Category: मुंबई

Mumbai news

 गंभीरपणे भाजलेल्या रुग्णांना खाजगी रुग्णालयात त्वरित उपचार मिळण्यासाठी महापालिकेने पॉलिसी आणावी

 नगरसेवक रफिक शेख यांची  मागणी मुंबई प्रतिनिधी जानेवारीमध्ये माझ्या प्रभागात मालाड येथे एका इमारतीमध्ये पहिल्या माळ्यावर गॅस सिलेंडरचा स्फोट झाला त्या स्फोटाचे परिणाम इतके गंभीर होते की दुसऱ्या मळ्यापर्यंत या स्फोटाची झळ पोहोचली होती. या स्फोटामुळे एकूण सात लोक जखमी झाले होते. त्यानंतर त्यातील पाच जणांचा हा दुर्दैवी मृत्यू झाला. नेमकी घटना अशी झाली की जेव्हा हा स्फोट झाला त्यानंतर या सगळ्या जखमी रुग्णांना त्वरित एका लोकल रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुविधा मिळाली परंतु त्या रुग्णालयामध्ये बर्न ओढ नसल्याने तेथे त्यांचा इलाज होऊ शकला नाही. त्यांना त्वरित शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु तिथे देखील बर्न वॉर्ड  हा कार्यान्वित नव्हता. त्यामुळे येथील रुग्णांना पुन्हा साधी वैद्यकीय सुविधा पुरवून त्यांना पुन्हा कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु या रुग्णालयात देखील बर्न वॉर्ड कार्यान्वीत नसल्याने या रुग्णांना पुन्हा केम रुग्णालय येथे दाखल करण्यात आले. या रुग्णालयातून चार रुग्णालयात शिफ्ट करण्यामध्ये रुग्णांचा फार मोठ्या प्रमाणात वेळ वाया जातो. यामुळे या रुग्णांना त्वरित उपचार न मिळाल्याने या रुग्णांचा जीव जातो असं माझा गंभीर आरोप आहे. या रुग्णालयातून विचार देण्यासाठी या रुग्णांकडे रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी पैसे मागितले. हे फार दुर्दैवी आहे. एकाच कुटुंबातील पाच जण जर जखमी असेल तर ते रुग्णांना डिस्चार्ज देण्यासाठी पैसे कसे देणार. तरी मुंबई महापालिकेच्या प्रत्येक वार्डामध्ये अशा भाजलेला रुग्णांना त्वरित उपचार मिळण्यासाठी खाजगी रुग्णालयात एक पॉलिसी आणावी जेणेकरून प्रत्येक रुग्णांना त्वरित आणि लवकर योग्य उपचार मिळेल  अशी मागणी नगरसेवक रफिक शेख यांनी महापौर रितू तावडे यांच्याकडे केली.

‘अनभिषिक्त देवदासी’ कादंबरीचा भव्य प्रकाशन सोहळा जल्लोषात संपन्न

मुंबई :काही कथा फक्त वाचल्या जात नाहीत. त्या मनाला हादरवून सोडतात. श्रद्धेच्या नावाखाली जे घडतंय, त्याला देव मान्यता देतो की समाज असा प्रश्नच आहे. मात्र गोपाल रायबोले यांच्या ‘अनभिषिक्त देवदासी’…

बोरिवली येथे अजिंक्यतारा मल्लखांब स्पर्धा उत्साही वातावरणात संपन्न

मुंबई : मल्लखांब लव संघ, सुविद्या प्रसारक संघ आणि आर्किटेक्चर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने बोरीवली (पश्चिम) येथे “५ वी अजिंक्यतारा मल्लखांब चषक  स्पर्धा” उत्साही वातावरणात नुकतीच संपन्न झाली. हि स्पर्धा मल्लखांब खेळातील अनभिषिक्त सम्राट कै. दत्ताराम दुदम यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात येते. मुंबई विभागीय स्तरावर झालेल्या या स्पर्धेत मुंबई उपनगर, मुंबई शहर, ठाणे, पालघर, रायगड या जिल्ह्यातील ५० संघांमधून जवळपास १ हजार पेक्षा जास्त खेळाडूंनी भाग घेतला होता. स्पर्धा प्रमुख म्हणून आशिष देवल व स्पर्धा सचिव म्हणून संचिता देवल यांनी  स्पर्धेची जबाबदारी उत्तमपणे पार पाडली. कर्ममूर्ती महादेव रानडे सर, मुंबईचे उपमहापौर संजय घाडी, नगरसेविका सीमा शिंदे, सुप्रसिद्ध कलाकार भाग्यश्री मिलिंद, ओंकार भोजने, समाजसेवक प्रशांत पाटील, एअर मार्शल गजेंद्र सर, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त पोलीस अधिकारी मंगेश नाईक, एअरफोर्स अधिकारी वाडकर सर, सुप्रसिद्ध उद्योजीका सोनाली कोचरेकर या मान्यवरांनी स्पर्धेला भेट देऊन खेळाडूंचा उत्साह वाढवला. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या स्पर्धेत सुविद्यालय शाळा, मुंबादेवी विद्यानिकेतन, दहिसर विद्यामंदिर, समता क्रीडा भवन, बोरीवली स्पोर्ट्स कल्चरल सेंटर, शैलेन्द्र एज्युकेशन सोसायटी, समर्थ व्यायाम मंदिर दादर, श्रीमा गुरुकुल ठाणे, रुतूराज स्पोर्ट्स अकादमी या संघांनी सर्वाधिक पारितोषिके पटकावली. भारतातील एकमेव पॅरा मल्लखांब स्पर्धा देखील यावेळी उत्साही वातावरणात पार पडली, यामध्ये ५० खेळाडूंनी सहभाग नोंदवला. या स्पर्धेचे मुख्य आकर्षण ठरलेल्या पॅरा मल्लखांब स्पर्धेतील खेळाडूंनी स्पर्धा आयोजकांचे कौतुक केले, तसेच स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंना उत्तम व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल मल्लखांब लव टीम चे आभार मानले. पुढील वर्षी या स्पर्धेत अधिक मोठ्या संख्येने खेळाडूंचा सहभाग असेल असा विश्वास स्पर्धा प्रमुख आशिष देवल यांनी व्यक्त केला.

मदार चषक कबड्डी स्पर्धेत महिला जेतेपदावर शिक्कामोर्तब

 राजमाता जिजाऊची निकिता पडवळ सर्वोत्तम खेळाडू मुंबई, दि. २२ (क्री.प्र.)-शेवटच्या चढाईपर्यंत श्वास राखायला लावणार्‍या क्रीडाप्रेमी आमदार सुनील राऊत यांच्या आमदार चषक कबड्डी स्पर्धेच्या महिला गटाच्या अंतिम सामन्यात मुंबईच्या शिवशक्ती महिला संघाने पुण्याच्या राजमाता जिजाऊविरुद्ध संघर्ष ३२-३० असा जिंकला आणि महिला कबड्डीत आपणच शक्तिशाली असल्याचे  पुन्हा एकदा दाखवून दिले. मात्र आजचा दिवस गाजवला तो निकिता पडवळच्या वेगवान-कल्पक चढायांनी. ती राजमाता जिजाऊच्या गळ्यात जेतेपदाची माळ घालण्यात थोडक्यात अपयशी ठरली असली तरी ती सर्वोत्तम खेळाडूच्या स्कुटरवर विराजमान झाली. विक्रोळी पूर्वेला टागोर नगरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त सुरु असलेल्या कबड्डी महोत्सवाच्या राज्यस्तरीय महिला गटाच्या अंतिम सामन्यात थराराने पुन्हा एकदा वातावरण पेटवले. उपांत्य सामन्यात शिवशक्तीच्या महिलांनी धर्मवीर कबड्डी संघाला तर राजमाता जिजाऊने डॉ. पतंगराव कदम संघावर सहज मात करत अंतिम फेरी गाठली. दोन्ही उपांत्य लढती एकतर्फी झाल्यामुळे हजारोंच्या संख्येने गर्दी करणार्‍या दर्दी कबड्डीप्रेमींची काहीशी निराशा झाली होती, पण अंतिम सामन्यातील संघर्षाने त्याची सव्याज भरपाई केली. शिवशक्ती आणि राजमाता जिजाऊ यांच्यातील सामना मुंबई विरुद्ध पुणे असा असला तरी कबड्डीप्रेमींनी दोन्ही संघांच्या खेळाला भरभरून दाद दिली. पहिल्या मिनिटापासून प्रत्येक गुणासाठी दोघांमध्ये चढाओढ पाहायला मिळाल्यामुळे जो शेवटपर्यंत लढणार तोच जिंकणार, याचे संकेत मिळाले. राज्याच्या महिला कबड्डीत कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या शिवशक्ती आणि राजमाता जिजाऊ संघांनी आपापल्या पहिल्या चढाईतच एकेक गुण मिळवत जोरदार सुरुवात केली. पुढे शिवशक्तीने चांगल्या पकडी करत आघाडी घेण्याचा प्रयत्न केला तर राजमाता जिजाऊच्या निकीताने त्या आघाडीशी बरोबरी साधणारा खेळ करुन सामन्यात रंगत आणली. पहिल्या डावात केवळ दोन खेळाडू मैदानात असलेल्या शिवशक्तीवर लोण चढवण्याची नामी संधी राजमाता जिजाऊला होती, निकीताच्या सुसाट खेळानेच त्यांना ही संधी मिळवून दिली. पण तेव्हाच शुभदा खोत आणि अपेक्षा टाकळे यांनी मगरमिठीसारखी निकीताची पकड करत आपल्यावर पडणार्‍या लोणला वाचवले. यामुळे शिवशक्तीने मध्यंतराला १४-११ अशी आघाडी मिळवली. मध्यंतरानंतर दोन्ही संघांमध्ये आघाडीसाठीचा संघर्ष आणखी तीव्र झाला. पण शिवशक्तीने शुभदा आणि रियाच्या चढायांमुळे आपली आघाडी २१-१२ अशी वाढवत सामन्यावर वर्चस्व मिळवले होते, पण तेव्हाही निकिताच्या आक्रमक चढायांनी राजमाता जिजाऊला पुन्हा सामन्यात आणण्याची किमया करून दाखवली.  त्यानंतर सामन्यातील थरार शेवटपर्यंत कायम राहिला. शेवटची दोन मिनीटे असताना शिवशक्तीवर पडलेल्या लोणने स्कोर २९-२८ वर आणला होता. विजयाची माळ कुणाच्या गळ्यात पडू शकत होती. पण झटापटीच्या त्याक्षणी शिवशक्तीने आपली आघाडी ३२-३० अशी नेत अवघ्या दोन गुणांच्या फरकाने जेतेपदाला गवसणी घातली. या थरारक सामन्याचे राणाप्रताप तिवारी यांनी आपल्या जोरदार आणि जल्लोषपूर्ण शैलीत निवेदन करून प्रेक्षकांचा उत्साह द्विगुणित केला. महिला विजेत्यांच्या पुरस्कारमध्ये वाढ आमदार सुनील राऊत यांनी महिला गटातील विजेत्यांना दिली जाणारी रोख रक्कम एक लाखावरून दीड लाख रुपयांपर्यत वाढवल्यामुळे अंतिम लढतीत हा पुरस्कार जिंकण्यासाठी दोन्ही संघांनी आपला सर्वोत्तम खेळ केला. विजेत्या शिवशक्तीला दीड लाख आणि आमदार चषकाने गौरविण्यात आले. राजमाता जिजाऊ पाऊण लाखांची मानकरी ठरली. मात्र त्यांच्या निकिता पडवळने स्कुटर जिंकली.सर्वोत्कृष्ट पकडपटूचा मानही त्यांच्याच ऋतुजा निगडेला मिळाला. शिवशक्तीची रिया मडकईकर सर्वोत्तम चढाईपटू ठरली. स्पर्धेचा पुरस्कार वितरण सोहळा आयोजक आमदार सुनील राऊत यांच्यासह माजी आमदार रमेश कोरगावकर, महिला विभागप्रमुख रश्मी पहुडकर, नगरसेवक दीपक सावंत, विश्वास शिंदे, म्युनिसिपल कामगार सेनेचे बाबा कदम, मुंबई उपनगर संघटनेचे अध्यक्ष अमोल कीर्तीकर,कार्याध्यक्ष सुधाकर घाग, सचिव राजेश पडेलकर, उपाध्यक्ष सदानंद माजलकर, संयुक्त सचिव राजेंद्र अनभवणे यांच्या उपस्थितीत पार पडला. बीपीसीएल-आयएसपीलमध्येच अंतिम लढत तीन दिवसांपूर्वी प्रभादेवीत ओम ज्ञानदीप क्रीडा मंडळाच्या कबड्डी स्पर्धेत जो अंतिम थरार अनुभवयाला मिळाला तोच थरार विक्रोळीतही पाहायला मिळणार आहे. पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात बीपीसीएलने आकाश पिकलमुंडे आणि मिलन दहिया यांच्या आक्रमक चढायांच्या बळावर मुंबई बंदरचा ३५-२२ असा सहज पराभव केला तर आयएसपीएलने ठाणे महानगरपालिकेचे आव्हान ४७-३२ असे मोडीत काढले. नीरज मिसाळ आणि अभिषेक गुंगे यांच्या तुफानी चढायांना रोखण्यात ठाणे पालिकेच्या खेळाडूंना अपयश आल्यामुळे मध्यंतरालाच २८-१४ अशा आघाडीसह आयएसपीएलने आपली अंतिम फेरी निश्चित केली होती. आता जेतेपदासाठी पुन्हा एकदा बीपीसीेएल आणि आयएसपीएल एकमेकांसमोर उभे ठाकणार असल्यामुळे बीपीसीएल पुन्हा विजेता होतो की आयएसपीएल आपल्या पराभवाचा वचपा काढतो याकडे कबड्डीप्रेमींचे लक्ष लागले आहे.

अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य

प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक मुंबई,: महाराष्ट्रातील रिक्षा, टॅक्सी तसेच ओला ,ऊबर इ-बाईक टॅक्सी सारख्या इतर व्यावसायिक अमराठी वाहनचालकांनी प्रवाशांशी मराठीतून संवाद साधणे अनिवार्य करण्याच्या निर्णयाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य शासनाने ठोस पावले उचलली आहेत. या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञ, साहित्यिक आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांसमवेत विशेष बैठक आयोजित केली आहे. शासनाने २०१९ मध्ये घेतलेल्या निर्णयानंतरही अनेक ठिकाणी त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याच्या तक्रारी पुढे आल्या आहेत. विशेषतः परप्रांतीय वाहनचालकांकडून प्रवाशांशी मराठीत संवाद साधला जात नसल्यामुळे प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे निदर्शनास आले आहे. याच पार्श्वभूमीवर हा विषय गांभीर्याने घेत राज्य शासनाने पुढाकार घेतला आहे. परिवहन विभागाच्या वतीने ‘महाराष्ट्र दिना’चे औचित्य साधत या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे. मराठी भाषेला नुकताच ‘अभिजात भाषा’ दर्जा मिळाल्याने या उपक्रमाला अधिक महत्त्व प्राप्त झाले असून, हा निर्णय केवळ प्रशासकीय न राहता अमराठी वाहनचालकांमध्ये मराठी भाषेबद्दल आत्मीयता निर्माण करणारा ठरावा, यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. या उपक्रमांतर्गत अमराठी वाहनचालकांना मराठी भाषेचे प्रशिक्षण देण्यासाठी अभ्यासक्रम तयार करण्यावर भर दिला जाणार आहे. मुंबई मराठी साहित्य संघाच्या अध्यक्षा श्रीमती उज्ज्वला मेहेंदळे तसेच ज्येष्ठ साहित्यिक प्रदीप ढवण, महेश केळुसकर, संतोष राणे, अशोक बागवे, बाळ कांदळकर, सुनील तांबे, शिवाजी गावडे, सतीश सोळांकुरकर, अरुण म्हात्रे, एकनाथ आव्हाड, प्रसाद कुलकर्णी, प्राचार्य अशोक चिटणीस, ज्येष्ठ साहित्यिका अनुपमा उजगरे, दीपा ठाणेकर आणि मनीषा राजपूत आदींच्या मार्गदर्शनामुळे या मोहिमेला अधिक बळ मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. या विषयावर सखोल चर्चा करण्यासाठी परिवहन आयुक्तही उपस्थित राहणार आहेत. आज परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी ११.०० वाजता ही बैठक होणार आहे. या बैठकीत मराठी भाषेची अनिवार्यता, अंमलबजावणीची रूपरेषा आणि प्रशिक्षणाचा आराखडा यावर व्यापक चर्चा होणार आहे. वाहनचालक आणि प्रवाशांमधील संवाद सुलभ करण्यासोबतच मराठी भाषेचा सन्मान राखण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वाचा टप्पा ठरणार असल्याचे मत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केले आहे.

 मुंबई–अहमदाबाद बुलेट ट्रेन ‘व्हायाडक्ट’वर ट्रॅक बसविण्याला वेग

 जपानी J-स्लॅब तंत्रज्ञानाचा भारतात प्रथमच वापर मुंबई : मुंबई–अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पात ‘व्हायाडक्ट’वर ट्रॅक बसविण्याच्या कामाला वेग आला असून, जपानी ‘शिंकान्सेन’ तंत्रज्ञानावर आधारित J-स्लॅब बॅलेस्टलेस ट्रॅक प्रणालीचा भारतात प्रथमच वापर होत आहे. ही प्रणाली RC ट्रॅक…

 चाळ परिसरातील सुशोभीकरण व ज्येष्ठ नागरिक विरंगुळा कट्ट्यावर तोडक कारवाई

 राजेश कदम यांच्या मध्यस्थी मुळे रेल्वे प्रशासनाने कारवाई तात्पुरती थांबविली कल्याण : डोंबिवली पश्चिम येथील रेल्वेच्या पडीक जागेत समाजसेवक व नवनिर्वाचित मनसे नगरसेवक प्रल्हाद म्हात्रे ह्यांनी स्व खर्चातून जे लाखो रुपये खर्च करून नंदनवन फुलविले होते, ज्येष्ठ नागरिक व त्या रस्त्याने जा ये करणाऱ्या थकल्या भागल्या जिवाला एक आसरा व विरंगुळा निर्माण झाला होता. वर्षानो वर्ष पडीक अश्या रेल्वेच्या जागेत जी जागा चरसी नश्या करणाऱ्या गुन्हेगारांसाठी अड्डा ठरलेली त्या जागेचे रूपांतर सुंदर विरंगुळा केंद्रात निर्माण झाले. त्या विरंगुळा केंद्रावर आज रेल्वे प्रशासनाने आपल्या अधिकारी आणि रेल्वे पोलिसांच्या मोठ्या फौजफाट्यासह जेसीबी मशीन सह अचानक तोडक कारवाई केली. ती जागा रेल्वेची असली तरी तेथे कुठल्याही प्रकारचा रेल्वे प्रकल्प येत नसताना, कुठलेही व्यापारीकरण नसताना नागरिकांना उपयोगात येणाऱ्या दुर्लक्षित जागेवर रेल्वेला अचानक कारवाई का करावीशी वाटली हा प्रश्न शिवसेना उपजिल्हा प्रमुख राजेश कदम यांनी उपस्थित करून तिथे उपस्थित राहून स्थानिक पोलिसांच्या माध्यमातून रेल्वेची ही दादागिरी मोडीत काढून जोवर रेल्वे तेथे काही करत नाही रेल्वे मालक असेल तरी नागरिकांना तोवर वापर करण्याचा अधिकार असावा ह्या समझोत्यावर आजची कारवाई थांबविण्यासाठी राजेश कदम यांनी यशस्वी मध्यस्थी केली. यावेळी नागरिकांनी सुद्धा मोठ्या संख्येने जमा होऊन रेल्वे प्रशासनाचा जाहीर निषेध केला व ज्येष्ठ नागरिकांना बसण्याचे बाकडे का पाडले असा जाब विचारला. या प्रसंगी प्रल्हाद म्हात्रे, तुषार शिंदे, जनार्दन म्हात्रे, केतकी पोवार व अनेक सामाजिक कार्यकर्ते हे देखील उपस्थित होते.

नाल्यातील विद्युत केबल्स धोकादायक

महापौरांचे तातडीचे निर्देश ठाणे :  नालेसफाई कामादरम्यान नाल्यातून गेलेल्या विविध प्राधिकरणांच्या विद्युत (केबल्स) अडथळा ठरत असून या केबल्समुळे नाल्यातील कचरा अडकून राहतो आणि पाण्याचा प्रवाह सुरळीत होत नाही. नालेसफाई व्यवस्थ‍ित होण्यासाठी नाल्यातून गेलेल्या विद्युत केबल्स एकत्रित करुन  केबल्स सुरक्षित राहतील व कामातही अडथळा निर्माण होणार नाही या दृष्टीने उपाययोजना करण्याचे निर्देश महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी महापालिका तसेच महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण, महाराष्ट्र विद्युत पारेषण महामंडळ तसेच टोरंट कंपनीच्या अधिकाऱ्यांना आज झालेल्या बैठकीत दिले. महापौर शर्मिला पिंपळोलकर व आयुक्त सौरभ राव यांनी मंगळवारी ठाणे शहरातील नालेसफाई कामाचा आढावा घेतला. या पाहणी दौऱ्यात नाल्यामध्ये महावितरण, टोरंट कंपनी यांच्या केबल्स अडथळा निर्माण करत असल्याचे निदर्शनास आले. या पार्श्वभूमीवर महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी महापौर दालनात संबंधित अधिकाऱ्यांची तातडीची बैठक आयोजित केली. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त २ प्रशांत रोडे, विरोधी पक्ष नेते शानू पठाण, शिवसेना गटनेते पवन कदम, भाजपा गटनेते मुकेश मोकाशी, उपायुक्त मधुकर बोडके, उपनगरअभ‍ियंता विकास ढोले, शुभांगी केसवानी आरोग्य अधिकारी डॉ. राणी शिंदे, महाराष्ट्र विद्युत पारेषण महामंडळाचे माणिक राठोड, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे कार्यकारी अभ‍ियंता चंद्रमणी मेश्राम, सतीश जाधव, टोरंट पॉवर कंपनीचे सन्होसेन खोब्रागडे, मदन धामुणसे आदी उपस्थित होते. नाल्यातून गेलेल्या केबल्सच्या जाळ्यामध्ये कचरा अडकणे, तसेच लोंबकळत असलेल्या केबल्समुळे नाल्यातील जेसीबीला अडथळा निर्माण होणे, केबल्स तुटणे, नाल्यात उतरुन काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना देखील या केबल्समुळे कर्मचाऱ्यांना अपघात होणे हे प्रकार घडत आहेत. यासाठी ज्या ज्या कंपन्याच्या केबल्स नाल्यामधून गेलेल्या आहेत त्यांनी तातडीने महापालिकेच्या अधिकाऱ्यांसमवेत पाहणी करुन सद्यस्थ‍ितीत या केबल्स एकत्रित करुन नाल्याच्या भिंतीला किंवा अन्य ठिकाणी एकत्रित करुन ठेवाव्यात अशा सूचना महापौरांनी आज झालेल्या बैठकीत दिल्या. तसेच याबाबत प्रत्येक कंपन्यांनी त्यांच्या स्तरावर बैठक आयोजित करुन भविष्यात नाल्यातील केबल्स या भूमीगत करता येतील किंवा कसे याबाबतच्या उपाययोजना तयार कराव्यात. तसेच भविष्यात ना्ल्यातून किंवा गटारातून कोणतीही केबल जाणार नाही या दृष्टीने नियोजन करावे. तसेच केबल्स टाकताना महानगरपालिकेची परवानगी घेवूनच सर्व कामे करण्याच्या सूचनाही महापौरांनी यावेळी दिल्या. तसेच जे प्राधिकरण परवानग्या न घेता केबल्स टाकतील अशांवर दंड आकारण्याबाबतही महापौरांनी सूच‍ित केले. 00000000

आनंदराव अडसूळ ट्रस्टतर्फे निवड कॅरम स्पर्धा २५ एप्रिलला

  मुंबई: आनंदराव अडसूळ चॅरिटेबल ट्रस्ट, को-ऑपरेटिव्ह बँक एम्प्लॉईज युनियन-मुंबई व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त होणाऱ्या सांघिक कॅरम स्पर्धेच्या अनुषंगाने अंतिम टप्प्यातील शालेय मुलामुलींसाठी विनाशुल्क निवड चाचणी कॅरम स्पर्धा २५ एप्रिल रोजी होणार आहे. दादर-पश्चिम येथे ही स्पर्धा रंगणार आहे. पहिल्या ८ विजेत्या-उपविजेत्यांना पुरस्कार असून त्यांना १ मेपासून होणाऱ्या सांघिक स्पर्धेसाठी थेट प्रवेश दिला जाणार आहे. १८ एप्रिलपासून सुरु झालेल्या कामगार व शालेय मुलामुलींच्या महाराष्ट्र व कामगार दिनानिमित्त साकारीत असलेल्या पूर्णपणे मोफत कॅरम उपक्रमास यंदाही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असल्यामुळे दर्जेदार आयोजनासाठी माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री व युनियनचे अध्यक्ष आनंदराव अडसूळ आणि पदाधिकारी सुनील साळवी, नरेंद्र सावंत, प्रमोद पार्टे, जनार्दन मोरे आदी विशेष कार्यरत आहेत. निवड झालेल्या खेळाडूंचे संघ निर्माण करण्यात येणार असून १ ते ३ मे दरम्यान अटीतटीचे सामने पाहण्यास मिळतील. शालेय खेळाडूंना तज्ञांचे मार्गदर्शन देखील मोफत लाभणार आहे. सदर शेवटच्या टप्प्यामधील उपक्रमात भाग घेऊ इच्छिणाऱ्या शालेय खेळाडूंनी प्रवेश अर्जासाठी अथवा अधिक माहितीसाठी संयोजक लीलाधर चव्हाण अथवा प्रमुख पंच चंद्रकांत करंगुटकर (९९८७८ ३१६२२) यांच्याकडे २३ एप्रिलपर्यंत संपर्क साधावा. ००००००००००

 शरीरसौष्ठवपटूंच्या पाठीवर राज्य शासनाकडूनही कौतुकाची थाप पडू दे

  – राष्ट्रीय विजेत्या शरीरसौष्ठवपटूंच्या कौतुक सोहळ्यात अध्यक्ष खानविलकरांचे शासनाला आवाहन मुंबई, दि.२० -जिंकायला दम लागतो आणि जिंकल्यावर पाठीवर पडलेली कौतुकाची थाप पुढच्या यशाची आग पेटवते. यंदा ही आग क्रीडाप्रेमी कुणाल केरकर यांनी शरीरसौष्ठवपटूंच्या नसानसांत पेटवली आहे. त्यांच्यासारख्या क्रीडाप्रेमींमुळे मुंबईच्या शरीरसौष्ठवाची ताकद आणखी बळकट झालीय. अशीच कौतुकाची थाप शासनाकडूनही आमच्या खेळाडूंच्या पाठीवर पडायला हवी. राजकीय व्यक्तींनी आमच्या खेळाला आपले बळ दिले तर शरीरसौष्ठवाचा बालेकिल्ला असलेली मुंबई अभेद्य होईल. त्याला कुणीही तोडू शकणार नाही, वाकवू शकणार नाही अशा शब्दांत मुंबई शरीरसौष्ठव संघटनेचे अध्यक्ष अजय खानविलकर यांनी  राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेतील विजेत्या मुंबईकर खेळाडूंचे कौतुक करत त्यांना प्रोत्साहन दिले. मुंबईच्या शरीरसौष्ठवपटूंनी पुणे येथे झालेल्या राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेत एक-दोन नव्हे तर १४ पदकांची कमाई करत मुंबईची ताकद अवघ्या हिंदुस्थानला दाखवली होती. या यशानिमित्त पदकविजेत्या खेळाडूंचे कुणाल केरकर यांनी मालाड पश्चिमेला आयर्न पॅराडाइज जिममध्ये कौतुक सोहळ्याचे प्रेरणादायी आयोजन केले ंहोते. गेल्या २५ वर्षांपासून फिटनेस क्षेत्रात सक्रिय असलेल्या कुणाल केरकर यांनी उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या खेळाडूंना व्यासपीठ मिळावे आणि नवोदितांना प्रेरणा मिळावी, या हेतूने या उपक्रमाचे आयोजन केले होते. त्यांचा हा पुढाकार शरीरसौष्ठवाला बळ देणारा ठरला. केरकर यांचे शरीरसौष्ठव आणि खेळाडूंवर असलेले प्रेम असेच बळ देणारे होत जावो, असे गौरवोद्गारही याप्रसंगी संघटनेचे सरचिटणीस राजेश सावंत यांनी काढले. याप्रसंगी केरकर यांनीही आपण खेळाडूंच्या पाठीशी सदैव उभे राहू, असे आश्वासन दिले. या कौतुक सोहळ्यानिमित्त हरमीत सिंग, उमेश गुप्ता, रेखा शिंदे, राजेश तारवे, संदीप सावळे, नीलेश दगडे, विश्वंभर राऊळ, नीलेश गुरव या सुवर्णविजेत्या खेळाडूंसह गणेश पेडामकर, ओंकार कळके, मनोज बोचरे, विशाल धावडे, अविनाश शिंदे, नीलेश रेमजे यांचे सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आले. तसेच आयर्न पॅराडाइजच्या प्रशांत घोलम, सिद्धांत यादव आणि क्षितीज साळुंखे या शरीरसौष्ठवपटूंनाही सन्मान चिन्ह आणि रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. या सोहळयाला शरीरासौष्ठव संघटनेचे किट्टी फणसेका, विशाल परब, सुनील शेगडे, राम नलावडे, किरण कुडाळकर, अशोक शेलार, राजेश निकम, जयदीप पवार, विजय झगडे आणि शरीरसौष्ठवातील दिग्गजांसह विजेत्या खेळाडूंचे कुटुंबीयही मोठ्या संख्येने उपस्थित होते.