Month: July 2026

 शिवभक्त राजू देसाई मुंबई पोर्ट ट्रस्ट येथे सन्मानित

शिवचरित्रावर व्याख्यानही उत्साही वातावरणात संपन्न                                              मुंबई,  दि. (प्रतिनिधी): मुंबई बंदर प्राधिकरण स्थानीय लोकाधिकार समितीच्या विद्यमाने शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त राजू देसाई यांचे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित ‘स्वराज्याचा अपरिचित इतिहास’…

के.एन.टी. पब्लिक स्कूल प्रकरणी पालकांचे केडीएमसी शिक्षण विभाग विरोधात शुक्रवारी निषेध आंदोलन

कल्याण: टिटवाळा येथील के.एन.टी. पब्लिक स्कूलतर्फे शालेय साहित्य खरेदी सक्ती केल्या प्रकरणी पालकांचे केडीएमसी शिक्षण विभागाविरोधात शुक्रवारी निषेध आंदोलन करण्यात येणार आहे. के.एन.टी. पब्लिक स्कूल, टिटवाळा येथील पीडित व त्रस्त…

 शास्त्रीनगर हॉस्पिटलच्या मेडिकलमध्ये औषधेच उपलब्ध नाहीत

 डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयाचा अजब कारभार कल्याण : डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयाच्या कारभार पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या हॉस्पिटलमध्ये चाललय तरी काय असा प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे. दोन वर्षांच्या वेदांश राठोड या चिमुकल्याला त्वचेचा त्रास असल्याने त्याचे वडील जगदीश राठोड उपचारासाठी शास्त्रीनगर रुग्णालयात घेऊन आले होते. डॉक्टरांनी तपासणीनंतर वेदांशसाठी तब्बल १२ औषधे लिहून दिली आणि ती रुग्णालयातील मेडिकलमधून घेण्यास सांगितले. मात्र, मेडिकलमध्ये एकही औषध उपलब्ध नसल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे सर्व औषधे बाहेरून खरेदी करण्यास सांगण्यात आल्याने रुग्णाच्या नातेवाईकांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत आहे. महापालिकेच्या रुग्णालयात रुग्णांना आवश्यक औषधेच उपलब्ध नसतील, तर सर्वसामान्य नागरिकांनी उपचारासाठी कुठे जावे, असा सवाल उपस्थित केला जात आहे. या घटनेमुळे कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या आरोग्य व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकाराबाबत वेदांशचे वडील जगदीश राठोड यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत, महापालिका प्रशासनाने रुग्णालयांमध्ये आवश्यक औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी केली आहे.

 डोंबिवलीतील स्पा सेंटरमधून महिलेचे ७० हजारांचे मंगळसूत्र चोरी

 बॉडी मसाज सुरू असताना पर्समधील दागिना लंपास; अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल कल्याण : डोंबिवली पूर्व येथील एका स्पा सेंटरमध्ये बॉडी मसाजसाठी गेलेल्या महिलेचे ७० हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एक ५० वर्षीय महिला ४ जुलैला दुपारी ३.१५ ते ५.०० वाजण्याच्या दरम्यान डोंबिवली पूर्वेतील टिळक रोडवरील स्पार्कल सलून अँड स्पा येथे बॉडी मसाजसाठी गेल्या होत्या. मसाज सुरू करण्यापूर्वी त्यांनी गळ्यातील ७० हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र काढून ते पर्समध्ये ठेवले आणि पर्स भिंतीलगत असलेल्या हुकला अडकवली. मसाज संपल्यानंतर पर्स तपासली असता त्यामधील मंगळसूत्र चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मंगळसूत्र न सापडल्याने त्यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ च्या कलम ३०५ (अ) अन्वये अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रकाश जगताप करीत आहेत. स्पा सेंटरमधील सीसीटीव्ही फुटेजसह अन्य पुराव्यांच्या आधारे आरोपीचा शोध सुरू आहे. 00000000

घणसोलीतील क्लस्टरमुळे माथाडींच्या साडेतीन हजार घरांचा पुनर्विकास होणार

अनिल ठाणेकर ठाणे : माथाडी कामगारांची वस्ती म्हणून ओळखल्या जाणार्‍या घणसोलीतील सिम्प्लेक्स सोसायटीच्या विकासासाठी क्लस्टरला मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे या सोसायटीमध्ये वास्तव्य करणार्‍या माथाडी कामगारांच्या साडेतीन हजार घरांच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून वनआरकेच्या घरात वास्तव्य करणार्‍या या कुटूंबांना आता टूबीएचकेचे प्रशस्त घर मिळणार आहे. सिम्प्लेक्सचा पुनर्विकास मार्गी लागावा यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली खासदार नरेश म्हस्के आणि शिवसेना नवी मुंबई जिल्हाप्रमुख किशोर पाटकर यांनी केलेल्या प्रयत्नांना अखेर यश आले आहे. घणसोली येथील सेक्टर ७ मध्ये सिम्प्लेक्स सोसायटी ही माथाडी कामगारांची मोठी वस्ती आहे. निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे या वसाहतीमधील घरे धोकादायक बनली आहेत. पिलर आणि भिंतींना मोठमोठे तडे गेले आहेत. दररोज छताचे प्लास्टर पडल्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे माथाडी कामगारांना आणि त्यांच्या कुटूंबांना जीव मुठीत धरून येथे वास्तव्य करावे लागत आहे. त्यामुळे या धोकादायक इमारतींचा पुनर्विकास करण्याची मागणी केली. यासाठी रहिवाशांनी अनेक आंदोलनेही छेडली. मात्र हा पुनर्विकास राजकीय श्रेयवाद अडकला. त्यामुळे माथाडी कामगार आणि त्यांच्या कुटूंबियांची मृत्युच्या दाढेतून सुटका झाली नाही. मात्र खासदार नरेश म्हस्के आणि शिवसेना नवी मुंबई जिल्हाप्रमुख किशोर पाटकर यांनी गोरगरीब माथाडी कामगारांना हक्काचा पक्का आणि मोठा निवारा मिळावा यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा केला. त्यांच्या या सततच्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. माथाडी कामगारांच्या या वसाहतीचा पुनर्विकास करण्यासाठी क्लस्टर योजना जाहीर करण्यात आली आहे. क्लस्टरची अधिसूचना आज महापालिका आयुक्त डॉ. कैलाश शिंदे यांनी प्रसिध्द केली. त्यामुळे गेल्या सिम्प्लेक्सचा पुनर्विकासाचा मार्ग अखेर मोकळा झाला असून साडेतीन हजार घरांमध्ये वास्तव्य करणार्‍या सुमारे १६ हजार रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. चौकट खासदार रहिवाशांच्या मागे खंबीरपणे उभा राहिले माथाडी कामगारांच्या सिम्प्लेक्स सोसायटीच्या पुनर्विकासामध्ये अनेक अडथळे आले. मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून हा प्रश्न अखेर मार्गी लागला. पुनर्विकासासाठी रहिवाशांना मोठा संघर्ष करावा लागला. या संघर्षात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली खासदार नरेश म्हस्के आणि जिल्हाप्रमुख किशोर पाटकर हे रहिवाशांच्या मागे खंबीरपणे उभे  राहिले. त्यामुळेच सिम्प्लेक्सच्या पुनर्विकासाठी क्लस्टरला मंजुरी मिळाली, अशी प्रतिक्रिया शिवसेना नगरसेवक सौरभ शिंदे यांनी व्यक्त केली आहे.

 दिव्यातील भराडी देवी सेवा मंडळाकडून वारकऱ्यांची सेवा

 सासवड येथे चहा, बिस्कीट व पाण्याचे मोफत वाटप दिवा :“जीवनातला एक दिवस चालत जाणाऱ्या वारकऱ्यांची सेवा करावी” हा भाव मनात ठेवून दिव्यातील भराडी देवी सेवा मंडळाने यंदाही सामाजिक बांधिलकी जपत…

पावसाळ्यानंतर डेंग्यू, मलेरिया आणि जलजन्य आजारांचा धोका वाढला

मिरा –भाईंदर : पावसाळा ओसरत असताना मुंबईसह मिरा -भाईंदर आणि वसई-विरार परिसरात डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनिया तसेच टायफॉइड, हिपॅटायटिस-ए आणि गॅस्ट्रोएन्टेरायटिससारख्या जलजन्य आजारांचा धोका वाढत आहे. या पार्श्वभूमीवर अपेक्स हॉस्पिटल्स समूहाने…

नाशिककरांनो, आता अनियंत्रित पार्किंग महागात पडणार!

 अखेर ‘स्मार्ट पार्किंग’ योजनेला मिळाला मुहूर्त” हरिभाऊ लाखे नाशिक : शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नियोजित करण्यात आलेल्या महापालिकेच्या स्मार्ट पार्किंग योजनेला अखेर मुहूर्त सापडला आहे. पाचव्यांदा राबविण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेत तीन ठेकेदार पात्र ठरल्यामुळे संबंधित प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी महापालिका आयुक्तांकडे पाठविण्यात आला आहे. येत्या आठवडाभरात ठेकेदार निश्चितीची प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे. मात्र, शहरातील अनेक प्रमुख रस्त्यांवर सुरू असलेल्या खोदकाम आणि विकासकामांमुळे स्मार्ट पार्किंगची अंमलबजावणी सुरुवातीला निवडक ठिकाणीच करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. महापालिकेने नाशिक पूर्व आणि पश्चिम विभागातील सुमारे सहा चौरस किलोमीटर परिसरात प्रायोगिक स्वरूपात २२ ऑन-स्ट्रीट आणि ६ ऑफ-स्ट्रीट अशा एकूण २८ स्मार्ट पार्किंग स्थळांची योजना आखली आहे. प्रत्येक पार्किंग परिसरात सुमारे १०० ते १५० मीटर अंतरावर पार्किंग व नो-पार्किंग झोन निश्चित करण्यात येणार आहेत. या योजनेसाठी यापूर्वी चार वेळा निविदा प्रक्रिया राबविण्यात आली होती. सुरुवातीला महापालिकेला दरमहा निश्चित रॉयल्टी देण्याच्या अटीला ठेकेदारांनी विरोध दर्शविला होता. त्यानंतर प्रशासनाने अटी-शर्तींमध्ये बदल करून रॉयल्टीची रक्कम ३५ लाख रुपयांवरून २० लाखांपर्यंत कमी केली. या बदलानंतर पाच कंपन्यांनी निविदा भरली होती; मात्र तांत्रिक तपासणीत त्या अपात्र ठरल्या होत्या. अखेर पाचव्या फेरनिविदेत तीन कंपन्या पात्र ठरल्याने प्रकल्पाच्या अंमलबजावणीत मार्ग मोकळा झाला. महासभेच्या मंजुरीनुसार दुचाकीसाठी दोन तासांपासून २४ तासांपर्यंत १० ते ६० रुपये, तर चारचाकीसाठी २० ते १०० रुपये (ऑन-स्ट्रीट) आणि ऑफ-स्ट्रीट पार्किंगसाठी २० ते २०० रुपये शुल्क आकारले जाणार आहे. टोइंग शुल्कामध्ये दुचाकी व तीनचाकी वाहनांसाठी ७०० रुपये, तर चारचाकी वाहनांसाठी १,१५० रुपये निश्चित करण्यात आले आहेत. स्मार्ट पार्किंग योजनेमुळे शहरातील अनियंत्रित पार्किंगला आळा बसण्याबरोबरच वाहतुकीला अधिक शिस्त लागण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. टोइंगचे दर (रुपये) दुचाकी: ७०० तीनचाकी: ७०० चारचाकी: १,१५० ४,१५५ वाहनांच्या पार्किंगची सुविधा स्मार्ट पार्किंग योजनेअंतर्गत एकूण ४,१५५ वाहनांच्या पार्किंगची सुविधा उपलब्ध होणार आहे. अधिकृत रिक्षा थांबे वगळता अन्य ठिकाणी उभी असलेली वाहने टोइंग करण्याचा अधिकार संबंधित ठेकेदाराला असेल. तसेच पार्किंग शुल्क आणि दंडाची संपूर्ण वसुली ऑनलाइन पद्धतीने करण्यात येणार असून, त्यामुळे महापालिका आणि वाहतूक पोलिसांच्या महसुलातही भर पडणार आहे.

रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघातांना निमंत्रण

चिकणघर परिसरातील रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवून रस्ता दुरुस्त करण्याची मागणी  कल्याण : कल्याण पश्चिमेतील चिकणघर परिसरातील रस्त्यांवर खड्डे पडले असून या रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अपघातांना निमंत्रण मिळत आहे. त्यामुळे  रस्त्यांवरील हे खड्डे तातडीने बुजवून रस्ता दुरुस्त करण्याची मागणी हेल्पिंग हँड सामाजिक संस्थेने केली असून याबाबत संस्थेचे अध्यक्ष सचिन राऊत यांनी केडीएमसी आयुक्तांना पत्र दिले आहे. काही दिवसांपूर्वी रस्त्यावरील खड्ड्यांमुळे होत असलेल्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर रस्ते तातडीने दुरुस्त करण्यासाठी महानगरपालिकेकडे निवेदन दिले होते. त्यानंतर काही ठिकाणी रस्त्यांचे काम करण्यात आले. मात्र, निकृष्ट दर्जाच्या कामामुळे अवघ्या काही दिवसांतच पावसात ते रस्ते पुन्हा वाहून गेले आणि खड्ड्यांची समस्या पूर्वीपेक्षा अधिक गंभीर झाली आहे. याच कारणामुळे पुन्हा महानगरपालिकेकडे निवेदन देऊन संबंधित रस्त्यांची तातडीने, दर्जेदार आणि कायमस्वरूपी दुरुस्ती करण्याची मागणी संस्थेतर्फे करण्यात आली आहे. जेणेकरून नागरिकांना होणारा त्रास आणि अपघातांचा धोका कमी होईल. चिकणघर परिसरातील संदीप हॉटेल ते मधुरीमा स्वीट्स या दरम्यानच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्‌डे पडले असून रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. या मार्गावर तीन ते चार शाळा असून दररोज हजारो शाळकरी वि‌द्यार्थी, पालक, ज्येष्ठ नागरिक तसेच इतर नागरिक या रस्त्याचा वापर करतात. रस्त्यावरील मोठ्या खड्ड्यांमुळे अपघात होण्याची शक्यता दिवसेंदिवस वाढत असून नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने त्यांचा अंदाज येत नाही आणि त्यामुळे दुचाकीस्वार तसेच पादचाऱ्यांसाठी हा रस्ता अधिक धोकादायक ठरत आहे. परिसरातील नागरिकांनी यापूर्वीही यासंदर्भात महानगरपालिकेकडे लेखी तक्रारी सादर केल्या आहेत. मात्र अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. तरी या बाबीची तातडीने दखल घेऊन संदीप हॉटेल ते मधुरीमा स्वीट्स या मार्गावरील सर्व खड्डे त्वरित बुजवून रस्त्याची योग्य दुरुस्ती करण्याचे आदेश संबंधित विभागास देण्याची मागणी हेल्पिंग हँड सामाजिक संस्थेने केडीएमसी आयुक्तांकडे केली आहे.

प्रस्तावित डेटा सेंटरविरोधी लढ्याला ज्येष्ठ नागरिकांचा जाहीर पाठिंबा

अनिल ठाणेकर ठाणे: ठाण्यातील प्रस्तावित डेटा सेंटर प्रकल्पाविरोधात सुरू असलेल्या जनआंदोलनाला आता ज्येष्ठ नागरिकांचाही ठाम पाठिंबा मिळाला असून, या लढ्यात ते सक्रिय सहभाग घेणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या मते, प्रस्तावित डेटा सेंटरमुळे परिसरातील पर्यावरण, ध्वनी प्रदूषण, वाहतूक कोंडी, उष्णतेत वाढ आणि नागरिकांच्या आरोग्यावर होणारे संभाव्य परिणाम यांचा सर्वाधिक फटका ज्येष्ठ नागरिकांनाच बसू शकतो. त्यामुळे हा प्रश्न केवळ विकासाचा नसून सार्वजनिक आरोग्य आणि जीवनमानाशी संबंधित असल्याचे त्यांनी नमूद केले. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नागरिकांनी स्थानिक नागरिकांसह प्रस्तावित प्रकल्पाविरोधातील आंदोलनात सक्रिय सहभाग घेण्याचा निर्णय घेतला आहे. पर्यावरणाचे संरक्षण, नागरिकांचे आरोग्य आणि भविष्यातील पिढ्यांच्या हितासाठी हा लढा अधिक व्यापक करण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले. आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाकडे प्रकल्पाबाबत संपूर्ण पारदर्शकता ठेवण्याची, पर्यावरणीय परिणामांचा सखोल अभ्यास सार्वजनिक करण्याची आणि स्थानिक नागरिकांच्या आक्षेपांचा गांभीर्याने विचार करण्याची मागणी केली आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या सहभागामुळे या आंदोलनाला अधिक बळ मिळणार असून, नागरिकांच्या आरोग्य व पर्यावरणाच्या संरक्षणासाठी हा लढा अधिक तीव्र करण्याचा निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला आहे.