Category: मुंबई

Mumbai news

 चाळ परिसरातील सुशोभीकरण व ज्येष्ठ नागरिक विरंगुळा कट्ट्यावर तोडक कारवाई

 राजेश कदम यांच्या मध्यस्थी मुळे रेल्वे प्रशासनाने कारवाई तात्पुरती थांबविली कल्याण : डोंबिवली पश्चिम येथील रेल्वेच्या पडीक जागेत समाजसेवक व नवनिर्वाचित मनसे नगरसेवक प्रल्हाद म्हात्रे ह्यांनी स्व खर्चातून जे लाखो रुपये खर्च करून नंदनवन फुलविले होते, ज्येष्ठ नागरिक व त्या रस्त्याने जा ये करणाऱ्या थकल्या भागल्या जिवाला एक आसरा व विरंगुळा निर्माण झाला होता. वर्षानो वर्ष पडीक अश्या रेल्वेच्या जागेत जी जागा चरसी नश्या करणाऱ्या गुन्हेगारांसाठी अड्डा ठरलेली त्या जागेचे रूपांतर सुंदर विरंगुळा केंद्रात निर्माण झाले. त्या विरंगुळा केंद्रावर आज रेल्वे प्रशासनाने आपल्या अधिकारी आणि रेल्वे पोलिसांच्या मोठ्या फौजफाट्यासह जेसीबी मशीन सह अचानक तोडक कारवाई केली. ती जागा रेल्वेची असली तरी तेथे कुठल्याही प्रकारचा रेल्वे प्रकल्प येत नसताना, कुठलेही व्यापारीकरण नसताना नागरिकांना उपयोगात येणाऱ्या दुर्लक्षित जागेवर रेल्वेला अचानक कारवाई का करावीशी वाटली हा प्रश्न शिवसेना उपजिल्हा प्रमुख राजेश कदम यांनी उपस्थित करून तिथे उपस्थित राहून स्थानिक पोलिसांच्या माध्यमातून रेल्वेची ही दादागिरी मोडीत काढून जोवर रेल्वे तेथे काही करत नाही रेल्वे मालक असेल तरी नागरिकांना तोवर वापर करण्याचा अधिकार असावा ह्या समझोत्यावर आजची कारवाई थांबविण्यासाठी राजेश कदम यांनी यशस्वी मध्यस्थी केली. यावेळी नागरिकांनी सुद्धा मोठ्या संख्येने जमा होऊन रेल्वे प्रशासनाचा जाहीर निषेध केला व ज्येष्ठ नागरिकांना बसण्याचे बाकडे का पाडले असा जाब विचारला. या प्रसंगी प्रल्हाद म्हात्रे, तुषार शिंदे, जनार्दन म्हात्रे, केतकी पोवार व अनेक सामाजिक कार्यकर्ते हे देखील उपस्थित होते.

नाल्यातील विद्युत केबल्स धोकादायक

महापौरांचे तातडीचे निर्देश ठाणे :  नालेसफाई कामादरम्यान नाल्यातून गेलेल्या विविध प्राधिकरणांच्या विद्युत (केबल्स) अडथळा ठरत असून या केबल्समुळे नाल्यातील कचरा अडकून राहतो आणि पाण्याचा प्रवाह सुरळीत होत नाही. नालेसफाई व्यवस्थ‍ित होण्यासाठी नाल्यातून गेलेल्या विद्युत केबल्स एकत्रित करुन  केबल्स सुरक्षित राहतील व कामातही अडथळा निर्माण होणार नाही या दृष्टीने उपाययोजना करण्याचे निर्देश महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी महापालिका तसेच महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण, महाराष्ट्र विद्युत पारेषण महामंडळ तसेच टोरंट कंपनीच्या अधिकाऱ्यांना आज झालेल्या बैठकीत दिले. महापौर शर्मिला पिंपळोलकर व आयुक्त सौरभ राव यांनी मंगळवारी ठाणे शहरातील नालेसफाई कामाचा आढावा घेतला. या पाहणी दौऱ्यात नाल्यामध्ये महावितरण, टोरंट कंपनी यांच्या केबल्स अडथळा निर्माण करत असल्याचे निदर्शनास आले. या पार्श्वभूमीवर महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी महापौर दालनात संबंधित अधिकाऱ्यांची तातडीची बैठक आयोजित केली. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त २ प्रशांत रोडे, विरोधी पक्ष नेते शानू पठाण, शिवसेना गटनेते पवन कदम, भाजपा गटनेते मुकेश मोकाशी, उपायुक्त मधुकर बोडके, उपनगरअभ‍ियंता विकास ढोले, शुभांगी केसवानी आरोग्य अधिकारी डॉ. राणी शिंदे, महाराष्ट्र विद्युत पारेषण महामंडळाचे माणिक राठोड, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे कार्यकारी अभ‍ियंता चंद्रमणी मेश्राम, सतीश जाधव, टोरंट पॉवर कंपनीचे सन्होसेन खोब्रागडे, मदन धामुणसे आदी उपस्थित होते. नाल्यातून गेलेल्या केबल्सच्या जाळ्यामध्ये कचरा अडकणे, तसेच लोंबकळत असलेल्या केबल्समुळे नाल्यातील जेसीबीला अडथळा निर्माण होणे, केबल्स तुटणे, नाल्यात उतरुन काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना देखील या केबल्समुळे कर्मचाऱ्यांना अपघात होणे हे प्रकार घडत आहेत. यासाठी ज्या ज्या कंपन्याच्या केबल्स नाल्यामधून गेलेल्या आहेत त्यांनी तातडीने महापालिकेच्या अधिकाऱ्यांसमवेत पाहणी करुन सद्यस्थ‍ितीत या केबल्स एकत्रित करुन नाल्याच्या भिंतीला किंवा अन्य ठिकाणी एकत्रित करुन ठेवाव्यात अशा सूचना महापौरांनी आज झालेल्या बैठकीत दिल्या. तसेच याबाबत प्रत्येक कंपन्यांनी त्यांच्या स्तरावर बैठक आयोजित करुन भविष्यात नाल्यातील केबल्स या भूमीगत करता येतील किंवा कसे याबाबतच्या उपाययोजना तयार कराव्यात. तसेच भविष्यात ना्ल्यातून किंवा गटारातून कोणतीही केबल जाणार नाही या दृष्टीने नियोजन करावे. तसेच केबल्स टाकताना महानगरपालिकेची परवानगी घेवूनच सर्व कामे करण्याच्या सूचनाही महापौरांनी यावेळी दिल्या. तसेच जे प्राधिकरण परवानग्या न घेता केबल्स टाकतील अशांवर दंड आकारण्याबाबतही महापौरांनी सूच‍ित केले. 00000000

आनंदराव अडसूळ ट्रस्टतर्फे निवड कॅरम स्पर्धा २५ एप्रिलला

  मुंबई: आनंदराव अडसूळ चॅरिटेबल ट्रस्ट, को-ऑपरेटिव्ह बँक एम्प्लॉईज युनियन-मुंबई व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त होणाऱ्या सांघिक कॅरम स्पर्धेच्या अनुषंगाने अंतिम टप्प्यातील शालेय मुलामुलींसाठी विनाशुल्क निवड चाचणी कॅरम स्पर्धा २५ एप्रिल रोजी होणार आहे. दादर-पश्चिम येथे ही स्पर्धा रंगणार आहे. पहिल्या ८ विजेत्या-उपविजेत्यांना पुरस्कार असून त्यांना १ मेपासून होणाऱ्या सांघिक स्पर्धेसाठी थेट प्रवेश दिला जाणार आहे. १८ एप्रिलपासून सुरु झालेल्या कामगार व शालेय मुलामुलींच्या महाराष्ट्र व कामगार दिनानिमित्त साकारीत असलेल्या पूर्णपणे मोफत कॅरम उपक्रमास यंदाही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असल्यामुळे दर्जेदार आयोजनासाठी माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री व युनियनचे अध्यक्ष आनंदराव अडसूळ आणि पदाधिकारी सुनील साळवी, नरेंद्र सावंत, प्रमोद पार्टे, जनार्दन मोरे आदी विशेष कार्यरत आहेत. निवड झालेल्या खेळाडूंचे संघ निर्माण करण्यात येणार असून १ ते ३ मे दरम्यान अटीतटीचे सामने पाहण्यास मिळतील. शालेय खेळाडूंना तज्ञांचे मार्गदर्शन देखील मोफत लाभणार आहे. सदर शेवटच्या टप्प्यामधील उपक्रमात भाग घेऊ इच्छिणाऱ्या शालेय खेळाडूंनी प्रवेश अर्जासाठी अथवा अधिक माहितीसाठी संयोजक लीलाधर चव्हाण अथवा प्रमुख पंच चंद्रकांत करंगुटकर (९९८७८ ३१६२२) यांच्याकडे २३ एप्रिलपर्यंत संपर्क साधावा. ००००००००००

 शरीरसौष्ठवपटूंच्या पाठीवर राज्य शासनाकडूनही कौतुकाची थाप पडू दे

  – राष्ट्रीय विजेत्या शरीरसौष्ठवपटूंच्या कौतुक सोहळ्यात अध्यक्ष खानविलकरांचे शासनाला आवाहन मुंबई, दि.२० -जिंकायला दम लागतो आणि जिंकल्यावर पाठीवर पडलेली कौतुकाची थाप पुढच्या यशाची आग पेटवते. यंदा ही आग क्रीडाप्रेमी कुणाल केरकर यांनी शरीरसौष्ठवपटूंच्या नसानसांत पेटवली आहे. त्यांच्यासारख्या क्रीडाप्रेमींमुळे मुंबईच्या शरीरसौष्ठवाची ताकद आणखी बळकट झालीय. अशीच कौतुकाची थाप शासनाकडूनही आमच्या खेळाडूंच्या पाठीवर पडायला हवी. राजकीय व्यक्तींनी आमच्या खेळाला आपले बळ दिले तर शरीरसौष्ठवाचा बालेकिल्ला असलेली मुंबई अभेद्य होईल. त्याला कुणीही तोडू शकणार नाही, वाकवू शकणार नाही अशा शब्दांत मुंबई शरीरसौष्ठव संघटनेचे अध्यक्ष अजय खानविलकर यांनी  राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेतील विजेत्या मुंबईकर खेळाडूंचे कौतुक करत त्यांना प्रोत्साहन दिले. मुंबईच्या शरीरसौष्ठवपटूंनी पुणे येथे झालेल्या राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेत एक-दोन नव्हे तर १४ पदकांची कमाई करत मुंबईची ताकद अवघ्या हिंदुस्थानला दाखवली होती. या यशानिमित्त पदकविजेत्या खेळाडूंचे कुणाल केरकर यांनी मालाड पश्चिमेला आयर्न पॅराडाइज जिममध्ये कौतुक सोहळ्याचे प्रेरणादायी आयोजन केले ंहोते. गेल्या २५ वर्षांपासून फिटनेस क्षेत्रात सक्रिय असलेल्या कुणाल केरकर यांनी उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या खेळाडूंना व्यासपीठ मिळावे आणि नवोदितांना प्रेरणा मिळावी, या हेतूने या उपक्रमाचे आयोजन केले होते. त्यांचा हा पुढाकार शरीरसौष्ठवाला बळ देणारा ठरला. केरकर यांचे शरीरसौष्ठव आणि खेळाडूंवर असलेले प्रेम असेच बळ देणारे होत जावो, असे गौरवोद्गारही याप्रसंगी संघटनेचे सरचिटणीस राजेश सावंत यांनी काढले. याप्रसंगी केरकर यांनीही आपण खेळाडूंच्या पाठीशी सदैव उभे राहू, असे आश्वासन दिले. या कौतुक सोहळ्यानिमित्त हरमीत सिंग, उमेश गुप्ता, रेखा शिंदे, राजेश तारवे, संदीप सावळे, नीलेश दगडे, विश्वंभर राऊळ, नीलेश गुरव या सुवर्णविजेत्या खेळाडूंसह गणेश पेडामकर, ओंकार कळके, मनोज बोचरे, विशाल धावडे, अविनाश शिंदे, नीलेश रेमजे यांचे सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आले. तसेच आयर्न पॅराडाइजच्या प्रशांत घोलम, सिद्धांत यादव आणि क्षितीज साळुंखे या शरीरसौष्ठवपटूंनाही सन्मान चिन्ह आणि रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. या सोहळयाला शरीरासौष्ठव संघटनेचे किट्टी फणसेका, विशाल परब, सुनील शेगडे, राम नलावडे, किरण कुडाळकर, अशोक शेलार, राजेश निकम, जयदीप पवार, विजय झगडे आणि शरीरसौष्ठवातील दिग्गजांसह विजेत्या खेळाडूंचे कुटुंबीयही मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 शिवशक्तीसह राजमाता जिजाऊ, धर्मवीरचा झंझावात कायम

 आमदार चषक कबड्डी स्पर्धा   मुंबई बंदर, ठाणे महापालिका उपांत्य फेरीत मुंबई, दि. २१ (क्री.प्र.)- क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणार्‍या चढाया-पकडींच्या संघर्षात मुंबईच्या मुंबई बंदर, भारत पेट्रोलियम (बीपीसीएल) आणि आयएसपीएलसह (इन्शुअरकोट स्पोर्ट्स प्रा. लि.)ठाणे महानगर पालिका या संघांनी थरारक विजयासह आमदार सुनील राऊत यांच्या पुढाकाराने सुरु असलेल्या आमदार चषक कबड्डी स्पर्धेच्या व्यावसायिक गटाची उपांत्य फेरी गाठली. महिला गटातही अंगावर शहारे आणणार्‍या रोमहर्षक लढतीनंतर मुंबईच्या शिवशक्ती, पुण्याच्या राजमाता जिजाऊ, पतंगराव कदम संघ आणि नंदुरबारच्या धर्मवीर कबड्डी संघाने उपांत्य फेरीत धडक मारली. आता पुरुषांच्या व्यावसायिक गटात आयएसपीएलची गाठ ठाणे महानगरपालिकेशी पडेल तर बीपीसीएल मुंबई बंदराशी भिडेल. महिलांच्या गटात राजमाता जिजाऊ – पतंगराव कदम, शिवशक्ती- धर्मवीर अशा अटीतटीच्या लढती रंगतील. विक्रोळी पूर्वेला टागोर नगरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त  सुरु असलेल्या कबड्डीच्या झटापटीत तिसर्‍या दिवशी कबड्डीप्रेमींना थरारक सामन्यांची मेजवानी चाखता आला आली. उपांत्य फेरीत धडक मारण्यासाठी झालेल्या चारही उपांत्य पूर्व लढतीचा पैâसला शेवटच्या मिनीटालाच झाला.  मुंबई बंदरने साइल पाटील, राहुल टाके यांच्या खोलवर चढायांनी मध्यंतराला संत सोपान काका बँकेविरुद्ध २०-१३ अशी आघाडी मिळवून दिली, पण मध्यंतरानंतर संत सोपान काकाच्या दीपक सांगळे आणि धीरज देवरेने वेगवान खेळ करत सामन्यात जान ओतली. शेवटची पाच मिनीटे असताना बरोबरीत असलेला खेळ शेवटी मुंबई बंदरने ३६-३२ असा जिंकत उपांत्य फेरीत स्थान मिळवले. ठाणे आणि मिरा-भायंदर या महानगर पालिका यांच्यात पहिल्या मिनिटापासून संघर्षाची ठिणगी पडली. त्यामुळे पहिल्या सत्रात १४-१४ असा बरोबरीचा खेळ रंगला. मध्यंतरानंतर दोन्ही संघाच्या चढाईबहाद्दरांनी आघाडी घेण्यासाठी जोरदार खेळ केला, पण स्कोर समान रेषेतच धावत होता. अखेर शेवटच्या क्षणी ठाण्याने मीरा भायंदरला २८-२५ असे मागे टाकत उपांत्यपूर्व फेरीचा अडथळा दूर केला. पिछाडीनंतर बीपीसीएलची कमाल सौरभ फगारे आणि साईप्रसाद पाटील यांच्या भन्नाट चढायांनी सीजीएसटीला (सेंट्रल गुड्स अ‍ॅण्ड सर्व्हिस टॅक्स)बीपीसीएलविरुद्धच्या उपांत्यपूर्व लढतीत मध्यंतराला २०-१० अशी अफलातून आघाडी मिळवून दिली होती. बीपीसीएलचे मिलन दहिया, तुषार अदावडे प्रभावी ठरत नव्हते. मात्र मध्यंतरानंतर बीपीसीएल संघात अशी जादू संचारली की त्यांनी पहिल्या दहा मिनीटात आधी पिछाडी भरून सामन्यात पुनरागमन केले. मग सीजीएसटीविरुद्ध एकेका गुणाची कमाई करत आघाडी घेतली. शेवटची पाच मिनीटे शिल्लक असताना बीपीसीएलने ३३-२७ अशी आघाडी कमावली होती. मग बुद्धिचार्तुयाचा वापर करत आपली आघाडी टिकवली आणि सीजीएसटीविरुद्धचा संघर्ष ३५-३० असा जिंकली. आयएसपीएलने  मुंबई पोस्टलचे आव्हान ४६-३४ असे सहज मोडीत काढत अंतिम चार संघात स्थान मिळवले. महिलांमध्ये थरारच थरार महिलांच्या उपांत्यपूर्व फेरींच्या सामन्यात कमालीचा संघर्ष पाहायला मिळाला. पतंगराव कदम आणि स्वराज्य स्पोर्ट्स क्लब यांच्यात झालेल्या सामन्यात तुल्यबळ लढत झाली. सानिका खाडे आणि आर्या लवार्डे हिने पतंगराव कदमला आघाडी मिळवून देण्यासाठी आक्रमक खेळ केला. दुसरीकडे याशिका पुजारी आणि प्रतीक्षा तांडेलच्या चढायांनी स्वराज्यासाठी गुणांचा सपाटा लावला. पण मध्यंतराला १६-१६ असा खेळ बरोबरीत थांबला. मध्यंतरानंतर दोन्ही संघांनी आघाडीसाठी जंग जंग पछाडले. पण गुणफलक समान रेषेतच धावत होता. अखेर पतंगराव कदम संघाने ३३-३१ अशी दोन गुणांनी बाजी मारली. धर्मवीर आणि श्रीराम कबड्डी संघ यांच्यातला थरारही ३५-३३ असा संपला. धर्मवीरच्या समृद्धी कोळेकर आणि हर्षदा हुंडारे या २ गुणांच्या निसटत्या विजयात मानकरी ठरल्या. राजमाता जिजाऊ आणि विवेक स्पोर्ट्स यांच्यातही काँटे की टक्कर झाली. राजमाता जिजाऊ २४-१४ अशी आघाडीवर होती. पण उत्तरार्धात विवेकच्या स्वीटी आणि संजना पोळने प्रतिस्पर्ध्यांच्या पोटात गोळा आणणारा खेळ केला. बरोबरीत चाललेला हा थरार विवेकने अवघ्या ३८-४० अशा फरकाने गमावला. राजमाता जिजाऊच्या fिनकीता पडवळ, रेखा सावंत विजयाच्या शिल्पकार ठरल्या. उद्धव ठाकरेंनी कबड्डीपटूंना दिल्या शुभेच्छा कबड्डी स्पर्धेच्या निमित्ताने विक्रोळीतला कबड्डी जल्लोष पाहून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे भारावले. उपनगरातील मराठी माणसांनी स्पर्धेच्या निमित्ताने आपला ठसा कायम ठेवल्याचे सांगत सर्वांचे कौतुक केले. तसेच क्रीडाप्रेमी आमदार सुनील राऊत यांनी या स्पर्धेची परंपरा यापुढेही कायम ठेवावी, अशा शुभेच्छा देत स्पर्धेत खेळत असलेल्या खेळाडूंनाही भरभरून दाद दिली. याप्रसंगी शिवसेना खासदार संजय राऊत, आमदार सचिन अहिर, विभागप्रमुख रमेश कोरगावकर, नगरसेविका राजोल पाटीलही उपस्थित होत्या.

 उल्हासनगर महापालिकेतील समिती सभापतीपदांच्या निवडी बिनविरोध

आज जिल्हाधिकाऱ्यांकडून अधिकृत घोषणा उल्हासनगर दि 20(सुनिल इंगळे ):- उल्हासनगर महापालिकेच्या स्थायी समिती तसेच नऊ विशेष समितींच्या सभापती पदांसाठी उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर सर्व पदांची निवड बिनविरोध होणार हे स्पष्ट झाले होते. आज या प्रक्रियेला अधिकृत शिक्कामोर्तब मिळाले असून ठाणे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी महापालिका सभागृहात सर्व सभापतींची घोषणा जाहीर केली. उल्हासनगर महापालिकेच्या विविध समित्यांसाठी सचिव कार्यालयात उमेदवारी अर्ज पाच दिवसांपूर्वी दाखल करण्यात आले होते. प्रत्येक समितीसाठी एकच अर्ज प्राप्त झाल्याने निवडणूक न लागता सर्व पदे बिनविरोध निवड निश्चित झाली होती. स्थायी समिती सभापती पदासाठी शिवसेना नगरसेवक कुलवंत सिंग सोहता याची निवड झाली आहे. सार्वजनिक बांधकाम समिती सभापती पदासाठी साई पक्षाच्या दीप्ती दुधानी, नियोजन व विकास समिती सभापती पदासाठी भाजपच्या मीना कौर अजित सिंग लबाना, पाणी पुरवठा व जलनिसारण समिती सभापती पदासाठी भाजपच्या दीपा नारायण पंजाबी, आरोग्य परीक्षण व वैद्यकीय सहाय्य समिती सभापती पदासाठी शिवसेनेच्या सविता तोरणे, माध्यमिक व पूर्व प्राथमिक शिक्षण समिती सभापती पदासाठी शिवसेनेच्या साक्षी सुर्वे, गलिच्छ वस्ती निर्मूलन समिती सभापती पदासाठी भाजपच्या विपुल मयेकर, क्रीडा, समाजकल्याण व सांस्कृतिक समिती सभापती पदासाठी भाजपच्या प्रीती विनोद मखिजा, महिला व बालकल्याण समिती सभापती पदासाठी शिवसेनेच्या मीना दीपक सोंडे, तर महसूल समिती सभापती पदासाठी शिवसेनेच्या प्रेरणा अजित मखिजानी यांची निवड घोषित करण्यात आली. सोमवारी झालेल्या अधिकृत घोषणेनंतर संबंधित सर्व पदाधिकाऱ्यांचे शिवसेना कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, आमदार डॉ. बालाजी किणीकर,माजी आमदार पप्पू कालानी, महापौर अश्विनी निकम, उपमहापौर अमर लुंड, गटनेता अरुण आशान,शिवसेना महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी, भाजपा शहर जिल्हा अध्यक्ष राजेश वधारिया यांच्या मार्फत अभिनंदन करण्यात आले. यावेळी महापालिकेतील पदाधिकारी व नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, बिनविरोध निवडीमुळे महापालिकेच्या कारभारात स्थिरता येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात असून आगामी काळात विकासकामांना गती मिळेल, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

के. व्ही. पेंढरकर महाविद्यालयाच्या संशोधकांना राष्ट्रीय पेटंट प्राप्त

कल्याण: के. व्ही. पेंढरकर महाविद्यालयाच्या प्राणिशास्त्र विभागातील पीएचडी विद्यार्थी अनिकेत मराठे यांच्या संशोधनाअंतर्गत गोगलगायींच्या प्रजातींचे सहज आकलन व्हावे ह्या उद्देशाने एक उपकरण विकसित केले आहे. ह्या उपकरणासाठी त्यांना राष्ट्रीय पेटंट प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले आहे. अनिकेत मराठे हे शांतारामभाऊ घोलप कला, विज्ञान आणि गोटीरामभाऊ पवार वाणिज्य महाविद्यालय, शिवळे येथे प्राणिशास्त्र विभागात सहा. प्राध्यापक असून पेंढरकर महाविद्यालयातील डॉ. शरद महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पी.एच.डी करीत आहेत. कॅ.डॉ. वर्षा नरवडे आणि अर्जुन शाहू यांचेदेखील पेटंट यशस्वीपणे नोंद होण्यासाठी सहकार्य लाभले आहे. डोंबिवली शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी हर्षल लवंगारे ह्यांनी डॉ.  महाजन व त्यांच्या सहकाऱ्यांचा सत्कार केला. विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी अधिकाधिक संशोधनाभिमुख व्हावे ह्यासाठी प्रयत्न करावा असे आवाहन संस्थेच्या वतीने करून संस्थादेखील सर्वतोपरी मदत करेल असेही त्यांनी सांगितले.  याप्रसंगी डहाणूकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ विनय भोळे हे देखील उपस्थित होते. 0000000000

आमच्या हक्काचे पैसे मृत्यूपूर्वी मिळणार का? सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा महापालिका प्रशासनाला सवाल 

  मागण्या मान्य न झाल्यास मंगळवारपासून बेमुदत आमरण उपोषणाचा इशारा उल्हासनगर( सुनिल इंगळे  ) : उल्हासनगर महापालिका सेवेतून सन २०१६ ते आजतागायत सर्व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांच्या निषेधार्थ व महापालिकेच्या…

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाच्या परिसरात खासगी व्यक्तीला राहण्यासाठी घर

सबंधित अधिकाऱ्यांचे निलंबन करून चौकशी करण्याची मागणी कल्याण: कल्याण येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाच्या परिसरात शासकीय जमिनीवर नियमांची पायमल्ली करून खासगी व्यक्तीला कायमस्वरूपी राहण्यासाठी घर बनवून दिल्याचा प्रकार उघडकीस आला…

केडीएमसी आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अंबरनाथमध्ये सामंजस्य करार

कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका अधिपत्याखालील कल्याण पश्चिमेतील बाई रुक्मिणीबाई रुग्णालय, गौरीपाडा रुग्णालय, कल्याण पूर्वेतील  शक्तीधाम रुग्णालय यामध्ये रुग्णसेवा देण्याकरिता सामंजस्य करार तत्वावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अंबरनाथ यांना संलग्नित करण्याच्या…