महाजनांच्या उपस्थितीत रंगली चर्चा!
हरिभाऊ लाखे
नाशिक : पुढील वर्षी नाशिक- त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळा निमित्त गुरुवारी रामकुंड परिसरात ध्वजस्तंभ शिलान्यास पूजन करण्यात आले. कुंभमेळा स्वच्छ, सुरक्षित व भव्य स्वरूपात पार पाडण्यासाठी शासन, प्रशासन, साधू-संत, महंत, विविध सामाजिक, धार्मिक संघटना आणि नागरिकांचा सहभाग आवश्यक असून भाविकांचे आदरातिथ्य करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी केले. या कार्यक्रमाकडे लोकप्रतिनिधींनी पाठ फिरवल्याने हा चर्चेचा विषय ठरला.
श्री गंगा गोदावरी पंचकोठी (तीर्थ) पुरोहित संघाच्या वतीने सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर श्रीरामाच्या जयघोषात आणि वेद मंत्रोच्चारात हा सोहळा झाला. महापौर हिमगौरी आडके-आहेर, सीमा हिरे, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह, मनपा आयुक्त मनीषा खत्री, उपमहापौर विलास शिंदे, जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज यांच्यासह विविध आखाड्यांचे प्रमुख साधू-संत, महंत उपस्थित होते.
मंत्री महाजन यांनी, मागील कुंभमेळ्यापेक्षा चार ते पाच पट अधिक, म्हणजेच १२ कोटींपेक्षा जास्त भाविकांच्या आगमनाची अपेक्षा पुढील कुंभमेळ्यात असल्याचे सांगितले. कुंभमेळा यशस्वी करण्याची जबाबदारी शासन, प्रशासनाबरोबरच प्रत्येक नागरिकाची आहे. गोदावरी नदी स्वच्छ ठेवण्यासाठी विविध संघटनांनी आणि भक्तगणांनी पुढाकार घेतला असून ही स्वच्छता केवळ एका दिवसापुरती नसून सातत्याने राखली जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
देश-विदेशातून येणाऱ्या भाविकांचे आदरातिथ्य करण्यासाठी प्रत्येक नाशिककराने स्वयंसेवक बनून पुढाकार घ्यावा. कुंभमेळ्याच्या अनुषंगाने नाशिक, त्र्यंबकेश्वर आणि जिल्ह्यात विविध विकासकामांना वेग आला आहे. रस्ते, पायाभूत सुविधा, वाहतूक व्यवस्था, स्वच्छता आणि नागरी सुविधांसाठी सुमारे ३५ हजार कोटी रुपयांच्या विविध विकासकामांची अंमलबजावणी सुरू आहे. या विकासकामांमुळे पुढील वर्षी नाशिकचा चेहरामोहरा पूर्णपणे बदललेला दिसेल, असेही त्यांनी सांगितले. कुंभमेळ्याच्या तयारीत साधू-संत, महंत, आखाडे, लोकप्रतिनिधी, प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि नागरिक यांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे नमूद केले.
यावेळी गंगा गोदावरीचे पूजन करण्यात आले. शंखनाद आणि उपस्थितांच्या टाळ्यांच्या गजरात ध्वजस्तंभ शिलान्यास पूजन समारंभ भक्तीमय वातावरणात पार पडला. पुरोहित संघाच्या सदस्यांनी मंत्रोच्चार केले.
ध्वज स्तंभाची रचना
रामकुंडावर उभारण्यात येणारा ध्वजस्तंभ सुमारे ५१ फूट उंच असणार असून, त्याची रचना अत्यंत आकर्षक व धार्मिक प्रतिकांनी समृद्ध आहे. या संपूर्ण स्तंभाच्या संकल्पनेत ‘अमृत मंथन’ कथेचा आधार घेण्यात आला आहे. यात प्रामुख्याने अश्व, हत्ती, रत्न, कल्पवृक्ष, अप्सरा, तसेच देवी-देवतांची प्रतिकात्मक शिल्पे कोरली जाणार आहेत. याशिवाय स्तंभावर गणपती आणि कमळ यांसारखी शुभचिन्हे देखील असतील. या सर्व घटकांमधून अमृत मंथनातील विविध पैलू आणि त्यांचे आध्यात्मिक महत्त्व अधोरेखित केले जाणार आहे.स्तंभाच्या तळभागाची रचना कमळाच्या आकारात करण्यात येणार असून, मध्यभागात कोरीव कलाकुसर असलेले पट्टे आणि विविध धार्मिक चिन्हांनी सजवलेले भाग असतील. शीर्षस्थानी ध्वजासह देवतांची प्रतिमा स्थापित केली जाणार आहे, ज्यामुळे संपूर्ण स्तंभ अधिक भव्य आणि दैदिप्यमान दिसेल.
लोकप्रतिनिधींची पाठ
शिलान्यास पुजन सोहळ्याचे निमंत्रण पुरोहित संघाच्या वतीने लोकप्रतिनिधी, महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी , पोलीस आयुक्त यांच्यासह अन्य मान्यवरांना देण्यात आले. कार्यक्रमास महापालिका आयुक्त मनीषा खत्री काही वेळ उपस्थित होत्या. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आलेच नाही. दादा भुसे, छगन भुजबळ, नरहरी झिरवाळ या मंत्र्यांसह देवयानी फरांदे, राहुल ढिकले हे अनुपस्थित राहिले. उद्योगमंत्री उदय सामंत शहरात असतांनाही ते कार्यक्रमास उपस्थित नव्हते. लोकप्रतिनिधींनी कार्यक्रमाकडे फिरवलेली पाठ चर्चेचा विषय ठरली.
00000000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *