Month: April 2026

माजी खासदार-आमदारांची पेन्शन बंद करा

मनसे नेते राजू पाटील यांची मागणी कल्याण : देशभरात खासदार-आमदारांची संख्या वाढण्याची चर्चा सुरु असताना मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी धाडसी वक्तव्य केलं आहे. प्रामाणिक करदात्यांच्या पैशांची नासाडी थांबवण्यासाठी माजी खासदार आणि आमदारांना मिळणारी पेन्शन आणि इतर सुविधा तातडीने बंद कराव्यात,” असे त्यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे या मागणीत त्यांनी स्वतःचाही समावेश केला आहे. राजू पाटील यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून (ट्विट) या विषयावर भूमिका मांडली आहे. त्यांच्या मागणीमागील प्रमुख कारण म्हणजे, आगामी काळात देशात होणारी जनगणना आणि त्यानंतर होणारी पुनर्रचना यामुळे लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. प्रतिनिधींची संख्या वाढली की, पर्यायाने माजी खासदार आणि आमदारांच्या पेन्शन आणि सुविधांचा आर्थिक भार सरकारी तिजोरीवर, म्हणजेच पर्यायाने जनतेवर वाढत जाणार आहे. सामान्य नागरिक आणि करदात्यांच्या पैशाचा असा वापर होणे चुकीचे आहे. ही नासाडी आताच थांबवणे गरजेचे आहे,” असे राजू पाटील यांनी नमूद केले. राजू पाटील यांनी म्हटले की, माजी आमदार म्हणून मी सुद्धा या पेन्शन योजनेत येतो, पण मलाही ही सवलत नको आहे. सध्या दिल्लीत संसदेचे विशेष अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात केवळ राजकीय मुद्द्यांऐवजी लोकप्रतिनिधींच्या पेन्शनसारख्या महत्त्वाच्या विषयावरही चर्चा होऊन ऐतिहासिक निर्णय घेतला जावा, अशी त्यांची इच्छा आहे. वाढत्या महागाईच्या काळात सामान्य जनतेला सुविधा देताना हात आखडता घेणाऱ्या सरकारने लोकप्रतिनिधींच्या पेन्शनवर कोट्यवधी रुपये खर्च करू नयेत, ही यामागची मूळ भावना आहे.

लोकदरबारात प्रताप सरनाईक यांनी ७०% तक्रारींचे केले ऑन दि स्पॉट निराकरण

मीरा-भाईंदर: कधी सुस्त प्रशासन, तर कधी फाईलींच्या जंजाळात अडकलेला सामान्य माणूस… पण आज मीरा-भाईंदरमध्ये चित्र काहीसं वेगळं होतं. जनतेचा थेट संवाद आणि प्रश्नांचा जागच्या जागी निपटारा करण्यासाठी आज मीरा भाईंदर…

कोकण विभागीय सत्यशोधक परिषदेचे आयोजन

अनिल ठाणेकर   ठाणे : महात्मा जोतिबा फुले यांचा सत्यशोधकी वारसा माणूसपण राखणारा, चिकित्सा करणारा आहे. सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून पर्यायी समाज व्यवस्था फुले यांनी उभी केली. अंधश्रद्धा, बुवाबाजीमुक्त समाज करण्याचे काम अंनिस करीत आहे. अंनिसने दोन हजार हून अधिक सत्यशोधक विवाह लावले आहेत जात,धर्म,लिंग भेदाला विरोध करण्याचा विचार जोतीराव यांनी दिला.सत्यशोधक परिषदेचा उद्देश, महात्मा ज्योतिबा फुले यांनी दिलेले वैचारिक मूल्यांचा वारसा पुढे शाहू महाराजांनी तदनंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर नंतर हल्लीच्या काळात दि बा पाटील व डॉ नरेंद्र दाभोलकर यांनी पुढे नेला त्यामुळे आता आपली जबाबदारी आहे की तो वैचारिक वारसा पुढे न्यायचा. त्यासाठी आपण कटिबद्ध होऊन ते कार्य पुढे न्यावे. असे आवाहन आपल्या अध्यक्षीय भाषणात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष संजय बनसोडे यांनी केले. महात्मा जोतिबा फुले जन्मद्विशताब्दी वर्षाचा आरंभ,  डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चवदार तळे आंदोलनाचे शंभरावे वर्ष आणि लोकनेते दि बा पाटील यांची जन्मशताब्दीचे वर्ष या प्रसंगांचे औचित्य साधून  महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने कोकण विभागीय सत्याशोधक परिषदेचे आयोजन १२ एप्रिल रोजी के. आ. बांठिया माध्यमिक विद्यालयाच्या सभागृहात करण्यात आले. परिषदेचे उद्घाटन अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या लौकीकाप्रमाणे वेगळ्या पद्धतीने करण्यात आले. तुकाराम महाराज यांच्या गाथेच्या आणि  महात्मा जोतिबा फुले  यांच्या पुस्तकांच्या प्रतिकृती एकेका प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते एकावर एक रचून आणि त्यावर हाताचे मॉडेल आणि त्यावर सत्यशोधन करणाऱ्या मेंदूची प्रतिकृती असा तुकारामांच्या गाथेवर उभारलेला एक छोटासा अर्थपूर्ण मनोरा तयार करण्यात आला. मुंबई नवी मुंबई ठाणे व रत्नागिरी सह कोकण विभागातील अन्य जिल्ह्यांमधून आलेल्या जवळपास २५० कार्यकर्त्यांनी आणि विविध समविचारी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी या अनोख्या उद्घाटनाचे कौतुक केले. याप्रसंगी उद्घाटन सत्राचे प्रमुख पाहुणे भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार  सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा हे उपस्थित होते. प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या सुरेखा दळवी याही आवर्जून उपस्थित होत्या. या सत्राचे अध्यक्ष अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिका या मासिकाचे कार्यकारी संपादक उत्तम जोगदंड हे होते. खासदार सुरेश म्हात्रे  यांनी या उपक्रमाचे तसेच अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कामाचे कौतुक केले. श्रद्धा असली तरी अंधश्रद्धा आणि त्यातून होणारे शोषण अजिबात असू नये असे मत त्यांनी मांडले. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पाठीमागे आपण उभे असून समितीच्या कार्यासाठी  सर्व प्रकारे मदत करण्याचे तसेच गरज असेल तेव्हा संसदेत अंधश्रद्धा निर्मूलनाचे प्रश्न मांडण्याचे आश्वासन त्यांनी दिले. तसेच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि बा पाटील यांचे नाव देण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे सांगतले. सुरेखा दळवी यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचाराचा वारसा पुढे नेणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि दिबा पाटील यांच्या कार्याविषयी विवेचन केले. सध्याच्या परिस्थितीत समाज कुंठित अवस्थेत गेलेला असून आता काय करावे असा प्रश्न पडला आहे अशी  चिंता त्यांनी व्यक्त केली. तसेच हल्ली समाजाला प्रतिकांमध्ये अडकवून सांस्कृतिक विषमता आणण्याचे काम सुरू आहे असा इशारा त्यांनी दिला. सगळीकडे अंधार दाटलेला असल्यामुळे, पणती जपून ठेवा अंधार फार झाला… ही कवितेची ओळ लक्षात ठेवून अंधार वाढू देऊ नका असा संदेश त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. “सत्यशोधक विचार व अंनिस” या चर्चासत्रात सुशीला मुंडे यांनी महात्मा फुले यांच्या वेगवेगळ्या अखंडांचा दाखला देऊन फुले यांचे विचार संविधानात आल्याचे आणि अंनिस त्यानुसारच कसे कार्य करते याचे तपशीलवार विवेचन केले. तर आपल्या अध्यक्षीय भाषणात उत्तम जोगदंड यांनी महात्मा फुले यांचे हे वेगवेगळे अखंड उद्धृत करून महात्मा फुले यांनी त्यांच्या काळातील अफवांचे आणि त्यातून होणार्‍या अन्याय अत्याचारांचे  फॅक्ट चेक करून या व्यवस्थेचा  भांडाफोड केल्याचे सांगितले. तसेच महात्मा फुले यांनी  त्याची संपूर्ण कारण मिमांसा करून दलितांना आणि बहुजनांना शिक्षणाचा मार्ग कसा दाखवला याबाबत विवेचन केले. तसेच त्यांनी  सुरेखा दळवी यांच्या भाषणाचा आढावा घेतला. “जोतिबा ते दि बा-  वारसा सत्यशोधनाचा” हा दुसऱ्या सत्राचा विषय होता. प्रमुख वक्त्या होत्या वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा रेखा ठाकूर तसेच शिवराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड रोशन पाटील. या सत्राचे अध्यक्ष होते ज्येष्ठ पत्रकार  दीपक म्हात्रे.  या परिसंवादात ॲड. रोशन पाटील, प्रदेशाध्यक्ष शिवराज्य प्रतिष्ठान, यांनी शिवरायांची उपेक्षित ठेवली गेलेली समाधी महात्मा फुले यांनी  शोधून काढली असल्याचे सांगून त्यांनी शिवराय हे रयतेचे राजे कसे होते, त्यांचा वैचारिक वारसा महात्मा फुले यांनी आणि नंतर डॉ बाबासाहेब आंबेडकर, दि बा पाटील व डॉ नरेंद्र दाभोलकर यांनी पुढे कसा चालवला, त्यांना या त्यांच्या कार्यात कसे अडथळे आणले गेले याची माहिती दिली.  रेखा ठाकूर यांनी महात्मा फुले यांच्या अखंडांचा उल्लेख करून त्याचा विचारांचा वारसा पुढे घेऊन जाताना शिक्षणावर भर देणे किती गरजेचे आहे या बाबत आपले विचार मांडले.अध्यक्षीय भाषणात ज्येष्ठ पत्रकार  दीपक म्हात्रे यांनी परिसंवादात ज्यांनी विचार व्यक्त केले त्यांच्या भाषणांचा थोडक्यात आढावा घेतला आणि वर्तमान परिस्थितीत सर्वांनी एकत्र येऊन वाटचाल करणे किती आवश्यक आहे यावर विवेचन केले. 0000

कर्जतच्या कृषी संशोधन केंद्रात डॉ.आंबेडकर जयंतीबद्दल अनास्था

कर्जतच्या कृषी संशोधन केंद्रात डॉ.आंबेडकर जयंतीबद्दल अनास्था मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली अशोक गायकवाड रायगड-कर्जत :महाराष्ट्र शासनाने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अमूल्य योगदानाची दखल घेत कृतज्ञता म्हणून १४ एप्रिल या त्यांच्या जन्मदिनी  शासकीय सुट्टी जाहीर केली आहे. यावेळी जनमानसात वैचारिक प्रबोधन व्हावे,त्यांच्या ऐतिहासिक कार्याला उजाळा मिळावा, अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रामाणिक इच्छा होती आणि ती त्यांनी दि.३ एप्रिल रोजी मंत्रालयात झालेल्या बैठकीत व्यक्त करून आदेशही निर्गमित केले होते. तरीही कृषी संशोधन केंद्रातील काही जातीयवादी अधिकारी व कर्मचारी  बाबासाहेबांप्रती घृणा, तिरस्कार, अनास्था व कमालीचा हलगर्जीपणा बाळगून शासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखविण्यात  यशस्वी झाल्याचे निदर्शनास आले आहे. जगभरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती हर्षोल्लासात साजरी झाली. मात्र शासनाचे आदेश धाब्यावर बसवून कृषी संशोधन केंद्राचे सहयोगी संशोधन संचालक डॉ.बी.डी. वाघमोडे आणि कार्यालय अधीक्षक न. ल.निरडे यांनी जयंती साजरी करण्याबाबत कसलेच पाऊल उचलले नव्हते, असे लक्षात आले. याबाबत सविस्तर वृत्त असे की, प्रस्तुत प्रतिनिधीने शासकीय आदेशानुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती कोणकोणत्या कार्यालयात झाली, याचा वृत्तांत घेण्यासाठी वेगवेगळ्या कार्यालयांना भेटी दिल्या. प्रादेशिक कृषी संशोधन केंद्रात भेट दिली असता, सहयोगी संशोधन संचालक डॉ. वाघमोडे बाहेरगावी गेल्याचे कळले. कार्यालयाचे अधीक्षक न. ल. निरडे यांची भेट घेऊन त्यांना बाबासाहेबांच्या जयंतीबद्दल विचारणा करून  कार्यक्रमाचे फोटो देण्यास सांगितले असता त्यांनी सुरुवातीला डॉ.वाघमोडे हे बाहेरगावी गेले होते, असे सांगितले.नंतर बोलता बोलता डॉ.वाघमोडे १४ एप्रिल रोजी रात्री बाहेरगावी गेल्याचे सांगितले. “जयंती झाली, फोटो पी. आर.ओ. डॉ. मर्दाने कडून घ्या “, असेही बिनधास्त सांगितले. निरडे यांच्या बोलताना आडखडण्यावरून आणि देहबोलीवरून ते प्रस्तुत पत्रकाराची दिशाभूल करीत असल्याचे लक्षात आले. वास्तविक संशोधन केंद्रात पी. आर .ओ. चे पद नाही.डॉ मर्दाने हे कृषी विस्तार शिक्षण शास्त्रज्ञ आहेत. वरिष्ठ पातळीवरून जेव्हा डॉ. मर्दाने यांना जयंती साजरी केल्याचे फोटो द्या, असे सांगण्यात आले, तेव्हा डॉ. मर्दाने हतबल झाल्याचे दिसून आले. डॉ. मर्दाने हे प्रस्तुत प्रतिनिधीला कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्राच्या त्यांच्या कक्षात घेऊन गेले.त्यांच्या कक्षातील डॉ. बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार होता व पेढा ठेवल्याचे निदर्शनास आले.त्यांनी उपलब्ध करून दिलेल्या फोटोमध्ये ते स्वतः व खांडस येथील शेतकरी बळीराम ऐनकर डॉ.बाबासाहेबांच्या प्रतिमेसमोर अभिवादन करताना दिसत आहेत.पण त्या दोघांव्यतिरिक्त तेथे कृषी संशोधन केंद्राचा एकही अधिकारी वा कर्मचारी उपस्थित नव्हता, हे स्पष्ट झाले. तरीही आम्ही जयंती साजरी केली, असे चक्क खोटे विधान मग्रूरीत अधीक्षक निरडे करीत होते. जगातील विविध देशात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती हर्षोल्लासात साजरी झाली. महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल,मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री, पालकमंत्री, खासदार, आमदार ,जिल्हा परिषदे,पंचायत समिती, ग्रामपंचायत सदस्य आपापल्या कार्यक्षेत्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती हिरीरीने साजरी करत होते मात्र संशोधन केंद्रातील अधिकारी आणि कर्मचारी सुट्टीचा आनंद उपभोगण्यात व्यस्त होते. या संशोधन केंद्रात मागील वर्षीही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जाणीवपूर्वक साजरी करण्यात आली नव्हती. वास्तविक महापुरुषांच्या जयंती व पुण्यतिथीचे कार्यक्रम आयोजित करण्याबाबत शासनाचे परिपत्रक आहे.पण बऱ्याच कार्यालयांमध्ये त्याची अंमलबजावणी होत नाही.ज्या महापुरुषांच्या जयंतीनिमित्त शासनाने सुट्टी घोषित केली आहे, त्या दिवशी कृतज्ञता म्हणून प्रबोधनात्मक  किंवा त्यांच्या कार्याला उजाळा मिळेल, असे कार्यक्रम आयोजित करून जनजागरण करणे शासनाला अपेक्षित आहे.पण काही जात्यंध अधिकारी असे कार्यक्रम घेणे टाळतात व तो दिवशी पर्यटन, खरेदी, मनोरंजन करण्यात घालवतात. परिणामतः शासन बदनाम होते. असे कृतघ्न अधिकारी, कर्मचारी देशासाठी कलंक असल्याची भावना व्यक्त होत आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी झाली मग त्या अंतर्गत असलेल्या संशोधन केंद्रात सदर जयंती का साजरी झाली नाही? येथील अधिकारी राज्यपाल, मुख्यमंत्री ,कुलगुरू यांच्यापेक्षा मोठे आहेत का? शासकीय आदेशाला फाट्यावर मारण्याची प्रवृत्ती येथील अधिकाऱ्यांमध्ये का बळावत आहे ? कुलगुरूंचा धाक उरला नाही का ? असे प्रश्न चर्चिले जात आहेत. कुलगुरू डॉ. संजय भावे यांनी संबंधित बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कडक कारवाही करावी, अशी मागणी काही डॉ. आंबेडकरप्रेमी संघटनांनी केली आहे.तसेच मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला न जुमाणणाऱ्या, त्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखविणाऱ्या महाराष्ट्रातील तमाम कार्यालयातील संबंधित बेजबाबदार व जात्यंध अधिकाऱ्यांवर कारवाई व्हायला हवी, असे मत विविध डॉ.बाबाबासाहेब आंबेडकरप्रेमी संघटनांनी व्यक्त केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्यावर काय कारवाई करतात, याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.

मॉडेल इंग्लिश हायस्कूलमध्ये भीम जयंती उत्साहात साजरी

मॉडेल इंग्लिश हायस्कूलमध्ये भीम जयंती उत्साहात साजरी भव्य रॅली आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन कल्याण: कल्याण पूर्वेतील द ईस्ट कल्याण वेलफेअर संचलित मॉडेल इंग्लिश हायस्कूल आणि मॉडेल कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स यांच्या संयुक्त विद्यमाने महामानव बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. या निमित्ताने काढण्यात आलेल्या भव्य रॅलीने आणि विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कलाविष्काराने संपूर्ण परिसर भीममय झाला होता. जयंती उत्सवाची सुरुवात माता रमाबाई चौक, सिद्धार्थ नगर ते कोळसेवाडी येथील मॉडेल शाळेपर्यंत काढण्यात आलेल्या भव्य रॅलीने झाली. या रॅलीमध्ये विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. रॅलीचे मुख्य आकर्षण शिस्तबद्धता आणि विद्यार्थ्यांचा उत्साह हे होते. रॅली शाळेच्या प्रांगणात पोहोचल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून पुढील कार्यक्रमांना सुरुवात झाली. कार्यक्रमाच्या प्रारंभी तथागत भगवान गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर सामूहिक बुद्धवंदना घेण्यात आली. मंचावरील मान्यवर आणि शिक्षकांनी आपल्या भाषणांतून डॉ. बाबासाहेबांच्या विचारांची प्रासंगिकता स्पष्ट केली आणि उपस्थित विद्यार्थी व पालकांना त्यांच्या जीवनकार्यातून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले. तसेच, बाबासाहेबांच्या जीवनावर आधारित एक माहितीपटही यावेळी दाखवण्यात आला. शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या अंगभूत कलागुणांचे दर्शन घडवत विविध भीमगीते सादर केली. बाबासाहेबांच्या जीवनातील प्रसंगांवर आधारित नाट्यप्रयोगांनी उपस्थितांची मने जिंकली. विशेषतः भीमगीतांवर आधारित नृत्याविष्कारांनी कार्यक्रमात रंगत आणली, ज्याला पालकांनी भरभरून दाद दिली. शाळेचे समन्वयक सूर्यकांत तांबोळी यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, केवळ शालेय शिक्षण न देता विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव आणि संस्कृतीची आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने शाळेत विविध सांस्कृतिक कार्यक्रम, खेळ महोत्सव, विज्ञान प्रदर्शने, विविध सण उत्सवासह सर्व महापुरुषांची जयंती साजरी केली जाते. यात पालक आणि शिक्षकही तितक्याच आनंदाने सहभागी होतात. पुढील वर्षी शाळेचा सुवर्ण महोत्सव असल्याने आणखीन जोरदार कार्यक्रम आयोजित केले जाणार असल्याचेही तांबोळी म्हणाले. या सोहळ्याला संस्थेचे पदाधिकारी भगवान भोईर, बी.जी. उन्नीथन, के.व्ही. सुर्वे, नरेंद्र सूर्यवंशी, आनंद नायर, दत्ता गायकवाड तसेच मुख्याध्यापिका शशिकला चव्हाण, शिरीन गोंसालवेझ, ममता भट्टाचार्य, कल्याणी अधारी, संगीता तांबोळी यांच्यासह मोठ्या संख्येने शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते.

वैज्ञानिक दृष्टिकोनाशिवाय प्रगती अशक्य – संदीप गोवळकर

वैज्ञानिक दृष्टिकोनाशिवाय प्रगती अशक्य – संदीप गोवळकर ठाणे : आपण विज्ञानाने निर्माण केलेल्या आधुनिक साधनांचा वापर करतो; पण वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारण्यास मात्र टाळाटाळ करतो. हाच विरोधाभास अंधश्रद्धेला खतपाणी घालत आहे. अंधश्रद्धेच्या विळख्यातून समाजाला मुक्त करायचे असेल, तर विज्ञानाचा प्रचार व प्रसार करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे, असे प्रतिप्रादन अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रधान सचिव संदीप गोवळकर यांनी केले. क्राऊड बुद्धिस्ट कम्युनिटी, लोढा माजिवडा,ठाणे यांच्या वतीने आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मंडळाचे अध्यक्ष जयवंत गायकवाड, उपाध्यक्ष प्रतीक पवार, सुभाष आचालखांब, सचिव निलेश गरुड, सहसचिव प्रवीण धुतराज, खजिनदार दीपक जाधव, सहखजिनदार निलेश निरभवणे, सल्लागार रवींद्र जाधव, महेंद्र नाकते, सदस्य सुनील माने, भत्ते लघु पवार सोसायटी नागरिक उपस्थित होते. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना अंनिसचे संदीप गोवळकर म्‍हणाले की, भारतीय राज्यघटनेतील कलम ५१ नुसार प्रत्येक नागरिकाला वैज्ञानिक दृष्टिकोन, मानवतावाद आणि जिज्ञासू वृत्ती जोपासण्याची जबाबदारी देते. पण प्रत्यक्षात समाजात याच्या अगदी उलट चित्र दिसते. अंधश्रद्धा, चमत्कारांचे दावे आणि अवैज्ञानिक समजुती आजही मोठ्या प्रमाणावर टिकून आहेत.वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे कुठल्याही घटनेमागील कारण शोधण्याची वृत्ती. जेवढा पुरावा, तेवढाच विश्वास  ही त्याची भूमिका. निरीक्षण, तर्क, अनुमान, प्रचिती आणि प्रयोग या मार्गांनीच सत्य समजून घेता येते. कोणी मोठी व्यक्ती सांगते म्हणून ते सत्य मानणे, किंवा एखाद्या ग्रंथात लिहिले आहे म्हणून त्याची चिकित्सा न करणे ही गुलाम मानसिकता आहे.चमत्कार हे वास्तव नसतात; ते हातचलाखी किंवा अज्ञानाचा फायदा घेणारी फसवणूक असते. प्रत्येक घटनेमागे कारण असतेच. ‘चमत्कार’ हा शब्दच माणसाला विचार करणे थांबवायला भाग पाडतो. मानवाची आजवरची सर्व प्रगती ही विज्ञानामुळेच झाली आहे. विज्ञान नम्र आहे, बदल स्वीकारते आणि स्वतःची चूकही मान्य करते. पण धर्म अंतिम सत्याचा दावा करतो  हीच मोठी समस्या आहे.यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना मंडळाचे अध्यक्ष जयवंत गायकवाड म्हणाले की, बाबासाहेबांनी बालपणापासूनच अत्यंत कठीण परिस्थितीचा सामना करत शिक्षणाच्या जोरावर स्वतःला घडवले. जातीय भेदभाव, सामाजिक अन्याय आणि उपेक्षा यांना न जुमानता त्यांनी ज्ञान, परिश्रम आणि चिकाटीच्या बळावर इतिहास घडवला.बाबासाहेबांचा संघर्ष हा केवळ वैयक्तिक नव्हता, तर तो संपूर्ण समाजाच्या उन्नतीसाठी होता. त्यांनी समानता, स्वातंत्र्य आणि बंधुता या मूल्यांवर आधारित समाजव्यवस्था निर्माण करण्यासाठी आयुष्यभर लढा दिला. त्यांच्या या संघर्षातून आजच्या पिढीने प्रेरणा घेऊन अन्यायाविरुद्ध उभे राहण्याची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. या कार्यक्रमाचे सुत्र संचालन व आभार प्रदर्शन प्रतीक पवार यांनी केले.

ठाणे जिल्ह्यात जवळपास २ हजार रुग्णांना सुमारे २१. ७४ कोटींची मदत

ठाणे जिल्ह्यात जवळपास २ हजार रुग्णांना सुमारे २१. ७४ कोटींची मदत अनिल ठाणेकर ठाणे,शासनाच्या आरोग्यविषयक विविध योजनांमधून मदत न मिळालेल्या पात्र व गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ‘आधार’ ठरत आहे.  ठाणे जिल्ह्यात आर्थिक वर्षात २ हजार ५१४ रुग्णांना सुमारे २१ कोटी ७४ लाख रुपयांची वैद्यकीय आर्थिक मदत वितरित करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून जिल्हा कक्षाची स्थापना, पेपरलेस अर्ज प्रक्रिया, तातडीने अर्जाचा निपटारा करणे आदी सकारात्मक बदल करण्यात आले. त्यासोबतच सामंजस्य करार, क्राउड फंडिंग आदींच्या माध्यमातून समाजातील मदत करणारे रूग्णालय, धर्मादाय रूग्णालय, संस्था, दाते आदींच्या सहकार्य लाभत आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या कार्यपद्धतीत केलेल्या सुधारणा आणि मदतीचे विविध मार्ग उपलब्ध करून दिल्याने पारदर्शकता वाढून मदत वितरणाचा वेग वाढला आहे. परिणामी, अधिकाधिक पात्र गरजू रुग्णांना वेळेत आर्थिक सहाय्य उपलब्ध होत आहे. कॉक्लियर इम्प्लांट (वय वर्ष २ ते ६), हृदय, यकृत, किडनी, फुफ्फुस, बोन मॅरो, हाताचे, गुडघ्याचे प्रत्यारोपण, हिप रिप्लेसमेंट, कर्करोग शस्त्रक्रिया, रस्ते अपघात, लहान बालकांची शस्रक्रिया, मेंदूचे आजार, हृदयरोग, डायालिसिस, कर्करोग (केमोथेरपी / रेडिएशन), अस्थिबंधन, नवजात शिशुंचे आजार, बर्न (भाजलेले) रुग्ण, विद्युत अपघात रुग्ण या अशा एकूण २० गंभीर आजारांसाठी आर्थसहाय्य दिले जाते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष, बीपीसीएल फाऊंडेशन व टाटा मेमोरियल सेंटर यांच्यात बालकांच्या कर्करोग उपचारासाठी नुकताच सामंजस्य करार करण्यात आला आहे. या करारामुळे सामाजिक दायित्व (सीएसआर) अंतर्गत उपचारांसाठी विशेष निधी उपलब्ध होणार आहे. आर्थिक अडचणी कमी होऊन गरजू बालकांना गुणवत्तापूर्ण कर्करोग उपचार सुलभ होणार आहेत. १ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत राज्यातील तब्बल ४० हजार ७७६ रुग्णांना ३३३ कोटी ६ लाख ८१ हजार ५०० रुपयांची वैद्यकीय मदत देण्यात आली आहे. तर, याच कालावधीत ठाणे  जिल्ह्यातील २५१४ रुग्णांना सुमारे २१  कोटी ७४ लाख ५० हजार  रुपयांची आर्थिक मदत वितरित करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या जिल्हा कक्ष, पेपरलेस अर्ज प्रक्रिया, सामंजस्य करार आदीमुळे रूग्णांना वेळेत अर्थसहाय्य होत आहे. गरजू रूग्णांनी योजनेचा लाभ घेण्याकरिता आणि अधिक माहितीकरिता १८०० १२३ २२११ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रूग्णालय मदत कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांनी केले आहे.

दिव्यात गॅस सिलेंडर घोटाळा?

दिव्यात गॅस सिलेंडर घोटाळा? श्रद्धा गॅस एजन्सीवर फसवणुकीचे आरोप आरती परब दिवा : आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर देशभरात घरगुती गॅस सिलेंडरचा तुटवडा जाणवत असताना, दिवा शहरात मात्र कृत्रिम तुटवडा निर्माण करून काळ्या बाजाराचा संशय व्यक्त केला जात आहे. एचपी गॅसचा पुरवठा करणाऱ्या श्रद्धा गॅस एजन्सीविरोधात नागरिकांनी गंभीर तक्रारी केल्या आहेत. दिव्यातील अनेक ग्राहकांनी सिलेंडरसाठी आगाऊ बुकिंग करूनही त्यांना वेळेवर गॅस मिळत नसल्याची तक्रार आहे. विशेष म्हणजे, सिलेंडर बुक केल्यानंतर डिलिव्हरी झाल्याचे ओटीपी प्राप्त होऊन २५ ते ३० दिवस उलटूनही प्रत्यक्षात सिलेंडर मिळालेले नाहीत, असा आरोप करण्यात येत आहे. तक्रारींबाबत एजन्सीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, श्रद्धा गॅस एजन्सीने दिवा व डोंबिवली येथील आपली कार्यालये बंद ठेवली असून कोणताही प्रतिसाद दिला जात नसल्याचे समोर आले आहे. तसेच एचपी गॅस कंपनीच्या सेल्स ऑफिसर चित्रा नायर यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्नही निष्फळ ठरल्याचे दिवा मनसेचे शहर सचिव प्रशांत गावडे यांनी सांगितले. या प्रकरणी संबंधित गॅस एजन्सीकडून नागरिकांची फसवणूक होत असल्याचा आरोप करत, Essential Commodities Act अंतर्गत कठोर कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी मनसेकडून करण्यात आली आहे. यासाठी तहसीलदारांची भेट घेऊन निवेदन देण्यात येणार असल्याची माहितीही देण्यात आली. दरम्यान, या प्रकारामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करून कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.