परप्रांतियांना जमीन विक्री करण्यास प्रतिबंध
मुणगे ग्रामसभेचा महत्त्वपूर्ण निर्णय अनिल ठाणेकर ठाणे- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील मुणगे ग्रामपंचायतीच्या विशेष ग्रामसभेत गावातील शेतीजमीन, निवासी जागा आणि प्लॉट परजिल्ह्यातील किंवा परराज्यातील व्यक्ती, संस्था व कंपन्यांना विक्री करण्यास प्रतिबंध करण्याबाबत महत्त्वपूर्ण ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला आहे. २ जुलै २०२६ रोजी झालेल्या विशेष ग्रामसभेच्या ठराव क्रमांक १ (०३) नुसार, गावाची शेतीजमीन व निवासी जागा ही गावाच्या आर्थिक आणि सामाजिक विकासाचा मुख्य आधार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. अलीकडच्या काळात परजिल्ह्यातील आणि परराज्यातील व्यक्तींकडून मोठ्या प्रमाणावर जमीन खरेदी होत असून, भविष्यात या जमिनी विविध प्रकल्पांसाठी हस्तांतरित होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर गावाचे हित, पर्यावरण आणि सुरक्षितता जपण्यासाठी ग्रामसभेने निर्णय घेतला आहे की, गावातील कोणत्याही नागरिकाने आपली शेतीजमीन, निवासी जागा किंवा प्लॉट परजिल्ह्यातील अथवा परराज्यातील व्यक्तींना विकू नये. ठरावात पुढे असेही नमूद करण्यात आले आहे की, एखाद्या नागरिकाला अपवादात्मक परिस्थितीत जमीन विकण्याची आवश्यकता भासल्यास प्रथम प्राधान्य गावातील स्थानिक भूमिपुत्रांना द्यावे. तसेच जमीन विक्रीसंदर्भातील माहिती ग्रामपंचायतीच्या निदर्शनास आणून देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हा ठराव विशेष ग्रामसभेत उपस्थित ग्रामस्थांनी सर्वानुमते मंजूर केला. ठरावाचे सूचक योगेश प्रकाश सावंत तर अनुमोदक सुनील तुकाराम सावंत होते. दरम्यान, या निर्णयामुळे स्थानिक भूमिपुत्रांचे हित, शेती आणि गावाची जमीन बाहेरील व्यक्तींच्या ताब्यात जाण्यापासून वाचवण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. मात्र, अशा प्रकारच्या ठरावाची कायदेशीर वैधता आणि तो विद्यमान जमीन हस्तांतरणाच्या कायद्यांशी कितपत सुसंगत आहे, याबाबत अंतिम निर्णय संबंधित कायदे व सक्षम शासकीय प्राधिकरणांवर अवलंबून राहणार आहे. 00000000
