Category: मुंबई

Mumbai news

पारंपारीक लोककलांचा अनुदान पॅकेजमध्ये समावेश – ॲड. आशिष शेलार

अनिल ठाणेकर ठाणे: महाराष्ट्राच्या समृद्ध लोककला परंपरेचे जतन, संवर्धन आणि प्रसार करण्यासाठी राज्य शासनाने लोककला अनुदान पॅकेजचा विस्तार करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यापुढे ‘नमन खेळे’, ‘जाखडी’, ‘वहीगायन’ आणि ‘झाडीपट्टी’ या चार पारंपरिक लोककलांचा लोककला अनुदान योजनेत समावेश करण्यात येणार असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी विधान सभेत  केली. महाराष्ट्राला लोककलेचा समृद्ध वारसा लाभला असून लोककला ही केवळ मनोरंजनाचे माध्यम नसून लोकप्रबोधन, सांस्कृतिक परंपरा आणि ऐतिहासिक वारशाची जपणूक करणारे प्रभावी माध्यम आहे. या लोककलांचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी शासन विविध लोककला महोत्सव आयोजित करत असून लोककलावंतांच्या कलापथकांना भांडवली व प्रयोगात्मक अनुदानही देत आहे. सन २००८ पासून तमाशा, दशावतार, शाहिरी, खडीगंमत आणि संगीतबारी या लोककलांना शासनाकडून अनुदान दिले जात आहे. आता या योजनेत नव्याने ‘नमन खेळे’, ‘जाखडी’, ‘वहीगायन’ आणि ‘झाडीपट्टी’ या लोककलांचाही समावेश करण्यात आला आहे. झाडीपट्टी रंगभूमी ही पूर्व विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यांतील १३० वर्षांहून अधिक परंपरा असलेली वैशिष्ट्यपूर्ण लोकनाट्य परंपरा आहे. वहीगायन ही धुळे, जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यांतील लोकप्रिय लोककला असून, नमन खेळे आणि जाखडी या कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांच्या सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य भाग आहेत. या योजनेअंतर्गत प्रत्येक लोककला प्रकारातील २० कलापथकांना प्रत्येकी ५० हजार रुपये या प्रमाणे प्रत्येकी १० लाख रुपये वार्षिक अनुदान देण्यात येणार आहे. त्यानुसार: झाडीपट्टी – २० कलापथके, एकूण १० लाख रुपये. वहीगायन – २० कलापथके, एकूण १० लाख रुपये. नमन खेळे – २० कलापथके, एकूण १० लाख रुपये. जाखडी – २० कलापथके, एकूण १० लाख रुपये असे स्वरूप राहणार आहे. ०००००००००

 मुंब्रा ड्रग्ज फ्री होणार!

 अजमल हकीम रूग्णालयात व्यसनमुक्ती आणि समुपदेशन केंद्र सुरू सर्वांच्याच प्रयत्नाने मुंब्र्यातील व्यसनाधिनता दूर होणार – मर्झिया शानू पठाण ठाणे -गेल्या काही दिवसांपासून मुंब्रा आणि परिसरातील अंमली पदार्थ विक्रीची जोरदार चर्चा…

 परप्रांतियांना जमीन विक्री करण्यास प्रतिबंध

 मुणगे ग्रामसभेचा महत्त्वपूर्ण निर्णय अनिल ठाणेकर ठाणे-  सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील मुणगे ग्रामपंचायतीच्या विशेष ग्रामसभेत गावातील शेतीजमीन, निवासी जागा आणि प्लॉट परजिल्ह्यातील किंवा परराज्यातील व्यक्ती, संस्था व कंपन्यांना विक्री करण्यास प्रतिबंध करण्याबाबत महत्त्वपूर्ण ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला आहे. २ जुलै २०२६ रोजी झालेल्या विशेष ग्रामसभेच्या ठराव क्रमांक १ (०३) नुसार, गावाची शेतीजमीन व निवासी जागा ही गावाच्या आर्थिक आणि सामाजिक विकासाचा मुख्य आधार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. अलीकडच्या काळात परजिल्ह्यातील आणि परराज्यातील व्यक्तींकडून मोठ्या प्रमाणावर जमीन खरेदी होत असून, भविष्यात या जमिनी विविध प्रकल्पांसाठी हस्तांतरित होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर गावाचे हित, पर्यावरण आणि सुरक्षितता जपण्यासाठी ग्रामसभेने निर्णय घेतला आहे की, गावातील कोणत्याही नागरिकाने आपली शेतीजमीन, निवासी जागा किंवा प्लॉट परजिल्ह्यातील अथवा परराज्यातील व्यक्तींना विकू नये. ठरावात पुढे असेही नमूद करण्यात आले आहे की, एखाद्या नागरिकाला अपवादात्मक परिस्थितीत जमीन विकण्याची आवश्यकता भासल्यास प्रथम प्राधान्य गावातील स्थानिक भूमिपुत्रांना द्यावे. तसेच जमीन विक्रीसंदर्भातील माहिती ग्रामपंचायतीच्या निदर्शनास आणून देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हा ठराव विशेष ग्रामसभेत उपस्थित ग्रामस्थांनी सर्वानुमते मंजूर केला. ठरावाचे सूचक योगेश प्रकाश सावंत तर अनुमोदक सुनील तुकाराम सावंत होते. दरम्यान, या निर्णयामुळे स्थानिक भूमिपुत्रांचे हित, शेती आणि गावाची जमीन बाहेरील व्यक्तींच्या ताब्यात जाण्यापासून वाचवण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. मात्र, अशा प्रकारच्या ठरावाची कायदेशीर वैधता आणि तो विद्यमान जमीन हस्तांतरणाच्या कायद्यांशी कितपत सुसंगत आहे, याबाबत अंतिम निर्णय संबंधित कायदे व सक्षम शासकीय प्राधिकरणांवर अवलंबून राहणार आहे. 00000000

तलावाचे मूळ क्षेत्रफळ जाहीर करा – नितीन देशपांडे

ठाणे : सततच्या पावसामुळे ठाण्यातील ऐतिहासिक मासुंदा (तलावपाळी) तलाव भरून ओसंडून वाहत असल्याच्या पार्श्वभूमीवर धर्मराज्य पक्षाने ठाणे महापालिकेवर (ठामपा) गंभीर आरोप केले आहेत. तलावाचे अधिकृत क्षेत्रफळ महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर जाणीवपूर्वक नमूद…

कोकणच्या पर्यावरणपूरक कृषी-औद्योगिक विकासावर १८ जुलैला रत्नागिरीत चिंतन बैठक

अनिल ठाणेकर ठाणे : कोकणच्या अपेक्षित भविष्यासाठी पर्यावरणपूरक कृषी-औद्योगिक विकासाची दिशा निश्चित करण्याच्या उद्देशाने शनिवारी, १८ जुलै २०२६ रोजी सकाळी ११ वाजता रत्नागिरी येथील नवनिर्माण कॉलेज, एस. एम. जोशी विद्यानिकेतन, मिरजोळे येथे चिंतन बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. कोकणातील उपलब्ध नैसर्गिक संसाधने, पर्यावरणीय समतोल, स्थानिक मनुष्यबळाची कुशलता आणि शाश्वत विकासाच्या संधी यांचा सर्वंकष विचार या बैठकीत केला जाणार आहे. पर्यावरणाला पूरक अशा कृषी व ग्रामीण उद्योगांची उभारणी, स्थानिक रोजगार निर्मिती, नैसर्गिक संपत्तीचे संवर्धन आणि विकासासाठी आवश्यक असलेल्या कृती कार्यक्रमांवर उपस्थितांमध्ये सविस्तर चर्चा होणार आहे. या बैठकीस सुभाष वारे आणि उपेंद्र टण्णू हे प्रमुख उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. विविध क्षेत्रातील अभ्यासक, पर्यावरणप्रेमी, शेतकरी, सामाजिक कार्यकर्ते, उद्योजक तसेच विकासाच्या प्रश्नांवर काम करणाऱ्या व्यक्तींनी या बैठकीत सहभागी होऊन आपले विचार मांडावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. या बैठकीतून कोकणच्या शाश्वत, पर्यावरणपूरक आणि लोककेंद्रित विकासाचा आराखडा तयार करण्यासाठी पुढील कृती कार्यक्रम निश्चित करण्याचाही प्रयत्न केला जाणार आहे. या बैठकीस उपस्थित राहण्याचे आवाहन निमंत्रक अभिजित हेगशेट्ये यांनी केले असून अधिक माहितीसाठी ९४२२०५२३१४ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

मुसळधार पावसात महापालिकेची आपत्कालीन मदत यंत्रणा फिल्डवर

नवी मुंबई : नवी मुंबईत १ जुलैपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असून ५ जुलैपासून अवघ्या पाच दिवसांत ७५२.२५ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. ताशी ६० ते ७०…

 राज्य कबड्डी संघटनेचे कबड्डी दिन पुरस्कार जाहीर

 दिनकर पाटील, शंकुतला खटावकर यांना जीवन गौरव मंगेश वरवडेकर यांना क्रीडा पत्रकार पुरस्कार मुंबई : मैदानावर कबड्डीपटूंवर अन्याय होताच आपल्या लेखणीला धार देणारे, खेळाडूंचा आवाज दाबताच व्यवस्थेला जाब विचारणारे आणि कबड्डीपटूंच्या हक्कासाठी प्रसंगी व्यवस्थेशी दोन हात करणारे आणि कबड्डीतील अन्यायाविरुद्धचा संताप आपल्या बातम्यांमधून सातत्याने मांडणारे दै. ‘सामना’चे क्रीडा पत्रकार मंगेश वरवडेकर यांच्या लढाऊ पत्रकारितेचा महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेने गौरव केला आहे. संघटनेने आपल्या २६ व्या कबड्डी दिनाचे औचित्य साधत त्यांना ज्येष्ठ पत्रकार पुरस्कार जाहीर केला असून त्याचबरोबर आपल्या विविध पुरस्कारांचीही घोषणा केली. तसेच कबड्डीसाठी आयुष्य झिजवणारे दिनकर पाटील (सांगली) आणि शकुंतला खटावकर (पुणे) यांना प्रतिष्ठेच्या कबड्डी जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. ज्येष्ठ खेळाडू, पंच, प्रशिक्षक, कार्यकर्ते, पत्रकार आणि गुणवंत कबड्डीपटूंवर यंदा पुरस्कारांचा अक्षरशः वर्षाव करण्यात आला आहे. येत्या १५ जुलै रोजी दुपारी ३ वाजता रत्नागिरीतील स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात रत्नागिरी जिल्हा कबड्डी संघटनेच्या वतीने हा दिमाखदार पुरस्कार वितरण सोहळा होणार असल्याची माहिती राज्य कबड्डी संघटनेने पत्रकाद्वारे दिली आहे. कबड्डी दिन पुरस्कार विजेते कबड्डी महर्षी शंकरराव (बुवा) साळवी कबड्डी जीवन गौरव पुरस्कार  : दिनकर पाटील (सांगली), शकुंतला खटावकर (पुणे). ज्येष्ठ पत्रकार : मंगेश वरवडेकर (दै. सामना), अलताफ कडकाले (दै. सकाळ) ज्येष्ठ कार्यकर्ते पुरस्कार : आत्माराम घेगडे, बंडूकांबळे, भरत मुळे, गिरीश नाईक, डॉ. दत्तात्रय शिंपी, वल्केश राऊत, खंडबाराव नाईक, प्रकाश पाटील, सय्यद अजगर अली पटेल, विलास सावंत. ज्येष्ठ पंच पुरस्कार : प्रकाश मोरे, रविंद्र लाड, अरुण पवार, अनिल शेजवळ, सूर्यकांत मुटके, वाल्मिक बागुल,मधुकर साळुंखे, हिरामण भोईर, बाळकृष्ण कडूस, रामदास गोळे. ज्येष्ठ खेळाडू पुरस्कार : सुरेश मोरे, शशिकांत कोरगांवकर, रवींद्र लवेकर,तुळसीदास रोकडे,ब्रह्मनाथ मेंगडे, सुदाम जोगदंड, अलका कारखानीस, मदन गायकवाड, रमेश देवाडीकर स्मृती श्रमयोगी कार्यकर्ता पुरस्कार- दीपक कांदळगांवकर (उपनगर), डॉ. शिवशंकर कापसे (हिंगोली), अरुणा गावडे (कोल्हापूर) कृतज्ञता पुरस्कार- निवृत्ती देसाई, सोपान काकडे, सदानंद जोशी, अभिजित राणे. फिदा कुरेशी स्मरणार्थ ज्येष्ठ प्रशिक्षक- नारायण गायकवाड (ठाणे),सुहास कदम (मुंबई उपनगर) किशोर व कुमार गट शिष्यवृत्ती विजेते किशोर गट : सुरज राठोड (रत्नागिरी), प्रशांत अकीगे (कोल्हापूर), ध्रुव डोंगरे (पालघर). किशोरी गट : आरती खांडेकर (पुणे), सेजल काकडे (नाशिक), ज्ञानेश्वरी ढवण (अहिल्यानगर), कुमार गट : शुभम बिटके (पुणे), जीतसिंग सैनी (ठाणे), अतुल जाधव (परभणी). कुमारी गट : संजना भोईर (पालघर), वैभवी जाधव (पुणे), सानिका पाटील(सांगली).…

 सर्वसमावेशक एकत्रित संयुक्त अहवाल केंद्राला पाठवू

कामगारमंत्री आकाश फुंडकर‌ यांचे कृती समितीला आश्वासन मुंबई: तज्ज्ञ समिती आणि कामगार संघटना यांच्यातील या विस्तृत चर्चेची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, त्यातून समोर आलेल्या निष्कर्षांचा आणि सूचनांचा अंतर्भाव करून एक सर्वसमावेशक एकत्रित संयुक्त अहवाल तयार करण्यात येईल. हा अंतिम अहवाल पुढील मंजुरी आणि कार्यवाहीसाठी केंद्रीय श्रम मंत्रालयाकडे सुपूर्द करण्यात येईल, असे सुस्पष्ट आश्वासन कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी दिले. कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे शिष्टमंडळाने विधानभवनात कामगार मंत्री आकाश फुंडकर यांची भेट घेतली त्यावेळी भारत सरकारच्या चार नवीन श्रम सहितांच्या  अनुषंगाने राज्य सरकारने तयार केलेल्या, महाराष्ट्र वेतन संहिता नियम, महाराष्ट्र औद्योगिक संबंध संहिता नियम, महाराष्ट्र व्यवसायिक सुरक्षा, आरोग्य व कामाची स्थिती संहिता नियम आणि महाराष्ट्र सामाजिक सुरक्षा संहीता नियम या चारही नियमावलीवर कामगार नेते आणि सचिवांची तज्ज्ञ कमिटी नेमून सविस्तर चर्चा करण्यात येऊन, संयुक्त अहवाल केंद्रीय श्रम मंत्रालयाला पाठवावा, अशी मागणी करण्यात आली. हा निर्णय घेण्यापूर्वी वरील नियमांची ‌अंमलबजावणी राज्यात न करण्याचे आश्वासन विधान भवनमध्ये बोलावलेल्या कामगार नेत्यांच्या बैठकीत राज्याचे कामगारमंत्री आकाश फुंडकर यांनी दिले. या संयुक्त बैठकीचा अहवाल केंद्रीय कामगार नेत्यांना पाठविण्याचे निर्देशही ‌सचिवांना दिले आहेत. केंद्र सरकारने चार श्रम संहिता देशात लागू केल्या आहेत. त्या संबंधातील नियमांची अंमलबजावणी महाराष्ट्र राज्यात करू नये, या मागणीसाठी कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने ३ जुलै रोजी आझाद मैदानावर धरणे ‌आंदोलन आयोजित करण्यात  आले होते. त्या पार्श्वभूमीवर कामगार नेत्यांच्या शिष्टमंडळाने राज्याचे कामगारमंत्री‌ ॲड. आकाश फुंडकर‌ यांची विधान भवननात भेट घेतली होती. मंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनानुसार कामगार नेत्यांच्या उपस्थितीत कामगार नेते आणि संबंधित सचिवांची विधान भवनात  बैठक पार पडली. या बैठकीला कामगार विभागाच्या अप्पर मुख्य सचिव आय. ए. कुंदन, उपसचिव दीपक पोकळे, स्वप्निल कापडणीस तसेच कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीचे डॉ.  कैलास कदम, गोविंदराव मोहिते, विवेक मोंटेरो, संजय वढावकर, निवृत्ती धुमाळ, सुकुमार दामले, संतोष चाळके, उदय भट, बजरंग चव्हाण मुकेश तिगोटे आदी मान्यवर कामगार नेते  उपस्थित होते. बैठकीदरम्यान कामगार मंत्री म्हणाले,  नवीन श्रम संहितांच्या अंमलबजावणीपूर्वी राज्यातील कामगार आणि कर्मचाऱ्यांच्या हितसंबंधांचे रक्षण करणे ही शासनाची प्राथमिकता आहे.  यासाठीच शासनाने मसुदा नियमावली जाहीर करून त्यावर हरकती व सूचना मागविल्या आहेत. या प्रक्रियेत पारदर्शकता आणि सर्वसमावेशकता राहावी म्हणून कामगार विभागाच्या वतीने चार स्वतंत्र तज्ज्ञ समित्यांची स्थापना करण्यात आलेली आहे. या तज्ज्ञ समित्यांनी कामगार संघटनांच्या संयुक्त कृती समितीसोबत समन्वय साधून सविस्तर चर्चा करावी. ही चर्चा केवळ नाममात्र न ठरता प्रत्येक मुद्द्यावर सखोल व्हावी, यासाठी कामगार विभागाने तातडीने बैठकांचे अधिकृत वेळापत्रक जारी करावे, अशा सूचना मंत्र्यांनी विभागाला दिल्या. या संवादाच्या माध्यमातून कामगार संघटनांनी मांडलेल्या सर्व रास्त मागण्या, सूचना आणि आक्षेप नोंदवून घेण्यात येतील. कामगारांचे हक्क आणि त्यांच्या सामाजिक सुरक्षिततेला कुठेही बाधा पोहोचणार नाही, याची काळजी राज्य शासन घेईल, असेही कामगार मंत्री म्हणाले.

वेंगसरकर क्रिकेट अकादमीच्या आरुष कोल्हेची इंग्लडमध्ये चमक

मुंबई : दिलीप वेंगसरकर क्रिकेट अकादमीचा १५ वर्षीय आयुष्य कोल्हे याने यंदाच्या इंग्लंड दौऱ्यात आपल्या अष्टपैलू कामगिरीने छाप पडली आहे. इंग्लंडमधील लीड्स येथील डॉक्टर समीर  पाठक जे तेथील क्रिकेट बियॉंड  बाऊंड्रीज या…

शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रेची धिंड काढा – रोहित पवार

केडीएमसी डॉक्टर मारहाण प्रकरणी रोहित पवार यांनी दिली शास्त्रीनगर रुग्णालयाला भेट कल्याण : डॉक्टरांना मारहाण करणारा नगरसेवक रमेश म्हात्रेची धिंड काढा, संध्याकाळ पर्यंत रमेश म्हात्रेला अटक न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी दिला. केडीएमसीच्या डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी बेदम मारहाण केल्यानंतर याचे तीव्र पडसाद उमटले असून या घटनेची महिती घेण्यासाठी आमदार रोहीत पवार डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात आले होते यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी बोलतांना रोहित पवार यांनी इथे कुठला आरोग्यमंत्री राज्यमंत्री आला का? श्रीकांत शिंदे आलेत का?  रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्ष इकडचे आमदार आहेत. चौथ्यांदा निवडून आले असे असतांना ते तरी आलेत का पाठबळ देण्यासाठी असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला. इलेक्शन आलं की एकमेकांच्या विरोधात खेळी करतात आणि सामान्य लोकांच्या जीवनाचा खेळ झाला तर येत नाहीत. असं असेल तर रवींद्र चव्हाण यांना पाचव्यांदा निवडून नाही दिले पाहिजे. खासदार श्रीकांत शिंदे यांनी ट्विट केलं मात्र त्यांनी इथे येऊन डॉक्टर नर्सेस यांना पाठबळ द्यायला पाहिजे होतं., असे मत रोहित पवार यांनी व्यक्त केले. शास्त्रीनगर रुग्णालयातील मारहाण झालेल्या डॉक्टर आणि परिचारिकांना रोहित पवार यांनी भेटून त्यांची विचारपूस केली आणि धीर दिला. शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेवकाने या देवदूतांना केलेली मारहाण ही सत्तेची मस्ती आणि गुंडगिरी असून याविरोधात सरकारला कठोर कारवाई करावीच लागेल असा इशारा त्यांनी दिला. यावेळी माजी खासदार विनायक राऊत, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते महेश तपासे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष वंडार पाटील यांच्यासह इंडियन मेडिकल असोसिएशनचे पदाधिकारी, काँग्रेस व शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.