदळे तसेच ज्येष्ठ साहित्यिक प्रदीप ढवण, महेश केळुसकर, संतोष राणे, अशोक बागवे, बाळ कांदळकर, सुनील तांबे, शिवाजी गावडे, सतीश सोळांकुरकर, अरुण म्हात्रे, एकनाथ आव्हाड, प्रसाद कुलकर्णी, प्राचार्य अशोक चिटणीस, ज्येष्ठ साहित्यिका अनुपमा उजगरे, दीपा ठाणेकर आणि मनीषा राजपूत आदींच्या मार्गदर्शनामुळे या मोहिमेला अधिक बळ मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. या विषयावर सखोल चर्चा करण्यासाठी परिवहन आयुक्तही उपस्थित राहणार आहेत. आज परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी ११.०० वाजता ही बैठक होणार आहे. या बैठकीत मराठी भाषेची अनिवार्यता, अंमलबजावणीची रूपरेषा आणि प्रशिक्षणाचा आराखडा यावर व्यापक चर्चा होणार आहे. वाहनचालक आणि प्रवाशांमधील संवाद सुलभ करण्यासोबतच मराठी भाषेचा सन्मान राखण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वाचा टप्पा ठरणार असल्याचे मत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केले आहे.

 मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्ग टोल वसुलीला जून २६ पासून सुरुवात?

   सिंधुदुर्गातील ओसरगाव टोल वसुलीची निविदा प्रसिद्ध…!  स्थानिकांना सवलत, सूट नाही..! सिंधुदुर्ग (प्रतिनिधी )–गेली अनेक वर्ष रखडलेला मुंबई -गोवा राष्ट्रीय  महामार्गाचे चौपदरीकरण (एनएच -६६) येत्या मे, २६ अखेरपर्यंत पूर्ण  करण्यात येईल अशी घोषणा केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी दिली असतानाच आता या महामार्गावरील टोल वसुलीच्या हालचालींना सुरुवात झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली आणि कसाल  यांच्यामध्ये असलेल्या ओसरगाव टोल नाक्यावर लवकरच टोल वसुलीला सुरुवात होणार आहे. या टोल नाक्यावर वसुलीसाठी यापूर्वी एका एजन्सीला  नियुक्ती देण्यात आली होती.मात्र १४ जून २०२३ रोजी वसुलीला सुरुवात होताच सर्व राजकीय पक्ष  आणि टोल विरोधी कृती समितीच्या झेंड्याखाली एकत्र झालेल्या सिंधुदुर्गवासीयांनी वसुली बंद पाडली होती. त्यानंतर महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम पूर्ण होईपर्यंत गेली तीन वर्षे टोल नाका सुरू करून वसुली करण्याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून कोणतीही कार्यवाही झाली नव्हती. मात्र आता याबाबतच्या हालचाली वेगाने सुरू झाल्या असून १७ एप्रिल ला या संदर्भात ऑनलाईन निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. २०१२ सालापासून मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम रखडले असून येत्या मे, २६ अखेर ते पूर्णत्वास जाईल अशी घोषणा गडकरी यांनी १० एप्रिल रोजी खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवलीत आयोजित करण्यात आलेल्या समारंभात बोलताना केली होती.  त्यानंतर आठवड्याभरातच टोल वसुलीची निविदा काढण्यात आली आहे. या संदर्भात प्रसिद्ध झालेल्या निविदेमध्ये कणकवली शहराजवळचा जानवली पूल ते पत्रादेवी (सिंधुदुर्ग- गोवा सीमा) या ६० किलोमीटरच्या लांबीच्या महामार्गासाठी दुचाकी आणि तीन आसनी वाहने वगळता उर्वरित सर्व वाहनांच्या टोल वसुलीसाठी संस्था निश्चित केली जाणार आहे.दरवर्षी या वाहनांकडून टोलच्या स्वरूपात  स्वरूपात ५८ कोटी रुपयांचा महसूल   मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. ओसरगाव टोल नाक्यावरील  टोल वसुलीला सुरुवात झाल्यानंतर जून महिन्यापासून महामार्गावरील सर्व टोल नाके सुरू करण्याची प्रक्रिया महामार्ग प्राधिकरणाकडून सुरू असल्याचे प्राधिकरणाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. या टोल वसुलीतून स्थानिक वाहनांना वगळण्यात यावे या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले होते मात्र निविदेमध्ये स्थानिक वाहनांना टोल करातून वगळण्याबाबत कोणताही उल्लेख नाही मात्र इतर वाहनांपेक्षा स्थानिक वाहनांना काही प्रमाणात सवलत देण्यात आल्याचे निविदे वरून स्पष्ट होत आहे. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरून मोटार गाड्या जीप आणि व्हॅन यासारखी हलकी वाहने जाण्याचे प्रमाण वाहतुकीचे प्रमाण हलक्या वाहनांचे वाहतुकीचे प्रमाण ४९ टक्के आहे बस आणि ट्रक दोन ऍक्सल वाहनांचे प्रमाण २७% मल्टी ऍक्सल वाहनांचे प्रमाण १९% असल्याचे नियोजित निविदेत निविदेत स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.

कुशिवलीच्या युनिव्हर्सल एआय युनिव्हर्सिटीत राज्यस्तरीय कार्यशाळा संपन्न

  अशोक गायकवाड रायगड- कर्जत : उद्योग संचालनालय, मार्फत विभागीय अधिकारी, महाव्यवस्थापक यांची १७ ते १९ एप्रिल दरम्यान तीन दिवसीय राज्य स्तरीय परिषद युनिव्हर्सल एआय युनिर्व्हसिटी, कुशिवली,कर्जत जि. रायगड येथे संपन्न झाली. यावेळी विभागीय अधिकारी, महाव्यवस्थापक यांची राज्य स्तरीय परिषद-२०२६ करीता राज्याचे विकास आयुक्त (उद्योग) दिपेंद्रसिंह कुशवाह,(भाप्रसे), अतिरिक्त विकास आयुक्त (उद्येाग) वैभव वाघमारे(भाप्रसे), अतिरिक्त उद्योग संचालक, बाळासाहेब यशवंते यांच्यासह महाराष्ट्रातील उद्योग विभागाचे सर्व विभागीय उद्योग सह संचालक, सर्व जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक जी.एस. हरळया उपस्थित होते. उद्येाग संचालनालयाद्वारे राज्यात उद्योग व स्वंयम रोजगाराकरिता अनेक महत्वपूर्ण योजनांची अंमलबजावणी करण्यात आली आहे. तसेच शासनाच्या विकासात्मक योजनासाठी व राज्याच्या एकूण औद्योगिक विकासासाठी राज्याचे उद्योग,गुंतवणूक व सेवा धोरण-२०२५ जाहीर झालेले आहे. या परिषदेत राज्याचे औद्योगिक गुंतवणूक, सेवा उद्योग धोरण-२०२५, माहिती तंत्रज्ञान धोरण, व्यवसाय सुलभता,मैत्री इ. विषयांवर सादरीकरण करण्यात आले. उद्योग विभागातील सर्व अधिका-याकरीता कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय ) चा प्रशासकीय कामात वापर यावर ए‍क दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. उद्येाग सह संचालक, कोकण विभाग, ठाणे संदिप पाटील यांनी राज्यस्तरीय परिषदेस उपस्थित सर्व अधिकाऱ्यांचे आभार व्यक्त केले.

 भोंदूबाबा अशोक खरातचा नवा कारनामा

३२ बनावट खाती उघडून ५७ लाखांचा गंडा, सिन्नरमध्ये गुन्हा दाखल! हरिभाऊ लाखे नाशिक : अशोक खरातची वेगवेगळी गैरकृत्ये उघड होत असून त्याच्याविरुध्द सिन्नर पोलीस ठाण्यात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात…

माथेरानमध्ये वृक्षतोडीचा सुळसुळाट

प्रशासनाचे मौन कायम मुकुंद रांजाणे (माथेरान) माथेरान मध्ये मागील काही वर्षांपासून जुने बंगले खरेदी करून त्याजागी आलिशान हॉटेल्स उभी रहात आहेत. या हॉटेलमध्ये रूम्स बांधताना अडसर ठरणारी झाडे मुळासहित छाटली…

कोकणातील आंबा-काजू बागायतदार शेतकरी १५ मे ला ‘वर्षा’वर धडकणार!

राजू शेट्टी यांचे प्रतिपादन रत्नागिरी (प्रतिनिधी )– कोकणातील आंबा आणि काजू बागायतदार शेतकऱ्यांना मागणी केल्याप्रमाणे येत्या १५ मे पर्यंत  नुकसान भरपाई न मिळाल्यास हजारो शेतकरी आणि बागायतदार मुंबईतील ‘वर्षा’ बंगल्यावर धडक देतील असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे.  बालाजी  मंगल कार्यालयात आयोजित शेतकरी एल्गार मेळाव्यात शेट्टी  बोलत होते. यावेळी व्यासपीठावर  ‘उबाठा’ सेनेचे माजी खासदार विनायक राऊत, माजी आमदार बाळ माने,जिल्हाप्रमुख दत्ता कदम, बाबा साळवी,नेहा माने आदी  अनेक नेते उपस्थित होते. कोकणातील आंबा -काजू उत्पादक शेतकरी आणि बागायतदार निसर्गाच्या लहरीपणामुळे पूर्णपणे उध्वस्त झाला आहे.असे असताना सरकारकडून जाहीर झालेली मदत ही शेतकऱ्यांचा घोर अपमान करणारी आहे आणि म्हणूनच आता ‘वर्षा’वर धडक दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही असा इशाराही त्यांनी दिला. शेतकऱ्याल नुकसान भरपाई म्हणून प्रति झाड २५० रुपये देणे ही क्रूर थट्टा आहे. त्यांना प्रति झाड पाच हजार रुपये नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे या मागणीवर भर देऊन, प्रत्यक्षात मागितलेली मदत मिळेपर्यंत हा लढा चालूच राहील असे शेट्टी यांनी स्पष्ट केले. कोकणच्या हापूसला जागतिक स्तरावर ‘जीआय’ टॅग मिळाला असला तरी हवामान बदलाच्या संकटामुळे हापूसचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. मागील दोन- तीन वर्षापासून सातत्याने बदलणाऱ्या हवामानामुळे बागायतदारांचा उत्पादन खर्चही प्रचंड वाढला असून हा खर्च भरून निघणे अवघड झाले आहे. तेव्हा शेतकरी -बागायतदारांनी आता जागे व्हावे आणि १५, मे च्या या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन यावेळी करण्यात आले. मेळाव्याला रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी आणि आंबा बागायतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. माजी खासदार विनायक राऊत यांनी सरकारवर जोरदार टीका केली. रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी सरकारकडे पैसा आहे मात्र कोकणच्या अर्थव्यवस्थेचा कणा  असलेल्या आंबा -काजू उत्पादकांना नुकसान भरपाई देण्यासाठी सरकार  तिजोरी का उघडत नाही असा  सवाल करून १५, मे च्या आंदोलनात सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन केले. यंदा उत्पादन अत्यल्प झाल्यामुळे शेतकरी- बागायतदार आर्थिक अडचणीत सापडला आहे. अशावेळी खते आणि कीटकनाशके विकणाऱ्या कंपन्यांनी शेतकऱ्यांकडे वसुलीसाठी तगादा लावला आहे तो त्यांनी लावू नये अन्यथा आक्रमक पवित्रा घ्यावा लागेल असा इशाराही यावेळी देण्यात आला. वाशी मार्केट मधील दलाल आणि अडत्यांनी संगनमत करून दर पाडू नयेत जेणेकरून शेतकऱ्यांना दोन पैसे अधिक मिळतील अशी अपेक्षाही राऊत यांनी यावेळी व्यक्त केली.

 धर्मांतराच्या संशयावरून बजरंग दलाच्या गुंडांची महिलांना मारहाण

घटनेचे वार्तांकन करणाऱ्या पत्रकारावरसुद्धा या गुंडांचा हल्ला मिरा -भाईंदर / अरविंद जोशी रविवारी अजय प्रताप यांच्या घरी प्रार्थना सभेसाठी सुमारे २०-२५ लोक जमले होते. दरम्यान, धर्मांतराचा आरोप करत बजरंग दलाचे काही गुंड घरात घुसले. बजरंग दलाच्या या सदस्यांनी घरात घुसून महिलांवर हल्ला केल्याचे प्रकरण समोर आले आहे. या घटनेचे वार्तांकन करण्यासाठी आलेल्या एका पत्रकारावर पोलीस ठाण्याबाहेर बजरंग दलाच्या गुंडांनी हल्ला केला, ज्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे लोक नेहरू नगरमधील बबली यांच्या घरात जबरदस्तीने घुसले. घरातील महिलांवर हल्ला करून त्यांना शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. नंतर काही लोकांना चौकशीसाठी भाईंदर पोलीस ठाण्यात नेण्यात आले. रात्री सुमारे साडेआठ वाजता, घटनेचे वार्तांकन करण्यासाठी आलेल्या पत्रकार केतन बरिया यांच्यावर पोलीस ठाण्याबाहेर जमावाने हल्ला केला. मिळालेल्या माहितीनुसार, ते घटनास्थळाचे चित्रीकरण करत असताना, आपण पत्रकार असल्याचे सांगूनही जमावाने त्यांना घेरले आणि मारहाण केली. सध्या रुग्णालयात उपचार घेत असलेले केतन बरिया म्हणाले, “मी पत्रकार आहे आणि माझे काम करत आहे, हे मी वारंवार सांगितले, पण कोणीही ऐकले नाही. त्यांनी मला घेरले आणि विनाकारण मारहाण करण्यास सुरुवात केली.” बरिया यांना जखमी अवस्थेत भारतरत्न पंडित भीमसेन जोशी (टेंभा) रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. पोलीस ठाण्याजवळ पत्रकारावर झालेल्या हल्ल्याचा पत्रकार संघटना आणि वृत्तसंस्थांनी तीव्र निषेध केला आहे. त्यांनी या घटनेला पत्रकार स्वातंत्र्यावरील गंभीर हल्ला म्हटले असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. दरम्यान, नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी धर्माच्या नावाखाली होणाऱ्या जमाव हिंसाचाराच्या वाढत्या प्रवृत्तीबद्दल चिंता व्यक्त केली असून, अशा घटनांमुळे शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेसमोर गंभीर आव्हान उभे राहिले आहे, असे म्हटले आहे. पोलिसांनी या प्रकरणात अजूनही कोणाला अटक केलेली नाही.

पालकांसाठी कार्यशाळा व प्रभाग क्र ६ व ९ येथे इंडोर गेम झोन सुरु करण्याचा माथेरान शिक्षण समितीने घेतला निर्णय

  मुकुंद रांजाणे (माथेरान) माथेरान नगरपरिषदे च्या शालेय शिक्षण क्रीडा व युवक कल्याण समितीची सभा सोमवारी नगरपालिकेच्या स्व.हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे सभागृहात आयोजित बैठकीत महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले असून  बुधवार दि २२ रोजी अंगणवाडी व माथेरान मधील तिन्ही शाळांच्या पालकांसाठी कार्यशाळा आयोजित केली आहे. सुप्रसिद्ध मनसोपचार तज्ञ् प्राजक्ता गांगल या मार्गदर्शन करणार आहेत. मुलांच्या सर्वांगीण विकासात पालकांची भूमिका व मोबाईल पासून मुलांना कसे दूर ठेवता येईल. या विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत. तरुणांमध्ये खेळाची आवड जोपासली जावी यासाठी प्रभाग क्र ६ व ९ येथे इंडोर गेम झोन सुरु करण्याचा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे या मध्ये टेबल टेनिस, दोन कॅरम बोर्ड, बॅडमिंटन व बुद्धिबळ याचा समावेश असेल.  तसेच वीर हुतात्मा भाई कोतवाल शाळेच्या पत्र्यांना रंग लावणे कामाला देखील मंजुरी देण्यात आली. शिक्षण समितीचे सभापती सुनिल शिंदे, समिती सदस्य प्रतिभा घावरे, केतन रामाने व सुरेखा साळूंखे यांच्या सह नगरपरिषदेचे समीर दळवी यांनी सभेचे कामकाज पाहिले.

माथेरानमध्ये जंगलाला कुंपण, जबाबदार कोण?

जाळीच्या कंपाऊंडमुळे वन्यजीव अडचणीत; प्राणीमित्र संतप्त मुकुंद रांजाणे ( माथेरान ) माथेरानच्या आजूबाजूचा संपूर्ण परिसर डोंगरदऱ्यांनी  व्यापलेला असून घनदाट वनराई अशी ख्याती असलेल्या माथेरान मध्ये पूर्वीपासून जंगलात मुक्या प्राण्यांचा वावर होता तो आजही मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे.परंतु सद्यस्थितीत येथील जुन्या बंगल्यांची विक्री होत गेल्याने काही नवीन मालकांनी बंगल्याच्या भोवती संपूर्ण भागात जाळीचे कंपाऊंड टाकण्यास सुरुवात केल्यामुळे जंगल भागातील मुक्या प्राण्यांच्या अधिवासावर निर्बंध आले आहेत. त्यामुळे साहजिकच आगामी काळात ह्या प्राण्यांच्या संख्येत घट होणार असून त्यांचा मुक्तसंचार लुप्त होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. येथील एल्फिन्स्टन बंगल्याच्या नवीन मालकाने जवळपास ३६ एकरांवर असणाऱ्या या बंगल्याच्या सभोवताली जाळीचे कंपाऊंड करत असल्याने हे केलेले कंपाउंड योग्य नसून मुक्या प्राण्यांच्या मुक्तसंचारावर गदा येत आहे.या बंगल्याच्या जवळच मंकी पॉईंट आणि मॅलेट स्प्रिंग हे पाण्याचे स्त्रोत असल्याने याठिकाणी जंगली प्राणी आपली पाण्याची तहान भागवत असतात. परंतु येथील घनदाट जंगलात असणाऱ्या एल्फिन्स्टन बंगल्याच्या नवीन मालकाने बंगल्याच्या सभोवताली तारेचे कंपाउंड केल्याने मुक्या प्राण्यांच्या अधिवासावर गदा आली आहे. यासाठी हे कंपाऊंड ताबडतोब काढून टाकण्यात यावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष संतोष शिंदे यांनी अनेक दिवसांपासून केलेली असून  याबाबत  लेखी पत्र व्यवहार संबंधित विभागाकडे केलेला असताना देखील अद्यापही याबाबत ठोस उपाययोजना करण्यात आलेली नसल्याने प्रशासनाच्या गलथान कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.नगरपरिषदेच्या सहायक रचनाकार करुणा बांगर यांनी एक दिवस या भागात येऊन हे कंपाऊंड काढायला हवे असा दिखावा केला होता परंतु काहीच योग्य कारवाई करण्यात आलेली नाही. वनखात्याचे वनपाल यांनीही फक्त एक दिवस नाममात्र पाहणी केली होती.त्यानंतर याभागात कुणीही प्रशासकीय अधिकारी वर्ग फिरकलेले नाहीत त्यामुळे निश्चितच यामागे राजकीय वरदहस्ताने मोठे अर्थकारण झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. ———————————— माथेरान स्थळासाठी वेगळी नियमावली असून जंगल भाग असल्याने मुक्या प्राण्यांच्या अधिवासाकरिता कोणत्याही वास्तूला कंपाऊंड करता येत नाही.आम्ही लेखी निवेदने देऊनही नाममात्र चार ते पाच जाळ्या काढण्याचा दिखावा नगरपरिषदेच्या सहायक रचनाकार करुणा बांगर यांनी केलेला आहे.बाकी सर्व जाळ्या आजही तशाच आहेत. वनखात्याचे अधिकारी सुध्दा मूग गिळून गप्प बसले आहेत. त्यांनाही आपल्या कर्तव्याची जाण नसल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. संतोष शिंदे—उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष माथेरान

 १५ मेपूर्वी मान्सूनपूर्व कामे पूर्ण करा

आपत्ती आराखडा अद्ययावत करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश सिंधुदुर्गनगरी: आगामी मान्सूनच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कोणतीही आपत्तीजन्य परिस्थिती उद्भवू नये आणि नागरिकांना तात्काळ व प्रभावी मदत मिळावी, यासाठी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी आज मान्सूनपूर्व तयारीचा सविस्तर आढावा घेतला. सर्व संबंधित विभागांना मान्सूनपूर्व कामे १५ मेपूर्वी पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले. तसेच जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी समन्वय साधून सज्ज राहण्याचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली मान्सुनपूर्व तयारी आढावा बैठक संपन्न झाली त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रमोद कामत, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, उपजिल्हाधिकारी प्रतिभा वराळे, पोलिस उपअधीक्षक श्वेता खाडे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजश्री सामंत तसेच महसूल, सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा, आरोग्य, वीज वितरण, ग्रामविकास, नगरपरिषद तसेच पोलीस विभाग यांचा सहभाग होता. प्रत्येक विभागाने आपापल्या तयारीचा आढावा सादर करताना संभाव्य अडचणी व उपाययोजना मांडल्या. यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी धोकादायक झाडे व जीर्ण इमारतींचे तातडीने सर्वेक्षण करून आवश्यक ती कारवाई करण्याचे निर्देश दिले. पूरप्रवण क्षेत्रांची अचूक नोंद करून तेथे विशेष दक्षता घेण्यास सांगितले. रस्ते व पुलांची दुरुस्ती वेळेत पूर्ण करून वाहतूक सुरळीत ठेवण्यावर भर देण्यात आला असून वीजपुरवठा अखंडित राहण्यासाठी आवश्यक साहित्यसाठा व मनुष्यबळ तयार ठेवण्याचे आदेश देण्यात आले. आरोग्य विभागाला संभाव्य साथीच्या आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पुरेसा औषधसाठा, वैद्यकीय पथके आणि आपत्कालीन सुविधा सज्ज ठेवण्याचे निर्देश देण्यात आले. ग्रामपातळीवर आपत्ती व्यवस्थापन समित्या सक्रिय करून जनजागृती मोहीम राबविण्यावर विशेष भर देण्यात यावा,  मान्सून काळात उद्भवणाऱ्या कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला त्वरित प्रतिसाद देण्यासाठी नियंत्रण कक्ष २४ तास कार्यरत ठेवण्याचे आदेश देताना, नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा व प्रशासनाशी थेट संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केले. उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी दामिनी, सचेत आणि भूकंप या ॲप विषयी सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले की, हे तीनही ॲप्स आपत्ती व्यवस्थापन आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी अत्यंत उपयुक्त आहेत. दामिनी हे ॲप विजेच्या कडकडाट (Lightning) बाबत पूर्वसूचना देते. आपल्या परिसरात पुढील काही मिनिटांत वीज पडण्याची शक्यता असल्यास अलर्ट मिळतो. सचेत ॲपद्वारे पूर, चक्रीवादळ, भूकंप, त्सुनामी इत्यादी आपत्तींबाबत वेळेवर सूचना मिळते तर भूकंप हे ॲप भूकंपाच्या धक्क्यांची माहिती आणि अलर्ट मिळण्यासाठी वापरले जाते. तरी नागरिकांनी हे ॲप डाऊनलोड करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.