Category: होम

Heading – एमआयडीसी फेज दोनमध्ये दारुड्यांच्या हैदोस

नोकरदार महिला त्रस्त कल्याण : डोंबिवली एमआयडीसी फेज दोन मधील जेथे प्रोबेस स्फोट झाला होता त्या W – १६० ते W – २५१ या लेन मधील कारखान्यासमोर गटाराच्या बाजूस काही तरुण, मध्यमवयीन दारुडे हे रोज सायंकाळी दुचाकी व अन्य वाहनांत येऊन दारू व इतर व्यसने करीत आहेत. सायंकाळ ते रात्री पर्यंत या दारुड्यांचे प्रताप तेथे चालू असतात. येथील कंपन्यांतून सायंकाळी सुटणाऱ्या महिला समक्ष हे प्रकार चालू असल्याने महिला वर्ग दहशतीखाली असून या दारुड्यांनी नशेत काही दुष्कृत्ये केली तर मोठा अनर्थ होणार आहे. हे नशेखोर दारुडे ठराविक प्रकारची म्हणजे मास्टर्स डीलाईट ही दारू पित असून त्याच्या लाल रंगाच्या प्लास्टिक बाटल्या, पाण्याच्या बाटल्या आणि चकणा साठी घेतलेले पेपर, कागदी डिश या बाजूच्या गटारात फेकून ते अस्वच्छता करीत आहेत. यामुळे गटारात या बाटल्यांचा खच जमा होत आहे. केडीएमसी, एमआयडीसी प्रशासन तर ही गटारे कधीच साफ करीत नाहीत. त्यामुळे येथे दुर्गंधी वाढली आहे. या संदर्भात येथील महिला उद्योजक वर्षा महाडिक यांनी याबाबत फोनवरून तोंडी तक्रार ही मानपाडा पोलिसांना आणि केडीएमसी एमआयडीसी यांच्याकडे केली असून लवकरच यावर कडक कार्यवाही करावी असे त्यानी सांगितले आहे.

स्वातंत्र्यसैनिक व ज्येष्ठ कामगार नेते डॉ. शांती पटेल यांना भावपूर्ण अभिवादन

०००००००० मुंबई : स्वातंत्र्यसैनिक, माजी खासदार, मुंबईचे माजी महापौर आणि ज्येष्ठ कामगार नेते डॉ. शांती पटेल यांच्या १२ व्या स्मृतिदिनानिमित्त गोदी कामगारांच्या वतीने शनिवारी (१३ जून) माझगाव येथील कामगार सदनमध्ये…

 टिटवाळ्यात वीज प्रश्नावर नागरिक आक्रमक

एका दिवसात ७०० नागरिकांचा पाठिंबा कल्याण: टिटवाळ्यातील वाढत्या वीज समस्यांविरोधात सुरू झालेल्या जनआंदोलनाला नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळत असून, केवळ एका दिवसात ७०० हून अधिक नागरिकांनी सह्या करून आपल्या संतापाला वाट मोकळी करून दिली आहे. जनतहित फाउंडेशनचे संस्थापक रितेश कांबळे यांच्या नेतृत्वाखाली मांडा पूर्व येथील बँक ऑफ महाराष्ट्रसमोर सुरू असलेल्या या मोहिमेची सध्या संपूर्ण टिटवाळ्यात जोरदार चर्चा आहे. वारंवार होणारी वीज खंडित होणे, कमी-जास्त दाबाचा पुरवठा आणि वाढत्या गैरसोयींमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे, हजारो ग्राहकांकडून नियमित महसूल वसूल केला जात असतानाही मूलभूत सेवा सुरळीत मिळत नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर रितेश कांबळे यांनी लोकशाही मार्गाने नागरिकांना एकत्र आणत सह्या मोहीम सुरू केली. या मोहिमेला मिळालेला प्रतिसाद पाहता हा प्रश्न आता केवळ वीजपुरवठ्यापुरता मर्यादित राहिलेला नसून तो जन भावनांचा विषय बनल्याचे दिसून येत आहे. “आज नाही तर कधीच नाही” या भूमिकेतून अनेक नागरिक आंदोलनस्थळी येत असून, आपल्या हक्कासाठी आवाज उठविण्याची वेळ आता आल्याची भावना व्यक्त करत आहेत. केवळ सोशल मीडियावर नाराजी व्यक्त करून प्रश्न सुटणार नाहीत, तर संघटित लोकशक्तीच प्रशासनाला जागे करू शकते, असा सूर नागरिकांमधून उमटत आहे. दरम्यान, वीज समस्यांवर तातडीने आणि कायमस्वरूपी उपाययोजना न झाल्यास नागरिकांच्या सहभागातून आणखी मोठे जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही आंदोलनकर्त्यांकडून देण्यात आला आहे.

 मुंबईतील रस्त्यांवर पांढऱ्या पट्ट्यांबाबत नागरिकांमध्ये चर्चा

प्रशासनाकडून स्पष्टतेची अपेक्षा अनिल ठाणेकर ठाणे : मुंबईतील काही भागांमध्ये रस्त्यांच्या कडेला आणि फूटपाथवर पांढऱ्या रंगाच्या पट्ट्या मारल्या जात असल्याचे निदर्शनास आले असून, याबाबत नागरिकांमध्ये विविध चर्चा सुरू झाल्या आहेत. दादर, चर्नी रोड तसेच काही इतर भागांमध्ये अशा पट्ट्या दिसून आल्याने त्यांच्या उद्देशाबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.काही जैन धर्मीय संघटनांच्या मते, ही कृती धार्मिक श्रद्धेशी संबंधित असून, पायाखाली लहान जीव-जंतू चिरडले जाऊ नयेत यासाठी अशा प्रकारच्या खूणा केल्या जातात. मात्र, दुसरीकडे काही नागरिकांनी सार्वजनिक रस्ते आणि फूटपाथ यांचा वापर सर्वांसाठी समान असल्याचे सांगत अशा प्रकारच्या चिन्हांकनाबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. सार्वजनिक जागांवर कोणत्याही प्रकारचे रंगकाम अथवा चिन्हांकन करण्यासाठी संबंधित प्रशासनाची परवानगी घेण्यात आली होती का, याबाबत माहिती देण्याची मागणी होत आहे.नागरिकांचे म्हणणे आहे की, जर ही धार्मिक प्रथा असेल तर तिची माहिती आणि अधिकृत परवानग्यांविषयी प्रशासनाने स्पष्ट भूमिका जाहीर करावी. तसेच अशा प्रकारच्या कृतीमुळे भविष्यात कोणतेही गैरसमज किंवा सामाजिक तणाव निर्माण होणार नाहीत, याची काळजी घेणे आवश्यक आहे. शहरातील विविध धर्म, भाषा आणि संस्कृती यांचा सुसंवाद हे मुंबईचे वैशिष्ट्य मानले जाते. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या सार्वजनिक उपक्रमांबाबत पारदर्शकता आणि कायद्याचे समान पालन होणे आवश्यक असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत. दरम्यान, या पांढऱ्या पट्ट्यांचे स्वरूप, उद्देश, त्यासाठी घेण्यात आलेल्या परवानग्या आणि संबंधित नियमांविषयी मुंबई महानगरपालिका प्रशासनाने अधिकृत स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी काही नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे. मुंबई महानगरपालिका आयुक्तांनी या प्रकरणाची दखल घेऊन वस्तुस्थिती नागरिकांसमोर मांडावी आणि सार्वजनिक जागांच्या वापराबाबतचे नियम सर्वांसाठी समानपणे लागू करावेत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. ००००००००

 आता ‘उलटी  गिनती’ सुरु- वैभव नाईक

  वैभववाडीत भाजपामधून आउटगोईंग…! उबाठा सेनेत प्रवेश…! वैभववाडी : देशात, राज्यात सर्वत्र भाजपामध्ये ‘इनकमिंग’ सुरु असतांना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यात, जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या बालेकिल्ल्यात भाजपाला ‘आउटगोईंग’चा फटका बसला असून नेर्ले गावचे सरपंच, उप सरपंच यांनी असंख्य कार्यकर्त्यांसह ‘उबाठा’ सेनेत प्रवेश केला आहे. ‘उबाठा’ सेनेचे माजी खासदार  विनायक राऊत, जिल्हा प्रमुख  वैभव नाईक, माजी आमदार  परशुराम उपरकर, युवा सेना जिल्हा प्रमुख  सुशांत नाईक, महिला जिल्हा प्रमुख नीलम पालव यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश कार्यक्रम पार पडला. सिंधुदुर्गात आता ‘उबाठा’ सेनेत प्रवेश करण्यास सुरुवात झाल्याचे सांगून आता ‘उलटी गिनती’ सुरु झाल्याची प्रतिक्रिया नाईक यांनी व्यक्त केली आहे. वैभववाडी तालुक्यातील नेर्ले गावच्या भाजप पक्षाच्या सरपंच निलांबरी पांचाळ, उपसरपंच पंढरीनाथ सुर्वे यांच्यासह शेकडो नागरिकांनी काल सायंकाळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. हा पक्षप्रवेश  घेऊन पालकमंत्री नितेश राणेंच्या मतदारसंघात भाजप पक्षाला शिवसेनेने जोरदार धक्का दिला आहे. शिवसेना नेत्यांनी भगवी शाल घालून प्रवेशकर्त्यांचे पक्षात स्वागत केले. यावेळी बोलताना माजी खासदार राऊत म्हणाले, अनेक संकटे झेलून शिवसेना आजही उभी आहे. शिवसेना संपविण्याचा कोणीही कितीही प्रयत्न केला तरी शिवसेना संपणार नाही.भाजपच्या सत्ता काळात देशात लोकशाही शिल्लक राहिलेली नाही. दुर्दैवाने सिंधुदुर्ग जिल्हा एका कुटुंबाच्या हातात आपण दिला आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याची अपरिमित हानी झाली असून ड्रग्स, गांजा,दारू यासारख्याअवैध धंद्यांचे प्रमाण वाढले आहे.पालकमंत्र्यांच्या मेहरबानीमुळे गोव्यातील ‘कॅसिनो’ देखील सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरु झाला आहे. मुंबई गोवा महामार्ग अद्याप पूर्ण झालेला नाही.वन्य प्राण्यांकडून शेतीचे नुकसान होत आहे. नागरिकांना गॅस, पेट्रोल, डिझेल मिळत नाही. त्यामुळे केंद्र आणि राज्यातील भाजप  सरकार पूर्णतः अपयशी ठरले असल्याचा आरोप राऊत यांनी केला. माजी आमदार वैभव नाईक म्हणाले, नेर्ले गावावर सत्ताधाऱ्यांकडून जो अन्याय झाला त्याला वाचा फोडण्यासाठी ग्रामस्थांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला हे कौतुकास्पद आहे. तुमचा निर्णय चुकला असे कधीही तुम्हाला वाटणार नाही याची खात्री मी तुम्हाला देतो. संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुतीची एकहाती सत्ता आहे. परंतु कुठल्या गावाचा सर्वांगीण विकास झाला हा प्रश्न सर्वांनाच पडत आहे. महागाईच्या प्रश्नावर आपल्याला आंदोलन करावे लागणार आहे असे ते म्हणाले. सत्ताधारी पक्ष अपयशी ठरतो तेव्हाच त्यांचे त्यांचे कार्यकर्ते  विरोधी पक्षाकडे वळतात. कार्यकर्त्यांना वापरायचे आणि नंतर फेकून द्यायचे असा राणे कुटूंबाचा देखील इतिहास आहे. परंतु आपण आता शिवसैनिक झाला आहात. आपल्याला न्याय देण्याचे काम आम्ही करू असे आश्वासन माजी आमदार परशुराम उपरकर यांनी दिले. जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे सर्वच बाबतीत अपयशी ठरले आहेत.सिंधुदुर्गातील अवैध धंदे त्यांना रोखता आले नाहीत.त्यांचे बंधू आमदार निलेश राणे यांनीच जिल्ह्यात अवैध धंदे वाढले असल्याचा आरोप केला आहे.  या पक्षप्रवेशाने नितेश राणे आणि भाजपा विरोधात पहिली ठिणगी वैभववाडीत पडली असून आता संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात त्याचे लोण पसरणार आहे हे निश्चित असा विश्वास युवा सेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक यांनी केला.

‘पुरब की ठुमरी’तून सुनंदा शर्मा आणि मालिनी अवस्थींच्या सुरांची मेजवानी

१५ जून रोजी रविंद्र नाट्य मंदिरात कार्यक्रम मुंबई : महाराष्ट्र ललित कला निधीतर्फे आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या गुणिदास संगीत सम्मेलनाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त सुगम शास्त्रीय संगीताचा आगळावेगळा कार्यक्रम ‘पुरब की ठुमरी’ सोमवार, १५ जून रोजी…

 माझ्या नवऱ्याच्या हत्येला पालिका आणि पोलिस अधिकारी जबाबदार 

 मृत प्रताप चौधरी यांच्या पत्नीचा आरोप कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात अनधिकृत बांधकामांच्या विरोधात आवाज उठवणे एका व्यक्तीच्या जीवावर बेतल्याची अत्यंत धक्कादायक घटना डोंबिवलीत समोर आली आहे. डोंबिवलीतील खंबाळपाडा परिसरात काही दिवसांपूर्वी प्रताप चौधरी यांची त्यांच्याच घराजवळ निर्घृण हत्या करण्यात आली होती. या हत्याकांडानंतर आता मृत प्रताप चौधरी यांच्या पत्नी नेहा चौधरी यांनी थेट महापालिका प्रशासन आणि पोलिसांवर गंभीर आरोप करत खळबळ उडवून दिली आहे. अनधिकृत बांधकामाची तक्रार केल्यामुळेच आपल्या पतीचा जीव गेला असून, महापालिकेने वेळीच कारवाई केली असती तर आपले पती आज जिवंत असते, असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. याप्रकरणी नेहा यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना पत्र पाठवत या प्रकरणाचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपविण्याची मागणी केली आहे. डोंबिवली पूर्वेकडील खंबाळपाडा परिसरात राहणारे प्रताप चौधरी यांची त्यांच्या राहत्या घरात अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात टिळकनगर पोलिसांनी तातडीने तपास करत मुख्य आरोपी रोहित शेलार याला अटक केली आहे. मात्र, या हत्येमागे केवळ वैयक्तिक वाद नसून अनधिकृत बांधकामांच्या विरोधात दिलेली तक्रार कारणीभूत असल्याचे मृताच्या पत्नीने समोर आणले आहे. परिसरातील संबंधित अनधिकृत बांधकामाबाबत प्रताप चौधरी यांनी केडीएमसीकडे अधिकृतपणे वारंवार तक्रारी दाखल केल्या होत्या.  या तक्रारींचा पाठपुरावा करूनही महापालिका प्रशासनाने आजतागायत त्या बेकायदेशीर बांधकामावर कोणतीही ठोस कारवाई केली नाही. महापालिकेने वेळेत दखल घेऊन ते बांधकाम पाडले असते, तर आरोपींनी हे भयंकर पाऊल उचलले नसते आणि माझे कुंकू पुसले गेले नसते, असा उद्विग्न आरोप नेहा चौधरी यांनी केला आहे. नेहा चौधरी यांनी केवळ महापालिकेवरच नाही तर पोलीस यंत्रणेवरही प्रश्न उपस्थित केले आहेत. मुख्य आरोपी रोहित शेलार याला पोलिसांनी पकडले असले, तरी या संपूर्ण हत्येच्या कटात त्याला मदत करणारे आणि पाठीशी घालणारे इतरही अनेक चेहरे आहेत, असा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. केवळ एकाला पकडून तपास थांबवू नका, तर या हत्येचा कट रचणाऱ्या आणि आरोपीला मदत करणाऱ्या इतर सर्व सहआरोपींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. 0000000000

– उदय सामंत यांच्या कानात सांगणारा ‘तो’ भाजपा नेता कोण?

 मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांच्या पोस्टमुळे चर्चांना उधाण कल्याण : डोंबिवलीतील प्रसिद्ध श्री पिंपळेश्वर महादेव मंदिराला जागा देण्याच्या निर्णयामागे नक्की कोणते राजकारण होते, याबाबतची चर्चा शहरात सुरू झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केलेल्या एका खळबळजनक वक्तव्यामुळे महायुतीत वादाची ठिणगी पडली आहे. या जागेचा निर्णय होऊ नये म्हणून उद्योगमंत्री उदय सामंत यांना प्रचंड मानसिक त्रास दिला गेला आणि काही लोक त्यांच्या कानात येऊन या निर्णयाविरोधात बोलत होते, असा दावा चव्हाण यांनी केला होता. या राजकीय वादात आता मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी थेट उडी घेतली असून सोशल मीडियावर पोस्ट करत भाजपाला शिंगावर घेतले आहे. मंदिराच्या नावाने सुरू असलेले घाणेरडे राजकारण बंद करा, असे सुनावत त्यांनी उदय सामंत यांच्या कानात सांगणारा तो भाजपचा नेता कोण, त्याचे नाव जनतेसमोर उघड करण्याचे थेट आव्हान दिले आहे. या संपूर्ण वादामुळे भाजपामधील एका बड्या नेत्याकडे संशयाची सुई जात असून डोंबिवलीतील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. डोंबिवली येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी या जागेचा निर्णय होऊ नये म्हणून उद्योगमंत्री उदय सामंत यांना प्रचंड मानसिक त्रास दिला गेला, काही लोक त्यांच्या कानात येऊन या निर्णयाविरोधात सातत्याने बोलत होते, असा खळबळजनक दावा चव्हाण यांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर केला. चव्हाण यांच्या या वक्तव्यानंतर  स्वतः उद्योगमंत्री उदय सामंत यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे. तो संबंधित व्यक्ती कोण आहे, याची पूर्ण माहिती रवींद्र चव्हाण, खासदार श्रीकांत शिंदे आणि महायुतीतील इतर नेत्यांना चांगलीच ठाऊक आहे, असे सामंत यांनी म्हटले आहे.  हाच धागा पकडत मनसेचे  माजी  आमदार राजू पाटील यांनी या वादात थेट उडी घेतली आहे. त्यांनी सोशल मीडियावर उद्योगमंत्री उदय सामंत यांचा फोटो पोस्ट करत भाजपाला थेट शिंगावर घेतले आहे. पिंपळेश्वर महादेव मंदिराच्या नावाने सुरू असलेले हे घाणेरडे राजकारण तात्काळ बंद झाले पाहिजे, असा इशारा त्यांनी दिला. आमचे पिंपळेश्वर देवस्थान अत्यंत जागृत असून खोटे बोलणाऱ्यांचा देव नक्कीच आवाज बंद करेल, असा टोला त्यांनी लगावला. उगीचच हवेत संशयाच्या पुड्या सोडण्यापेक्षा, मंदिराला जागा मिळू नये म्हणून उदय सामंत यांच्या कानात सांगणारा तो भाजपचा नेता कोण, त्याचे नाव जनतेसमोर उघड करा, अशी ठाम मागणी राजू पाटील यांनी केली आहे. राजू पाटील यांच्या या आक्रमक पोस्टनंतर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. 000000000

– शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या तयारीला वेग

 सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे – भरत गोगावले अलिबाग, दि. १२ (प्रतिनिधी) : दुर्गराज रायगडावर तिथीनुसार २७ जून रोजी साजऱ्या होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या तयारीला वेग आला असून, सोहळा सुरक्षित, शिस्तबद्ध आणि यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी…