Author: bittambatami.com

नाशिकमध्ये कुंभमेळा रामकुंडात, मग आमच्या जमिनी कशासाठी?

शेतकऱ्यांचा प्रशासनाला सवाल हरिभाऊ लाखे नाशिक : कुंभमेळा व साधुग्रामच्या नावाखाली प्रशासन नांदूर, टाकळी परिसरातील सुपीक शेतजमिनी अन्यायकारकपणे ताब्यात घेण्याच्या प्रयत्नात आहे. मागील अडीच दशकांत डीपी रोड, छत्रपती संभाजीनगर रस्ता, साधुग्राम व सांडपाणी प्रक्रिया केंद्र (एसटीपी) यासाठी घेतलेल्या, वापरलेल्या जागांचा मोबदला अद्याप दिला नसल्याची तक्रार करीत साधुग्राम शेतकरी कृती समितीने साधुग्रामसाठी नव्याने जागा देण्यास ठाम विरोध दर्शविला आहे. पुढील वर्षी होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी प्रशासनाने नाशिक, नांदूर व टाकळी शिवारातील सुमारे एक हजार एकर जमीन साधुग्रामसाठी तात्पुरत्या स्वरूपात अधिग्रहित करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या विरोधात साधुग्राम शेतकरी कृती समितीने उच्च न्यायालयात दाद मागितली. न्यायालयाने पुढील सुनावणीपर्यंत स्थगिती देत शेतकऱ्यांची सुनावणी घेण्याचे निर्देश दिले. त्यानुसार मंगळवारी अपर तहसीलदार अमोल निकम यांच्यासमोर संबंधित शेतकऱ्यांच्या हरकतींवर सुनावणी सुरू झाली. यावेळी जमीन मालकी, शेती, कुटुंबाची उपजीविका आणि अधिग्रहण संबंधी हरकतींशी संबंधित कागदपत्रे शेतकऱ्यांनी सादर केली. कुंभमेळा रामकुंडात भरतो. आमच्या सुपीक जमिनींचा कुंभमेळ्याशी काहीच संबंध नाही. वर्षानुवर्षे आम्ही शेती करीत असून प्रशासन मनमानीपणे नोटिसा देऊन मोजण्या करीत आहे, असा आरोप शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष समाधान जेजुरकर आणि शेतकऱ्यांनी केला. यापूर्वी विविध कारणांसाठी आमच्या ताब्यात घेतलेल्या, वापरलेल्या जमिनींचे पैसे थकवून नवीन विकास आराखड्यातील (डीपी) जमिनींसाठी मात्र प्रशासनाने ९०० कोटी रुपयांचे वाटप केल्याचा दावा त्यांनी केला. प्रशासनाने थकीत पैसे न दिल्यास सातबारा उताऱ्यावर आमची नावे असून ऐन कुंभमेळ्यात जमिनींवर ताबा घेऊन खोदाई केली जाईल, असा इशाराही जेजुरकर यांच्यासह शेतकऱ्यांनी दिला. प्रशासनाने न्यायालयाच्या निर्देशानुसार सुनावणी पूर्ण होईपर्यंत संबंधित जागेवर जैसे थे परिस्थिती कायम ठेवली जाणार असल्याचे म्हटले आहे. तात्पुरत्या अधिग्रहणातील मूल्यांकन व अर्जदारांनी न्यायालयात मांडलेल्या सर्व मुद्यांवर सविस्तर सुनावणी घेतली जाईल. नागरिकांच्या शंका, समस्या व कायदेशीर हरकतींचा सहानुभूतीपूर्वक व कायदेशीर चौकटीत विचार केला जाणार असल्याचे प्रशासकीय वर्तुळातून सांगण्यात आले. गोदावरी काठावर दर १२ वर्षांनी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यात देशभरातील लाखो साधू-महंतांच्या निवासासाठी नाशिकमध्ये साधुग्राम वसविण्यात येते. २०२७ मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यात सुमारे १६१८ एकर क्षेत्रावर साधुग्राम उभारण्याचे प्रस्तावित आहे. यातील तपोवन परिसरातील सुमारे ३१८ एकर जागा साधुग्रामसाठी आरक्षित असून यावेळी ती कायमस्वरूपी संपादित केली जाणार आहे. याव्यतिरिक्त लागणारी सुमारे १२५० एकर जागा तात्पुरत्या स्वरूपात घेतली जाणार आहे. नव्याने जागा देण्यास शेतकऱ्यांचा विरोध आहे. मागील २०१५ च्या कुंभमेळ्याच्या वेळी साधुग्रामसाठी जमिनी अधिग्रहित करण्यात आल्या होत्या. सिंहस्थ संपल्यानंतर या जमिनी पुन्हा शेतीयोग्य करून देण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले होते. मात्र प्रत्यक्षात खडी, मुरूम, सिमेंट, दगड, पाइप आदी साहित्य पूर्णपणे काढून जमीन पूर्ववत करण्यात प्रशासनाला अपयश आल्याने अनेक जमिनी पुन्हा शेतीसाठी योग्य राहिल्या नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे पुन्हा हजारो एकर सुपीक व बागायती जमीन अधिग्रहित केल्यास शेतकऱ्यांचे कायमस्वरूपी नुकसान होईल, अशी भूमिका समितीने घेतली आहे.

 फक्त मुंबई नव्हे, संपूर्ण राज्य ‘ग्रोथ इंजिन’ बनविणार : एकनाथ शिंदे

मुंबई-एमएमआरला जागतिक आर्थिक केंद्र बनविण्यासाठी वेगाने पावले टियर-२, टियर-३ शहरांच्या विकासावर भर अनिल ठाणेकर मुंबई : महाराष्ट्राला केवळ मुंबईपुरते मर्यादित न ठेवता संपूर्ण राज्याला देशाच्या विकासाचे ‘ग्रोथ इंजिन’ बनविण्याचे सरकारचे उद्दिष्ट…

प्रदूषण नियमावलीचे उल्लंघन करणाऱ्या तुर्भेतील बांधकामस्थळावर कारवाई

महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्याकडून पाहणी अशोक गायकवाड नवी मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने स्वतःहून दाखल करून घेतलेल्या जनहित याचिका क्रमांक ३/२०२३ मध्ये २४ डिसेंबर २०२५ रोजी दिलेल्या आदेशानुसार, शहरातील वाढत्या वायू प्रदूषणावर तातडीने व प्रभावी उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील बांधकामस्थळांमुळे होणारे ध्वनी व वायू प्रदूषण तसेच सुरुंगस्फोटासाठी अवलंबावयाची मानक कार्यपद्धती जाहीर करण्यात आली असून, तिचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना सर्व बांधकामधारकांना देण्यात आल्या आहेत. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांना यापूर्वी नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. त्यानंतरही आवश्यक सुधारणा न करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या पाहणी दौऱ्यादरम्यान तुर्भे सेक्टर १९ मधील भूखंड क्रमांक ११ येथे मे. शेल्टॉन इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. यांच्या बांधकामस्थळी मानक कार्यपद्धतीतील अनेक नियमांचे उल्लंघन होत असल्याचे आढळून आले होते. त्यानंतर संबंधित बांधकामधारकास तातडीने आवश्यक उपाययोजना करण्याची नोटीस बजावण्यात आली होती. मात्र, त्यानंतरही बांधकाम स्थळी आवश्यक सुधारणा करण्यात आलेल्या नसल्याचे निदर्शनास आल्याने तुर्भे विभाग कार्यालय मार्फत संबंधित बांधकामस्थळ सीलबंद करण्यात आले. महानगरपालिकेच्या पर्यावरण विभागाच्या माध्यमातून तुर्भे विभागाचे सहायक आयुक्त तथा विभाग अधिकारी सागर मोरे यांच्या नियंत्रणाखाली अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली. यावेळी कनिष्ठ अभियंता विनोद आंब्रे यांच्यासह अतिक्रमण निर्मूलन पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच अतिक्रमण विभागातील सुरक्षारक्षक तैनात होते.

 खडेगोळवली परिसरात गुन्हेगारांचा धुमाकूळ

दोन दुचाकी पेटवल्या, १५ वाहनांची तोडफोड दोन आरोपी पोलिसांच्या ताब्यात; एका अल्पवयीनाचा समावेश कल्याण : कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खडेगोळवली परिसरात मंगळवारी रात्री अज्ञात गुन्हेगारांनी धुमाकूळ घालत दोन दुचाकींना आग लावल्याची तसेच एका रिक्षासह तब्बल १४ चारचाकी वाहनांची तोडफोड केल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून, त्यामध्ये एका अल्पवयीनाचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, खडेगोळवली येथील पुष्पराज कॉलनीमध्ये आशीष गोकुळ तिळोंजे यांच्या दुचाकीला अज्ञात आरोपींनी आग लावली. त्याचवेळी जवळील नेहरू नगर परिसरात गौतम भिंगारदिवे यांच्या दुचाकीलाही आग लावण्यात आली. दोन्ही घटना एकाच वेळी घडल्याने पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत तपास सुरू केला. दरम्यान, खडेगोळवली येथील पाण्याच्या टाकीपासून कमलादेवी महाविद्यालयापर्यंत रस्त्यालगत उभी असलेली वाहनेही आरोपींनी लक्ष्य केली. यामध्ये एका रिक्षेसह १४ चारचाकी वाहनांच्या काचा फोडून त्यांचे नुकसान करण्यात आले. कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन पगार यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात साहिल फिरोज शेख आणि एका अल्पवयीनाला ताब्यात घेण्यात आले आहे. या घटनेमागील कारण तसेच आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा पोलीस तपास करीत आहेत. 0000

साबे गावातील नाल्यात टोरंट पॉवरची केबल

 पाण्याचा निचरा खोळंबल्याने भाजपचे टोरंट पॉवरला निवेदन दिवा, दि. २५ ऑगस्ट: दिवा पूर्वेकडील साबे गावातील विठ्ठल मंदिराशेजारील मुख्य नाल्यामधून टोरंट पॉवर कंपनीची केबल गेल्यामुळे नाल्यातील पाण्याचा नैसर्गिक प्रवाह अडथळित होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या समस्येमुळे नाल्याला वारंवार चौकअप होऊन परिसरात सांडपाणी साचण्याची परिस्थिती निर्माण होत असल्याने भारतीय जनता पक्ष, दिवा शहरच्या वतीने टोरंट पॉवर कंपनीच्या दिवा पूर्व कार्यालयाला निवेदन देण्यात आले. भाजप दिवा शहरचे अध्यक्ष सचिन रमेश भोईर यांनी टोरंट पॉवर कंपनीच्या अधिकाऱ्यांना हे निवेदन दिले. सावे गावातील विठ्ठल मंदिरा शेजारील मुख्य नाल्यामधून टोरंट पॉवरची केबल नेण्यात आली आहे. या केबलमुळे नाल्यातील पाण्याचा नैसर्गिक प्रवाह व्यवस्थित होत नसून पाणी अडून राहत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. नाल्यात वारंवार चोकअप होऊन परिसरातील सांडपाणी साचत असल्याने नागरिकांना दुर्गंधी, अस्वच्छता तसेच डासांचा प्रादुर्भाव यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. पावसाळ्यात ही परिस्थिती आणखी गंभीर होत असून नागरिकांच्या आरोग्यासोबतच परिसराच्या स्वच्छतेलाही धोका निर्माण झाल्याचे निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे टोरंट पॉवर कंपनीने या ठिकाणी तातडीने पाहणी करून नाल्यातील पाण्याचा प्रवाह सुरळीत होण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. केबलमुळे अडथळा निर्माण होत असल्यास ती योग्य पद्धतीने स्थलांतरित किंवा व्यवस्थित करून नाल्याचा पूर्ण क्षमतेने पाणी निचरा होईल, याची व्यवस्था करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. ही समस्या नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी आणि आरोग्याशी संबंधित असल्याने प्रशासनाने तसेच संबंधित कंपनीने तातडीने प्रत्यक्ष पाहणी करून कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी विनंती निवेदनातून करण्यात आली आहे. तसेच केलेल्या कार्यवाहीची माहिती लवकरात लवकर देण्यात यावी, अशी मागणी भाजपच्या वतीने करण्यात आली आहे. 0000

मुंबई : अशोक गायकवाड ‘व्हीबी जी राम जी’ योजनेच्या माध्यमातून राज्यातील गरजू नागरिकांना अधिकाधिक रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी कामांची संख्या वाढवून मंजूर कामांच्या अंमलबजावणीला गती द्यावी, असे निर्देश रोजगार हमी…

अदानी इलेक्ट्रिसिटी ऑफिसर्स असोसिएशनचे आंदोलन

रमेश औताडे मुंबई : अदानी इलेक्ट्रिसिटी आस्थापनेतील ९०० पैकी तब्बल ४५० अधिकाऱ्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता, टप्प्याटप्प्याने कामावरून काढून टाकण्याचे कारस्थान कंपनीने रचल्याचा गंभीर आरोप अदानी इलेक्ट्रिसिटी ऑफिसर्स असोसिएशनचे सरचिटणीस प्रदीप बोरकर यांनी केला असून या पार्श्वभूमीवर आझाद मैदानावर आंदोलन करण्यात आले. कंपनीला प्रचंड आर्थिक लाभ मिळवून देऊनही कोणतीही दया-माया न दाखवता, आकस ठेवून अधिकाऱ्यांवर ही कारवाई १ सप्टेंबर पासून सुरू केली जात असल्याचा दावा असोसिएशनचे निशिकांत धवन यांनी केला. या दडपशाही आणि अन्यायकारक धोरणाविरोधात सरकार व जनतेचे लक्ष वेधण्यासाठी अधिकारी मैदानात आक्रमक झाले होते. अदानी व्यवस्थापनाच्या या कारभाराचा निषेध नोंदवण्यासाठी आणि शासनाचे लक्ष वेधण्यासाठी अधिकाऱ्यांनी मुंबईतील आझाद मैदानावर लाक्षणिक धरणे आंदोलन केले. सरकारने या प्रकरणी गंभीरपणे निर्णय घ्यावा अन्यथा मंत्रालयासमोर आंदोलन करू असा इशारा दिला.

 ठाणे बॅडमिंटन अकॅडमीच्या खेळाडूंचे चमकदार यश

मुंबई विद्यापीठ ठाणे क्षेत्र आंतरमहाविद्यालयीन बॅडमिंटन स्पर्धा ठाणे- ठाणे महानगरपालिकेच्या दादोजी कोंडदेव क्रीडा संकुलातील खंडू रांगणेकर बॅडमिंटन हॉल येथे राबविण्यात येणाऱ्या ‘सय्यद मोदी बॅडमिंटन प्रशिक्षण योजने’अंतर्गत प्रगत प्रशिक्षण घेणाऱ्या ठाणे…

सरकारचा अनावश्यक हस्तक्षेप कायद्यात नको

रमेश औताडे मुंबई : नागरिकांच्या धार्मिक स्वातंत्र्य, वैयक्तिक निवड, विवाह, श्रद्धा आणि गोपनीयतेच्या अधिकारांमध्ये शासनाचा अनावश्यक हस्तक्षेप नवीन सुधारित कायद्यामुळे वाढू शकतो, असा आरोप संयुक्त नागरी समाज समितीच्या प्रतिनिधींनी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते फादर फ्रेझर मास्करेन्हास, संध्या गोखले, ॲड. इरफान इंजिनिअर, ॲड. लारा जेसानी,समन्वयक शाकीर भाई शेख, सलीम खान उपस्थित होते. इरफान इंजिनिअर यांनी कायद्याच्या काही तरतुदींवर आक्षेप घेतला. धर्मांतराच्या आरोपात आरोपीवरच स्वतः निर्दोष असल्याचे सिद्ध करण्याची जबाबदारी येत असल्यास, ती फौजदारी न्यायव्यवस्थेच्या मूलभूत तत्त्वांशी विसंगत ठरू शकते, असे त्यांनी सांगितले. फादर फ्रेझर मास्करेन्हास यांनी शिक्षण आणि सामाजिक सेवेच्या संदर्भात चिंता व्यक्त केली. संध्या गोखले यांनी कायद्याकडे व्यापक घटनात्मक आणि सामाजिक दृष्टिकोनातून पाहण्याचे आवाहन केले.  पत्रकार परिषदेत सहभागी नागरी समाजाच्या प्रतिनिधींनी महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा, २०२६ मागे घ्यावा किंवा त्यातील घटनात्मकदृष्ट्या आक्षेपार्ह तरतुदींचा पुनर्विचार करावा, अशी मागणी केली.

दाक्षिणात्य चित्रपटासाठी ‘समर्थ’ ला चित्रपटगृह नाकारले ; रसिक प्रेक्षकांमध्ये तीव्र संताप

मुंबई : १४ ऑगस्ट रोजी प्रदर्शित करण्यात आलेला आणि लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचणारा श्री समर्थ रामदास स्वामी यांची शिकवण समाजासमोर आणणारा मराठी चित्रपट ‘समर्थ’ ला केवळ दाक्षिणात्य चित्रपटासाठी चित्रपटगृह नाकारण्यात आले.…