Month: April 2026

 ओम् वर्तकनगर, अश्वमेघ स्पोर्टस् ,श्रीराम,जय बजरंग चौथ्या फेरीत

 श्री मावळी मंडळ राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा ठाणे :- श्री मावळी मंडळाने आयोजित केलेल्या “७३व्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत” ओम् वर्तकनगरने महिला विभागात  चौथी फेरी गाठली.तर  पुरुष गटात  शिवमुद्रा प्रतिष्ठान, श्रीराम विश्वस्त, जय बजरंग-वाशिंद, मिड…

 विक्रोळीत चढाई-पकडीचा संग्राम आजपासून

सुनील राऊत यांच्या आमदार चषक कबड्डी स्पर्धेत पुरस्कारांचा वर्षाव राज्यातील १६ दिग्गज व्यावसायिक संघ  भिडणार मुंबई, दि. १७ (क्री.प्र.)- क्रीडाप्रेमी आमदार सुनील राऊत यांनी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित आमदार चषक कबड्डी स्पर्धेवर छप्पर फाडके पुरस्कारांचा वर्षाव केला आहे. राज्यातील तगड्या १६ व्यावसायिक पुरुष संघांचा आणि १५ महिला संघाचा सहभाग असलेल्या या स्पर्धांत सुमारे दहा लाखांपेक्षा अधिक रकमेच्या बक्षीसांची उधळण केली जाणार आहे. येत्या १८ ते २१ एप्रिलदरम्यान विक्रोळी पूर्वेला टागोर नगरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर उद्यानात हा कबड्डीतील चढाई-पकडींचा थरार रंगणार आहे. एकीकडे आयपीएलची फटकेबाजी सुरु असताना आमदार सुनील राऊत यांनी श्रीमान योगी प्रतिष्ठानाच्या संयोजनाखाली राज्यातील व्यावसायिक कबड्डी संघांची ताकद दाखवण्याचे आव्हान स्वीकारले आहे. महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटना आणि मुंबई उपनगर कबड्डी संघटनेच्या मान्यतेने  होणार्‍या कबड्डीच्या पकडापकडींच्या संघर्षासाठी आंबडेकर उद्यानातील क्रीडानगरीला ‘कबड्डी पंढरी’ चे रुप दिले आहे. राज्यातील पुरुष आणि महिलांचे अव्वल आणि बलवान संघ स्पर्धेत सहभागी झाल्यामुळे कबड्डीप्रेमींना प्रो कबड्डीला साजेशी चढाओढ पाहायला मिळणार आहे. कबड्डीला प्रो कबड्डीची श्रीमंती लाभण्यापूर्वी कबड्डी आणि कबड्डीपटूंना मान आणि सन्मान मिळवून देण्यासाठी सदैव तत्पर असलेल्या आमदार सुनील राऊत यांनी या स्पर्धेत सहभागी संघ आणि खेळाडूंनाही लखपती करण्याचे ठरवले आहे. मुंबईतील सर्वाधिक रोख रकमेची स्पर्धा असलेल्या या कबड्डी थरारात व्यावसायिक स्पर्धेतील विजेत्यांना दोन लाखांचे  पारितोषिक दिले जाणार आहे तर उपविजेता संघ दीड लाखांचा मानकरी ठरेल. उपांत्य फेरी पराभूत संघही पाऊण लाखांचे बक्षीस मिळवतील. महिलांच्या स्पर्धेतील विजेता संघ एक लाखांचा पुरस्कार जिंकेल तर उपविजेता पाऊण लाखाचे इनाम मिळवेल. इथेही उपांत्य परभाूत संघ ३५ हजार रुपयांच्या पुरस्काराचे मानकरी ठरतील. सर्वात विशेष म्हणजे स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूंना मोटर बाईक आणि स्कूटी दिली जाणार असल्यामुळे हे जिंकण्यासाठी खेळाडू पहिल्या लढतीपासूनच आपला जोरदार खेळ दाखवण्यासाठी सज्ज झाले आहेत. आजवर अनेक कबड्डी स्पर्धांचे दिमाखदार ेआयोजन करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या आमदार राऊत यांनी व्यावसायिक कबड्डी संघांच्या जोरदार आणि रोमहर्षक खेळाची मेजवानी सादर करण्यासाठी  मुंबई शहरच्या तगड्या ८ संघांसह उपनगर, पुणे, ठाणे, नंदुरबार, रायगड आणि नवी मुंबई या जिल्ह्यातील बलाढ्य संघांनाही मॅटवर उतरवले आहे. त्यामुळे या संघांचा ‘दम’दार खेळ टागोर नगरात उभारलेल्या क्रीडानगरीतील दोन मॅटच्या मैदानावर पाहण्याची संधी मिळणार असल्याची माहिती स्पर्धा संयोजक आणि आमदार सुनील राऊत यांनी दिली. प्रो कबड्डीच्या सुपरस्टार्सचीही चढाई या स्पर्धेचे वैशिष्ट्यं म्हणजे आपल्या जोरदार चढाया- पकडींनी कबड्डी चाहत्यांना आपल्या प्रेमात पाडणारे प्रो कबड्डीचे तब्बल ३० सुपरस्टार  विक्रोळी पूर्वेला असलेल्या स्पर्धेत आपला सुसाट आणि भन्नाट खेळ करताना दिसतील. यात पंकज मोहिते, शुभम शिंदे, अजिंक्य पवार, -संकेत सावंत, अस्लम इनामदार, साहिल राणे, सुशांत साईल, अजिंक्य कापरे सारखे अनेक तूफानी खेळाडू आपला झंझावात दाखवण्यासाठी सज्ज झाले आहेत. आमदार चषक कबड्डी स्पर्धेतील संघ व्यावसायिक पुरुष संघ-युवा पलटण, भारत पेट्रोलियम, मध्य रेल्वे, सीजीएसटी, न्यू इंडिया अ‍ॅश्युरन्स, मुंबई पोर्ट ट्रस्ट, पोस्टल, युनियन बँक (सर्व मुंबई शहर), लिब्रा अ‍ॅग्रो (उपनगर), ठाणे महानगरपालिका (ठाणे), रुपाली ज्वेलर्स (नंदुरबार), संत सोपानकाका सहकारी बँक, कृषी उत्पन्न बाजार, आयकर (सर्व पुणे), मिडलाइन फाऊंडेशन (रायगड), डीवाय पाटील (नवी मुंबई). स्थानिक महिला संघ – स्वराज्य स्पोर्ट्स क्लब, स्वस्तिक क्रीडा मंडळ, संघर्ष क्रीडा मंडळ, महात्मा गांधी अकादमी (सर्व उपनगर),शिवशक्ती महिला संघ, डॉ, शिरोडकर स्पोर्ट्स क्लब, विवेक संघ (सर्व मुंबई), कर्नाळा स्पोर्ट्स अकादमी (रायगड), कुलाई क्रीडा मंडळ (पालघर), राजमाता जिजाऊ स्पोर्ट्स क्लब , तात्या बालवडकर स्पोर्ट्स क्लब, पतंगराव कदम (सर्व पुणे), अनिकेत स्पोर्ट्स क्लब (रत्नागिरी), शिवाजी उदय स्पोर्ट्स क्लब (सातारा), होतकरु मित्र मंडळ (ठाणे). 0000000000 जान्हवी मोरे स्मृती चषक मुला-मुलींची कॅरम स्पर्धा २९ एप्रिलला ठाणे : डोंबिवली येथील दत्तनगर उत्कर्ष मंडळाच्या विद्यमाने येत्या २९ एप्रिल रोजी राष्ट्रीय कॅरमपटू स्व. जान्हवी मोरे स्मृती प्रित्यर्थ १६ वर्षाखालील‌ मुला -मुलींच्या राज्य स्तरीय   कॅरम स्पर्धेचे २९ एप्रिल २०२६ रोजी आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा शास्त्री हॉल,दत्तनगर,डोंबिवली,पूर्व  येथे होणार आहे. स्पर्धेचे प्रवेश शुल्क रुपये १०० असुन २० एप्रिल पर्यंत प्रवेशिका स्वीकारण्यात येतील.प्रवेशासाठी दिलीप कर्वे, मो.९१६७७४४०४९.  संजय ठाकुरदेसाई मो.   ९८६७५८५२७१. अथवा पर्णाद जोशी मो.  ८४५०९५४५८४ यांच्याशी संपर्क साधावा.

 राष्ट्रीय पदक विजेत्या शरीरसौष्ठवपटूंच्या आज कौतुक सोहळा

 कुणाल केरकर यांच्या आयर्न पॅराडाईज जिमचा पुढाकार मुंबई- राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेच्या रंगमंचावर मुंबईकरांनी पुन्हा एकदा ताकदीचा तडाखा देत प्रतिस्पर्ध्यांना अक्षरशः चीत केले. “मुंबई म्हणजे बॉडीबिल्डिंगचा बालेकिल्ला” ही ओळख सांगताना मुंबईच्या शरीरसौष्ठवपटूंनी तब्बल १४ पदकांची दणदणीत कमाई करत देशभरात आपला दबदबा प्रस्थापित केला. या झंझावाती यशाच्या पाठीवर कौतुकाची थाप पडावी आणि नव्या पिढीला प्रेरणेची ठिणगी मिळावी, या उद्देशाने कुणाल केरकर यांच्या संकल्पनेतून आयर्न पॅराडाईज जिमतर्फे शनिवारी १८ एप्रिलला भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबईच्या या दमदार यशाची दखल घेत बृहन्मुंबई शरीरसौष्ठव संघटना आणि मुंबई उपनगर शरीरसौष्ठव व फिटनेस संघटना यांच्या मार्गदर्शनाखाली मालाड (पश्चिम) येथील आयर्न पॅराडाईज जिममध्ये आयोजित या सोहळ्यात केवळ विजेत्यांचा सन्मानच नव्हे, तर मुंबईच्या शरीरसौष्ठव परंपरेचा दिमाखदार गौरव केला जाणार आहे. गेल्या २५ वर्षांपासून फिटनेस क्षेत्रात भक्कम कामगिरी करणारे कुणाल केरकर यांनी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना व्यासपीठ मिळावे आणि नवोदितांना प्रेरणा मिळावी, या हेतूने हा उपक्रम उभा केला आहे. या उपक्रमाला संघटनेचे अध्यक्ष नंदू खानविलकर, सरचिटणीस राजेश सावंत, किट्टी फणसेका, विशाल परब, सुनील शेगडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे भक्कम सहकार्य लाभले आहे. याच मंचावर राष्ट्रीय पदक विजेत्यांसह आयर्न पॅराडाईजसाठी दमदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचाही विशेष गौरव केला जाणार आहे. राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेतील सुवर्णपदक विजेते : हरमीत सिंग (किताब विजेता), उमेश गुप्ता (उपविजेता), रेखा शिंदे (महिला शरीरसौष्ठव), राजेश तारवे, संदीप सावळे, निलेश दगडे, विश्वंभर राऊळ (क्लासिक शरीरसौष्ठव)  नीलेश गुरव (मेन्स फिजिक) रौप्य पदक विजेते : गणेश पेडामकर, ओंकार कळके, मनोज बोचरे, विशाल धावडे, अविनाश शिंदे (क्लासिक बॉडीबिल्डिंग) कांस्य पदक विजेता निलेश रेमजे विशेष गौरव प्रशांत घोलम (मुंबई श्री, महाराष्ट्र श्री – सुवर्ण), सिद्धांत यादव (रौप्य) आणि क्षितिज साळुंखे (कांस्य).

पाणी पुरवठ्यात निष्काळजीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांना घरी बसविण्याचा महापौरांचा इशारा

मोहिली पंप हाऊसवर महापौर हर्षाली चौधरी यांची सरप्राईज व्हिजिट – कामचुकार अधिकारी कर्मचाऱ्यांची घेतली झाडाझडती कल्याण : पाणी पुरवठ्यात निष्काळजीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांना घरी बसविण्याचा इशारा केडीएमसी महापौरांनी दिला असून केडीएमसीच्या मोहिली पंप हाऊसवर महापौर हर्षाली चौधरी यांनी सरप्राईज व्हिजिट करत कामचुकार अधिकारी कर्मचाऱ्यांची झाडाझडती घेतली. कल्याण डोंबिवलीकरांच्या घशाला पडलेली कोरड आता प्रशासकीय पातळीवर गंभीर वळण घेत आहे. शहरात वाढत्या पाणीटंचाईमुळे नागरिकांमध्ये संताप असतानाच, महापौर हर्षाली चौधरी यांनी थेट ग्राऊंड झिरोवर उतरण्याचा निर्णय घेतला आहे. महापौरांनी  ‘अ’ प्रभागातील मोहिली पंप हाऊसवर अचानक भेट देऊन पाहणी केली. कामात होत असलेली दिरंगाई आणि कर्मचाऱ्यांचा कामचुकारपणा पाहून महापौरांनी अधिकाऱ्यांचे चांगलेच कान टोचले असून, पाण्यासाठी वणवण करणाऱ्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी कडक आदेश दिले आहेत. गेल्या काही दिवसांपासून कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात पाण्याचा प्रश्न उग्र रूप धारण करत आहे. अनेक भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होणे किंवा पाणीच न मिळणे अशा तक्रारींचा पाऊस पडत आहे. या पार्श्वभूमीवर महापौर हर्षाली चौधरी यांनी कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय मोहिली पंप हाऊसला भेट दिली. महापौरांनी जेव्हा पंप हाऊसमध्ये प्रवेश केला, तेव्हा तेथील यंत्रणा आणि कामाची संथ गती पाहून त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. पाणीपुरवठ्याचे नियोजन कोलमडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यावेळी त्यांनी संबंधित अभियंता आणि कर्मचाऱ्यांशी थेट संवाद साधून तांत्रिक अडचणी समजून घेतल्या. मात्र, तांत्रिक कारणांपेक्षा मानवी दिरंगाईमुळे पाणीपुरवठा विस्कळीत होत असल्याचे दिसून आल्यावर महापौरांनी आक्रमक पवित्रा घेतला.पाहणी दरम्यान महापौरांनी अधिकाऱ्यांना सक्त ताकीद दिली: यावेळी कामचुकारपणा खपवून घेणार नाही: कर्तव्यात कसूर करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याचे संकेत त्यांनी दिले. याबरोबर कोणत्या प्रभागात किती पाणी जाते आणि कुठे कमतरता आहे, याचे चोख नियोजन सादर करण्याचे आदेश दिले. तसेच पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहण्याची वेळ नागरिकांवर येऊ देऊ नका  अशा स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या. ंनागरिक पाण्यासाठी त्रस्त असताना प्रशासन ढिम्म राहू शकत नाही. मोहिली पंप हाऊस हे शहराच्या पाणीपुरवठ्याचे हृदय आहे, तिथेच जर कामात दिरंगाई होत असेल तर ते सहन केले जाणार नाही. जनतेला पाणी मिळणे हा त्यांचा हक्क आहे आणि तो मिळवून देण्यासाठी मी कटिबद्ध आहे असे सागितले. महापौरांच्या या धडक कारवाईमुळे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागात मोठी खळबळ उडाली आहे. आता या भेटीनंतर तरी कल्याण-डोंबिवलीतील नळांना पाणी वेळेवर आणि पुरेशा दाबाने येणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 नवी मुंबई महानगरपालिकेची २०२६-२७ च्या मालमत्ता कराची ई-बिले आता ऑनलाइन उपलब्ध

 महापालिका आयुक्त डॉ कैलास शिंदे यांचे आवाहन अशोक गायकवाड नवी मुंबई :नवी मुंबई महानगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागामार्फत आर्थिक वर्ष २०२६-२७ साठी मालमत्ता कराची ई-बिले तयार करण्यात आली असून, नागरिकांना आपले मालमत्ता कराचे बिल व्हाट्सअॅप चॅटबॉट तसेच महापालिकेच्या www.nmmc.gov.in या अधिकृत संकेतस्थळाच्या माध्यमातून केवळ काही मिनिटांत पाहता येईल, डाऊनलोड करता येईल आणि त्यासोबतच बिलाचा भरणा करता येणार आहे. महापालिकेकडून नागरिकांना अधिक सुलभ, जलद आणि पारदर्शक सेवा देण्याच्या उद्देशाने ही डिजीटल सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच लवकरच ऑफलाईन पद्धतीने देखील घरपोच बिल वाटप करण्यात येणार आहेत. मात्र ई-बिलमुळे नागरिकांना आता ऑफलाइन बिलाची प्रतीक्षा करण्याची गरज नसून, घरबसल्या कोणत्याही वेळी आपले बिल मिळवण्याची सोय उपलब्ध झाली आहे. महानगरपालिकेच्या सर्व प्रभाग कार्यालयाकडील संकलन केंद्र तसेच मुख्यालयातील नागरी सुविधा केंद्रामधील संकलन केंद्र कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी १०:०० ते दुपारी ०३:०० वाजेपर्यंत तसेच पहिल्या व तिस-या शनिवारी सकाळी १०:०० ते दुपारी १२:०० वाजेपर्यंत कार्यरत आहे. व्हाट्स अॅप चॅटबॉट द्वारे मालमत्ता कर बिल मिळवण्याची प्रक्रिया: नागरिकांनी त्यांच्या मोबाईलमधून ८२९१९२०५०४ या क्रमांकावर “Hi” असा संदेश पाठवावा. त्यानंतर उपलब्ध पर्यायांमधून आपल्या पसंतीची भाषा निवडावी. पुढे “Pay Your Property Tax” हा पर्याय निवडल्यानंतर आपला १२ अंकी मालमत्ता क्रमांक (Property ID) प्रविष्ट करावा. मालमत्ता क्रमांक प्रविष्ट केल्यानंतर संबंधित मालमत्तेची सविस्तर माहिती जसे की मालकाचे नाव, मालमत्तेचा पत्ता इत्यादी तपशील स्क्रीनवर दिसेल. तसेच संबंधित आर्थिक वर्ष २०२६-२७ साठीचे मालमत्ता कराचे बिल PDF स्वरूपात उपलब्ध होईल. या PDF वर क्लिक करून बिल पाहता आणि डाऊनलोड करता येईल. “Pay Now” पर्याय निवडून त्वरित भरणा करण्याची सुविधा देखील उपलब्ध आहे. अधिकृत संकेतस्थळाद्वारे मालमत्ता कर बिल मिळवण्याची प्रक्रिया: नागरिकांनी आपल्या ब्राऊझरमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळाला (www.nmmc.gov.in) भेट द्यावी. संकेतस्थळावरील “Property Tax” हा पर्याय निवडल्यानंतर नागरिकांनी आपला १२ अंकी मालमत्ता क्रमांक प्रविष्ट करावा. यानंतर संबंधित मालमत्तेची सर्व माहिती स्क्रीनवर दिसेल. पुढे “Bill” या पर्यायावर क्लिक करून नागरिकांना त्यांच्या मालमत्ता कराच्या बिलाची प्रत ऑनलाइन स्वरूपात पाहता तसेच डाऊनलोड करता येईल. “Pay Now” या पर्यायावर क्लिक करून थेट भरणा करता येईल. मालमत्ता कर ऑनलाईन भरण्याच्या सुविधा: नागरिकांना मालमत्ता कर भरण्यासाठी विविध डिजिटल माध्यमांचा वापर करता येणार असून त्यामध्ये पुढील पर्यायांचा समावेश आहे: क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, UPI, नेट बँकिंग, वॉलेट, QR कोड अवघ्या काही मिनिटात मिलणार बिल नवी मुंबई महानगरपालिका नागरिकांना अधिक सुलभ, जलद व पारदर्शक सेवा देण्यासाठी सातत्याने डिजिटल माध्यमांचा वापर वाढवत आहे. मालमत्ता कराची ई-बिले व्हाट्सअॅप चॅटबॉट आणि अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्यामुळे नागरिकांना केवळ काही मिनिटांत आपले बिल प्राप्त करून त्याचा भरणा करता येणार आहे. या सुविधेमुळे वेळेची बचत होणार असून, नागरिकांनी या सेवांचा अधिकाधिक वापर करून निर्धारित कालावधीत मालमत्ता कर भरावा आणि शहराच्या विकासासाठी साथ द्यावी असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या वतीने करण्यात येत आहे.

प्रशासकीय सेवा थेट जनतेच्या दारी

  २,५०० नागरिकांनी घेतला विविध शासकीय सेवांचा लाभ कल्याण : जीवनदीप महाविद्यालय, गोवेली यांच्या सहकार्याने महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागांतर्गत ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ उपक्रमाअंतर्गत ठाणे जिल्हाधिकारी व तहसीलदार कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य दाखले वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामीण भागातील नागरिक, विद्यार्थी, महिला आणि दिव्यांग व्यक्तींना शासकीय योजनांचा लाभ जलदगतीने व सुलभ पद्धतीने मिळावा, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश होता. शुक्रवारी पार पडलेल्या या शिबिरात सुमारे २,५०० नागरिकांनी विविध शासकीय सेवांचा लाभ घेत समाधान व्यक्त केले. या शिबिराचे उद्घाटन मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना आमदार कथोरे म्हणाले, “शासकीय योजना व दाखले मिळवण्यासाठी नागरिकांना वारंवार कार्यालयात जावे लागू नयेत; त्यांना तात्काळ आणि सुलभ सेवा मिळणे गरजेचे आहे.” या शिबिरामध्ये प्रामुख्याने उत्पन्न दाखला, अधिवास (डोमिसाईल) प्रमाणपत्र, आयुष्यमान कार्ड व आभा कार्ड नोंदणी, जात प्रमाणपत्र व नॉन-क्रिमीलेअर दाखला, रेशन कार्डवरील नाव बदल व इतर दुरुस्त्या (पुरवठा विभाग), सामाजिक न्याय विभागांतर्गत संजय गांधी निराधार योजनेचे अर्ज व मंजुरी, महिला व बालविकास तसेच आरोग्य विभागाशी संबंधित विविध योजनासेवा प्रभावीपणे पुरविण्यात आल्या. विशेष बाब म्हणजे, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता झालेल्या नागरिकांना मान्यवरांच्या हस्ते तत्काळ दाखले वितरित करण्यात आले. या प्रसंगी ठाण्याचे उपजिल्हाधिकारी सर्जेराव मस्के पाटील, प्रांत अधिकारी विश्वास गुजर, सहायक कामगार आयुक्त अनघा क्षीरसागर, प्रकल्प अधिकारी धनश्री साळुंखे, कल्याणचे तहसीलदार विकास गारुडकर तसेच टीडीसी बँकेचे उपाध्यक्ष अरुण पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. जीवनदीप संस्थेचे अध्यक्ष कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रविंद्र घोडविंदे यांनी सर्व मान्यवरांचे पुष्पहार देऊन स्वागत केले. कार्यक्रमाला जिल्हाधिकारी कार्यालय, पंचायत समिती, महसूल, वन व आरोग्य विभागातील अधिकारी-कर्मचारी, तसेच पत्रकार आणि विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नरेश टेंभे यांनी केले. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी जीवनदीप संस्थेचे संचालक प्रशांत घोडविंदे, प्राचार्य डॉ. अशोक वाघ, उपप्राचार्य हरेंद्र सोष्टे तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

 सलमान खान, आमिर खान यांच्या चित्रपटांऐवजी रणवीर सिंग, विकी कौशल यांचे चित्रपट पहा!

मंत्री नितेश राणे यांचे मोठे विधान हरिभाऊ लाखे नाशिक –महाराष्ट्रातील भाजपमधील हिंदुत्ववादी आक्रमक चेहरा म्हणून ओळख निर्माण करणारे मंत्री नितेश राणे हे कायमच वादग्रस्त ठरत आले आहेत. हिंदू राष्ट्र म्हणून एक…

विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना बळ देत आमदार निरंजन डावखरे यांचा वाढदिवस साजरा

अनिल ठाणेकर ठाणे-विर्थ्यांसोबतचा प्रत्येक क्षण हा अविस्मरणीय असतो आणि समाजाला काहीतरी परत देण्याची हीच खरी संधी असते. अशा भावना व्यक्त करत आमदार ॲड. निरंजन डावखरे यांनी कर्णबधीर विशेष विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल…

बृहन्मुंबई गुजराती समाजाचे नवनियुक्त अध्यक्ष आणि ज्यांच्यावर कादंबरी, डॉक्युमेंटरी व नाट्यकृती निर्माण झाली आहे असे विक्रमादित्य डॉ. हेमराज शाह यांच्या ८५ व्या वाढदिवसानिमित्त बिर्ला मातोश्री सभागृहात ‘हेमूदादा’ या नाट्यप्रयोगाचे सादरीकरण करण्यात…

मुंबई : कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना राज्य सरकारने तुटपुंजी मदत जाहीर करून वा-यावर सोडल्याने मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी महिनाअखेरीस कोकणातील आंबा व काजू बागायतदार धडक देणार आहे.  या मोर्चास सर्व विरोधी पक्षांनी पाठिंबा देवून सहभागी व्हावे याकरिता शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे , कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांची मुंबईत भेट घेतली. गेल्या दोन महिन्यांपासून कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकरी अस्मानी व सुल्तानी संकटाने झालेल्या नुकसानीत हेक्टरी ५ लाख व ३ लाख रूपये नुकसान भरपाई मागणीसाठी रस्त्यावरची लढाई लढत आहे. राज्य सरकारने हेक्टरी २२ हजारांची मदत जाहीर करून बोळवण केली आहे. यामुळे कोकणातील आंबा व काजू बागायतदार शेतकरी हवालदिल झाला आहे. नुकसानभरपाई बाबत राज्य सरकारने आज अखेर कोणतेही पंचनामे अथवा प्रशासकीय आदेश दिलेले नाहीत. एकीकडे २५ हजार कोटींचा कुंभमेळा ३५ हजार कोटी व ८६ हजार कोटींचा शक्तीपीठ १ लाख कोटींपर्यंत खर्च करण्यास मान्यता दिली जात आहे. मात्र दुसरीकडे रत्नागिरी, सिंधुदुर्ग,पालघर,ठाणे जिल्ह्यातील शेतकरी मदतीसाठी टाहो फोडत असताना राज्य सरकार आंबा बागायतदार शेतकऱ्यांची चेष्टा करू लागले आहे. यामुळे एप्रिल महिन्याच्या अखेरीस कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकरी गिरगांव चौपाटी ते मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. यावेळी मा. खासदार राजू शेट्टी यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे , कॅाग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन पाटील व राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे या सर्वांनी या मोर्चात सहभागी होवून लढा यशस्वी करण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे सांगितले. यावेळी रत्नागिरीचे आमदार बाळा माने , सुशांत नाईक, गणेश गायकर , किरण टेंभुलकर ,अजय तेली यांच्यासह कोकणातील शेतकरी प्रतिनिधी उपस्थित होते.