Category: महाराष्ट्र

Maharashtra News

जिल्हा क्रीडा संकुलाच्या माध्यमातून विविध सुविधा

जिल्हा क्रीडा संकुलाच्या माध्यमातून विविध सुविधा पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत निर्णय रत्नागिरी : (अशोक गायकवाड )–जिल्हा क्रीडा संकुलाच्या माध्यमातून सुरु असलेल्या सुविधा जलतरण तलाव, व्यायामशाळा, तायक्वांदो हॉल, बॅडमिंटन आणि बास्केटबॉल कोर्ट जिल्हा क्रीडा संकुल स्वत: चालवेल, दुसऱ्या कोणत्याही बाह्य यंत्रणेला देणार नाही, असा धोरणात्मक निर्णय पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा क्रीडा संकुल कार्यकारी समितीच्या बैठकीत घेण्यात आला. शासकीय विश्रामगृहात झालेल्या या बैठकीला आमदार किरण सामंत, जिल्हाधिकारी मनुज जिंदल, नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे, अपर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, जि. प. उपाध्यक्ष विलास चाळके आदी उपस्थित होते. जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे यांनी विषय पत्रिकेचे वाचन करुन सविस्तर माहिती दिली. पालकमंत्री डॉ. सामंत म्हणाले, फ्लोरींग करिता १ कोटी ९८ लाख रुपये ची निविदा स्थानिक स्तरावर प्रसिध्द करावी. त्यानुसार कामकाम करुन घ्यावे. उत्तम प्रशिक्षक ठेवून त्यांना चांगल्या पगारावर नेमणूक करावी आणि जिल्हा क्रीडा संकुलाने सर्व स्वत: चालवावे. व्यावसायिक बाह्य यंत्रणेला चालविण्यास देऊ नये. सेवाशुल्क, अग्नीसेवा शुल्क माफ करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला. मालगुंड येथील प्राणी संग्रहालयाची निविदा पुढील आठवड्यामध्ये मार्गी लावण्याची सूचना देऊन पालकमंत्री म्हणाले, महावितरणने सिंगल फेज वरुन थ्री फेज करण्याची मोहीम हाती घ्यावी. एमआयडीसी परिसरातील अतिक्रमणे तसेच अनावश्यक उभे असणारे होर्डींग काढावेत. स्थानिकांसाठी त्याबाबत धोरण ठरविले जाईल. तज्ज्ञ व्यक्तींच्या मार्गदर्शनाखाली आवश्यक त्या ठिकाणीच विशेषतः डाजिटल होर्डींग उभी करण्याबाबत नगरपरिषदेने नियोजन करावे. यानंतर छत्रपती शिवाजी महाराज ग्रंथालय, ध्यान केंद्र इमारत, अल्पसंख्यांक वसतिगृह इमारत, एनसीसी इमारत, रत्नागिरी नगरपरिषद घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाबाबत बैठक झाली.

मतदारयादी होणार ‘अपडेटेड’ अन् ‘स्मार्ट’!

मतदारयादी होणार ‘अपडेटेड’ अन् ‘स्मार्ट’! मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम् यांचे नाशिकमध्ये कडक निर्देश हरिभाऊ लाखे नाशिक : जिल्ह्यातील मतदारयादी अद्ययावत आणि अचूक अशी तयार करावी. मतदारयादी तयार करताना कोणत्याही प्रकारच्या त्रुटी ठेवू नयेत, अशा सूचना मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम् यांनी येथे दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहामध्ये मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम् यांच्या अध्यक्षतेखली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मनपा आयुक्त मनीषा खत्री, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रतिभा संगमनेरे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मधुमती सरदेसाई, सहायक जिल्हाधिकारी डॉ. पवन दत्ता (इगतपुरी), कश्मिरा संखे (कळवण), मालेगाव मनपाचे आयुक्त रवींद्र जाधव यांच्यासह जिल्ह्यातील सर्व मतदार नोंदणी अधिकारी, सहायक मतदार नोंदणी अधिकारी उपस्थित होते. मुख्य निवडणूक अधिकारी यांनी सांगितले की, २००२ च्या यादीतील नावांची स्वयंजुळवणी तसेच कुटुंबातील एका मतदाराच्या नावावरून अन्य सदस्यांच्या नावांच्या जुळवणी कामाला गती द्यावी. मतदारांची अस्पष्ट छायाचित्रे, निरर्थक नोंदी दुरुस्तीसाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांनी घरोघरी प्रत्यक्ष भेट देत सुस्पष्ट रंगीत छायाचित्र संकलित करून बीएलओ अॅपमध्ये अपलोड करावीत. तसेच समान नाव आणि छायाचित्र असलेल्या मतदारांशी प्रत्यक्ष संपर्क साधत दुरुस्ती करून घ्याव्यात, मतदारांचे अर्ज क्रमांक सहा, सात आणि आठ वर तत्काळ कार्यवाही करावी. कोणतेही अर्ज १५ दिवसांपेक्षा जास्त कालावधीत प्रलंबित राहणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. मतदारांनी संपर्क केल्यावर त्यांना तत्काळ प्रतिसाद द्यावा. त्यासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून घ्यावे. मतदार नोंदणीबाबत नागरिकांमध्ये व्यापक प्रमाणात जनजागृती करावी, असेही चोक्कलिंगम् यांनी दिले. जिल्ह्यात ५१ लाख ५६ हजार मतदार जिल्हाधिकारी प्रसाद यांनी सांगितले की, जिल्ह्यात विधानसभेचे १५ मतदारसंघ असून, एकूण ५१ लाख ५६ हजार मतदार आहेत, या मतदारांपैकी २००२ मध्य विशेष सखोल पुनरीक्षण करून तयार झालेल्या यादीशी विद्यमान मतदारांची नावे जुळवणी करण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत १५ लाख १६ हजार मतदारांच्या जुळवणीचे काम पूर्ण झाले आहे. या कामाचा नियमितपणे आढावा घेण्यात येईल, असेही त्यानी सांगितले.

अशोक खरात प्रकरण म्हणजे सत्ता, संपत्ती, लैंगिक शोषण, बुवाबाजी या धोकादायक संगनमताचे उदाहरण – संजय बनसोडे

अशोक खरात प्रकरण म्हणजे सत्ता, संपत्ती, लैंगिक शोषण, बुवाबाजी या धोकादायक संगनमताचे उदाहरण – संजय बनसोडे अनिल ठाणेकर पुणे : नाशिक येथील भोंदू अशोक खरात प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडले आहे. या प्रकरणाकडे केवळ एका व्यक्तीच्या गुन्ह्याच्या रूपात पाहणे ही मोठी चूक ठरेल. हे प्रकरण म्हणजे “सत्ता, संपत्ती, लैंगिक शोषण, बुवाबाजी” या धोकादायक संगनमताचे स्पष्ट उदाहरण आहे. समाजातील असुरक्षितता, भीती आणि विविध समस्यांचा गैरफायदा घेत, तथाकथित अध्यात्म आणि ज्योतिषाच्या नावाखाली महिलांचे व सामान्य लोकांचे शोषण कसे केले जाते, याचे हे गंभीर चित्र आहे. या प्रकरणातून एक गोष्ट प्रकर्षाने समोर येते की अशा प्रकारची बुवाबाजी एकट्या व्यक्तीच्या जोरावर उभी राहत नाही. त्यामागे सामाजिक मान्यता, आर्थिक स्वार्थ आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे राजकीय व प्रशासकीय पातळीवरील प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संरक्षण असते. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी केवळ आरोपीपुरती मर्यादित न ठेवता, त्याच्या मागील संपूर्ण जाळ्याचा शोध घेणे अत्यावश्यक आहे, अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष संजय बनसोडे यांनी केली आहे. यावेळी डॉ. ठकसेन गोराने, विनायक सावळे, विजय परब, उत्तरेश्वर बिराजदार, सुधाकर काशीद, शहाजी भोसले, आरती नाईक, उत्तम जोगदंड, ॲड मनीषा महाजन, ॲड. परिक्रमा खोत आदी पदाधिकारी उपस्थित होते. अशोक खरात प्रकरणाची चौकशी स्वतंत्र विशेष तपास पथकाकडून (SIT) पूर्णपणे निष्पक्ष, निर्भय आणि पारदर्शक पद्धतीने व्हावी. कोणत्याही राजकीय किंवा प्रशासकीय दबावाला बळी न पडता संबंधित सर्व व्यक्तींवर कारवाई झाली पाहिजे. महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध व उच्चाटन अधिनियम, २०१३ या कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करण्यात यावी. या कायद्याची नियमावली तयार करण्याची रखडलेली प्रक्रिया शासनाने त्वरित पूर्ण करावी. प्रत्येक जिल्ह्यात विशेष पथके तयार करून अशा प्रकारच्या भोंदूगिरीवर तात्काळ कारवाई केली जावी. अशोक खरातच्या या भयंकर शोषणाच्या प्रकरणात फलज्योतिष हे प्रमुख साधन म्हणून वापरले गेले. स्वतःला तो अंक आणि हस्तरेषाशास्त्राचा तज्ञ म्हणून मिरवत होता. प्रत्यक्षात फलज्योतिष ही मोठ्या प्रमाणावर लोकांची दिशाभूल करणारी बुवाबाजी आहे. त्यामुळे जादूटोणा विरोधी कायद्यात फलज्योतिषाचाही समावेश करून त्यावर कायदेशीर नियंत्रण प्रस्थापित करावे. या प्रकरणातील सर्व पीडित महिलांची ओळख गोपनीय ठेवण्यात यावी. त्यांना कायदेशीर मदत, मानसोपचार आणि संरक्षण देण्यासाठी विशेष यंत्रणा उभी करावी. साक्ष देणाऱ्या महिलांना पूर्ण सुरक्षा दिली जावी.आरोपी व्यक्तीचे विविध राजकीय नेते, अधिकारी किंवा प्रभावशाली व्यक्तींशी असलेले संबंध उघड करून त्यांचीही चौकशी करण्यात यावी. दोषी आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी. राज्याच्या गृहमंत्र्यांनी याबद्दल स्वतंत्र निवेदन करावे.सर्व राजकीय पक्षांनी तथाकथित बुवा-बाबा, मांत्रिक आणि ज्योतिषी यांच्याशी असलेले संबंध तात्काळ तोडावेत. अशा व्यक्तींना सार्वजनिक पाठबळ देणाऱ्या नेत्यांविरोधात कारवाई करण्याची आचारसंहिता सर्व पक्षांनी तयार करावे.भारतीय राज्यघटनेने दिलेल्या वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या मूल्यांची अंमलबजावणी करण्यासाठी राज्याने व्यापक जनजागृती अभियान राबवावे. शाळा, महाविद्यालये आणि समाजपातळीवर विवेकवादी विचारांचा प्रसार करावा. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने ३ एप्रिल, शुक्रवार रोजी नाशिक येथे “फलज्योतिष आणि बुवाबाजी विरोधी संघर्ष परिषद” आयोजित करण्यात येणार आहे. तसेच फलज्योतिषविरोधी महाराष्ट्रव्यापी संघर्ष यात्रेचे आयोजनही करण्यात येणार आहे.हे प्रकरण केवळ गुन्हेगारीचा मुद्दा नाही, तर समाजातील अंधश्रद्धा, सत्तेचा गैरवापर आणि महिलांवरील अत्याचार यांचा संगम आहे. त्यामुळे यावर केवळ तात्पुरती कारवाई नव्हे, तर दीर्घकालीन धोरणात्मक बदलांची आवश्यकता आहे.महाराष्ट्रअंधश्रद्धा निर्मूलन समिती स्पष्टपणे सांगते की श्रद्धा ही वैयक्तिक असू शकते; परंतु श्रद्धेच्या नावाखाली होणारे शोषण, फसवणूक आणि अत्याचार हे गुन्हे आहेत आणि त्यांना कोणत्याही परिस्थितीत संरक्षण दिले जाऊ शकत नाही.समाज, शासन आणि राजकारण या सर्वांनी मिळून अशा प्रवृत्तींचा निर्णायक अंत करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे, हीच महा अंनिसची ठाम भूमिका आहे, असे संजय बनसोडे यांनी सांगितले.

नाशिकमध्ये गॅसचा ‘काळा खेळ’

नाशिकमध्ये गॅसचा ‘काळा खेळ’ २६ लाखांच्या मुद्देमालासह ४५७ सिलिंडर जप्त हरिभाऊ लाखे नाशिक – एलपीजी गॅसच्या टंचाईची ओरड एकिकडे होत असताना शहरात सिलिंडरचा काळाबाजार होत असल्याचे जिल्हा पुरवठा विभागाने सातपूर औद्योगिक वसाहतीत केलेल्या कारवाईतून उघड झाले. यावेळी ४५७ घरगुती-व्यावसायिक सिलिंडर आणि पाच वाहने असा सुमारे २६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी गॅस वितरकासह कर्मचारी अशा आठ जणांविरुद्ध सातपूर पोलीस ठाण्यात जिवनावश्यक वस्तू अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सातपूर औद्योगिक वसाहतीत सोमवारी रात्री हा प्रकार उघडकीस आला. महात्मानगर येथील समर्थ गॅस एजन्सीमधील हा माल आहे. घरगुती आणि व्यावसायिक एलपीजी सिलिंडर एका वाहनातून दुसऱ्या वाहनात संशयास्पदरित्या भरले जात होते. यासंदर्भातील माहिती मिळाल्यानंतर जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश गायकवाड, सहायक जिल्हाधिकारी अर्पिता ठुबे, अपर तहसीलदार अमोल निकम, एचपीसीएलचे भूपेन पाटील आणि बीपीसीएलचे राजकुमार यादव घटनास्थळी दाखल झाले. त्यांना मोठ्या संख्येने सिलिंडरचा साठा आढळला. चाके जमिनीत रुतलेल्या आणि नादुरुस्त वाहनातही मोठ्या संख्येने सिलिंडर होते. दोन मालवाहू वाहनेही सिलेंडर भरण्यासाठी उभी होती. पथकाने कर्मचाऱ्यांकडे विचारणा केली असता संबंधितांनी काळ्या बाजारात त्यांची विक्री केली जात असल्याचे मान्य केल्याचे पुरवठा विभागाने तक्रारीत म्हटले आहे. या कारवाईत सुमारे १३ लाख रुपयांची ४५७ घरगुती, व्यावसायिक गॅस सिलिंडर आणि तीन मालवाहू वाहने ताब्यात घेण्यात आली. काळ्या बाजारात गॅस सिलिंडरची विक्री केल्या प्रकरणी गॅस एजन्सीधारक हर्षल सरनाईक (वॉटरफ्रंट सोसायटी, जलालपूर) याच्यासह प्रवीण साळुंखे, समाधान सोळंकी, रवींद्र खंडाळे, सिद्धार्थ निराळे, तेजस आढळकर, प्रितम राजपूत, व्ही. प्रताप या कर्मचाऱ्यांविरुध्द सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इराण-अमेरिका, इस्रायल युद्धामुळे संपूर्ण देशात एलपीजी सिलिंडरचा तुटवडा भेडसावत आहे. सिलिंडरचा काळा बाजार जोमाने सुरू असल्याचे पुरवठा विभागाच्या कारवाईतून समोर आले. गोदाम, सिलेंडर वितरणाची छाननी समर्थ गॅस एजन्सीचे कार्यालय महात्मानगरला तर गोदाम विल्होळी येथे आहे. सिलिंडरचे वितरण नियमानुसार या दोनपैकी एका ठिकाणाहून होणे अपेक्षित असते. सातपूर औद्योगिक वसाहतीत एजन्सीने वाहन नेण्याचे काहीच कारण नव्हते. महत्वाचे म्हणजे ज्या वाहनात सिलिंडर आढळली. ते नादुरुस्त आहे, त्या वाहनाची चाके जमिनीत रुतलेली आहे. सिलिंडरच्या पावत्याही कर्मचाऱ्यांना सादर करता आल्या नाही. हा संपूर्ण घटनाक्रम संशयास्पद असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश गायकवाड यांनी सांगितले. प्रशासनाने एचपीसीएल कंपनीच्या अधिकाऱ्यांना पत्र दिले आहे. संबंधित एजन्सीच्या गोदाम व कार्यालयाची सखोल तपासणी करावी. मागील १० दिवसांत संबंधितांकडे किती गॅस सिलिंडर आले आणि त्यांनी किती सिलिंडरचे वितरित केले याची छाननी करून अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे. हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर प्रशासन पुढील कारवाई करणार आहे.

 सिंधुदुर्गातील आठही तालुक्यांमध्ये पंचायत समिती सभापती -उपसभापती महायुतीचेच…!

सिंधुदुर्गातील आठही तालुक्यांमध्ये पंचायत समिती सभापती -उपसभापती महायुतीचेच…! सर्व निवडी बिनविरोध…! सिंधुदुर्ग(प्रतिनिधी )– जिल्ह्यातील आठही पंचायत समित्यांमध्ये भाजपा आणि शिंदे सेनेचे सभापती आणि उप -सभापती बिनविरोध निवडून आले असून सर्व ठिकाणी महायुतीचाच  झेंडा फडकला आहे. कुडाळ पंचायत समितीच्या सभापतीपदी शिंदे सेनेचे मिलिंद नाईक तर उप -सभापती पदी भाजपाचे सिताराम तेली बिनविरोध विजयी झाले आहेत. विशेष म्हणजे नाईक हे तुळसुली गावचे तर तेली हे हुमरस गावचे सरपंच म्हणून कार्यरत होते. या निवडीनंतर सभापती दालनामध्ये भाजपा खासदार नारायण राणे आणि शिंदे सेनेचे आमदार निलेश  राणे यांचे फोटो लावण्यात येऊन महायुतीच्या विजयाच्या घोषणा देण्यात आल्या. मालवणमध्ये शिंदे सेनेच्या पोईप मतदारसंघातील सदस्या प्रज्ञा चव्हाण तर उप-सभापतीपदी भाजपाचे वायरी   – भूतनाथ मतदारसंघाचे सदस्य घनश्याम झाड यांची बिनविरोध निवड झाली. देवगडमध्ये भाजपाचे गणेश राणे हे सभापती झाले तर शिंदे सेनेचे अमोल लोके हे उप- सभापती बिनविरोध विजयी झाले आहेत. याठिकाणी महायुतीची निर्विवाद सत्ता आहे. कणकवली पंचायत समिती सभापतीपदी अपेक्षेप्रमाणे नांदगाव पं. स.मतदारसंघातून  बिनविरोध विजयी  झालेल्या हर्षदा वाळके यांची बिनविरोध निवड झाली आहे  तर उप-सभापतीपदी वरवडे पंचायत समिती मतदारसंघातून बिनविरोध विजयी झालेले राजेश उर्फ सोनू सावंत यांची बिनविरोध निवड झाली आहे. कणकवलीत  भाजपाचे १४ तर शिंदे सेनेचे दोन अशा १६ ही जागांवर महायुतीचीच सत्ता आहे. महायुतीचेच सर्व  उमेदवार विजयी होऊन  एकहाती सत्ता मिळाली आहे. वैभववाडीत सभापती आणि उप-सभापती हे दोन्ही भाजपाचेच असून दोघेही बिनविरोध निवडून आले आहेत.सभापतीपदी सिद्धेश दिलीप रावराणे तर उप- सभापतीपदी सौ. साची सचिन  कोलते या बिनविरोध निवडून आल्या आहेत. दोडामार्ग  तालुक्यात महायुतीची एकहाती सत्ता आल्याने सभापतीपदासाठी भाजपच्या पार्वती गवस यांची तर उप-सभापती पदासाठी गणेशप्रसाद गवस यांची बिनविरोध निवड झाली आहे. वेंगुर्ल्यात सभापतीपदी मातोंडचे भाजपा सदस्य शंकर घारे यांची बिनविरोध निवड झाली आहे. तर उप-सभापतीपदी शिंदे सेनेचे परुळे प. स.सदस्य सचिन देसाई यांची निवड झाली आहे. सावंतवाडीत शिंदे सेनेच्या सुस्मिता जाधव या सभापतीपदी बिनविरोध निवडून आल्या आहेत  तर उप-सभापतीपदी भाजपाचे गौरव मुळीक हे बिनविरोध निवडून आले आहेत.

 मूळ भाजपा कार्यकर्ते व राणे समर्थक यांच्यात पुन्हा एकदा वाद रंगणार…!

मूळ भाजपा कार्यकर्ते व राणे समर्थक यांच्यात पुन्हा एकदा वाद रंगणार…! जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांना पक्षविरोधी कारवाईबद्दल निलंबित करण्याची मागणी…! वेंगुर्ला (प्रतिनिधी)– सिंधुदुर्ग जिल्ह्यात नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आडेली जिल्हा परिषद मतदारसंघात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या मतदारसंघातील रहिवासी व स्वतःला भाजपचा सक्रिय कार्यकर्ता म्हणून ओळख करून देणारे समीर रुक्मांगद कुडाळकर यांनी प्रदेश भाजपा अध्यक्षांकडे निवेदन सादर करून जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष आणि राणे समर्थक भाजपा नेते मनीष दळवी यांच्या निलंबनाची मागणी केली आहे. कट्टर राणे समर्थक असलेले आणि जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांचे अत्यंत निकटवर्ती मानले जाणारे दळवी यांच्या विरोधात मुळच्या भाजपा कार्यकर्त्यांनी सुरुंग पेरायला सुरुवात केली असून यामागे ‘त्या ‘अदृश्य शक्तीचा हात असल्याची चर्चा भाजपा कार्यकर्ते आणि राणे समर्थक कार्यकर्त्यांमागे रंगली आहे. वेंगुर्ला तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये उमेदवारी निश्चित करण्याचे अधिकार पक्षाकडून मनीष दळवी यांना देण्यात आले होते. मात्र या अधिकारांचा वापर करताना स्थानिक कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता काही निर्णय घेतले गेल्याचा आरोप कुडाळकर यांनी या निवेदनात केला आहे. या निर्णयांमुळे तालुक्यात भाजपला अपेक्षित यश मिळाले नाही असे मतही त्यांनी व्यक्त केले आहे. आडेली जिल्हा परिषद मतदारसंघ हा मागील अनेक वर्षांपासून भाजपाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. या मतदारसंघात भाजपा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांचा प्रभाव आहे. या पार्श्वभूमीवर अनेक इच्छुक उमेदवार असतानाही मनीष दळवी यांनी स्वतःची उमेदवारी जाहीर करून निवडणूक अर्ज दाखल केल्याचे कुडाळकर यांनी निवेदनात म्हटले आहे. सुरुवातीला जिल्हा परिषदेसाठी आपण अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र पक्षाच्या आदेशानंतर आपण आपला अर्ज मागे घेतला. त्यानंतर मनीष दळवी यांनीही आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने आडेली मतदारसंघात भाजपचे अधिकृत उमेदवार नसल्याची परिस्थिती निर्माण झाली याकडे कुडाळकर यांनी लक्ष वेधले असून त्यामुळे पक्षाची प्रतिमा धोक्यात आल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे. यासोबतच वेंगुर्ला तालुक्यातील उमेदवारी वाटप, स्थानिक पदाधिकाऱ्यांशी संवादाचा अभाव, तसेच काही ठिकाणी अपक्ष उमेदवारांना दिलेल्या छुप्या  पाठिंब्याबाबतही कुडाळकर यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. या सर्व बाबींची पक्षाने चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी आपल्या निवेदनात केली आहे. निवडणूक काळात काही निर्णयांमुळे स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये नाराजी निर्माण झाली. याचा परिणाम निवडणुकीच्या निकालावर झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच वेंगुर्ला नगरपरिषद निवडणुकीच्या वेळीही स्थानिक पदाधिकाऱ्यांना पुरेसे महत्व दिले नसल्याची तक्रारही त्यांनी केली आहे. दरम्यान, कुडाळकर यांनी आपल्या निलंबनाबाबतही आक्षेप घेतला असून, त्यांनी पंचायत समितीची निवडणूक अपक्ष उमेदवाराविरुद्ध लढवली असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे पक्षातून केलेले त्यांचे निलंबन रद्द करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. या संदर्भात मनीष दळवी किंवा भाजपच्या संबंधित पदाधिकाऱ्यांची अधिकृत प्रतिक्रिया मिळू शकलेली नाही. मात्र स्थानिक पातळीवर या निवेदनाची चर्चा रंगली असून प्रदेशाध्यक्ष   याबाबत काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जि. प. आणि पंचायत समिती निवडणुकांनंतर या अदृश्य शक्तीने राणे समर्थकांचे वर्चस्व असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे आपले लक्ष वळवले असल्याची जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.

‘रहाडी’ मध्ये ‘धप्पा’

‘रहाडी’ मध्ये ‘धप्पा’ नाशिकमध्ये रंगपंचमीचा अपूर्व उत्साह हरिभाऊ लाखे नाशिक – ‘रहाड’ संस्कृतीमुळे वेगळी ओळख निर्माण झालेली नाशिकची रंगपंचमी अभूतपूर्व उत्साहात साजरी होत आहे. रंगांनी तुडूंब भरलेल्या शहरातील आठ रहाडींमध्ये उड्या मारण्यासाठी म्हणजेच ‘धप्पा’ मारण्यासाठी तरुणाईत चढाओढ सुरु आहे. रहाडींची विधीवत पूजा झाल्यानंतर रहाडींमध्ये रंगप्रेमी डुंबू लागले. नाशिकमध्ये होळी, धुलिवंदन नव्हे तर, रंगपंचमीच्या दिवशी रंग खेळला जातो. नाशिकमध्ये पेशवेकालीन अनेक रहाडी आहेत. रहाड म्हणजे पेशवेकाळात बांधलेले मोठे हौद. साधारणपणे एखाद्या छोट्या बारवप्रमाणे यांचे स्वरूप असते. दरवर्षी नाशिकमध्ये रंगपंचमीसाठी या रहाडी खोदल्या जातात. आणि रंगपंचमीनंतर पुन्हा त्या मातीने बुजविल्या जातात. या रहाडी प्रामुख्याने जुने नाशिक आणि पंचवटी परिसरात आहेत. त्यापैकी यंदाच्या रंगपंचमीसाठी आठ रहाडी तयार झाल्या. नाशिकमध्ये जुन्या काळात म्हणजेच १८ व्या शतकात १८ पेक्षा अधिक रहाडी होत्या, असे सांगितले जाते. त्यातील काही बुजल्या गेल्या. काही रहाडींच्या ठिकाणी वाडे बांधले गेले. त्यामुळे काही रहाडी कायमच्या अस्तंगत झाल्या. आता शहरातील आठ रहाडी रंगपंचमीसाठी तयार झाल्यात. त्यात शनी चौक, दिल्ली दरवाजा, तिवंधा, मधली होळी, तांबट लेन, शिवाजी चौक आणि दंडे हनुमान चौक येथील रहाडींचा समावश आहे. तसेच जुने नाशिकच्या मेनरोड भागातील राजेबहाद्दर लेन येथील रहाड सुमारे ८० वर्षानंतर यंदा उकरण्यात आली. अशाप्रकारे शहरात यंदाची रंगपंचमी आठ रहाडींमध्ये होतआहे. या प्रत्येक रहाडींची खोली साधारणपणे १० फूटपेक्षा अधिक असते. रंगपंचमीनिमित्त रविवारी सकाळपासून रहाडी वेगवेगळ्या रंगांनी भरण्यात आल्या. त्यात राजेबहाद्दर लेनमधील रहाडीत केशरी, शनी चौकातील रहाडीत गुलाबी, दिल्ली दरवाजा केशरी, तिवंधा पिवळा, मधली होळी केशरी, तांबट लेन केशरी, दंडे हनुमान चौकातील रहाडीतील रंग पिवळा, शिवाजी चौकातील रहाडीचा रंग लाल आहे. रहाडींमध्ये नैसर्गिक फुलांपासून तयार केलेले रंग टाकण्यात आले. प्रारंभी हा रंग मोठ्या भांड्यांमध्ये उकळविण्यात आला. त्यानंतर तो रहाडींमध्ये टाकण्यात आला. रहाडींचे पूजन झाल्यानंतर परंपरेनुसार मानकऱ्यांनी प्रथम रहाडीत उड्या मारल्या. त्यानंतर मग रहाडीत डुंबण्यासाठी एकच चढाओढ सुरु झाली. रंगपंचमी आणि महिला दिन एकाच दिवशी आल्याने जुनी तांबट लेने, मधली होळी आणि राजेबहाद्दर लेन येथील रहाडींमध्ये मानकऱ्यानंतर सर्वप्रथम महिलांना डुंबण्यास प्राधान्य देण्यात आले. महिलांसाठी खास वेळ ठरवून देण्यात आली होती. ती वेळ संपल्यानंतर पुरुषांनी रहाडींमध्ये झोकून देण्यास सुरुवात केली. मेनरोडवरील संत गाडगे महाराज चौकात सार्वजनिक रंगपंचमीसाठी खास शाॅवरची व्यवस्था करण्यात आली होती. संगीताच्या तालावर येथे तरुणाईची झुंबड उडाल्याचे दिसून आले.

 नुकसानग्रस्त आंबा काजू बागायतदारांच्या प्रश्नावर शासन सकारात्मक- नितेश राणे

नुकसानग्रस्त आंबा काजू बागायतदारांच्या प्रश्नावर शासन सकारात्मक- नितेश राणे ८५ टक्के नुकसानीचा यंत्रणेचा अहवाल कणकवली(प्रतिनिधी)–आंबा काजू आदी फळांवर सिंधुदुर्गचे अर्थकारण अवलंबून असून नुकसानग्रस्त शेतकरी बागायतदारांना राज्य सरकार नुकसान भरपाई देईलच,मात्र इथून पुढे अशी समस्या उद्भवू नये यासाठी बारामती येथील संशोधन संस्था आणि तंत्रज्ञानाचा वापर करून या फळ पिकांचे नुकसान होणार नाही याची खबरदारी घेण्याचा प्रयत्न शासन करील असे आश्वासन जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना दिले. या प्रश्नावर आंबा काजू बागायतदार शेतकरीआक्रमक झाले असून येत्या १२ मार्च रोजी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर बागायतदारांचा प्रचंड मोर्चा काढण्यात येणार आहे अशी घोषणा शेट्टी यांनी नुकतीच केली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी आज कणकवली येथे पत्रकार परिषद आयोजित करून या प्रश्नावर शासनाची भूमिका स्पष्ट केली.  ते म्हणाले की,आंबा उत्पादक आणि शेतकरी पूर्णतः हवालदिल झालेला आहे गेल्या ५०-६० वर्षात आंबा उत्पादकांनी सरकारकडे कधीच मदत मागितलेली नाही किंवा नुकसान भरपाई मागितलेली नाही.मागण्याची परिस्थितीही कधीचआलेली नाही. उलट जिल्ह्याचे अर्थकारण चालवण्यामध्ये आंबा -काजू उत्पादकांचा आणि मासेमारी करणाऱ्यांचा खूप मोठा हातभार आहे. आज शेतकरी अडचणीत आहे. राज्य सरकार मार्फत जो आढावा घेण्यात आला त्यावरून या विषयावर मंत्रिमंडळात दोन वेळा चर्चा झाली आपण स्वतःत्याचा सविस्तर आढावा घेतला. मुख्यमंत्र्यांचेही या विषयाकडे लक्ष वेधण्यात आले आहे.या विषयावर आपण सविस्तर बोललोही आहे. आणि आता राज्य शासनाकडे जो अहवाल आला आहे त्या अहवालानुसार निसर्गामुळे प्रामुख्याने निसर्गातील बदलामुळे जिल्ह्यातील आंबा काजू उत्पादनांचे ८० ते ८५ टक्के नुकसान झाले आहे असे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे शासनाने याची गंभीर दखल घेतली आहे. ‘आंबा काजू बागायतदारांच्या उत्पादकांच्या शिष्टमंडळांनी माझी भेट घेतली असता त्यांच्याशी झालेल्या चर्चेच्या वेळी नुकसान हा विषय आहेच पण त्याही पलीकडे काहींनी या प्रश्नावर कायमस्वरूपी स्वरूपी तोडगा काढण्यासाठी संशोधनात्मक उपाययोजना करता येणे शक्य आहे का याकडे माझे लक्ष वेधले त्यानंतर मी स्वतः काही परदेशी कंपन्या तसेच राज्यातील काही स्वयंसेवी संस्थांशी  संपर्क साधला  आणि या विषयावर अभ्यास सुरू केला बारामती येथील विकास प्रतिष्ठानच्या  काही तज्ञ्  मंडळींशी ही या विषयावर चर्चा केली असता या प्रश्नावर खबरदारीच्या उपायोजना करण्याच्या दृष्टीने मार्ग निघू शकतो हे लक्षात आल्यानंतर यासाठी चार ते साडेचार कोटी रुपये खर्च येईल आणि तो जिल्हा नियोजन मंडळातून करणे शक्य होईल यावर आपण निष्कर्षांस आलो आहोत. याबाबत लवकरच कार्यवाही करण्याच्या सूचना आपण संबंधितांना दिल्या आहेत’, असे राणे यांनी स्पष्ट केले. 12 मार्चच्या नियोजित  मोर्चा संबंधी बोलताना राणी म्हणाले या प्रश्नावर कोणी मोर्चा काढावा किंवा न काढावा हा त्यांच्या प्रश्न आहे मात्र या प्रश्नावर शासन पूर्णतः सकारात्मक आहे आंबा काजू बागायतदारांची आपण सतत संवाद करीत आहोत उद्याही आपण देवगड येथील बागायतदारांची चर्चा करणार आहोत असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

युद्ध इराण-अमेरिकेचे, पण नाशिकचा द्राक्ष उत्पादक कोलमडला!

युद्ध इराण-अमेरिकेचे, पण नाशिकचा द्राक्ष उत्पादक कोलमडला! अडीच हजार कोटींचा माल समुद्रात अडकला हरिभाऊ लाखे नाशिक : सहाव्या इराण-अमेरिका युद्धाची व्याप्ती दिवशी वाढली असून, इराणलगतच्या हॉर्मुझ खाडी आणि पर्शियन आखातात…

प्रा. रंजनाताई कवाडे यांच्या कुटुंबीयांची देवेंद्र फडणवीस यांनी घेतली सांत्वन भेट

प्रा. रंजनाताई कवाडे यांच्या कुटुंबीयांची देवेंद्र फडणवीस यांनी घेतली सांत्वन भेट नागपूर – आंबेडकरवादी चळवळीतील ज्येष्ठ मार्गदर्शक आणि शांत, संयमी व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रा. रंजनाताई कवाडे यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री…