१३ हजार ८० घरगुती तर १ सार्वजनिक गणपतीचे विसर्जन
डोंबिवली : गणेश चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाची पूजा अर्चा करून दीड दिवस मनोभावे भक्ति करून आज गणरायांना भक्तिभावात निरोप देण्यात आला. ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत मिरवणूक काढत गणपतीचे विसर्जन करण्यात आले. कल्याणच्या गणेश घाट विसर्जनस्थळी गणेश भक्तांची गर्दी दिसून आली. कल्याण परिमंडळ ३ अंतर्गत दीड दिवसांच्या १ सार्वजनिक तर सुमारे १३ हजार ८० घरगुती गणपतींचे विसर्जन करण्यात आले.
या वर्षीच्या गणेशोत्सवासाठी महापालिकेने जय्यत तयारी केली असून, महापालिकेच्या विद्युत विभागामार्फत श्री गणेशोत्सव काळात नागरीकांची गैरसोय होऊ नये म्हणून एकूण २७३५ हॅलोजन बसविण्यात आले असून ७० जनरेटरची व्यवस्था करण्यात आली आहे तसेच एकूण १०३ ठिकाणी टॉवर लाईटिंगची व्यवस्था करण्यात आली असून १८० सीसीटीव्ही कॅमे-यांच्या नियंत्रणाखाली देखरेख केली जाणार आहे.कल्याण डोंबिवली महापालिका कार्यक्षेत्रातील यावर्षीच्या श्री गणेशोत्सवासाठी विविध परवानग्या देण्याकरिता महापालिकेच्या सर्व प्रभागामध्ये २३ ऑगस्ट पासून आतापर्यंत एक खिडकी योजना कार्यान्वित आली होती या एक खिडकी योजनेअंतर्गत २२४ मंडप ,स्टेज परवानगी यामध्ये १३ मंडप परवानगी ५ वर्षांसाठी आणि ५६ कमानी परवानगी सर्व प्रभागातंर्गत देण्यात आल्या आहेत.
श्री गणेश मुर्तीच्या विर्सजनासाठी कल्याण २२ नैसर्गिक तलाव व ३६ कृत्रिम तलाव उपलब्ध असून डोंबिवली विभागात ३० नैसर्गिक तलाव व २७ कृत्रिम तलावांची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. नागरीकांच्या सोयीसाठी “विसर्जन आपल्या दारी” ही संकल्पना देखील प्रत्येक प्रशासकीय प्रभागात राबविण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त कल्याण मधील दुर्गाडी गणेश घाटावर तसेच डोंबिवली येथील रेतीबंदर मोठागाव विसर्जन घाटावर मोठ्या श्री गणेश मुर्तीच्या विसर्जनासाठी महापालिकेने चोख व्यवस्था ठेवली असून दोन्ही ठिकाणी मंडप व्यवस्था, बॅरीकेट्स, ध्वनीक्षेपण, हायड्रा व फोरक्लिप इ. साधन सामुग्री तसेच ठेकेदाराचा समन्वयक पूर्णवेळ उपलब्ध राहिल. महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत प्रत्येक विसर्जन स्थळी स्वच्छता निरीक्षक, सफाई कर्मचारी तैनात राहणार असून, सदर ठिकाणी संकलीत होणारे निर्माल्य व ओला कचरा उंबर्डे, कचोरे व आयरे येथील बायोगॅस प्लॅन्ट येथे पुढील प्रक्रियेसाठी पाठविला जाणार आहे. तसेच डोंबिवलीतील निर्माल्य हे श्री गणेश मंदिर संस्थानाच्या एमआयडीसीतील प्रकल्पाकडे पुढील प्रक्रियेसाठी पाठविले जाणार आहे. यासाठी महापालिकेस शाळांचे, एनएनएस चे विद्यार्थी व विविध एनजीओ यांचे देखील सहकार्य लाभणार आहे.
महापालिका आयुक्त डॉ.इंदु राणी जाखड़ यांनी स्वत: कल्याण व डोंबिवली दोन्ही ठिकाणी मुर्तीकार, श्री गणेश मंडळांचे प्रतिनिधी, विविध प्राधिकरणाचे अधिकारी यांचे समवेत बैठका घेवून श्री गणेशोत्सव कालावधीत येणा-या समस्या जाणून घेतल्या आणि बैठकीत उपस्थित अधिका-यांना त्यांचे निराकरण करणेबाबत निर्देश दिले आहेत.नागरीकांनी जलप्रदुषण टाळण्यासाठी श्रीगणेश मूर्ती विसर्जनासाठी कृत्रीम तलावांचा शक्यतो वापर करुन महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. इंदु राणी जाखड़ यांनी केले आहे.
00000000
