Author: bittambatami.com

मालमत्ता कर पावती वाटप करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना भत्ता द्या

एक हात मदतीचा’ संस्थेची उल्हासनगर महापालिका आयुक्तांकडे मागणी सुनिल इंगळे उल्हासनगर : यंदा पहिल्यांदाच मालमत्ता कर पावती वाटपाचे काम उल्हासनगर महानगरपालिकेने कंत्राटी कर्मचाऱ्यांना दिले असून या कर्मचाऱ्यांना विशेष भत्ता देण्यात यावा अशी मागणी ‘एक हात मदतीचा’ या सामाजिक संस्थेने महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे. संस्थेचे अध्यक्ष विजय कदम, उपाध्यक्ष रवी वलेचा, सचिव अतुल शिंदे, उपसचिव करण दराडे, खजिनदार जयेश बेलदार व सल्लागार दत्तात्रय कदम यांच्या स्वाक्षरीने आयुक्तांना हे निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दरवर्षी मालमत्ता कर पावती वाटपाचे काम महिला बचत गटांमार्फत केले जाते व त्यांना त्याचा मोबदला दिला जातो. परंतु यावर्षी हे काम महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांकडे सोपवण्यात आले आहे. कंत्राटी कर्मचारी हे काम चोखपणे व योग्य प्रकारे करत आहेत. मात्र, हे काम करताना कर्मचाऱ्यांना गाडी भाडे, पाणी, जेवण यासाठी स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करावे लागत आहेत. सध्या कडक उन्हाळ्याचे दिवस असल्याने शारीरिक त्रासही होत आहे. तरीही कर्मचाऱ्यांनी कोणतीही तक्रार किंवा अपेक्षा व्यक्त केलेली नाही. ‘आपली महानगरपालिका एक कुटुंब आहे आणि आपण या कुटुंबाचे प्रमुख आहात. त्यामुळे याचा सकारात्मक विचार करून मालमत्ता कर भरणा पावती वाटपासाठी कंत्राटी कर्मचाऱ्यांना स्वखुशीने काहीतरी विशेष भत्ता देण्यात यावा अशी विनंती ‘एक हात मदतीचा’ या सामाजिक संस्थेने केली आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या या अतिरिक्त कामाची दखल घेऊन त्यांना योग्य मोबदला मिळावा जेणेकरून त्यांचे मनोबल वाढेल अशी अपेक्षा देखील ‘एक हात मदतीचा’ संस्थेने व्यक्त केली आहे.

– ३७ वर्षांनंतरही मफतलाल कामगार न्यायाच्या प्रतीक्षेत

थकबाकी देण्याची कामगारांची मागणी ठाणे : कळवा येथील मफतलाल इंजिनिअरिंग इंडस्ट्रियल लिमिटेड कंपनी बंद होऊन तब्बल ३७ वर्षे उलटूनही हजारो कामगारांना अद्याप न्याय मिळालेला नसल्याची खंत मफतलाल कामगार संघर्ष समितीने व्यक्त केली आहे. कंपनीची जमीन विकून कामगारांचे पीएफ, निवृत्तीवेतन आणि इतर थकबाकीची देणी तातडीने द्यावीत, अशी मागणी समितीकडून करण्यात आली आहे.२७ मे १९८९ रोजी कोणतीही पूर्वसूचना न देता कंपनी बंद करण्यात आली होती. त्यामुळे २२०३ कामगार बेरोजगार झाले. त्यापूर्वी १९८६ मध्ये ९२३ कामगारांना सक्तीने निवृत्त करण्यात आल्याचा आरोप कामगारांनी केला आहे. २५ वर्षांहून अधिक सेवा बजावलेल्या कामगारांना अपमानास्पद पद्धतीने बाहेर काढण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तत्कालीन कामगार नेते आणि स्वातंत्र्यसैनिक आप्पा सामंत यांनी हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत नेले होते. सर्वोच्च न्यायालयाने कामगारांना पुन्हा सन्मानाने कामावर घेण्याचे आदेश दिले होते. मात्र, व्यवस्थापनाने या आदेशाची अंमलबजावणी केली नसल्याचा आरोप कामगारांनी केला आहे. त्यानंतर उर्वरित कामगारांनाही १९८९ मध्ये बाहेर काढण्यात आले.कामगारांनी १९९० मध्ये उच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र, कंपनीचे कथित गैरव्यवस्थापन आणि मालकांच्या निष्क्रियतेमुळे कंपनी पूर्णपणे बंद पडल्याचा आरोप मफतलाल कंपनीचे कामगार सतीश मनवल यांनी केला. वेतन, पीएफ, निवृत्तीवेतन आणि इतर कायदेशीर देणी गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या तीन दशकांत दीड हजारांहून अधिक कामगारांचे निधन झाले असून उर्वरित कामगार अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. न्यायालयीन आदेशानंतरही मालकांनी कंपनी पुन्हा सुरू करण्यास किंवा कामगारांची देणी देण्यास स्वारस्य दाखवले नाही. त्यामुळे १ फेब्रुवारी १९९९ रोजी कंपनी मुंबई उच्च न्यायालयाच्या रिसिव्हरच्या ताब्यात देण्यात आली. न्यायमूर्ती काथावाला यांच्या आदेशानुसार कंपनी परिसराला कुंपण घालण्यात आले. जागेच्या विक्रीसाठी तीन वेळा लिलाव प्रक्रिया राबविण्यात आली, मात्र कोणत्याही विकासकाने प्रतिसाद दिला नाही.यानंतर हे प्रकरण डेट रिकव्हरी ट्रिब्युनल न्यायालयाकडे वर्ग करण्यात आले. २०२४ मध्ये पहिला लिलाव जाहीर करण्यात आला होता, मात्र त्यालाही प्रतिसाद मिळाला नसल्याचे कामगारांनी सांगितले. डीआरटी कार्यालयातून समाधानकारक माहिती मिळत नसल्याचाही आरोप करण्यात आला. २०११ मध्ये किरण मोहिते यांच्या नेतृत्वाखाली “मफतलाल कामगार संघर्ष समिती” स्थापन करण्यात आली. २०१२ मध्ये जागेवरील ‘लँडलॉक’ हटविण्यात आला आणि सुमारे सव्वा दोन कोटी रुपये खर्चून परिसराला कंपाऊंड घालण्यात आले. १२३ एकर जागेचे मूल्यांकन करण्यात आले असता तिची किंमत तब्बल ११३२ कोटी रुपये असल्याचे समोर आले. तरीही जागा विक्रीसाठी कोणताही विकासक पुढे आला नसल्याचे समितीने म्हटले आहे. दरम्यान, आमदार संजय केळकर यांनी २०१२ पासून या प्रकरणात पाठपुरावा करून कामगारांना काही प्रमाणात देणी मिळवून दिल्याचा दावा समितीकडून करण्यात आला. तसेच वर्ग १ आणि वर्ग २ मधील जागांचे एकत्रीकरण करून जागा विक्रीचा मार्ग मोकळा करण्यात आल्याचेही सांगण्यात आले. मात्र, जागा विक्री अद्याप रखडल्याने हजारो कामगारांची देणी

ठाणेकरांना महागाईचा आणखी झटका! रिक्षा-टॅक्सी भाडेवाढीची मागणी

सिद्धेश शिगवण ठाणे : ठाणेकरांच्या खिशाला पुन्हा कात्री लागण्याची शक्यता असून, रिक्षा आणि टॅक्सी प्रवास लवकरच महाग होण्याची चिन्हे आहेत.सीएनजीच्या दरात सातत्याने होत असलेली वाढ, वाढती महागाई आणि वाहनांच्या देखभालीचा वाढलेला खर्च यामुळे ठाण्यात रिक्षा आणि टॅक्सी प्रवास लवकरच महागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ठाणे शहर रिक्षा-टॅक्सी समन्वय कृती समितीने प्रादेशिक परिवहन विभागाकडे (आरटीओ) भाडेवाढीची मागणी केली आहे. समितीने आरटीओला दिलेल्या पत्रानुसार, रिक्षा आणि टॅक्सीच्या किमान भाड्यात प्रति किलोमीटर ४ रुपयांची वाढ तसेच पुढील प्रत्येक किलोमीटरसाठी २ रुपयांची वाढ करण्याची मागणी करण्यात आली आहे. सध्या सीएनजीचे दर ८४ रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचल्याने चालकांचे आर्थिक गणित कोलमडल्याचा दावा रिक्षा-टॅक्सी संघटनांनी केला आहे. ठाणे शहरात सुमारे ८ लाख वाहने सीएनजीवर धावत असून, त्यामध्ये जवळपास २ लाख रिक्षा, १ लाखांहून अधिक टॅक्सी आणि ५ लाखांपेक्षा जास्त खासगी वाहनांचा समावेश आहे. वाढती महागाई, वाहनांच्या किंमती, दुरुस्ती व देखभाल खर्च तसेच बँक कर्जाचा वाढलेला बोजा यामुळे भाडेवाढ अपरिहार्य असल्याचे युनियनचे म्हणणे आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास ठाणे, लोकमान्य नगर, वागळे इस्टेट आणि घोडबंदर परिसरातील रोज प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या खिशाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. खटुआ समितीच्या सूत्रानुसार तातडीने भाडेवाढ लागू करण्याची मागणी रिक्षा-टॅक्सी संघटनांनी केली आहे.

नालेसफाईच्या कामातील हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही

आयुक्त राधा बिनोद शर्मा यांचा कडक इशारा मिरा -भाईंदर : आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर, आयुक्त राधाविनोद ए. शर्मा यांनी मंगळवारी सुरू असलेल्या मान्सूनपूर्व नाले सफाई मोहिमेचा भाग म्हणून महानगरपालिका क्षेत्रातील विविध भागांची पाहणी केली. त्यांनी अधिकारी आणि कंत्राटदारांना स्पष्ट सूचना दिल्या की, नाले सफाईच्या कामातील हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही आणि सर्व कामे वेळेत व दर्जेदार पद्धतीने पूर्ण केली पाहिजेत. आयुक्त शर्मा यांनी प्रमुख नाले, तुंबलेल्या गटारवाहिन्या आणि जलनिःसारण प्रणालीची स्थिती तपासण्यासाठी शहराच्या विविध भागांना भेट दिली. या पाहणीदरम्यान, टाटा पॉवर हाऊस मीरा रोड, जेपी इन्फ्रा, साई पॅलेस, लक्ष्मी बाग, रेल्वेला समांतर असलेला नाला आणि डीबी रियल्टी परिसरातील सुरू असलेल्या साफसफाईच्या कामाचा आढावा घेतला. त्यांनी अधिकाऱ्यांना नाल्यांमधून गाळ आणि कचरा पूर्णपणे काढून टाकण्याचे निर्देश दिले. नाले स्वच्छता मोहीम पावसाळ्यात नाल्यांमध्ये अडकलेला कोणताही कचरा तात्काळ काढून टाकण्याचे आदेश स्वच्छता निरीक्षकांना देण्यात आले. ज्या ठिकाणी नाले रुंद आहेत, त्या भागात अतिरिक्त कर्मचारी आणि यंत्रसामग्री तैनात करण्याचे निर्देशही देण्यात आले. रस्त्याच्या कडेला आणि नाल्यांच्या बांधकाम स्थळांवर पडलेला कचरा तात्काळ काढून टाकण्याचे आदेश देण्यात आले. आयुक्तांनी नियमित देखरेख आणि कामाची वेळेवर पूर्तता सुनिश्चित करण्याची जबाबदारी संबंधित प्रभाग अधिकाऱ्यांवर सोपवली. पावसाळ्यात पाणी साचणे, वाहतूक कोंडी आणि जनतेची गैरसोय टाळण्यासाठी आवश्यक खबरदारीच्या उपाययोजना राबवल्या जात असल्याचे महानगरपालिका प्रशासनाने सांगितले. स्वच्छता केल्यानंतर महानगरपालिकेने पाण्याचा सुरळीत प्रवाह सुनिश्चित करावा आणि आजूबाजूच्या परिसरात स्वच्छता राखावी. आयुक्तांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला प्रमुख नाल्यांवर मजबूत आणि उच्च दर्जाची लोखंडी जाळी बसवण्याचे निर्देश दिले.

बालभवनच्या नूतनीकृत इमारतीचे मुख्यमंत्री फडणीस यांच्या हस्ते लोकार्पण

अशोक गायकवाड मुंबई : मुंबईच्या चर्नी रोड परिसरातील महाराष्ट्र राज्य जवाहर बालभवनाच्या परिसरात ‘मुक्त विज्ञान उद्यान’ उभारण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. मुख्यमंत्री फडणीस यांच्या हस्ते बालभवनच्या नूतनीकृत इमारतीचे लोकार्पण करण्यात आले. त्यांनतर मध्यमांशी बोलताना त्यांनी ही घोषणा केली. उद्घाटन प्रसंगी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, कौशल्य, रोजगार आणि नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार दीपक केसरकर, मुंबईच्या महापौर रितू तावडे, शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल, शिक्षण विभागाचे आयुक्त सचिन्द्र प्रताप सिंह, बालभवनच्या संचालक नीता पाटील यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. बालभवनच्या नूतन वास्तूची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, महानगरपालिका शाळांमधील अधिकाधिक विद्यार्थ्यांना या केंद्राशी जोडण्यासाठी महापौर रितू तावडे यांनी पुढाकार घ्यावा. यातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी हातभार लागेल. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार म्हणाल्या की, बालभवन ही केवळ इमारत नसून लाखो मुलांच्या स्वप्नांना आकार देणारे प्रेरणास्थान आहे. नवीन वास्तूमुळे महाराष्ट्रातील बालकांच्या कल्पकतेला नवे पंख मिळतील. मुलांना बालभवनाच्या माध्यमातून खेळ, गायन, नृत्य, चित्रकला, शिल्पकला आणि विविध सृजनशील उपक्रमांद्वारे स्वतःला शोधण्याची संधी येथे मिळते; तसेच त्यांना मातीशी, रंगांशी आणि संगीताशी जोडण्याचे महत्त्वपूर्ण कार्य बालभवन गेली ७५ वर्षे सातत्याने काम करत आहे. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी सांगितले की, ४ ते १६ वयोगटातील मुलांच्या कल्पनाशक्तीला आणि सृजनशीलतेला वाव देण्याचे कार्य ही संस्था सातत्याने करत आहे. नूतनीकरण करण्यात आलेल्या या इमारतीत तळमजल्यावर अत्याधुनिक प्रेक्षकगृह आणि सुसज्ज ग्रंथालय तयार करण्यात आले आहे. पहिल्या मजल्यावर नृत्य दालन, नाट्य कक्ष आणि संगीत कक्ष आहे. दुसऱ्या मजल्यावर विद्यार्थ्यांच्या सादरीकरणासाठी व्यासपीठ; तसेच मूर्तिकला आणि चित्रकला दालने उभारण्यात आली आहेत. या वास्तूमध्ये १०० विद्यार्थी क्षमतेची तीन सुसज्ज सभागृहे आहेत. एकाच वेळी ५०० विद्यार्थी विविध कलांचे प्रशिक्षण घेऊ शकतील. दररोज ५०० विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षण क्षमतेनुसार महिन्याला सुमारे १० हजार, तर वर्षभरात जवळपास १ लाख विद्यार्थ्यांना प्रशिक्षण व मार्गदर्शन मिळू शकणार आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात एक बालभवन सुरू करण्याचा शालेय शिक्षण विभागाचा मानस आहे, असे शालेय शिक्षण मंत्री भुसे यांनी सांगितले. यावेळी सर जे. जे. कला महाविद्यालय आणि महाराष्ट्र राज्य जवाहर बालभवन यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. बालभवनच्या संचालक नीता पाटील आणि सर जे. जे. कला महाविद्यालयाचे संचालक किशोर इंगळे; तसेच कुलसचिव शशिकांत काकडे यांच्यात सामंजस्य कराराच्या प्रतींचे आदानप्रदान करण्यात आले. या करारामुळे विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे कला प्रशिक्षण आणि मार्गदर्शन मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

शहरातील प्रत्येक घराची नोंद होईल या दृष्टीने काळजीपूर्वक घरगणना करावी – आयुक्त सौरभ राव

ठाणे: ठाणे महानगरपालिका हद्दीत १६ मे पासून घरगणनेसाठी प्रगणक घराघरामध्ये भेटी देत असून प्रभाग समितीनिहाय सुरू असलेल्या घरगणना प्रक्रियेचा आढावा ‍आज महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी घेतला. १४ जून २०२६…

अशोक समेळ, वारे गुरुजी, कोकरे युआरएल पुरस्काराचे मानकरी

अशोक समेळ, वारे गुरुजी, कोकरे युआरएल पुरस्काराचे मानकरी २९ मे रोजी ‘कृतज्ञता दिवस’ निमित्त पुरस्कार वितरण सोहळा मुंबई : विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांचा गौरव करण्यासाठी यूआरएल…

 निरंकारी राजमाताजी मेमोरियल क्रिकेट टूर्नामेंट संपन्न

कल्याण : संत निरंकारी मिशनच्या विद्यमाने २३ व २४ मे रोजी  विलेपार्ले स्थित धनजीभाई मेहता ग्राउंडमध्ये निरंकारी राजमाताजी मेमोरियल महिला क्रिकेट टूर्नामेंटचे यशस्वी आयोजन करण्यात आले. त्यामध्ये मुंबई परिक्षेत्रातील एकंदर २२…