Category: मुंबई

Mumbai news

जय महाराष्ट्र नगर वसंत व्याख्यानमालेचे पुरस्कार जाहीर

   विजय वैद्य यांच्या नावाचा पहिला पुरस्कार संजय डहाळे यांना मुंबई : जय महाराष्ट्र नगर बोरीवली पूर्व येथील जय महाराष्ट्र नगर वसंत व्याख्यानमालेचे पुरस्कार जाहीर करण्यात आले असून भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी खासदार गोपाळ शेट्टी यांनी पुरस्कृत केलेल्या विजय वैद्य उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्काराची तसेच जय महाराष्ट्र नगर वसंत व्याख्यानमालेच्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. विजय वैद्य यांच्या नावाचा पहिला उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार ज्येष्ठ नाट्य समीक्षक आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या दैनिक सामना मध्ये प्रारंभापासून सुमारे तीस वर्षे उच्च पदावर निष्ठापूर्वक जबाबदारी पार पाडणारे ज्येष्ठ पत्रकार संजय डहाळे यांना देण्यात येणार आहे. जय महाराष्ट्र नगर वसंत व्याख्यानमालेचा शारदा पुरस्कार ज्येष्ठ चित्रपट समीक्षक म्हणून लोकप्रियता मिळविलेले दिलीप ठाकूर यांना, प्रेरणा पुरस्कार वायंगणकर साई स्पोर्ट्स च्या आधारस्तंभ पल्लवी राकेश वायंगणकर यांना तसेच जय महाराष्ट्र नगर भूषण पुरस्कार ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विजय पडकील यांना देण्यात येणार आहे. जय महाराष्ट्र नगर वसंत व्याख्यानमाला येत्या २४, २५ आणि २६ एप्रिल २०२६ असे तीन दिवस आयोजित करण्यात आली असून या वसंत व्याख्यानमालेच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांच्या शुभहस्ते हे पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार असल्याचे संयोजकांनी सांगितले. एकता विनायक चौक, जय महाराष्ट्र नगर, बोरीवली पूर्व येथे रोज सायंकाळी साडेसात वाजता ही व्याख्यानमाला होणार आहे. रसिक श्रोत्यांनी या बौद्धिक मेजवानीचा लाभ घ्यावा, असे आवाहनही संयोजकांनी केले आहे. ०००००००

ठाणेची ५ सुवर्ण, ४ रौप्यांसह एकूण ९ पदकांची दिमाखदार कमाई!

राज्य अजिंक्यपद खुली बॅडमिंटन स्पर्धा ऋषिकेश जोगळेकर, विनय पाटील, मृणाल पोद्दार चमकले! मुंबई येथील पवई येथील आय आय टी येथील बॅडमिंटन कोर्टावर ३ एप्रिल ते ५ एप्रिल २०२६ दरम्यान पार पडलेल्या आवाहन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत ठाणे बॅडमिंटन अकॅडमीच्या खेळाडूंनी शानदार कामगिरी करत तब्बल ५ सुवर्ण व ४ रौप्य पदकांसह एकूण ९ पदकांची कमाई केली. विविध गटांमध्ये ठाण्याच्या खेळाडूंनी केलेला दमदार खेळ, जिद्द आणि सातत्यपूर्ण कामगिरी यामुळे संपूर्ण स्पर्धेत ठाण्याचा दबदबा पाहायला मिळाला. ठाणे महानगरपालिकेच्या दादोजी कोंडदेव क्रीडांगणातील खंडू रांगणेकर बॅडमिंटन हॉल येथे सय्यद मोदी बॅडमिंटन प्रशिक्षण योजनेअंतर्गत चालणाऱ्या ठाणे बॅडमिंटन अकॅडमीतील खेळाडूंनी या स्पर्धेत आपली छाप उमटवत उच्च दर्जाच्या खेळाचे प्रदर्शन केले. मुख्य प्रशिक्षक श्रीकांत वाड यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच प्रशिक्षक मयूर घाटणेकर, अक्षय देवलकर, मितेश हाजीरनिस, तसेच इतर सहाय्यक प्रशिक्षकांच्या सहकार्याने खेळाडूंनी ही यशस्वी कामगिरी साकारली. पुरुष एकेरी गटात विनय पाटीलने उत्कृष्ट खेळ करत अंतिम फेरीपर्यंत मजल मारली. सुरुवातीच्या फेरीत शारविल तेंबुळकरला १५-३, १५-८ अशा सहज पराभूत केले. उपांत्यपूर्व फेरीत राफेल मस्कारेनहासला १५-१०, १५-७ अशा सरळ सेटमध्ये हरवले. उपांत्य फेरीत ऋतुराज चिपटविरुद्ध २१-१९, २१-१० असा प्रभावी विजय मिळवत अंतिम फेरी गाठली. अंतिम सामन्यात माजी ठाणे अकॅडमीच्या वरिष्ठ खेळाडूविरुद्ध पराभव पत्करावा लागला आणि रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. पुरुष दुहेरी गटात नव्याने तयार झालेल्या ऋषिकेश जोगळेकर व विनय पाटील या जोडीने सर्वांना आश्चर्यचकित करत सुवर्ण पदक पटकावले. १६ फेरीत अथर्व बागवे व प्रथमेश कांबळे यांना १५-६, १५-४ अशा सहज पराभूत करत सुरुवात केली. उपांत्यपूर्व फेरीत सोहम फाटक व तेजस प्रभुदेसाई यांच्याविरुद्ध १०-१५, १५-१२, १५-१३ असा थरारक विजय मिळवला. उपांत्य फेरीत ठाणे अकॅडमीच्याच माजी वरिष्ठ खेळाडू कृष्ण देसाई व पार्थिव नायर या जोडीविरुद्ध १८-२१, २४-२२, २१-१८ अशा दीर्घ आणि उत्कंठावर्धक सामन्यात विजय मिळवत सर्वांना थक्क केले. अंतिम फेरीत आर्यन वर्मा व कृष्णा मजेठिया या जोडीवर २१-१८, २१-१६ असा विजय मिळवत सुवर्ण पदक पटकावले. महिला दुहेरी गटात मृणाल पोतदार हिने आपल्या जोडीदारासह उत्कृष्ट खेळ करत सुवर्ण पदक जिंकले. अंतिम फेरीत ठाणे अकॅडमीच्या अनुभवी जोडी अनामिका सिंग व अनघा करंदीकर यांच्यावर २१-१९, १७-२१, २१-१६ अशा चुरशीच्या सामन्यात विजय मिळवत विजेतेपद पटकावले. मिश्र दुहेरी गटात सर्वेश यादव व अनामिका सिंग या जोडीने सुवर्ण पदक जिंकत ठाण्याच्या यशात भर घातली. अंतिम फेरीत त्यांनी कडव्या प्रतिस्पर्ध्यांवर १७-२१, २१-१७, २१-१९ असा थरारक विजय मिळवत विजेतेपद मिळवले. या यशाबद्दल मुख्य प्रशिक्षक श्रीकांत वाड यांनी आनंद व्यक्त करत सांगितले की, “या स्पर्धेत आमच्या खेळाडूंनी दाखवलेली कामगिरी ही त्यांच्या सातत्यपूर्ण सराव, शिस्त आणि खेळावरील निष्ठेचे फलित आहे. विशेषतः नव्या जोड्यांनी दिलेली कामगिरी आशादायक आहे आणि भविष्यात ते मोठ्या स्तरावर नक्कीच चमकतील.” ठाणे महानगरपालिकेच्या क्रीडा उपायुक्त मीनल पलांडे यांनी खेळाडूंचे अभिनंदन करत सांगितले की, “ठाणे बॅडमिंटन अकॅडमीचे खेळाडू सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करत ठाण्याचे नाव उंचावत आहेत. या यशामुळे इतर खेळाडूंनाही प्रेरणा मिळेल. सर्व खेळाडूंना पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा.” ००००००००

कामे करा नाहीत घरी बसा’, कामचुकार नेत्यांना श्रीकांत शिंदेंची तंबी

आरती परब डोंबिवली : खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या संघटनात्मक मजबुतीसाठी आणि आगामी राजकीय नियोजनाच्या पार्श्वभूमीवर डोंबिवली येथे आयोजित आढावा बैठकीत पदाधिकाऱ्यांशी सविस्तर संवाद साधला. या बैठकीत मतदारसंघातील संघटनात्मक बांधणीबाबत सखोल चर्चा करण्यात आली. भारतीय निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनर्निरीक्षण (SIR) मोहिमेला गती देण्यासाठी ‘बीएलए’ (BLA) नियुक्ती लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या. यासोबतच या संपूर्ण प्रक्रियेबाबत सर्व कार्यकर्त्यांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. प्रत्येकाने सक्रिय भूमिका घेत मतदारांना नोंदणीसाठी आवश्यक मदत व माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले. यामुळे मतदार नोंदणी प्रक्रिया अधिक पारदर्शक, अचूक आणि विश्वासार्ह करण्यावर भर देण्यात आला. यावेळी सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी संपूर्ण प्रक्रिया समजून घेत याबाबत काम करण्याचा विश्वास व्यक्त केला. यावेळी खासदार नरेश म्हस्के, आमदार डॉ.बालाजी किणीकर, आमदार राजेश मोरे, युवासेना कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक, शिवसेना उपनेते रवींद्र फाटक, उल्हासनगर महापौर अश्विनी निकम, कल्याण- डोंबिवली महापौर हर्षाली चौधरी, शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, अरविंद मोरे, महिला आघाडीच्या लता पाटील यांच्यासह सर्व स्थानिक नगरसेवक, विभागप्रमुख, शाखाप्रमुख, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कुमार गट व प्रथम श्रेणी पुरुष गट कबड्डी स्पर्धा

महाड तालुका क्रीडा मंडळ, जय भवानी क्रीडा मंडळ उपांत्य फेरीत मुंबई. . महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या स्मरणार्थ   हनुमान क्रीडा मंडळ कुर्ला, गौरीशंकर क्रीडा मंडळ कुर्ला आणि  कुर्ला क्रीडा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने येथील गांधी मैदानात आयोजित केलेल्या  कुमार गट व प्रथम श्रेणी पुरुष गटाच्या कबड्डी स्पर्धेत कुमार गटात महाड तालुका क्रीडा मंडळ, जय भवानी क्रीडा मंडळाने उपांत्य फेरीत प्रवेश केला.  कुमार गटाच्या उपांत्य पुर्व फेरीच्या सामन्यात  विक्रोळीच्या महाड तालुका क्रीडा मंडळाने    नवशक्ती स्पोर्ट्स अकॅडमी चेंबूरचा ८ गुणांनी पराभव  केला . दुसऱ्या सामन्यात जय भवानी क्रीडा मंडळाने हनुमान क्रीडा मंडळाचा सहज‌ पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला इतर सामन्यात  बालवीर स्पोर्ट्स क्लबने ट्रान्सपोर्ट क्लब घाटकोपरचा १६  गुणांनी आरामात पराभव केला. तर भानवे अकॅडमी विरुद्ध पार्ले महोत्सव यांच्यात झालेल्या सामन्यात भानवे अकॅडमीने पार्ले महोत्सवांचा अवघ्या ३ गुणांनी पराभव केला. प्रथम श्रेणी पुरुष गटाच्या सामन्यात सन्मित्र क्रीडा मंडळ घाटकोपर व चेंबूर क्रीडा मंडळ यांच्यात अटीतटीची लढत पाहायला मिळाली  विश्रांतीला दोन्ही संघाचे ९-९ असे समान गुण होते. सन्मित्र क्रीडा मंडळाच्या खेळाडूंनी निकराचा प्रयत्न करत चेंबूर क्रीडा केंद्राला जोरदार लढत‌ दिली.पण अखेर चेंबूर संघाने २ गुणांनी बाजी मारली. सन्मित्र क्रीडा मंडळचा अजिंक्य जाधवने   तर चेंबूर क्रीडा केंद्राकडून गुफ्रानने चांगला खेळ केला. ०००००००

एमजीएसएम आंतर महाविद्यालयीन टी -२०  क्रिकेट स्पर्धा

धनश्री वाघमारेचे नाबाद अर्धशतक मुंबई : सलामीची फलंदाज धनश्री वाघमारेने केलेल्या दोन महत्वपूर्ण भागीदारी आणि नाबाद अर्धशतकी खेळीमुळे रमणीरंजन झुनझुनवाला महाविद्यालयाने महर्षी दयानंद महाविद्यालयाचा ३७ धावांनी पराभव करत एमजीएसएम आंतर महाविद्यालयीन टी -२० क्रिकेट स्पर्धेत आगेकूच केली. प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत १३७ धावा उभारल्यावर रमणीरंजन झुनझुनवाला महाविद्यालयाने प्रतिस्पर्ध्यांना १०० धावांवर रोखत स्पर्धेच्या पुढल्या फेरीत स्थान मिळवले. या सामन्यात धनश्रीने आपल्या ५१ धावांच्या नाबाद खेळीसह सलामीची जोडीदार सृष्टी नाईक आणि किमया राणेसोबत संघाला आश्वासक अशा भागीदारी रचल्या. पहिल्या गड्यासाठी धनश्रीने सृष्टीच्या साथीने अर्धशतकी ६७ धावांची भागीदारी केली. नंतर किमयाला हाताशी घेऊन ४३ धावांची भागीदारी केली. सृष्टीने ३४ आणि किमयाने ४७ धावांचे योगदान दिले. महर्षी दयानंद महाविद्यालयाच्या प्रियदर्शनी सिंगने दोन फलंदाज बाद केले. विजयासाठी धावांचा पाठलाग करणाऱ्या महर्षी दयानंद महाविद्यालयाच्या अलिना मुल्लाचा अपवाद वगळता त्यांच्या इतर फलंदाजांना मोठ्या खेळी करता आल्या नाहीत. अलिनाने ३३, ईश्वरी खत्रीने नाबाद १४ आणि मेहेक पटेलने १७ धावा केल्या. झुनझुनवाला महाविद्यालयाच्या दिक्षा पवारने तीन, अदिती सुर्वे आणि वैष्णवी पाटीलने प्रत्येकी दोन फलंदाज बाद केले. संक्षिप्त धावफलक : रमणीरंजन झुनझुनवाला महाविद्यालय – २० षटकांत ४ बाद १३७ ( धनश्री वाघमारे नाबाद ५१, सृष्टी नाईक ३४, किमया राणे २७, प्रियदर्शनी सिंग ४-२५-२) विजयी विरुद्ध महर्षी दयानंद महाविद्यालय : २० षटकात ९ बाद १००( अलिना मुल्ला ३३, ईश्वरी खत्री नाबाद १४, मेहेक पटेल १७, दिक्षा पवार ४-२०-३, अदिती सुर्वे ४-१७-२, वैष्णवी पाटील २-५-२). ०००००००००

दुसऱ्या मानांकित सामंतला हरवून वर्तक उपांत्य फेरीत

जी. डी. बिर्ला स्मृती मास्टर्स आंतर-क्लब बॅडमिंटन स्पर्धा मुंबई: बॅडमिंटन गुरुकुल आयोजित जी. डी. बिर्ला स्मृती मास्टर्स आंतर-क्लब बॅडमिंटन स्पर्धेत दुसऱ्या मानांकित राजन सामंतवर तीन गेममध्ये विजय मिळवून कौशिक वर्तकने…

अजित पवारांच्या अपघातादरम्यान खरातच्या बँकेत ६२ वेळा पैसे जमा

अजित पवारांच्या अपघातादरम्यान खरातच्या बँकेत ६२ वेळा पैसे जमा मुंबई : अजित पवारांचा मृत्यू २८ जानेवारी २०२६ ला झाला, या घटेनच्या आधी आणि नंतर अशा एकूण पाच दिवसात तब्बल ६२ वेळा विविधवेळा…

मुंबईत दंगेखोरांच्या घरावर बुलडोझर ; 8 जणांना अटक

दंगेखोरांनो खबरदार… दंगा कराल तर यापुढे महाराष्ट्रतही बुलडोजर चालणार… मुंबईच्या गोरेगाव पूर्व मधील दिंडोशी संतोष नगर परिसरात काल हिंदूंच्या यात्रेवर दगडफेक करून दंगल करणाऱ्या ८ दंगेखोरांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्या बेकायदा बांधकाम आणि…

बौद्धांच्या जात प्रमाणपत्राची फाईल मंत्रालयातून गायब !

बौद्धांच्या जात प्रमाणपत्राची फाईल मंत्रालयातून गायब ! राज्य जन माहिती अधिकाऱ्याची कबुली दिवकर शेजवळ मुंबई : एका उप सचिवाने फक्त बौद्धांसाठी लागू केलेले नमुना क्रमांक : ७ चे नुकसानकारक जात प्रमाणपत्र रद्द करण्याच्या…

 तबेला मैदान-श्रमिक जिमखाना “हिरक महोत्सवी सोहळा-२०२६

अमरप्रेम क्रीडा मंडळ व सर्व कबड्डीप्रेमी यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई :- वरळी कोळीवाडा येथील अमरप्रेम क्रीडा मंडळ व सर्व कबड्डीप्रेमी यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच लोकप्रिय आमदार सुनील शिंदे यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली तबेला मैदान-श्रमिक जिमखाना, ना. म. जोशी मार्गचा “हिरक महोत्सवी सोहळा” रविवार, ११ एप्रिल, सायंकाळी ५ ते १० या वेळेत साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने पूर्वीचे मुंबई व आताच्या मुंबई शहरच्या सर्व वरिष्ठ पुरुष व महिला गटाच्या संघनायक व संघनायिकेंचा सन्मान करण्यात येणार आहे. मुंबई उपनगरच्या वरिष्ठ गटातील प्रथम संघनायकांना देखील यानिमित्ताने गौरविण्यात येईल. मुंबईची कबड्डी वाढविण्यासाठी ज्या संघटनानी सातत्याने स्पर्धा आयोजन केले अशा आर्य सेवा मंडळ(६१वर्ष), शिवनेरी सेवा मंडळ(५३वर्ष), अमर क्रीडा मंडळ, दादर(४३वर्ष)यांच्या बरोबरीने मातीची क्रीडांगण बनविणारे, ते क्रीडांगण एका हाती सरळ रेषेत आखणारा अशोक गुरव आदींचा सत्कार होणार आहे. महाराष्ट्रातील सर्व अर्जुन पुरस्कार प्राप्त खेळाडून बरोबर महाराष्ट्रात गेली तीन तपे वास्तवास असलेली मोनिका बाकरे(नाथ) हिला देखील निमंत्रित करण्यात आले आहे. कबड्डी सलग चार दशकापेक्षा अधिक काळ खेळणारा विलास जाधव, बंगालला “टायगर” ही उपाधी मिळालेला वसंत सूद, ट्रॉफी बनविणारे हरीश परब, बनियान बनविणारे भुईम्बर आदी मान्यवरांचा सन्मान होणार आहे. कबड्डीच्या कठीण काळात खेळाडूंना वैद्यकीय सुविधा मिळवून देणारे हाड वैद्य, जेष्ठ पत्रकार, जेष्ठ कबड्डी समीक्षक, सर्वत्र कबड्डी पहाणारे चाहते आदी बरोबर शालेय स्तरापासुन खेळाडूंना मार्गदर्शन करणारे मार्गदर्शक आदी मान्यवारांना पाचारण करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करणारी हिंदमाता सेवा मंडळ, मुंबईत प्रथम जागतिक कबड्डी स्पर्धेचे आयोजन करणारी साऊथ कॅनरा स्पोर्टस् क्लब, कबड्डीत रोख रकमेची व मोठी पारितोषिके देणाऱ्या संघटनाचा देखील या सोहळ्यात सन्मान होणार आहे. या सोहळ्याला क्रीडा प्रेमीनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या जेष्ठ्यांच्या आयुष्यात चार सुखाचे क्षण निर्माण करावेत. असे आव्हान एका परिपत्रकाद्वारे मंडळाचे अध्यक्ष राणा प्रताप तिवारी यांनी सर्व प्रसार माध्यमा द्वारे केले आहे.