Category: महाराष्ट्र

Maharashtra News

 बिटको रुग्णालयात कोट्यवधींची यंत्रसामग्री धूळ खात!

बिटको रुग्णालयात कोट्यवधींची यंत्रसामग्री धूळ खात! १५० कोटींच्या रुग्णालयाचा कारभार रामभरोसे? हरिभाऊ लाखे नाशिक: येथील बिटको रुग्णालयात कोट्यवधी रुपयांची आधुनिक वैद्यकीय यंत्रणा मागील तीन वर्षांपासून वापराविना धूळ खात पड़न असल्याची धक्कादायक बाब समोर येत आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर उभारण्यात आलेली मॉलिक्युलर लॅब तसेच अत्याधुनिक व्हेंटिलेटर यंत्रणा आणि रक्तपेढी सध्या बंद अवस्थेत असून, याबाबत अस्वच्छता हे मोठ्या प्रमाणात आहे. यामुळे परिसरात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. कोरोना काळात नवीन संसर्गजन्य आजारांचे निदान करण्यासाठी मोठ्या खर्चातून मॉलिक्युलर लॅब उभारण्यात आली होती. त्या काळात या लॅबचा वापर मोठ्या प्रमाणात झाला; मात्र कोरोना संसर्ग ओसरल्यानंतर ही लॅब बंद पडली. त्यानंतर कोट्यवधी रुपयांची यंत्रसामग्री आणि व्हेंटिलेटर खाटा देखील निष्क्रिय अवस्थेत पडून आहे. सरकारने सुमारे १५० कोटी रुपये खर्चुन उभारलेल्या या भव्य रुग्णालयाचे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे रुग्णालय असे नामकरण करण्यात आले. या रुग्णालयात सुसज्ज रक्तपेढी उभारण्यात आली असली, तरी ती अद्याप पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात आलेली नाही. सध्या जुने बिटको रुग्णालयातच रक्तपेढी कार्यरत असून, दरमहा सुमारे ७०० ते ८०० लिटर रक्ताचा पुरवठा रुग्णांना केला जातो. नव्या रक्तपेढीत रक्त विलगीकरणाची आधुनिक व्यवस्था उपलब्ध असतानाही ती सुरू करण्यात उशीर का होत आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मात्र प्रत्यक्षात सुविधा सुरू होत नसल्यामुळे केवळ श्रेयवादामुळेच कामे रखडली आहेत का, अशी शंका नागरिक व्यक्त करत आहेत. शहरातील हे सरकारी पातळीवरील सर्वात मोठे रुग्णालय असले, तरी काही विभाग अद्याप पूर्णपणे कार्यरत नाहीत. अनेक रुग्णांना उपचारासाठी सिव्हिल रुग्णालय किंवा वसंतराव पवार मेडिकल हॉस्पिटल येथे हलवावे लागते. रुग्णालय परिसरातील स्वच्छतेबाबतही गंभीर तक्रारी समोर येत आहेत. एमआरआय विभागासमोर ड्रेनेज तुंबल्याने डास व मच्छरांचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे रुग्णांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. स्वच्छता कर्मचाऱ्यांची नियुक्ती असतानाही अशी परिस्थिती का निर्माण झाली, असा प्रश्न नागरिक विचारीत आहेत.

 रत्नागिरी जिल्ह्यात सामूहिक गीतगायन

 हिंद की चादरला मानवंदना  रत्नागिरी जिल्ह्यात सामूहिक गीतगायन नाचणे येथे जिल्हाधिकाऱ्यांची, तर दामले विद्यालयात अपर जिल्हाधिकाऱ्यांची उपस्थिती अशोक गायकवाड रत्नागिरी : शिखांचे नववे गुरु हिंद की चादर श्री गुरु तेग बहादूर साहेबजी यांच्या ३५० व्या शहिदी समागम शताब्दी वर्ष निमित्ताने आज सकाळी ९ वाजता जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये सामुहिक गायन झाले. जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक विद्यामंदिर, नाचणे शाळा क्र.१ येथे जिल्हाधिकारी मनुज जिंदल तसेच रत्नागिरी नगरपरिषदेच्या दामले विद्यालयात अपर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे यांच्या उपस्थितीत हे गायन झाले. हिंद की चादर गुरु तेग बहादूर जी यांच्या ३५० व्या शहिदी समागमाच्या अनुषंगाने आज सकाळी ९ वाजता जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक विद्यामंदिर, नाचणे शाळा क्र. १, दामले हायस्कूल येथे श्री गुरु तेग बहादूरजी यांच्या जीवनकाळावर आधारित सुप्रसिध्द गायक सतिंदर सरताज सिंग यांनी गायलेले गीत समूह गीत म्हणून गाण्यात आले. जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक विद्यामंदिर, नाचणे शाळा क्र.१ येथील कार्यक्रमात अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षीत यादव, उपशिक्षणाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, शिक्षक दीपक नागवेकर, सौरभी पवार, विनोदिनी कडवईकर, विद्या कोकजे उपस्थित होते. ग्रंथभेट देऊन जिल्हाधिकारी जिंदल यांचे स्वागत करण्यात आले. जिल्हाधिकारी जिंदल यांनी सर्व उपक्रमांची माहिती घेतली. तसेच, निबंध स्पर्धा, पोस्टर्स स्पर्धा, स्वच्छता अभियान, चित्रकला स्पर्धा, प्रश्नमंजुशा आदी स्पर्धा राबवाव्यात. विद्यार्थ्यांनीही शालेय जीवनात राबविल्या जाणाऱ्या विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेतला पाहिजे, अशा स्पर्धांमध्ये स्वत:च्या शाळेचे, आपल्या गावाचे नाव उज्ज्वल करावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले. दामले हायस्कूल येथील कार्यक्रमात मुख्याध्यापक भगवान मोटे, उपमुख्याध्यापक जुलेखा काझी, मंडळ अधिकारी प्रताप कोल्हे यांच्यासह शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना गलांडे म्हणाले, श्री गुरु तेग बहादूर यांचे बलिदान, त्यांचे कार्य आताच्या पिढीला माहित व्हावे, यासाठी हिंद की चादर गुरु तेग बहादूर जी यांच्या ३५० व्या शहीदी समागमाच्या अनुषंगाने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहेत.  २८ फेब्रुवारी व १ मार्च रोजी खारघर, नवी मुंबई येथे पंतप्रधान यांच्या उपस्थित मोठा कार्यक्रम होणार आहे. या उपक्रमांतर्गत राबविण्यात येणाऱ्या प्रभातफेरी, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा अशा विविध उपक्रमात दामले शाळेतील मुलांनी घेतलेला भाग आणि त्यामध्ये मिळविलेले यश हे खूप कौतुकास्पद आहे. यापुढेही १ मार्चपर्यंत शाळेकडून राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमात सहभाग घ्यावा, आपल्या शाळेचे नाव उंचावर न्यावे, अशा शुभेच्छा यावेळी गलांडे यांनी दिल्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला विभागीय आयुक्त यांनी हिंद की चादर गुरु तेग बहादूर जी यांच्या ३५० व्या शहीदी समागमाच्या या उपक्रमाच्या अनुषंगाने दिलेला संदेश सर्वांना ऐकविण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रविंद्र शिंदे यांनी केले.

स्वाभिमान व समता शिवरायांच्या स्वराज्याचे सूत्र – कैलाश देसाई

स्वाभिमान व समता शिवरायांच्या स्वराज्याचे सूत्र – कैलाश देसाई अनिल ठाणेकर सांगली – ‘बंधुता, स्वाभिमान व समता हेच शिवरायांच्या स्वराज्य पायाभरणीचे सूत्र होते. शिवरायांनी घालून दिलेली स्वराज्याची आदर्श नैतिक मूल्ये आजच्या राज्यकर्त्यांनी स्वीकारावीत’, असे प्रतिपादन शिवशंभु प्रतिष्ठानचे राज्य समन्वयक  कैलाश देसाई यांनी केले. मालती वसंतदादा पाटील कन्या महाविद्यालयाच्या इतिहास विभागामार्फत आयोजित केलेल्या ‘छत्रपती शिवाजी राजांचे सांस्कृतिक धोरण व आजची दशा’ या विषयावरील व्याख्यानामध्ये बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.अंकुश बेलवटकर होते.  कैलाश देसाई पुढे म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराज मुत्सद्दी, लोककल्याणकारी आणि नीतिमान राजे होते.  शिवरायांनी आपल्या राज्यात कधीही भेदभाव केला नाही.  आपल्या राजकीय विरोधकांच्या आईचा, पत्नीचा, मुलांचा, बहिणींचा आदर, सन्मान आणि संरक्षण करण्याचे शिवरायांचे धोरण होते. परंतु आजचे राज्यकर्ते अगदी खालच्या पातळीवर येऊन विरोधकांच्या कुटुंबीयांवर टीका करतात. जाती-जाती धर्मा-धर्मात द्वेष पसरवण्याचे काम करतात. वतनदारी व जहागीरदारी व्यवस्था शिवरायांनी संपविली. परंतु आजचे राज्यकर्ते नवसरंजामदार बनले आहेत. आजची राज्यव्यवस्था शिवरायांच्या स्वराज्याच्या विचाराला व लोकशाहीला घातक आहे. राजकारण करणाऱ्यांनी शिवरायांच्या नावे मतांचा जोगवा मागू नये. सर्व जाती धर्मीयांचा मानसन्मान ठेवावा. शिवरायांचे स्वराज्य म्हणजे आधुनिक लोकशाहीचा पायाच होता. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी शिवरायांच्या स्वराज्याचे संविधानात रूपांतर केले. शिवरायांचा ध्वज गेरू व मातीच्या रंगाचा आहे तो ध्वज वारकरी आहे. वारकरी परंपरेचा विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा.” अध्यक्ष डॉ. बेलवटकर म्हणाले. “पर्यावरण रक्षण, शेती सुधारणा व लोककल्याणकारी कामे शिवाजी राजांनी घडवून आणली. त्यांच्या आज्ञापत्रातून स्वराज्याची आदर्श मूल्ये दिसून येतात.स्वराज्याला नैतिक अधिष्ठान शिवरायांनी मिळवून दिले. त्यांनी कधीच आत्यंतिक धर्मवाद जोपासला नाही. कर्मकांड व अंधश्रद्धा विरोध केला.”कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रा. डॉ. राम घुले यांनी केले. या निमित्ताने आयोजित केलेल्या वक्तृत्व स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक कल्याणी साळुंखे, द्वितीय क्रमांक अक्षय पाटील व तृतीय क्रमांक तृप्ती गोंधळी यांना प्राप्त झाला. स्पर्धेचे परीक्षक प्रा. संध्या साठे व प्रा. स्वाती चौधरी होते. बीए भाग एकच्या विद्यार्थ्यांनी  शिवबाचा पाळणा व पोवाडा सादर केला.छत्रपती शिवाजी राजे व स्वराज्याची राजचिन्हे या विषयावर रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या.  त्यामध्ये प्रथम क्रमांक आरती चव्हाण, द्वितीय क्रमांक श्रावणी पाटील व तृतीय क्रमांक करुणा काळे यांना प्राप्त झाला. स्पर्धेचे परीक्षण प्रा. शैलजा पाटील व प्रा. उत्तरा पाटील यांनी केले. प्रथम तीन क्रमांकांना ट्रॉफी, प्रमाणपत्रे व रोख रक्कम देण्यात आली. विद्यार्थिनींनी शिवकालीन वेशभूषा परिधान केली. सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्रे देण्यात आली. सूत्रसंचालन करुणा काळे यांनी केले. प्रा. के. बी. पाटील यांनी आभार मानले. याप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने शिव पदयात्रा इस्लामपूर शहरात काढण्यात आली. प्रा वर्षा पाटील यांनी पदयात्रेचे संयोजन केले. महाविद्यालयाचा शिक्षक वर्ग व विद्यार्थीनी उपस्थित होत्या.

स्मार्ट सिटी कामांमुळे नाशिक पुन्हा कोंडीत

स्मार्ट सिटी कामांमुळे नाशिक पुन्हा कोंडीत हरिभाऊ लाखे नाशिक: शहरात आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत सुरू असलेल्या रस्ते व भुयारी गटारांच्या कामांमुळे नाशिकमध्ये पुन्हा एकदा वाहतूक कोंडीचे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे वाहनचालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. शहरात सध्या विविध भागांत रस्ते रुंदीकरण, काँक्रिटीकरण तसेच भुयारी मार्ग आणि गटारांची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. द्वारका, त्र्यंबक रोड, शालिमार, पंचवटी, नाशिकरोड आदी प्रमुख भागांमध्ये एकाच वेळी कामे सुरू असल्यामुळे त्याचा थेट परिणाम वाहतुकीवर होत आहे. विशेषतः द्वारका सर्कल येथे भुयारी मार्गाचे काम सुरू झाल्यामुळे वाहतुकीचा ताण वाढला आहे. सारडा सर्कल ते काठे गल्ली दरम्यान भुयारी मार्गाचे काम टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात आले असले, तरी सध्या दोन ते तीन ठिकाणी एकाच वेळी काम सुरू असल्यामुळे रस्ते अरुंद झाले आहेत. परिणामी काठे गल्लीमार्गे मुंबई नाक्याकडे वाहतुकीसाठी डायव्हर्जन देण्यात आले आहे. या मार्गावर विशेषतः मालवाहतूक करणाऱ्या मोठ्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र दिसून येते. ठिकठिकाणी पर्यायी मार्ग (डायव्हर्जन) देण्यात आले असले, तरी वाहनांची वाढती संख्या आणि अरुंद रस्ते यामुळे कोंडी टळत नाही. वाहतूक शाखेतर्फे अतिरिक्त कर्मचारी तैनात करून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र वाहनांचा प्रचंड ताण लक्षात घेता कर्मचाऱ्यांची चांगलीच कसरत होत आहे. कामे लवकर पूर्ण व्हावीत, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत असून, तोपर्यंत संयम बाळगण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

नाशिककरांवरील करवाढीचे संकट टळले

नाशिककरांवरील करवाढीचे संकट टळले हरिभाऊ लाखे नाशिक : नाशिक महापालिकेच्या स्थायी समिती सदस्यांची निवड झाली असली तरी शुक्रवारपर्यंत स्थायी समितीची पुनर्रचना न झाल्यामुळे नाशिककरांवर करवाढ यंदा टळली आहे. कायद्यातील तरतुदींनुसार २० फेब्रुवारीच्या आत कर व दरवाढीच्या प्रस्तावांना स्थायी समितीची मंजुरी मिळू शकलेली नाही. त्यामुळे पुढील आर्थिक वर्षात प्रशासनाला कुठलीही कर व दरवाढ लागू करता येणार नाही. त्यामुळे नाशिककरांना दिलासा मिळाला आहे. सातव्या पंचवार्षिकमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले. महापौर, उपमहापौरपदाची निवडणूक पार पडली. पाठोपाठ महासभेकडून स्थायी समितीच्या १६ सदस्यांची निवडही झाली आहे. स्थायीचे सदस्य निवडले गेले असले तरी, सभापतीची निवड अद्याप झालेली नाही. सभापती निवड येत्या बुधवारी होणार आहे. त्यामुळे २०२६-२७ या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक स्थायी समिती सभापती निवडीनंतरच सादर होण्याची शक्यता असल्याने नाशिककरांना नवीन करवाढ लागू होणार नाही. असा आहे नियम महापालिका क्षेत्रात कर व दर ठरवण्याचे अधिकार स्थायी समितीला असतात. महापालिका प्रशासनाकडून अर्थात आयुक्तांकडून करवाढ सुचवल्यास २० फेब्रुवारीच्या आत स्थायी समितीची परवानगी घ्यावी लागते. या कालावधीत मंजुरी मिळणे आवश्यक असते. परंतु, यंदा २० पर्यंत स्थायी समिती अस्तित्वात न आल्याने कर व दरवाढीचा प्रस्ताव अंदाजपत्रकात सादर होण्याची शक्यता मावळली आहे.

जुन्नर-शिवनेरी विकासाला प्राधान्य, किल्ले संवर्धन आणि पर्यटन सर्किट उभारणीचा निर्धार -एकनाथ शिंदे

जुन्नर-शिवनेरी विकासाला प्राधान्य, किल्ले संवर्धन आणि पर्यटन सर्किट उभारणीचा निर्धार -एकनाथ शिंदे अनिल ठाणेकर पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर आधारित लोककल्याणकारी विकासासाठी राज्य सरकार कटिबद्ध असूनशिवनेरी विकासाला प्राधान्य, किल्ले संवर्धन आणि पर्यटन सर्किट उभारणीचा निर्धार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवनेरी येथे केला. किल्ले शिवनेरी येथे छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सोहळा मोठ्या जल्लोषात पार पडला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मार्गदर्शन करताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे स्मरण करून राज्याच्या विकासासाठी त्यांच्या आदर्शांचा मार्ग स्वीकारण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मंत्री आशिष शेलार यांच्यासह अनेक मंत्री, खासदार-आमदार, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषातून संकटांशी लढण्याची प्रेरणा मिळते आणि आत्मविश्वास वाढतो. हिंदवी स्वराज्य स्थापन करताना महाराजांनी प्रजेला केंद्रस्थानी ठेवून लोककल्याणकारी राज्य उभारले. स्वराज्याबद्दलची तळमळ, निष्ठा आणि पराक्रम यांच्या जोरावर त्यांनी काळाच्या पुढे विचार करणारे शासन दिले. आज आपण ज्या विकास मॉडेलचा विचार करतो, त्याचा पाया महाराजांनी शेकडो वर्षांपूर्वी घातला होता. अर्थव्यवस्था, जलव्यवस्थापन, शहर नियोजन, पायाभूत सुविधा, पर्यावरण यांचा त्यांनी दूरदृष्टीने विचार केला. मोहिमेतून आर्थिक लाभ झाला की त्यांनी किल्ले उभारणीसाठी वापर करून राज्य बळकट केले. शिवराई चलन निर्माण करून स्वतंत्र आर्थिक व्यवस्था उभी केली, धरणे-कालवे बांधले, घाटरस्ते विकसित केले आणि आरमार उभारून सामर्थ्य वाढवले.महाराज शेतकऱ्यांवर जिवापाड प्रेम करणारे राजे होते. मावळे युद्धासाठी सीमोल्लंघन करून जात आणि अक्षय तृतीयेला परत येऊन शेतीची कामे करत, अशी शेतकरी-सैनिक संकल्पना त्यांनी निर्माण केली. शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका अशी कठोर आज्ञा त्यांनी दिली होती. त्यामुळे “अन्नदाता बळीराजा हा मायबाप आहे” हीच भूमिका आजच्या सरकारची असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले. शिवनेरी व परिसरातील जुन्नर भागाच्या सर्वांगीण विकासाला सरकार प्राधान्य देणार असून स्थानिक मागण्या गांभीर्याने विचारात घेत आवश्यक सुविधा उभारल्या जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली. किल्ल्यांच्या संवर्धनासाठी पर्यटन सर्किट उभारणे, स्वच्छता-संवर्धन मोहिम राबवणे आणि ऐतिहासिक वारसा जपणे यावर सरकार भर देत आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त गड-किल्ल्यांच्या स्वच्छता व संवर्धन मोहिमाही हाती घेतली जाणार आहे. मराठा लष्करी लँडस्केप म्हणून ११ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा अभिमान व्यक्त करत त्यांनी किल्ल्यांच्या जतनासाठी व्यापक प्रयत्न सुरू असल्याचे सांगितलेस्वदेशी आणि आत्मनिर्भरता हे शिवरायांच्या राज्यकारभाराचे मुख्य तत्त्व होते. त्याच धर्तीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला आत्मनिर्भर भारताचा मंत्र देशाला महासत्ता बनविण्यासाठी उपयुक्त ठरेल. महायुती सरकारने लाडकी बहीणसह विविध लोककल्याणकारी योजना राबवून महिलांना आत्मसन्मान व आत्मनिर्भरता देण्याचे काम सुरू केले आहे.शिवरायांच्या गनिमी काव्याचा अभ्यास जगभर केला जात असून दिल्लीतील जेएनयू विद्यापीठात त्यांच्या युद्धनीतीवर अभ्यासक्रम सुरू आहे, असेही त्यांनी नमूद केले. भूगोलाची जाण, दूरदृष्टी आणि युद्धकौशल्यामुळे त्यांनी बलाढ्य शक्तींना नमवले आणि आजही त्यांचे विचार प्रेरणादायी व मार्गदर्शक ठरतात. विकसित भारताच्या निर्मितीसाठी आणि भारताला महासत्ता बनवण्यासाठी शिवरायांचा आदर्श महत्त्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले.“आपण सर्व शिवरायांचे मावळे आहोत. प्रत्येकाने महाराजांचा किमान एक गुण अंगीकारला तर स्वाभिमानी, सुरक्षित आणि बलशाली महाराष्ट्र घडेल,” असा विश्वास व्यक्त करून उपमुख्यमंत्री शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार अभिवादन केले. कार्यक्रमात विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा सन्मान करण्यात आला आणि जय शिवरायच्या घोषणांनी शिवनेरी दुमदुमून गेला.

  सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिक सज्ज!

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिक सज्ज! द्वारका ते नाशिकरोड रस्ता आता होणार ‘दहा पदरी’ हरिभाऊ लाखे नाशिक :  आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर वाहतूक नियोजनासाठी द्वारका ते नाशिकरोड या नाशिक-पुणे रस्त्याचे दहा पदरीकरण केले जाणार आहे. या रस्ता रुंदीकरणासाठी टीडीआरद्वारे भूसंपादनाचा निर्णय महापालिकेने घेतला असून, रस्ता क्षेत्राचे डिमार्केशन करत ३५ जागामालकांना भूसंपादनाच्या नोटिसा बजावल्या जात आहेत. नाशिक शहरातील अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या द्वारका चौकातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी तब्बल तीनशे कोटी रुपये खर्च करून अंडरपास तयार केला जात आहे. या कामाला सुरुवात झाली असून, चौकातील वाहतूक अन्य मागनि वळविण्यात आली आहे. तीन महिने काम सुरू राहणार असल्याने या भागातील वाहतूक पूर्णपणे बंद ठेवली जाणार आहे. या चौकातील वाहतूक कोंडीवर उपाय शोधताना भविष्यातील गरज आणि आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यात वाहनांची वाढणारी गर्दी लक्षात घेता महापालिकेच्या बांधकाम विभागाने एकूण २७६ कोटी रुपयांच्या खर्चातून द्वारका ते नाशिकरोड रस्ता दहा पदरी करण्याचा प्रस्ताव न्हाईला सादर केला आहे. न्हाईने त्यास हिरवा कंदील देत हा रस्ता महापालिकेकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे. सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर रस्ता रुंदीकरणाच्या कामाला वेग देणे गरजेचे असल्यामुळे महापालिकेने रुंदीकरणासाठी आवश्यक रस्त्याच्या डाव्या बाजूकडील क्षेत्राचे डिमार्केशन करत भूसंपादनाची प्रक्रिया सुरू केली आहे. मौजे नाशिक शिवारातील स.नं. ८४७/१/१-१/२/१/१ नगररचना योजना क्रमांक २ पैकी मधील ४५ मीटर रुंद विकास योजना रस्त्याने डाव्या बाजूने बाधित होत आहे. या बाधित क्षेत्राकरिता एकीकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली २०२० मधील विनयम क्रमांक ११.२ नुसार हस्तांतरणीय विकास हक्क (टीडीआर) / संलग्न उर्वरित जागेत चटई क्षेत्र निर्देशांकाच्या मोबदल्यात बाधित क्षेत्र मनपाच्या ताब्यात देण्यात यावे, अशा आशयाच्या नोटिसा मनपाकडून संबंधित जागामालक तसेच शासकीय यंत्रणांना बजावल्या आहेत. जागामालकांना जमिनीच्या मोबदल्यात टीडीआर मिळविण्यासाठी वास्तुविशारदांमार्फत मनपास प्रस्ताव सादर करावा लागणार आहे. एकीकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीतील तरतुदीनुसार आपल्या प्रस्तावावर नियमोचित निर्णय घेण्यात येईल, असे महापालिकेने जागामालकांना पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे.

‘देआसरा उद्योजकता पुरस्कार २०२६’ साठी अर्ज प्रक्रिया सुरू

‘देआसरा उद्योजकता पुरस्कार २०२६’ साठी अर्ज प्रक्रिया सुरू ६ विजेत्यांना रोख रक्कम आणि सन्मानचिन्हाने गौरवणार; ४ एप्रिल रोजी पुण्यात वितरण पुणे : उद्योग क्षेत्रात आपला ठसा उमटवू इच्छिणाऱ्या उद्योजकांसाठी प्रतिष्ठेच्या मानल्या…

खेळाडूंच्या पदयात्रेने पुण्यात शिवजयंती साजरी

खेळाडूंच्या पदयात्रेने पुण्यात शिवजयंती साजरी पुणे: जिल्हा प्रशासन, क्रीडा विभाग आणि पुणे महानगरपालिका यांच्या समन्वयाने पुण्यात शिवजयंती  ‘मेरा युवा भारत’’  पदयात्रेत  खेळाडूंच्या उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.  पुणे महानगरपालिकेच्या महापौर मंजुषा नागपुरे यांच्या हस्ते झेंडा दाखवून पदयात्रेचा शनिवार वाडा येथून शुभारंभ करण्यात आला. यावेळी उपमहापौर परशुराम वाडेकर, क्रीडा उपसंचालक युवराज नाईक, जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे, शिक्षण उपायुक्त वसुंधरा बारवे, मनपा उपायुक्त संदीप खलाटे, जिल्हा प्रशासनाच्या वतीने तहसीलदार स्मिता माने,अर्जुन पुरस्कार प्राप्त काका पवार, भारतीय  खो खो संघाचे कर्णधार प्रतीक वायकर, महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे सहसचिव  शैलेश टिळक,  लेखक संजय दुधाणे शिक्षण, पर्यटन, क्रीडा, आरोग्य व पोलीस विभागाचे अधिकारी उपस्थित होते. ऑलिंपिकवीर खाशाबा जाधव यांचे पुस्तक देऊन मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. महापौर श्रीमती नागपुरे म्हणाल्या, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आपण अंगीकारले पाहिजेत. शिवजयंती ही औपचारिक मिरवणूक न राहता ती तरुण पिढीला महाराजांच्या विचारांशी जोडणारी, सगळ्यांमध्ये सांघिक भावना निर्माण करणारी ठरावी. आपले सण- परंपरा सर्वांनी एकत्र येऊन साजरे केले पाहिजेत. सर्व महानुभाव, युगपुरुषांच्या जयंती एकत्र येऊन साजरे करुया सर्वांमध्ये सांघिक भावना निर्माण होऊन शिवरायांचे विचार आचरणात यावेत, असा संकल्प यानिमित्ताने करुया, असे त्या म्हणाल्या. युवा पिढीने थोरा मोठ्यांचा वारसा जतन करावा, तरुण पिढीमध्ये ऊर्जा नवसंकल्पना जागृत करण्याच्या उद्देशाने या पदयात्रेचे आयोजन करण्यात आल्याचे  लकडे यांनी प्रास्ताविकात सांगितले. सूत्रसंचालन संदिप घोलप केले तर आभार शिवाजी कोळी यांनी मानले.  या पदयात्रेचा शनिवार वाडा येथून शुभारंभ होऊन एस एस पी एम शाळेजवळील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ समारोप करण्यात आला. ढोल ताशांच्या गजरात आणि जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव, छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.  पदयात्रेत पारंपरिक वेशभूषेत राष्ट्रीय छात्र सेना, राष्ट्रीय सेवा योजना, उच्च शिक्षण, तंत्रशिक्षण, व्यवसाय शिक्षण, सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या  २ हजार विद्यार्थी- विद्यार्थीनी सहभाग घेतला.

नाशिक-पुणे रेल्वे मार्ग, आता लढा विद्यार्थ्यांच्या हाती!

नाशिक-पुणे रेल्वे मार्ग, आता लढा विद्यार्थ्यांच्या हाती! हरिभाऊ लाखे नाशिक – नाशिक-पुणे जलदगती रेल्वेमार्ग मूळ प्रस्तावित सरळ मार्गाने नेण्यात यावा, यासाठी चाललेल्या लढ्याला जनआंदोलनाचे व्यापक रूप देण्यासाठी विद्यार्थ्यांनी अग्रस्थानी राहण्याची आवश्यकता असल्याकडे लक्ष वेधत नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजीत तांबे यांनी तरुण व विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्र्यांना आपल्या भावना पत्राद्वारे कळवण्याचे आवाहन केले आहे. संगमनेर व अकोले तालुक्यात ही मोहीम सुरू असून आता तिचा विस्तार सिन्नर तालुक्यातही झाला आहे. सिन्नर रेल्वे कृती समितीने तालुक्यातील शाळा, महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांसह नागरिकांना लोकशाही मार्गाने आपली भूमिका पत्र मोहिमेतून शासनापर्यंत पोहोचवण्याचे आवाहन केले आहे. नाशिक–पुणे जलदगती रेल्वे मार्गासाठी नाशिक- सिन्नर– अकोले– संगमनेर– नारायणगाव– राजगुरुनगर– चाकण या मार्गाचे मूळ संरेखन होते. रेल्वे मंत्रालयाने त्यात बदल करून पुणे– अहिल्यानगर– पुणतांबा– साईनगर शिर्डी–नाशिक असा नवीन मार्ग निश्चित केल्यापासून मूळ मार्गावरील गावांमध्ये असंतोष आहे. ठिकठिकाणी आंदोलने होत आहेत. नाशिक-पुणे जलदगती रेल्वे ही आपल्या हक्काची आहे. हा हक्क मिळवण्यासाठी आपला संघर्ष अधिकाधिक तीव्र करावा लागेल. ही लढाई एकाच वेळी अनेक माध्यमातून लढावी लागणार आहे, असे आमदार सत्यजीत तांबे यांनी म्हटले आहे. लोकप्रतिनिधी म्हणून विधिमंडळात आपण ही लढाई लढत आहोत. प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा केला जात आहे. यासाठी सर्व लोकप्रतिनिधींनी एकजूट करून मुख्यमंत्र्यांकडे हा विषय नेला जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या लढ्याला खऱ्या अर्थाने जनआंदोलनाचे रूप देण्यासाठी ज्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हा लढा लढला जात आहे, त्या युवकांनी व विद्यार्थ्यांनी पुढे येण्याची गरज आ. तांबे यांनी मांडली. संबंधितांनी पत्राद्वारे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आपली भावना कळवण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या आवाहनानुसार संगमनेर व अकोले तालुक्यात ही मोहीम सुरू झाली आहे. आता ही पत्र मोहीम सिन्नर तालुक्यातही राबविली जाणार असल्याचे सिन्नर तालुका रेल्वे कृती समितीचे पदाधिकारी बबन वाजे यांनी सांगितले. पत्रातून आपला आवाज सरकारपर्यंत पोहोचवूया, अशी ही मोहीम आहे. या माध्यमातून हा रेल्वे मार्ग बदलल्यास आमच्या भागातील मुलांचे शिक्षण, पालकांचा रोजगार व विकास थांबेल. त्यामुळे भविष्यासाठी मूळ सरळ रेल्वे मार्ग कायम ठेवा, अशी विनंती विद्यार्थ्यांकडून पत्राद्वारे केली जात आहे. रेल्वे मार्ग परिसरातील नागरिकांना पत्र मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आल्याचे वाजे यांनी सांगितले. मार्ग बदलल्यास मूळ मार्गावरील भाग विकासाच्या मुख्य प्रवाहापासून दूर जाईल, तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक संधी कमी होतील, शेतकऱ्यांच्या मालास बाजारपेठ मिळणे कठीण होईल, आदींकडे लक्ष वेधले जात आहे.