Month: July 2026

जुन्या वादातून कल्याण पूर्वेत तरुणाची धारधार शस्त्राने हत्या

कल्याण : जुन्या वादातून चाकूने बारा ते तेरा वार केल्याने गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना कल्याण पूर्वेतील आडीवली परिसरात घडली आहे. कल्याणच्या आडीवली परिसरात मध्यरात्री हि धक्कादायक हत्याकांडाची…

अमेरिका-इस्रायल-इराण युद्धाचा भारतावर होणाऱ्या परिणामांवर आज मुंबईत सार्वजनिक चर्चा

अनिल ठाणेकर मुंबई, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने ‘अमेरिका-इस्रायल आणि इराण युद्ध व त्याचा भारतावर होणारा परिणाम’ या विषयावर सार्वजनिक चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम शनिवार, १८ जुलै रोजी दुपारी ३.३० ते सायंकाळी ६.३० या वेळेत टिळक भवन ऑडिटोरियम, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस मुख्यालय, काकासाहेब गाडगीळ मार्ग, दादर (पश्चिम), मुंबई येथे होणार आहे. या चर्चासत्रात जागतिक युद्धनीती व संरक्षणविषयक अभ्यासक तसेच ‘फोर्स’ मासिकाचे संपादक प्रवीण साहनी हे प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ असतील. कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अर्थ विभागाचे अध्यक्ष विश्वास उतगी हे जबाबदारी सांभाळत आहेत. या कार्यक्रमाला माजी खासदार कुमार केतकर, सामाजिक कार्यकर्ते फिरोज मिठीबोरवाला आणि माजी खासदार हुसेन दलवाई हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. मध्यपूर्वेतील युद्धस्थिती, त्याचे जागतिक राजकारण, अर्थव्यवस्था, ऊर्जा सुरक्षा तसेच भारताच्या परराष्ट्र धोरण आणि राष्ट्रीय हितांवर होणाऱ्या परिणामांचा सखोल आढावा या चर्चासत्रात घेतला जाणार असून, विविध क्षेत्रांतील अभ्यासक, नागरिक, विद्यार्थी आणि माध्यम प्रतिनिधींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे. ०००००००

 सोनम वांगचुंग यांच्या आंदोलनावर तातडीने तोडगा काढावा

केंद्र सरकारला माकपचे आवाहन अनिल ठाणेकर ठाणे : सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुंग यांच्या आंदोलनाचा आज अठरावा दिवस असून, त्यांच्या आंदोलनाची केंद्र सरकारने तातडीने दखल घेऊन सकारात्मक तोडगा काढावा, अशी मागणी भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) अर्थात माकपने केली आहे. माकपचे राज्य सचिव डॉ. अजित नवले यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सलग १८ दिवसांच्या उपोषणामुळे सोनम वांगचुंग यांच्या प्रकृतीवर गंभीर परिणाम होत असून, त्यांच्या काही सहआंदोलकांची प्रकृतीही चिंताजनक बनली आहे. त्यामुळे आंदोलकांचा जीव धोक्यात येण्यापूर्वी केंद्र सरकारने तातडीने हस्तक्षेप करून त्यांच्याशी चर्चा करावी आणि आंदोलनावर मार्ग काढावा. निवेदनात पुढे म्हटले आहे की, नीट परीक्षेतील पेपरफुटीप्रकरणी आंदोलनकर्त्यांनी मांडलेल्या मागण्या योग्य असून, लोकशाही व्यवस्थेत अशा मागण्यांची दखल घेणे ही सरकारची जबाबदारी आहे. त्यामुळे केंद्र सरकारने आंदोलकांशी संवाद साधून त्यांच्या प्रश्नांचे निराकरण करावे. डॉ. नवले यांनी युवक व विद्यार्थ्यांनाही आवाहन करताना सांगितले की, सोशल मीडियावर आंदोलनाला मोठ्या प्रमाणावर पाठिंबा देणाऱ्या युवकांनी आता प्रत्यक्ष लोकशाही आंदोलनात सहभागी होऊन सोनम वांगचुंग यांच्या मागण्यांना बळ द्यावे. दरम्यान, माकपने केंद्र सरकारला आंदोलनाची गंभीर दखल घेऊन आंदोलकांचे प्राण वाचवण्यासाठी तातडीने पावले उचलण्याचे आवाहन केले आहे.

सावरकर नगर येथे झोपडपट्टी पुनर्वसन योजनेची जनजागृती कार्यशाळा संपन्न

 मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळवी यांचे मार्गदर्शन ठाणे, मुंबई महानगर प्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, ठाणे यांच्यावतीने शहरातील सावरकर नगर येथे झोपडपट्टी पुनर्वसन योजनेबाबत जनजागृती व मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. ठाणे महानगरपालिकेच्या महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेल्या या कार्यशाळेला स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळवी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या कार्यशाळेला उपमुख्य अभियंता राजकुमार पवार, सक्षम प्राधिकरण अधिकारी मिनल पालांडे, कार्यकारी अभियंता सलीम सय्यद, सहाय्यक निबंधक रोहिदास बांगर, वास्तुविशारद निलेश सावंत यांच्यासह परिसरातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण ठाणे शहरात प्रभावीपणे कार्यरत असून, नागरिकांनी पुनर्वसन योजनेत सक्रिय सहभाग नोंदवून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.प्राधिकरणामार्फत आयोजित करण्यात आलेल्या या कार्यशाळेत झोपडपट्टी पुनर्वसन योजनेची उद्दिष्टे, योजनेचे फायदे, पुनर्वसनाची प्रक्रिया, पात्रता निकष तसेच नागरिकांच्या शंकांचे निरसन आदी विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी उपस्थित नागरिकांच्या विविध प्रश्नांची समाधानकारक उत्तरे देत पुनर्वसन प्रक्रियेतील प्रत्येक टप्प्याची सविस्तर माहिती दिली. तसेच, स्थानिक नागरिकांमध्ये जनजागृती करून योजनेचा लाभ अधिकाधिक पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहनही प्राधिकरणामार्फत करण्यात आले. या कार्यशाळेत परिसरातील स्थानिक नागरिक, झोपडपट्टीधारक तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

 कोणत्याही पुर्वसूचनेशिवाय स्मार्ट मीटर बसवल्याचा आरोप

 कर्मचाऱ्यांवर कारवाईची ग्राहकांची मागणी अनिल ठाणेकर ठाणे, ठाणे पश्चिम येथील ओम श्री स्वामी समर्थ सोसायटीतील रहिवासी जगदीश कमलसिंह खैरालिया यांनी महावितरणाकडे लेखी तक्रार करून कोणतीही पूर्वसूचना किंवा संमती न घेता त्यांच्या घरातील जुना वीज मीटर काढून स्मार्ट वीज मीटर बसविण्यात आल्याचा आरोप केला आहे. तसेच संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर चौकशी करून कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. जगदीश खैरालिया यांनी कार्यकारी अभियंता, महावितरण (ठाणे विभाग) यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, १ जुलै २०२६ रोजी वीजबिलाचा धनादेश भरण्यासाठी गेल्यानंतर त्यांना कार्यालयात समजले की, त्यांच्या घरातील जुना वीज मीटर काढून त्याजागी स्मार्ट मीटर बसविण्यात आला आहे. मात्र याबाबत कोणतीही पूर्वकल्पना, सूचना किंवा संमती घेण्यात आली नव्हती. ही बाब ग्राहक संरक्षणाच्या अधिकारांचे उल्लंघन असून ग्राहकांची फसवणूक असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. खैरालिया यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे की, ते २६९ चौरस फूट क्षेत्रफळाच्या १ बीएचके सदनिकेत राहतात. घरात अत्यल्प वीज वापर होत असून टीव्ही, फ्रिज व वॉशिंग मशीनचा वापरही केला जात नाही. तरीदेखील स्मार्ट मीटर बसवल्यानंतर वीजबिलात अचानक वाढ झाल्याने संशय निर्माण झाला. त्यानंतर कार्यालयात चौकशी केली असता स्मार्ट मीटर बसविल्याची माहिती मिळाली. मात्र तो नेमका कधी बसविण्यात आला, याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या निवेदनाद्वारे त्यांनी तीन प्रमुख मागण्या केल्या आहेत. त्यामध्ये तात्काळ स्मार्ट मीटर काढून पूर्वीप्रमाणे जुना वीज मीटर बसविणे, स्मार्ट मीटरमुळे वसूल झालेली अतिरिक्त रक्कम व्याजासह परत देणे आणि संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करणे यांचा समावेश आहे. या मागण्यांची तातडीने पूर्तता न झाल्यास पुढील कायदेशीर कारवाई तसेच आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशाराही जगदीश खैरालिया यांनी दिला आहे. या निवेदनाच्या प्रती ठाण्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा न्यायदंडाधिकारी आणि ठाणे शहर पोलीस आयुक्त यांनाही पाठविण्यात आल्या आहेत.

 मतदार पडताळणीबाबत संभ्रम कायम

– घरोघरी जाऊन फॉर्म भरणे आवश्यक -नंदकुमार देशमुख अनिल ठाणेकर ठाणे, मतदार यादी विशेष पुनरिक्षण मोहिमेबाबत प्रशासनाने केलेल्या घोषणेनंतरही प्रत्यक्षात घरोघरी जाऊन मतदारांचे फॉर्म भरले जात नसल्याचा आरोप ठाणे रेल्वे प्रवासी संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार दत्तात्रेय देशमुख यांनी केला आहे. काही दिवसांपूर्वी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक मतदार यादी तयार करण्यासाठी नियुक्त कर्मचारी (बीएलओ) प्रत्येक मतदाराच्या घरी जाऊन आवश्यक फॉर्म भरून घेतील, असे आवाहन केले होते. मात्र आजपर्यंत कोणताही कर्मचारी घरी आलेला नसल्याने मतदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे, असे देशमुख यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे म्हटले आहे. शिवाईनगर येथील शाळेत सुमारे ५० नागरिक माहिती घेण्यासाठी गेले असता, तेथे बीएलओंची यादी उपलब्ध झाली. मात्र यादीतील बहुतांश अधिकाऱ्यांनी फोन न उचलल्याने किंवा आवश्यक माहिती न दिल्याने नागरिकांची गैरसोय झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.अनेक मतदारांना ऑनलाइन पद्धतीने माहिती मिळविणे किंवा अर्ज भरणे शक्य नसल्याने प्रशासनाने या बाबीकडे तातडीने लक्ष द्यावे. बीएलओंना आवश्यक सूचना देऊन त्यांनी प्रत्येक मतदाराच्या घरी जाऊन मतदार यादी पडताळणी व फॉर्म भरण्याची प्रक्रिया पूर्ण करावी, अशी मागणी नंदकुमार दत्तात्रेय देशमुख यांनी केली आहे. ०००००००

इथेनॉल मिश्रित पेट्रोल विरोधात कल्याणमध्ये मनसेचे आंदोलन

कल्याण : इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे वाहनांच्या इंजिनचे नुकसान होत असल्याचा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात आक्रमक आंदोलन केले. महाराष्ट्र नवनिर्माण सेना कल्याण शहर शाखेच्या वतीने माजी आमदार…

गणवेश सक्ती करणाऱ्या शाळेवर कारवाईच्या मागणीसाठी पालकांचे ठिय्या आंदोलन

मान्यता रद्द करण्यासाठी उपसंचालकांना पत्र कल्याण : टिटवाळा येथील केएनटी शाळा प्रशासनाकडून तिप्पट दराने ठराविक दुकानातुच गणवेश खरेदी करण्याची सक्ती पालकांवर केल्याने याविरोधात पालकांनी शिक्षण विभागावर तीन वेळा आंदोलन छेडले. मात्र, तरीही संबधित शाळा प्रशासनावर कोणतीही कारवाई होत नाही. यासाठी आज पुन्हा या पालकांनी केडीएमसीच्या शिक्षण मंडळ कार्यालयात ठिय्या मांडत आंदोलन केले.  शिक्षण विभाग आणि शाळा प्रशासनाचे साटे लोटे असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते विजय देशेकर यांनी केला आहे. तर, शाळेकडून वाढीव दराने गणवेश विक्री केल्याच्या तक्रारीची दखल घेत याप्रकरणी शाळेविरोधात कारवाई करण्यासाठी उपसंचालकांना पत्र पाठवले असून, त्यांच्याकडून आदेश प्राप्त होताच कारवाई केली जाईल. असे केडीएमसी शिक्षण विभाग प्रशासन अधिकारी भारत बोरनारे यांनी स्पष्ट केले आहे. के.एन.टी. पब्लिक स्कूल, टिटवाळा येथील पीडित व त्रस्त पालकांनी शाळेकडून करण्यात येत असलेल्या कथित सक्तीच्या गणवेश विक्री, शैक्षणिक साहित्याबाबतच्या तक्रारी आणि इतर मुद्द्यांसंदर्भात २५ जून  रोजी प्रशासन अधिकारी तथा शिक्षणाधिकारी भारत बोरनारे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन संबंधित कागदपत्रे व उपलब्ध पुरावे सादर केले होते. पालकांच्या म्हणण्यानुसार, त्या बैठकीत संबंधित प्रकार गंभीर असल्याचे निदर्शनास आले असून, पुढील आवश्यक कार्यवाही करण्यात येईल तसेच आवश्यक असल्यास संबंधित प्रस्ताव मा. शिक्षण उपसंचालक, मुंबई यांच्याकडे पाठविण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले होते. तसेच काही पालकांना संबंधित गणवेश विक्रेत्याकडे गणवेश परत जमा करण्याबाबत आणि शैक्षणिक साहित्याबाबत पुढील सूचनांची प्रतीक्षा करण्यास सांगण्यात आले होते. त्यानंतरही कोणताही लेखी निर्णय, बैठक किंवा पालकांना दिलासा देणारी ठोस कार्यवाही न झाल्याने पालकांनी दिनांक २ जुलै २०२६ रोजी स्मरणपत्रही सादर केले. मात्र आजपर्यंत कोणताही अंतिम निर्णय अथवा स्पष्ट आदेश प्राप्त झालेला नसल्याचा पालकांचा दावा आहे. यामुळे अनेक पालकांनी गणवेश विक्रेत्याकडे परत जमा केले असले तरी त्यांना अद्याप पैसे परत मिळालेले नाहीत. तसेच शैक्षणिक साहित्याबाबतही निर्णय प्रलंबित असल्याने पालक आणि विद्यार्थी संभ्रमाच्या स्थितीत आहेत. या पार्श्वभूमीवर, प्रशासनाकडून तातडीने निर्णय व्हावा, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळावे आणि पालकांना न्याय मिळावा या मागण्यांसाठी आज  शिक्षण मंडळ कार्यालय येथे पालकांनी निषेध आंदोलन केले. 00000000

 गेल्या सहा महिन्यात सिंधुदुर्गात अपघाती मृत्यूंमध्ये घट

संसदीय सुरक्षा समितीची बैठक संपन्न सिंधुदुर्ग: जानेवारी ते जून, या गेल्या सहा महिन्यात, गतवर्षीच्या (२०२५)   तुलनेत यावर्षी  (२०२६) सिंधुदुर्ग जिल्ह्यात अपघाती मृत्यूंच्या संख्येत कमालीची घट झाल्याचे दिसून आले आहे. विविध विभागांनी समन्वयाने राबविलेल्या उपाययोजनांमुळे रस्ता सुरक्षेच्या क्षेत्रात सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत अशी माहिती परिवहन विभागाच्या वतीने देण्यात आली.  संसदीय रस्ता सुरक्षा समितीची बैठक रत्नागिरी -सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालयातील  जिल्हा नियोजन समिती सभागृहात संपन्न झाली. जिल्ह्यात केवळ अपघातांची संख्या कमी करणे हे अंतिम उद्दिष्ट नसून ‘अपघातमुक्त सिंधुदुर्ग’ घडविण्यासाठी शून्य अपघाती मृत्यूचे लक्ष्य ठेवून सर्व संबंधित विभागांनी अधिक प्रभावी नियोजन करावे. वाहतूक नियमांची कठोर अंमलबजावणी, रस्ते अभियांत्रिकीतील आवश्यक सुधारणा, व्यापक जनजागृती तसेच आपत्कालीन प्रतिसाद व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, अशा स्पष्ट सूचना खासदार नारायण राणे यांनी यावेळी दिल्या. बैठकीत जिल्ह्यातील रस्ता सुरक्षा उपाययोजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला तसेच अपघातमुक्त जिल्हा घडविण्याच्या दृष्टीने विविध विभागांनी राबविणाऱ्या उपक्रमांवर चर्चा करण्यात आली. बैठकीत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काळे यांनी जिल्ह्यात रस्ता सुरक्षा क्षेत्रात राबविण्यात आलेल्या विविध उपाययोजनांची माहिती सादर केली. विशेष अंमलबजावणी मोहिमा, वाहतूक नियमांच्या काटेकोर अंमलबजावणीसाठी करण्यात आलेली कारवाई, नागरिकांमध्ये रस्ता सुरक्षा विषयक जनजागृती, अपघातप्रवण स्थळांवरील सुधारणा, तसेच विविध विभागांच्या समन्वयातून राबविण्यात आलेल्या उपक्रमांचा सविस्तर आढावा त्यांनी सादर केला. या बैठकीला आमदार निलेश राणे, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर, पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता दिनेशकुमार बागुल तसेच राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या कार्यकारी अभियंता अनामिका जाधव उपस्थित होत्या. बैठकीत राष्ट्रीय व राज्य महामार्गांवरील सुरक्षा वाढविण्यासाठी आवश्यक सुधारणा, अपघातप्रवण स्थळांवर कायमस्वरूपी उपाययोजना, वाहतूक व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी आधुनिक उपायांचा अवलंब, रस्ते अभियांत्रिकीतील त्रुटी दूर करणे, तसेच विविध विभागांमधील समन्वय अधिक मजबूत करावा. रस्ता सुरक्षा ही केवळ एका विभागाची जबाबदारी नसून सर्व संबंधित विभागांनी संयुक्तपणे कार्य केल्यासच अपघातांमध्ये आणखी घट साध्य होऊ शकते असे पालकमंत्री नितेश राणे यावेळी बोलताना म्हणाले. 000000

 माऊली फाऊंडेशनचा अनुकरणीय उपक्रम

वारकऱ्यांना आवश्यक साहित्य वाटप मुंबई : गेल्या पाच वर्षांपासून आषाढी वारीमध्ये वारकऱ्यांची निःस्वार्थ सेवा करणाऱ्या माऊली फाउंडेशन, सानपाडा,ज्ञनवी मुंबई यांनी यंदाही मोठ्या उत्साहात सेवा उपक्रम राबवून हजारो वारकऱ्यांना अत्यावश्यक साहित्याचे वाटप केले. वारकऱ्यांच्या गरजा ओळखून सातत्याने सेवा देणाऱ्या फाउंडेशनने गेल्या दोन वर्षांपासून हजारो वारकऱ्यांना मोफत वैद्यकीय साधनांच्या संचाचे वाटप करण्याचा उपक्रम यशस्वीपणे सुरू ठेवला आहे. यावर्षी समाजातील अनेक दानशूर व्यक्ती, हितचिंतक आणि सेवाभावी नागरिकांनी माऊली फाउंडेशनच्या कार्यावर विश्वास ठेवून उदंड सहकार्य केले. त्यांच्या योगदानामुळे वैद्यकीय साधनांच्या संचासोबतच रेनकोट, पिण्याचे पाणी, बिस्किटे, हल्दिराम उपवास चिवडा, तुळशीची माळ आणि श्रीमद् भगवद्गीता यांचेही मोठ्या प्रमाणावर वाटप केले. विशेष म्हणजे सेवा उपक्रम केवळ साहित्य वाटपापुरता मर्यादित न ठेवता, वाटप पूर्ण झाल्यानंतर माऊली फाउंडेशनच्या संपूर्ण पथकाने सेवा केंद्र आणि परिसराची स्वच्छता केली. स्वच्छता हीसुद्धा सेवा  या भावनेतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे वारकरी आणि उपस्थित नागरिकांनी विशेष कौतुक केले. माऊली फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ. सायली कैलास मुद्रास यांनी सांगितले की, वारकऱ्यांची सेवा जितकी महत्त्वाची आहे तितकेच वारीचे पावित्र्य आणि परिसराची स्वच्छता राखणेही प्रत्येकाचे कर्तव्य आहे. सेवा, संवेदना आणि सामाजिक बांधिलकी या मूल्यांचा जप करत फाऊंडेशन सातत्याने समाजकार्यात योगदान देत आहे. वारकरी संप्रदायाच्या या सेवाभावी कार्यात माऊली फाउंडेशनचे खजिनदार अजय पवार आणि सचिव विकास वाघुले यांचे फार मोठे योगदान आहे.  या सेवाकार्यात मोलाचे सहकार्य करणाऱ्या सर्व दाते, स्वयंसेवक, सहकारी आणि समाजातील नागरिकांप्रती माऊली फाउंडेशनने मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त केली आहे. प्रत्येक देणगीमागील समाजसेवेची भावना हीच या कार्याची प्रेरणा असून, त्याच बळावर अधिकाधिक वारकऱ्यांपर्यंत सेवा पोहोचविणे शक्य झाल्याचे फाऊंडेशनने नमूद केले. पुढील वर्षी हा सेवायज्ञ आणखी व्यापक स्वरूपात राबविण्याचा संकल्प माऊली फाऊंडेशनने केला असून आमच्या कार्याची दखल घेऊन कालच एका भक्ताने आम्हाला पुढील वर्षासाठी देणगी दिली असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. समाजातील जास्तीत जास्त नागरिकांनी या सेवायज्ञात सहभागी व्हावे, असे आवाहन आम्ही करत आहोत. दान करणारा हात आणि सेवा करणारा हात,  दोन्ही विठ्ठलाचेच रूप आहेत. स्वच्छता ही सुद्धा सेवा आहे. माऊली फाऊंडेशन या दोन्ही मूल्यांचा जप करत राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.