Category: मुंबई

Mumbai news

 टिटवाळ्यात वीज प्रश्नावर नागरिक आक्रमक

एका दिवसात ७०० नागरिकांचा पाठिंबा कल्याण: टिटवाळ्यातील वाढत्या वीज समस्यांविरोधात सुरू झालेल्या जनआंदोलनाला नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळत असून, केवळ एका दिवसात ७०० हून अधिक नागरिकांनी सह्या करून आपल्या संतापाला वाट मोकळी करून दिली आहे. जनतहित फाउंडेशनचे संस्थापक रितेश कांबळे यांच्या नेतृत्वाखाली मांडा पूर्व येथील बँक ऑफ महाराष्ट्रसमोर सुरू असलेल्या या मोहिमेची सध्या संपूर्ण टिटवाळ्यात जोरदार चर्चा आहे. वारंवार होणारी वीज खंडित होणे, कमी-जास्त दाबाचा पुरवठा आणि वाढत्या गैरसोयींमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे, हजारो ग्राहकांकडून नियमित महसूल वसूल केला जात असतानाही मूलभूत सेवा सुरळीत मिळत नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर रितेश कांबळे यांनी लोकशाही मार्गाने नागरिकांना एकत्र आणत सह्या मोहीम सुरू केली. या मोहिमेला मिळालेला प्रतिसाद पाहता हा प्रश्न आता केवळ वीजपुरवठ्यापुरता मर्यादित राहिलेला नसून तो जन भावनांचा विषय बनल्याचे दिसून येत आहे. “आज नाही तर कधीच नाही” या भूमिकेतून अनेक नागरिक आंदोलनस्थळी येत असून, आपल्या हक्कासाठी आवाज उठविण्याची वेळ आता आल्याची भावना व्यक्त करत आहेत. केवळ सोशल मीडियावर नाराजी व्यक्त करून प्रश्न सुटणार नाहीत, तर संघटित लोकशक्तीच प्रशासनाला जागे करू शकते, असा सूर नागरिकांमधून उमटत आहे. दरम्यान, वीज समस्यांवर तातडीने आणि कायमस्वरूपी उपाययोजना न झाल्यास नागरिकांच्या सहभागातून आणखी मोठे जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही आंदोलनकर्त्यांकडून देण्यात आला आहे.

 मुंबईतील रस्त्यांवर पांढऱ्या पट्ट्यांबाबत नागरिकांमध्ये चर्चा

प्रशासनाकडून स्पष्टतेची अपेक्षा अनिल ठाणेकर ठाणे : मुंबईतील काही भागांमध्ये रस्त्यांच्या कडेला आणि फूटपाथवर पांढऱ्या रंगाच्या पट्ट्या मारल्या जात असल्याचे निदर्शनास आले असून, याबाबत नागरिकांमध्ये विविध चर्चा सुरू झाल्या आहेत. दादर, चर्नी रोड तसेच काही इतर भागांमध्ये अशा पट्ट्या दिसून आल्याने त्यांच्या उद्देशाबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.काही जैन धर्मीय संघटनांच्या मते, ही कृती धार्मिक श्रद्धेशी संबंधित असून, पायाखाली लहान जीव-जंतू चिरडले जाऊ नयेत यासाठी अशा प्रकारच्या खूणा केल्या जातात. मात्र, दुसरीकडे काही नागरिकांनी सार्वजनिक रस्ते आणि फूटपाथ यांचा वापर सर्वांसाठी समान असल्याचे सांगत अशा प्रकारच्या चिन्हांकनाबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. सार्वजनिक जागांवर कोणत्याही प्रकारचे रंगकाम अथवा चिन्हांकन करण्यासाठी संबंधित प्रशासनाची परवानगी घेण्यात आली होती का, याबाबत माहिती देण्याची मागणी होत आहे.नागरिकांचे म्हणणे आहे की, जर ही धार्मिक प्रथा असेल तर तिची माहिती आणि अधिकृत परवानग्यांविषयी प्रशासनाने स्पष्ट भूमिका जाहीर करावी. तसेच अशा प्रकारच्या कृतीमुळे भविष्यात कोणतेही गैरसमज किंवा सामाजिक तणाव निर्माण होणार नाहीत, याची काळजी घेणे आवश्यक आहे. शहरातील विविध धर्म, भाषा आणि संस्कृती यांचा सुसंवाद हे मुंबईचे वैशिष्ट्य मानले जाते. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या सार्वजनिक उपक्रमांबाबत पारदर्शकता आणि कायद्याचे समान पालन होणे आवश्यक असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत. दरम्यान, या पांढऱ्या पट्ट्यांचे स्वरूप, उद्देश, त्यासाठी घेण्यात आलेल्या परवानग्या आणि संबंधित नियमांविषयी मुंबई महानगरपालिका प्रशासनाने अधिकृत स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी काही नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे. मुंबई महानगरपालिका आयुक्तांनी या प्रकरणाची दखल घेऊन वस्तुस्थिती नागरिकांसमोर मांडावी आणि सार्वजनिक जागांच्या वापराबाबतचे नियम सर्वांसाठी समानपणे लागू करावेत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. ००००००००

‘पुरब की ठुमरी’तून सुनंदा शर्मा आणि मालिनी अवस्थींच्या सुरांची मेजवानी

१५ जून रोजी रविंद्र नाट्य मंदिरात कार्यक्रम मुंबई : महाराष्ट्र ललित कला निधीतर्फे आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या गुणिदास संगीत सम्मेलनाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त सुगम शास्त्रीय संगीताचा आगळावेगळा कार्यक्रम ‘पुरब की ठुमरी’ सोमवार, १५ जून रोजी…

 माझ्या नवऱ्याच्या हत्येला पालिका आणि पोलिस अधिकारी जबाबदार 

 मृत प्रताप चौधरी यांच्या पत्नीचा आरोप कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात अनधिकृत बांधकामांच्या विरोधात आवाज उठवणे एका व्यक्तीच्या जीवावर बेतल्याची अत्यंत धक्कादायक घटना डोंबिवलीत समोर आली आहे. डोंबिवलीतील खंबाळपाडा परिसरात काही दिवसांपूर्वी प्रताप चौधरी यांची त्यांच्याच घराजवळ निर्घृण हत्या करण्यात आली होती. या हत्याकांडानंतर आता मृत प्रताप चौधरी यांच्या पत्नी नेहा चौधरी यांनी थेट महापालिका प्रशासन आणि पोलिसांवर गंभीर आरोप करत खळबळ उडवून दिली आहे. अनधिकृत बांधकामाची तक्रार केल्यामुळेच आपल्या पतीचा जीव गेला असून, महापालिकेने वेळीच कारवाई केली असती तर आपले पती आज जिवंत असते, असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. याप्रकरणी नेहा यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना पत्र पाठवत या प्रकरणाचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपविण्याची मागणी केली आहे. डोंबिवली पूर्वेकडील खंबाळपाडा परिसरात राहणारे प्रताप चौधरी यांची त्यांच्या राहत्या घरात अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात टिळकनगर पोलिसांनी तातडीने तपास करत मुख्य आरोपी रोहित शेलार याला अटक केली आहे. मात्र, या हत्येमागे केवळ वैयक्तिक वाद नसून अनधिकृत बांधकामांच्या विरोधात दिलेली तक्रार कारणीभूत असल्याचे मृताच्या पत्नीने समोर आणले आहे. परिसरातील संबंधित अनधिकृत बांधकामाबाबत प्रताप चौधरी यांनी केडीएमसीकडे अधिकृतपणे वारंवार तक्रारी दाखल केल्या होत्या.  या तक्रारींचा पाठपुरावा करूनही महापालिका प्रशासनाने आजतागायत त्या बेकायदेशीर बांधकामावर कोणतीही ठोस कारवाई केली नाही. महापालिकेने वेळेत दखल घेऊन ते बांधकाम पाडले असते, तर आरोपींनी हे भयंकर पाऊल उचलले नसते आणि माझे कुंकू पुसले गेले नसते, असा उद्विग्न आरोप नेहा चौधरी यांनी केला आहे. नेहा चौधरी यांनी केवळ महापालिकेवरच नाही तर पोलीस यंत्रणेवरही प्रश्न उपस्थित केले आहेत. मुख्य आरोपी रोहित शेलार याला पोलिसांनी पकडले असले, तरी या संपूर्ण हत्येच्या कटात त्याला मदत करणारे आणि पाठीशी घालणारे इतरही अनेक चेहरे आहेत, असा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. केवळ एकाला पकडून तपास थांबवू नका, तर या हत्येचा कट रचणाऱ्या आणि आरोपीला मदत करणाऱ्या इतर सर्व सहआरोपींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. 0000000000

– उदय सामंत यांच्या कानात सांगणारा ‘तो’ भाजपा नेता कोण?

 मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांच्या पोस्टमुळे चर्चांना उधाण कल्याण : डोंबिवलीतील प्रसिद्ध श्री पिंपळेश्वर महादेव मंदिराला जागा देण्याच्या निर्णयामागे नक्की कोणते राजकारण होते, याबाबतची चर्चा शहरात सुरू झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केलेल्या एका खळबळजनक वक्तव्यामुळे महायुतीत वादाची ठिणगी पडली आहे. या जागेचा निर्णय होऊ नये म्हणून उद्योगमंत्री उदय सामंत यांना प्रचंड मानसिक त्रास दिला गेला आणि काही लोक त्यांच्या कानात येऊन या निर्णयाविरोधात बोलत होते, असा दावा चव्हाण यांनी केला होता. या राजकीय वादात आता मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी थेट उडी घेतली असून सोशल मीडियावर पोस्ट करत भाजपाला शिंगावर घेतले आहे. मंदिराच्या नावाने सुरू असलेले घाणेरडे राजकारण बंद करा, असे सुनावत त्यांनी उदय सामंत यांच्या कानात सांगणारा तो भाजपचा नेता कोण, त्याचे नाव जनतेसमोर उघड करण्याचे थेट आव्हान दिले आहे. या संपूर्ण वादामुळे भाजपामधील एका बड्या नेत्याकडे संशयाची सुई जात असून डोंबिवलीतील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. डोंबिवली येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी या जागेचा निर्णय होऊ नये म्हणून उद्योगमंत्री उदय सामंत यांना प्रचंड मानसिक त्रास दिला गेला, काही लोक त्यांच्या कानात येऊन या निर्णयाविरोधात सातत्याने बोलत होते, असा खळबळजनक दावा चव्हाण यांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर केला. चव्हाण यांच्या या वक्तव्यानंतर  स्वतः उद्योगमंत्री उदय सामंत यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे. तो संबंधित व्यक्ती कोण आहे, याची पूर्ण माहिती रवींद्र चव्हाण, खासदार श्रीकांत शिंदे आणि महायुतीतील इतर नेत्यांना चांगलीच ठाऊक आहे, असे सामंत यांनी म्हटले आहे.  हाच धागा पकडत मनसेचे  माजी  आमदार राजू पाटील यांनी या वादात थेट उडी घेतली आहे. त्यांनी सोशल मीडियावर उद्योगमंत्री उदय सामंत यांचा फोटो पोस्ट करत भाजपाला थेट शिंगावर घेतले आहे. पिंपळेश्वर महादेव मंदिराच्या नावाने सुरू असलेले हे घाणेरडे राजकारण तात्काळ बंद झाले पाहिजे, असा इशारा त्यांनी दिला. आमचे पिंपळेश्वर देवस्थान अत्यंत जागृत असून खोटे बोलणाऱ्यांचा देव नक्कीच आवाज बंद करेल, असा टोला त्यांनी लगावला. उगीचच हवेत संशयाच्या पुड्या सोडण्यापेक्षा, मंदिराला जागा मिळू नये म्हणून उदय सामंत यांच्या कानात सांगणारा तो भाजपचा नेता कोण, त्याचे नाव जनतेसमोर उघड करा, अशी ठाम मागणी राजू पाटील यांनी केली आहे. राजू पाटील यांच्या या आक्रमक पोस्टनंतर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. 000000000

– शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या तयारीला वेग

 सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे – भरत गोगावले अलिबाग, दि. १२ (प्रतिनिधी) : दुर्गराज रायगडावर तिथीनुसार २७ जून रोजी साजऱ्या होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या तयारीला वेग आला असून, सोहळा सुरक्षित, शिस्तबद्ध आणि यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी…

भातसा तलाव तळ गाठतोय

 मुंबईला पाणी कपातीचे संकट ओढावण्याची भिती अविनाश उबाळे ठाणे : कडक ऊन्हाळा वातावरणातील प्रचंड तापमान व पाण्याचे होणारे बाष्पीभवन यामुळे मुंबई महानगराला पाणी पुरवठा करणाऱ्या भातसा धरणाची पाणी पातळी ही पुर्णपणे खालावली आहे.धरणातील पाण्याने तळ गाठण्यास सुरुवात केल्याने भातसा तलावातील डोंगर,टेकड्या आता जलाशयातील पाण्याबाहेर डोकावू लागल्या आहेत.जून महिना उजाडला तरी अद्यापही पाऊस पडत नाही यंदा मान्सून लांबत असल्याचे चित्र दिसत आहे.पाऊस असाच लांबला गेला तर मग मात्र पुढील काळात पाणीकपातीला मुंबईला तोंड द्यावे लागेल अशी एकंदरीत परिस्थिती भातसा जलाशयाच्या पाणी पातळीवरुन दिसून येत सध्या धरणात केवळ २९.४५ टक्के एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे.जलाशयातील पाणी आटत चाल्याने पुढील काळात पाणी कपातीचे संकट ओढावण्याची भीती आहे.सध्यास्थिती धरणातून मुंबई व ठाणे शहरासाठी पाणीपुरवठा महापालिकांच्या मागणीनुसार सुरु असून सध्या सिंचनासाठी सोडण्यात येणारे भातसा उजवा कालव्याचे पाणी देखील बंद करण्यात आलेले आहे.तर जलाशयावरील १५ मेगाव्हॅट वीज केंद्र ही बंद करण्यात आलेले आहे.मुंबईला सर्वात जास्त पाणीपुरवठा करणारे धरण म्हणून भातसा जलाशयाची ओळख आहे.भातसा तलावातील पाणी जरी कमी झालेले असले तरीही जून अखेरीपर्यंत मुंबई व ठाण्याला तलावातून पाणीपुरवठा करणे शक्य आहे.एवढा पुरेसा पाणीसाठा भातसा धरणात शिल्लक असल्याचा दावा अभियंत्यांकडून व्यक्त केला जात आहे.शहापूर तालुक्यातील भातसा,तानसा, मोडकसागर,मध्यवैतरणा,धरणांतून प्रतिदिन ३ हजार ९०० एमएलडी इतके पाणी मुंबई ,व ठाणे शहरांना पुरविले जाते यात सर्वाधिक भातसा धरणातून प्रतिदीन जवळपास २२०० एमएलडी पाणी मुंबई व ठाणे महानगराला पुरविण्याची जबाबदारी भातसा जलाशयावर आहे.या धरणाची लांबी ९५९ मीटर असून तळपायापासून उंची ८९  मीटर आहे तसेच एकुण जलसंचय ९७६ .१० दशलक्ष घनमिटर आहे.तसेच धरणाचे पाणलोट क्षेत्र ३८८.५० चौरस किलोमिटर आहे.भातसा धरणाला जोडलेला उजवा तीर कालवा ६७ किलोमिटर आहे.सध्यास्थितीत धरणाची पाण्याची पातळी यंदा १११.०२ मीटर इतकी आहे.तर जलाशयात उपयुक्त साठा यंदा २७७.४९५ दशलक्ष घनमीटर इतका आहे. 00000

केडीएमसीतील अनागोंदीवर काँग्रेसचा हल्लाबोल

 सत्ताधाऱ्यांना अमित म्हात्रेंचा राजीनाम्याचा इशारा कल्याण : कल्याण-डोंबिवलीतील नागरिकांना आरोग्य, शिक्षण, परिवहन, पाणीपुरवठा, वीज, फुटपाथ आणि कचरा व्यवस्थापनासह अनेक मूलभूत समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या प्रश्नांवर प्रशासनाला जाब विचारत विरोधक म्हणून सत्ताधाऱ्यांचा पर्दाफाश करू, असा इशारा…

 नारायणराव आचार्य विद्यानिकेतन अजिंक्य

– मुंबई महापौर चषक ॲक्रोबॅटिक्स  जिम्नॅस्टिक्स स्पर्धा मुंबई : यजमान श्री नारायणराव आचार्य विद्यानिकेतन संघाने मुंबई महापौर चषक निमंत्रित ॲक्रोबॅटिक्स  जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत आपली विजयी परंपरा कायम राखताना विजेते पदाचा मान पटकावला. चेंबूर…

 भांडुपकरांची पाण्यासाठी वणवण

 पालिकेच्या निष्काळजीपणा विरोधात जल अभियंत्यांकडे धाव – डोंगराळ भागातील नागरिकांचा संताप उफाळला! मुंबई : भांडुप विधानसभा क्षेत्रात पाणीपुरवठ्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला असून, विशेषतः डोंगराळ भागातील रहिवाशांना अपुऱ्या व कमी दाबाच्या पाणीपुरवठ्याचा मोठा फटका बसत आहे. अनेक ठिकाणी नळांना अत्यंत कमी दाबाने पाणी येत असल्याने ते डोंगराळ भागात पोहोचत नाही. परिणामी नागरिकांना पिण्याचे व दैनंदिन वापराचे पाणी मिळवण्यासाठी मोठी कसरत करावी लागत असून पालिका प्रशासनाच्या कारभाराविरोधात नगरसेविका राजोल संजय पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. या पार्श्वभूमीवर भांडुपमधील पाणीपुरवठा व प्रभागातील विविध प्रलंबित प्रश्नांबाबत आज वरळी येथे जल अभियंता दिलीप पाटील यांच्या दालनात संयुक्त बैठक घेण्यात आली. या बैठकीला नगरसेवक सुरेश शिंदे,  नगरसेविका दिपमाला बडे, राजोल संजय पाटील, शाखाप्रमुख राजेश कदम यांच्यासह स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीत भांडुपमधील डोंगराळ भागात पाणी पुरेशा दाबाने पोहोचत नसल्याचा मुद्दा अत्यंत ठामपणे मांडण्यात आला. अनेक वर्षांपासून नागरिक या समस्येला सामोरे जात असताना पालिका प्रशासनाकडून कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आलेली नसल्याची खंत उपस्थितांनी व्यक्त केली. विशेषतः उंच भागातील वस्त्यांमध्ये नळांना पाणीच न येणे किंवा अत्यल्प दाबाने येणे ही बाब प्रशासनाच्या नियोजनशून्यतेचे द्योतक असल्याचा आरोप करण्यात आला. लोकप्रतिनिधींनी जल अभियंत्यांकडे डोंगराळ भागात पाणी वरपर्यंत पोहोचविण्यासाठी स्वतंत्र पंपिंग व्यवस्था, जलवाहिन्यांचे सक्षमीकरण तसेच कमी दाबाच्या भागांसाठी विशेष तांत्रिक उपाययोजना तातडीने राबविण्याची मागणी केली. तसेच खालच्या भागातही जास्तीत जास्त आणि नियमित पाणीपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी ठोस कृती आराखडा तयार करण्याची आवश्यकता असल्याचे प्रभाग क्र. ११४ च्या नगरसेविका राजोल संजय पाटील यांनी सांगितले. दरम्यान, भांडुपकरांना मूलभूत गरज असलेल्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत असताना पालिका प्रशासन मात्र केवळ बैठका व आश्वासनांपुरतेच मर्यादित राहिल्याची टीका नागरिकांकडून होत आहे. उन्हाळ्यात आणि वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर पाणीपुरवठ्याचे योग्य नियोजन करण्यात प्रशासन अपयशी ठरल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. बैठकीत नागरिकांच्या पाणीप्रश्नावर तातडीने कार्यवाही करून डोंगराळ भागातील रहिवाशांना दिलासा देण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची जोरदार मागणी करण्यात आली. आता पालिका प्रशासन प्रत्यक्ष कृती करून भांडुपकरांचा पाणीप्रश्न सोडवते की पुन्हा एकदा आश्वासनांचीच मालिका सुरू राहते, याकडे संपूर्ण भांडुपकरांचे लक्ष लागले आहे. 000000000 नरसोबावाडी, कोल्हापूर येथे राज्य मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन मुंबई : महाराष्ट्र कॅरम असोसिएशन व कोल्हापूर जिल्हा हौशी कॅरम संघटनेच्या मान्यतेने कै. अशोक पुजारी यांच्या स्मरणार्थ १० व्या श्री दत्तराज चॅरिटेबल ट्रस्ट राज्य मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.   हॉटेल मंगलम, नरसोबावाडी, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर येथे दि. ४ ते ६ जुलै २०२६ दरम्यान पुरुष एकेरी व महिला एकेरी अशा दोन गटांमध्ये ही स्पर्धा रंगणार आहे.   स्पर्धेतील विजेत्यांना एकूण ₹१,१०,०००/- ची रोख पारितोषिके व चषक देण्यात येणार आहेत. स्पर्धेचे प्रवेश अर्ज महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या www.maharashtracarromassociation.com या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. महाराष्ट्र कॅरम असोसिएशनने ऑनलाईन नोंदणी पद्धत सुरू केली असून त्याची लिंक संकेतस्थळावर देण्यात आली आहे. स्पर्धेत भाग घेण्यास इच्छुक खेळाडूंनी आपल्या जिल्हा संघटनेशी संपर्क साधावा. स्पर्धेत नावे नोंदविण्याची अंतिम मुदत दि. १४ जून २०२६ आहे.   मुंबईतील प्रवेश महाराष्ट्र कॅरम असोसिएशन, पारेख महल बिल्डिंग, आश्रय हॉटेलच्या मागे, सखाराम कीर मार्ग, राजा राणी चौक जवळ, शिवाजी पार्क, दादर (प.) येथे सायं. ६ ते ८ या वेळेत स्वीकारले जातील. इतर सर्व जिल्ह्यांतील खेळाडूंची नावे त्यांच्या जिल्हा संघटनेमार्फतच स्वीकारण्यात येतील.