Category: होम

वाढवण बंदर खाण प्रकल्पाच्या जन सुनावणीमध्ये आंदोलकांचा गोंधळ

 दगड उत्खननासंदर्भात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने आयोजित केली होती जन सुनावणी पालघर :  खोल समुद्रामध्ये उभारण्यात येणाऱ्या महत्त्वाकांक्षी वाढवण बंदराच्या उभारणीसाठी समुद्रात भराव करण्यात येणार असून त्यासाठी आवश्यक गौण खनिजांचे उत्खनन करण्यात येणार आहे. पालघर तालुक्यातील गारगाव आणि खाणीवडे या नजीकच्या दगड खाणींमधून दगडाचे उत्खनन करण्यात येणार आहे. सदर बाबीच्या पर्यावरणीय मंजुरीसाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या वतीने जाहीर सुनावणीचे आयोजन रविवार दिनांक २ ऑगस्ट रोजी करण्यात आले होते. यावेळी प्राधिकरणाकडून देण्यात येणाऱ्या तज्ञ मंडळींच्या अहवालावरून आणि जन सुनावणी पुढे ढकलण्याच्या मुद्द्यावरून आंदोलकांनी जन सुनावणीत गोंधळ घातला. गारगाव आणि खाणीवडे या नजीकच्या दगड उत्खननामुळे पर्यावरणावर त्याचा होणारा परिणाम आणि या प्रक्रियेमुळे स्थानिकांच्या जीवनमानावर होणारा बदल याबाबत मंडळाकडून एक अहवाल सादर करण्यात आला. सदर अहवाल अध्ययनासाठी दिलेला कालावधी अपुरा असल्याचे प्रथमतः आंदोलकांकडून सांगण्यात आले. सदर अहवाल मराठी मध्ये आणि त्याचा मतितार्थ संक्षिप्त रूपात सादर करण्याचे प्रशासनाने आश्वासन दिल्यानंतर आंदोलकांनी त्याला देखील नकार दिला. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने रविवारी शिगाव- खुताड येथे जाहीर जन सुनावणी आयोजित केली होती. या जनसुनावणीत आंदोलकांनी तज्ञ मंडळींच्या अहवाला सोबतच अतिवृष्टी आणि शेतीची कामे सुरू असताना जन सुनावणी का घेतली? असा सवाल उपस्थित केला. दगडखणींमधून होणाऱ्या उत्खननाचा संभाव्य जीवनमानावरील आणि पर्यावरणावरील परिणाम याबाबत तयार केलेल्या अहवालाच्या अनुषंगाने आजूबाजूच्या पाच ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांना या  सुनावणीसाठी निमंत्रित करण्यात आले होते. अतिवृष्टी आणि शेतीची कामे यांची कारणे देत जन सुनावणी रद्द करून पुढे ढकलण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली होती. गारगाव गट क्रमांक ८२ (क्षेत्र.२४.९४ हे.) साठी आयोजित सुनावणीमध्ये ९० नागरिक, गट क्रमांक ८२ (क्षेत्र.१७.०८ हे.) साठी ७२ आणि खानिवडे गट क्रमांक ९ (क्षेत्र.१५.३९ हे.) ६० ते ७० नागरिकांनी उपस्थिती दर्शविली. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने देण्यात येणाऱ्या विविध पर्यायांना आंदोलकांनी धुडकारले. जन सुनावणीच्या सभा मंडपा बाहेर येऊन त्यांनी घोषणा द्यायला सुरुवात केली. पोलीस प्रशासनाने त्यांची समजूत काढल्यानंतर देखील आंदोलन सुरूच राहिले. अखेरीस महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने जन सुनावणीचा कारभार सुरू करण्यात आला. यादरम्यान कुठलीही पोलिसी कारवाई होणार नाही याची दक्षता प्रशासनाने घेतली. जन सुनावणीचा कारभार सुरू असलेला पाहता घोषणाबाजीचे रूपांतर गोंधळबाजी मध्ये झाले. तुमच्या हरकती व सूचना लिखित अथवा कथित स्वरूपामध्ये प्रशासनाकडे नोंदवा अशी पोलिसांच्या वतीने वारंवार विनंती करण्यात आली. एकंदरीतच जन सुनावणी उधळून लावण्याचा आंदोलकांचा मानस होता. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने एकंदरीत झालेल्या घडामोडींची नोंद घेऊन जन सुनावणी पूर्ण केली.पोलिस प्रशासनाने देखील सर्व आंदोलकांच्या मागण्यांची नोंद केली. प्रशासनाच्या वतीने जन सुनावणी मध्ये ग्रामस्थांच्या समस्या ऐकून घेण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली होती. चौकट महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने सादर करण्यात आलेला तज्ञ मंडळींचा अहवाल इंग्रजीमध्ये असून तो फार मोठा आणि क्लिष्ट असल्याचा आरोप उपस्थित ग्रामस्थांनी केला. त्यावर मंडळाच्या वतीने तो मराठीमध्ये व संक्षिप्त स्वरूपात तुम्हाला सादर करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले ते देखील ग्रामस्थांनी झिडकारले.सुनावणी मध्ये अपेक्षित समस्या निराकरण करण्यासाठी शक्य ते प्रयत्न करण्यात आल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

ज्येष्ठ नागरिकांसाठी एसटी स्मार्ट कार्ड व मोफत बस पास शिबिर उत्साहात संपन्न

औचित्य माजी आमदार संदीप नाईक यांच्या वाढदिवसाचे मुंबई, दि. (प्रतिनिधी) :  ऐरोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार  संदीप नाईक यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून  सानपाडा येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्यालयात ज्येष्ठ नागरिकांसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे एनसीएमसी स्मार्ट कार्ड तसेच नवी मुंबई परिवहन उपक्रमाचा मोफत बस पास काढून देण्यासाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. नगरसेवक  सुनिल कुरकुटे,  नगरसेवक प्रभाग क्रमांक १९ यांच्या पुढाकारातून, भारत ई-सेवा केंद्राच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या या सामाजिक व लोकोपयोगी उपक्रमाला ज्येष्ठ नागरिकांसह महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अत्यंत आनंदमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात हे शिबिर यशस्वीरीत्या संपन्न झाले. कार्यक्रमाचे उद्घाटन नवी मुंबई परिवहन समितीचे सदस्य राजेश राय, नगरसेवक सुनिल कुरकुटे आणि ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष  मारुती विश्वासराव यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी मान्यवरांनी उपस्थित ज्येष्ठ नागरिकांना मार्गदर्शन केले तसेच  संदीप नाईक यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. नगरसेवक  सुनिल कुरकुटे यांची नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मध्य रेल्वेच्या बोर्डावर सल्लागार सदस्यपदी निवड झाल्याबद्दल ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला. तसेच ज्येष्ठ नागरिकांना नवी मुंबई परिवहन उपक्रमाचा मोफत बस पास मिळवून देण्यासाठी विशेष सहकार्य केल्याबद्दल परिवहन समितीचे सदस्य  राजेश राय यांचाही सन्मान करण्यात आला. याप्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.  पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. शिबिराला ज्येष्ठ नागरिकांचा मोठा व उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ०००००

अभिनेता ऋषिकेश कानडे काळाच्या पडद्याआड

अवघ्या ३८‌व्या वर्षी घेतली ‘एक्झिट’ मुंबई : पुण्यातील एक हरहुन्नरी आणि अतुलनीय अभिनेता ऋषिकेश कानडे याचे आज पहाटे पुणे येथे अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यू समयी त्याचे वय अवघे ३८ वर्षांचे होते.  अजात शत्रु असलेला ऋषिकेश एक प्रगल्भ अभिनेता तर होताच पण देशप्रेमाने पूर्ण भारलेला होता. तो मुख्य भूमिका करत असलेल्या ‘मी भारतीय ‘ ह्या दिर्घांकाचे जवळपास ३०० प्रयोग करतांना  त्याच्या देशप्रेमाचे प्रत्यंतर यायचे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रावर व्याख्यान देताना तो महाराजमय होऊन जायचा. त्याने केलेल्या प्रत्येक भूमिका तो जगला, त्यामुळे प्रेक्षकांच्या ह्रदया पर्यंत पोहोचला. त्याला राज्य नाट्य स्पर्धेत दोन वर्ष अभिनयाच्या रौप्य पदकाने गौरवले होते. त्याच्या पश्चात आई-वडील, बहिण आणि पत्नी असा परिवार आहे. ३ ऑगस्टला संध्याकाळी ऋषिकेशवर पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. स्वत:चा ऑनलाईन फिटनेस क्लब चालवणाऱ्या ऋषिकेशच्या निधनाने पुण्याच्या रंगकर्मींमधे हळहळ व्यक्त होत आहे. ००००

खड्डे बुजविण्यासाठी मनपा अ‍ॅक्शन मोडवर

मंत्री गिरीश महाजन, मनपा आयुक्त मनीषा खत्री उतरले रस्त्यावर हरिभाऊ लाखे नाशिक : शहरामध्ये रस्ते अपघातात पाच जणांचा मृत्यू आणि त्यानंतर नाशिककरांची झालेली ओरड यामुळे खडबडून जागे झालेले महापालिका प्रशासन अ‍ॅक्शन मोडवर आले आहे. दोन दिवसांपासून शहरातील प्रमुख रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे काम वेगाने सुरू असून, रविवारी कुंभमेळामंत्री गिरीश महाजन, मनपा आयुक्त मनीषा खत्री स्वतः रस्त्यावर उतरले होते. मंत्री महाजन यांनी खड्डेमय रस्त्यांची पाहणी करत, आठवड्याभरात शहरातील सर्व खड्डे बुजवले जातील आणि आगामी ३ ते ४ महिन्यांत नाशिकमध्ये सिमेंट काँक्रीटचे रस्ते दिसणार असल्याचा दावाही या वेळी दिला. तर, रस्ते दुरुस्तीचे काम गतीने करण्याचे आदेश मनपा आयुक्त खत्री यांनी दिले. शहरातील मखमलाबाद रोड, पंचवटी, सिडको, सातपूर आणि नाशिकरोड परिसरातील अनेक रस्त्यांवर ठिकठिकाणी भलेमोठे खड्डे पडले आहेत. पावसाचे पाणी साचल्यामुळे खड्ड्यांचा अंदाज न आल्याने रोज लहान-मोठे अपघात घडत आहेत. यामुळे वाहतुकीची मोठी कोंडी होत असून, वाहनधारकांना पाठीच्या आजारांना आणि वाहनांच्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. माध्यमांनी या प्रश्नावर सातत्याने आवाज उठवल्यानंतर महापालिका प्रशासनाविरोधात नागरिकांमधून तीव्र असंतोष व्यक्त केला जात होता. आयुक्त मनीषा खत्री यांनी रविवारी शहरातील रस्त्यांच्या परिस्थितीची आणि सुरू असलेल्या दुरुस्ती कामांचा आढावा घेतला. पावसाची उघडीप मिळताच सर्व प्रभागांमध्ये पेव्हर ब्लॉक आणि कोल्ड मिक्सच्या साहाय्याने तातडीने खड्डे बुजवण्याचे निर्देश त्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. कामाच्या गुणवत्तेत कसूर करणाऱ्या कंत्राटदारांवर आणि निष्काळजीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशाराही आयुक्तांनी दिला आहे. कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी स्वतः शहरात उतरून खड्डेमय रस्त्यांची पाहणी केली. आगामी ३ ते ४ महिन्यांत नाशिकमधील रस्ते सिमेंट काँक्रीटचे पाहायला मिळतील, अशी ग्वाही मंत्री महाजन यांनी दिली. शहरात रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अपघातांचे प्रमाण प्रचंड वाढले असून, आतापर्यंत ५ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. मखमलाबाद रस्ता पुढील दोन दिवसांत पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. मंत्री महाजन म्हणाले की, कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिकसाठी सुमारे ३५ हजार कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. दरवर्षी डांबरी रस्त्यांवर वाहनांचा भार आणि पावसामुळे खड्डे पडतात. त्यामुळे या वर्षी सर्व मुख्य रस्त्यांचे ‘व्हाइट टॉपिंग’ करून सिमेंट काँक्रीटीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे पुढील ३० ते ४० वर्षे रस्त्यांवर खड्डे पडणार नाहीत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सध्या पाणीपुरवठा, ड्रेनेज, गॅस लाईन आणि फायबर केबल यांसारख्या युटिलिटी लाईन्स जमिनीखाली दाबण्याचे काम सुरू असल्याने खुदाई करावी लागत आहे. त्यातच यंदा मुसळधार पाऊस झाल्यामुळे खड्डे पडले आहेत. मात्र, येत्या आठवड्याभरात शहरातील सर्व खड्डे बुजवले जातील. या कामाचा वेग वाढवण्यासाठी सर्व अधिकारी, कंत्राटदार आणि केंद्रीय एजन्सींची तातडीची बैठक घेण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

 ‘लँड टायटलिंग’ कायदा अंमलात आणून प्रॉपर्टी कार्ड देण्याची योजना राबविणार- चंद्रशेखर बावनकुळे

१५ ऑक्टोबर २०२४ पूर्वी खाजगी जागेवर  बांधलेल्या घरांना गुंठेवारी कायद्यांतर्गत नियमित करणार…! कणकवली(प्रतिनिधी )–सिंधुदुर्ग जिल्ह्याचे आधुनिक पद्धतीने  ‘ड्रोन सर्वेक्षण’ करून प्रत्येक मालमत्तेला ‘प्रॉपर्टी कार्ड ‘देण्याची योजना राबविण्यात येणार.त्यासाठी दोनशे सर्व्हेअर्सना परवाने  देऊन हंगामी स्वरूपाची नियुक्ती करण्यात येणार आहे. भविष्यात लँड टायटलिंग कायदा  लागू करून शासनमान्य  मालकी हक्काचे कार्ड देण्याचा सरकारचा मानस आहे. तसेच नोंदणीपूर्वी मोजणी आणि त्यानंतर फेरफार करण्याची नवी व्यवस्था कायद्याद्वारे लागू केली जाईल अशा घोषणा राज्याचे  महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केल्या. राज्य शासनाच्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियानांतर्गत ‘आयोजित महसूल समाधान शिबिराच्या निमित्ताने आटोजीत करण्यात आलेल्या समारंभात बावनकुळे बोलत होते. ३१ मार्च २०२७ पर्यंत जिल्ह्यातील सर्व शेत रस्त्यांचे सीमांकन, मोजणी, अतिक्रमण हटवून क्रमांक देण्याचे काम पूर्ण करण्यात येणार असून, मुख्यमंत्री बळीराजा पांदण रस्ता योजनेतून प्रत्येक शेतकऱ्याला शेतरस्ता उपलब्ध करून देण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. राज्यातील सर्व २८८ विधानसभा मतदारसंघांमध्ये महसूल समाधान शिबिरे आयोजित करण्यात आली असून, शासनाच्या योजना थेट नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा हा उपक्रम असल्याचे बावनकुळे म्हणाले. या शिबिरात प्राप्त झालेल्या नागरिकांच्या निवेदनांवर तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले. १ जानेवारी २०११ पूर्वीच्या सरकारी जागांवरील घरांचे सर्वेक्षण करून पात्र लाभार्थ्यांना पट्टे देण्यात येणार असून, १५ ऑक्टोबर २०२४ पूर्वी खाजगी जागेवरील ले-आउट मध्ये बांधलेल्या घरांना गुंठेवारी कायद्यांतर्गत नियमित करण्याचा निर्णयही त्यांनी यावेळी  जाहीर केला. सिंधुदुर्गचे  पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे आणि स्थानिक प्रशासनाच्या कार्याचे कौतुक करताना, जिल्ह्याची बदनामी करण्याचा कोणताही प्रयत्न सहन केला जाणार नाही. आवश्यक तेथे चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, मात्र प्रामाणिक नागरिक व शेतकऱ्यांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचा विश्वास बावनकुळे यांनी यावेळी बोलतांना व्यक्त केला. जनतेच्या हिताचे निर्णय प्रत्यक्षात पोहोचविणारे मंत्री म्हणजे बावनकुळे अशा शब्दात जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी बावनकुळे यांच्या कामाचे कौतुक केले. बावनकुळे यांच्या कार्यशैलीतून आम्ही शिकतो, तरुण मंत्र्यांसाठी ते आदर्श आहेत असे गौरवोदगार राणे यांनी काढले. बावनकुळे यांनी आपल्या भाषणात राणे  बंधूंचे तोंड भरून कौतुक केले. मत्स्य व्यवसाय आणि बंदर खात्याचे मंत्री म्हणून नितेश राणे हे अतिशय उत्तम प्रकारे काम करत आहेत शिवाय हे खातं ते प्रभावीपणे सांभाळत आहेत अशा शब्दात त्यांनी नितेश राणे यांचा गौरव केला. आमदार निलेश राणे यांच्याबाबत बोलताना बावनकुळे म्हणाले, विधानसभेत ते महसूल विभागाशी संबंधित विषय अत्यंत अभ्यासपूर्ण, तळमळीने आणि जनहिताची भूमिका घेऊन मांडत आहेत. त्यांनी सिंधुदुर्गच्या प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा केला असून, त्यांनी मांडलेल्या महसूल विभागाच्या सर्व विषयांवर निर्णय घेण्याचे मी वचन देतो, असे त्यांनी यावेळी  स्पष्ट केले. यावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री तथा माजी महसूल मंत्री नारायण राणे यांच्या कार्याचाही गौरव करत, महसूल मंत्री म्हणून नारायण राणे यांनी घेतलेल्या अनेक दूरदृष्टीच्या निर्णयांचा पाया आजही भक्कम आहे. त्या निर्णयांना पुढे नेण्याचे काम आम्ही करत आहोत. कोकण दौऱ्यावर येण्यापूर्वी मी त्यांचा आशीर्वाद घेतला, असेही त्यांनी सांगितले. कोकणात झालेल्या जमीन गैरव्यवहार प्रकरणांची महसूल विभागाने गंभीर दखल घेतली असून या प्रकरणांच्या चौकशीसाठी २० अधिकाऱ्यांची विशेष चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे ही समिती मागील दहा वर्षांच्या कागदपत्रांची चौकशी करणार आहे. या तपासात य चौकशीत जे कोणी अधिकारी कर्मचारी दोषी आढळतील त्यांच्यावर थेट गुन्हे दाखल करून कठोर कारवाई केली जाईल अशी घोषणा महसूल मंत्री बावनकुळे यांनी काल रत्नागिरी येथे बोलताना केले शेतकऱ्यांना कर्ज देणे ही बँक आणि महसूल विभागाची जबाबदारी आहे. कोकणात सातबारावर अनेक नावे असतात.परंतु कर्ज देताना संमती पत्र मिळणं अवघड होऊन जातं त्यामुळे बँका कर्ज देत नाहीत तेव्हा हमीपत्रावर कर्ज देण्याबाबत शासन विचार करीत असून त्याबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली.

 २५ लाखांच्या भाड्यावरून वाद

महापालिकेकडे वाहने असूनही, खाजगी यंत्रसामग्री भाड्याने घेण्याचा निर्णय वादाच्या भोवऱ्यात मिरा -भाईंदर : शहरातील धोकादायक झाडांच्या फांद्या छाटण्यासाठी एका खाजगी कंपनीकडून अंदाजे २५ लाख रुपये खर्च करून दोन हायड्रॉलिक बूम लिफ्ट (मॅन लिफ्ट) भाड्याने घेण्याच्या महानगरपालिकेच्या प्रस्तावावरून वाद निर्माण झाला आहे. विरोधी पक्ष आणि नागरिकांनी या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून प्रशासनाकडून स्पष्टीकरण मागितले आहे. महानगरपालिका प्रशासनाचे म्हणणे आहे की, भारतीय हवामान विभाग आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पावसाचा इशारा दिल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. आपत्ती व्यवस्थापनाच्या बैठकीत शहरातील धोकादायक झाडांच्या फांद्या तात्काळ छाटण्याचे निर्देश देण्यात आले, ज्यामुळे अतिरिक्त यंत्रसामग्रीची गरज निर्माण झाली. प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, महानगरपालिकेकडे आधीपासूनच उपलब्ध असलेली दोन हायड्रॉलिक वाहने शहरभरातील काम वेळेवर पूर्ण करण्यासाठी पुरेशी नव्हती. वेळखाऊ नियमित निविदा प्रक्रियेमुळे, ही तातडीची गरज भागवण्यासाठी विविध कंपन्यांकडून दरपत्रके मागवण्यात आली. सर्वात कमी दर देणाऱ्या कंपनीकडून चालक, ऑपरेटर आणि इंधनासह दोन यंत्रे भाड्याने घेण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. या कामासाठी अंदाजे २५ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. २०२६-२७ च्या अर्थसंकल्पाअंतर्गत नवीन हायड्रॉलिक यंत्रे खरेदी करण्याचा प्रस्तावही तयार करण्यात आला असून, त्यासाठी आर्थिक आणि प्रशासकीय मंजुरीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तथापि, विरोधी पक्ष आणि नागरिक प्रश्न विचारत आहेत की, महानगरपालिकेकडे आधीपासूनच दोन हायड्रॉलिक वाहने आहेत आणि त्यांचा पूर्ण वापर का केला गेला नाही. शिवाय, कायमस्वरूपी उपाय म्हणून नवीन यंत्रे खरेदी करण्याऐवजी ती भाड्याने घेण्याचा निर्णय का घेण्यात आला आणि नियमित निविदा प्रक्रियेऐवजी तात्पुरती पद्धत का अवलंबण्यात आली. या प्रश्नांमुळे प्रशासनाच्या निर्णयावर वाद निर्माण झाला आहे. ०००००

 बालकामगार म्हणून नेलेल्या दोन आदिवासी मुलांचा काही तासांत शोध

श्रमजीवी संघटनेच्या पाठपुराव्यामुळे पोलिसांची तत्पर कारवाई योगेश चांदेकर पालघर: जव्हार तालुक्यातील धारणहट्टी गावातील दोन आदिवासी अल्पवयीन मुलांना बालकामगार म्हणून वाडा तालुक्यातील कोने गावातील एका पोल्ट्रीवर नेल्याची घटना समोर आली. श्रमजीवी संघटनेच्या तातडीच्या पाठपुराव्यामुळे आणि पोलिसांच्या जलद कारवाईमुळे दोन्ही मुलांचा काही तासांत शोध लागला असून त्यांना सुरक्षितपणे पोलिसांच्या ताब्यात घेण्यात आले आहे. धारणहट्टी येथील राजा जाधव (वय १४) आणि रोहिदास सवरा (वय १२) हे दोघे अल्पवयीन मुलगे त्यांच्या आई-वडिलांच्या अनुपस्थितीत एका इसमाकडून वाडा तालुक्यातील कोने गावातील एका पोल्ट्रीवर कामासाठी नेण्यात आले. मुलांचे आई-वडील शेतीच्या कामानिमित्त बाहेर गेले होते. घरी परतल्यानंतर मुलं बेपत्ता असल्याचे लक्षात येताच त्यांनी जव्हार येथे सुरू असलेल्या बालसंजीवन छावणीत श्रमजीवी संघटनेच्या अध्यक्ष सीता घाटाळ यांची भेट घेतली. सीता घाटाळ यांनी तातडीने श्रमजीवी संघटनेचे सरचिटणीस विजय जाधव, पालघर जिल्हाध्यक्ष सुरेश रेंजड तसेच जव्हार तालुका अध्यक्ष अजित गायकवाड यांना माहिती देऊन मुलांचा शोध सुरू केला. त्याचबरोबर जव्हारचे पोलीस निरीक्षक किरण पवार, समीर महेर, पोलीस उपअधीक्षक, जव्हार, तसेच राजेंद्र कदम, पोलीस निरीक्षक, वाडा यांना माहिती देण्यात आली. राजेंद्र कदम यांनी चेतन सोनावणे, पोलीस हेड कॉन्स्टेबल यांच्याकडे तपासाची जबाबदारी सोपविली. दिवसभर वाडा तालुक्यातील विविध पोल्ट्री फार्मवर शोधमोहीम राबविल्यानंतर कोने गावातील एका पोल्ट्रीवर दोन्ही मुले आढळून आली. पोलिसांनी मुलांना सुरक्षित ताब्यात घेतले असून संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रकरणात पोलिसांनी दाखविलेल्या तत्परतेबद्दल आदिवासी विकास आढावा समितीचे अध्यक्ष (मंत्री दर्जा) विवेक पंडित, श्रमजीवी संघटनेच्या अध्यक्ष सीता घाटाळ, सरचिटणीस विजय जाधव आणि पालघर जिल्हाध्यक्ष सुरेश रेंजड यांनी पालघरचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांचे तसेच या कारवाईत सहभागी सर्व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.

 महसूल दिन व पालघर जिल्हा वर्धापन दिन उत्साहात साजरा

जिल्हाधिकारी डॉ.इंदु राणी जाखड यांचे विशेष मार्गदर्शन अशोक गायकवाड पालघर : महसूल विभाग हा केवळ महसूल वसुली करणारा विभाग राहिलेला नसून नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून विकासाला चालना देणारा विभाग म्हणून त्याचे स्वरूप बदलले आहे. शासनाच्या लोकाभिमुख धोरणांची प्रभावी अंमलबजावणी करून शेवटच्या घटकापर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचविण्यासाठी महसूल विभाग कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी केले. महसूल दिन आणि पालघर जिल्ह्याच्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, डहाणू प्रकल्प अधिकारी विशाल खत्री, जव्हार प्रकल्प अधिकारी डॉ.अपूर्वा बासुर , अपर जिल्हाधिकारी दत्तात्रेय कवितके,भारतीय प्रशासन सेवेतील (प्रशिक्षणार्थी ) पी.व्ही अमल ,उपजिल्हाधिकारी रणजित देसाई, विजया जाधव, तेजस चव्हाण, भूमी अभिलेख विभागाचे अधीक्षक नरेंद्र पाटील, तसेच अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ.इंदु राणी जाखड म्हणाल्या की, १ ऑगस्ट २००२ पासून महसूल दिन साजरा करण्यामागील संकल्पना म्हणजे महसूल विभाग अधिकाधिक नागरिकाभिमुख करणे. स्वातंत्र्यानंतर महसूल प्रशासनाची भूमिका बदलत गेली असून आज हा विभाग महसूल संकलनाबरोबरच विकास, जनकल्याण, आपत्ती व्यवस्थापन आणि नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहे. गेल्या वर्षभरात सातबारा उताऱ्यावरील हक्क सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी शासनाने घेतलेल्या निर्णयांचे त्यांनी विशेष कौतुक केले. विशेषतः वनहक्क कायद्यांतर्गत पात्र लाभार्थ्यांना सातबारा उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया ही अनेक वर्षांच्या संघर्षानंतर प्रत्यक्षात येत असून हा महसूल विभागासाठी अभिमानास्पद टप्पा असल्याचे त्यांनी नमूद केले. महसूल विभाग कृषी, ग्रामविकास, भूमी अभिलेख, मुद्रांक व नोंदणी यांसह विविध विभागांमध्ये प्रभावी समन्वय साधत असल्याचे सांगताना त्यांनी पालघर जिल्ह्यात सर्व विभाग एकाच प्रशासकीय इमारतीत कार्यरत असल्याने समन्वय अधिक परिणामकारक होत असल्याचे स्पष्ट केले. आपत्ती व्यवस्थापनात महसूल विभागाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगत त्यांनी अलीकडील अतिवृष्टीच्या काळात विविध विभागांच्या समन्वयातून नागरिकांपर्यंत तातडीने मदत पोहोचविण्यात प्रशासनाला यश आल्याचे नमूद केले. शासकीय जमिनींचे व्यवस्थापन, सर्वांसाठी घरे अभियान, २०११ पूर्वीच्या अतिक्रमणांचे नियमानुकूलकरण यांसारख्या निर्णयांमधून शासनाचा नागरिकाभिमुख दृष्टिकोन अधोरेखित होत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी महसूल विभागाच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना उद्देशून, शासनाच्या योजनांचा लाभ १०० टक्के पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प करण्याचे आवाहन केले. पालघर जिल्ह्याच्या विकासाबाबत बोलताना त्यांनी मुख्यमंत्री यांनी व्यक्त केलेल्या भूमिकेचा उल्लेख करत, “पालघर हे भविष्यात संपूर्ण महाराष्ट्राच्या विकासाचे ‘ग्रोथ इंजिन’ ठरेल,” असा विश्वास व्यक्त केला. पुढील पाच ते दहा वर्षांत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर औद्योगिक गुंतवणूक, रोजगारनिर्मिती, कौशल्य विकास आणि पायाभूत सुविधांचा विस्तार होणार असून हा विकास सर्व समावेशक आणि शाश्वत राहील, यासाठी प्रशासन प्राधान्याने काम करणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी सांगितले. या कार्यक्रमामध्ये महसूल विभागात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. ०००००००००

महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाच्या संचालकपदी विकास पानसरे यांची नियुक्ती

अनिल ठाणेकर ठाणे- महाराष्ट्र शासनाने नुकत्याच झालेल्या प्रशासकीय बदल्यांनुसार पर्यटन संचालनालयाच्या संचालक पदी भारतीय प्रशासकीय सेवेतील (भा.प्र.से.) नियुक्ती जाहीर केली आहे. महाराष्ट्र शासनाने विकास पानसरे (भा.प्र.से.) यांची पर्यटन संचालनालयाचे संचालक म्हणून नियुक्ती केली आहे. गुरुवार, ३० जुलैपासून त्यांनी पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. यापूर्वी ते महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाचे (एमएसएसआयडीसी) व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत होते. विकास पानसरे यांनी राज्य शासनाच्या विविध विभागांमध्ये प्रशासकीय जबाबदाऱ्या यशस्वीपणे सांभाळल्या आहेत. पर्यटन संचालनालयाच्या धोरणांची अंमलबजावणी, पर्यटन स्थळांचा प्रचार आणि प्रसिद्धी तसेच जगाच्या नकाशावर राज्याला एक उत्तम पर्यटन स्थळ म्हणून नव्याने ओळख मिळवून देण्याचे काम विकास पानसरे करणार आहेत. त्यांच्या कारकिर्दीतील अनुभवाचा उपयोग राज्याच्या शाश्वत आणि पर्यटन विकासाला गती देण्यासाठी होईल, अशी खात्री आहे. यापूर्वी मंगेश जोशी (भा.प्र.से.) पर्यटन संचालक म्हणून महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाचे काम पाहत होते. मंगेश जोशी यांनी त्यांच्या कार्यकाळात महाराष्ट्राच्या पर्यटन क्षेत्राला बळकटी देण्यासाठी महत्त्वाचे काम केले आहे. पायाभूत सुविधांचा विकास, राज्यातील पर्यटन स्थळांना प्रसिद्धी मिळवून देणे आणि पर्यटन क्षेत्रातील खासगी भागीदारी वाढवण्यावर त्यांनी अधिक भर दिला. यामुळे राज्याच्या पर्यटनाला देशपातळीवर तसेच जागतिक स्तरावर मोठी ओळख मिळाली. मंगेश जोशी यांच्या उल्लेखनीय कामगिरीबाबत पर्यटन संचालनालयाने त्यांचे आभार मानले. तसेच महाराष्ट्र पर्यटन संचालनालयामध्ये विकास पानसरे यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी विकास पानसरे यांच्या नेतृत्वाखाली राज्याच्या पर्यटनाला नवी उंची मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. ००००