Category: मुंबई

Mumbai news

उद्योगपती कान्हाशेठ ठाकूर यांचे अल्पशा आजाराने निधन

अशोक गायकवाड पनवेल : माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे सख्खे चुलत बंधू आणि आमदार प्रशांत ठाकूर व परेशशेठ ठाकूर यांचे काका, प्रसिद्ध उद्योगपती कान्हाशेठ ठाकूर यांचे बुधवारी अल्पशा आजाराने निधन झाले. पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी येथे जन्माला आलेल्या कान्हाशेठ ठाकूर यांनी प्रतिकूल परिस्थितीत लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली उद्योगधंद्यात जम बसविला. एकेकाळी मचव्यातून रेती व्यवसाय करीत असलेले कान्हाशेठ ठाकूर आज रेल्वेमधील प्रसिद्ध ठेकेदार म्हणून गणले गेले. न्हावा ग्रामपंचायतीमध्ये सदस्य म्हणून निवडून आल्यानंतर आपल्या निर्भिड स्वभावाप्रमाणे त्यांनी अनेक विकासकामे मार्गी लावली. उद्योगधंद्यात नावारुपाला आल्यानंतर अनेक गरजूंना त्यांनी उदारहस्ते मदत केली. देवभोळे असल्यामुळे अनेक धार्मिक कार्यांना, मंदिरांनाही त्यांनी मोठ्या प्रमाणात मदत केली. उद्योगधंद्यात कार्यरत असताना आपल्या न्हावेखाडी गावाकडे त्यांचे नेहमीच लक्ष असायचे. उद्योगव्यवसायात त्यांची मुले, सागरशेठ ठाकूर, सम्राट ठाकूर, रोशन ठाकूर, जावई अल्केश बैकर त्यांचा वारसा चालवत आहेत. कान्हाशेठ यांच्या पश्‍चात धर्मपत्नी देवकाबाई (बाय) ठाकूर, तीन मुले, एक मुलगी, जावई, सुना, नातवंडे आणि मोठा ठाकूर परिवार आहे. कान्हाशेठ ठाकूर यांच्या पार्थिवावर न्हावेखाडी येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, ज्येष्ठ नेते जे.एम. म्हात्रे, पनवेलचे महापौर नितीन पाटील, ज्येष्ठ नेते वाय.टी. देशमुख, कृष्णाशेठ ठाकूर, नगरसेवक परेश ठाकूर, माजी विरोधीपक्षनेते प्रितम म्हात्रे, नगरसेवक अजय बहिरा, प्रवीण पाटील, मधु पाटील, नरेंद्र ठाकूर, वासुदेव पाटील, न्हावे ग्रामपंचायतीचे सरपंच विजेंद्र पाटील, माजी सरपंच जितेंद्र म्हात्रे, उद्योगपती विजय जाधव कडू, वसंतशेठ पाटील, भाऊशेठ पाटील, सुनिल म्हसकर, चेतन उर्फ भायाशेठ म्हात्रे, संजय पाटील, हरिश्‍चंद्र पाटील यांच्यासह नातेवाईक आप्तेष्ट, मोठ्या संख्येने पंचक्रोशीतील मान्यवर, ग्रामस्थ उपस्थित होते.

मध्य रेल्वेची युनियन बँकेवर मात

१५ वी ज्यो फर्नांडिस हॉकी स्पर्धा २०२६ मुंबई : एएचडब्ल्यूए आयोजित १५व्या ज्यो फर्नांडिस हॉकी स्पर्धेत (२०२६) एलिट पुरुष गटाच्या सामन्यात मध्य रेल्वेने युनियन बँक ऑफ इंडियावर २-१ अशी मात…

महापौर नितीन पाटील यांनी केली पावसाळ्यापूर्वीच्या कामांची पाहणी

अशोक गायकवाड पनवेल : पनवेल महानगरपालिकेचे महापौर नितीन पाटील यांनी गुरुवारी प्रभाग क्रमांक १४ मधील विविध ठिकाणी नालेसफाई व पावसाळ्यापूर्वी सुरू असलेल्या कामांची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी परिसरातील नागरिकांच्या समस्या जाणून घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील सखल भागांमध्ये पाणी साचू नये, नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये तसेच नाल्यांमधील गाळ व अडथळे तातडीने दूर करण्यात यावेत, यासाठी महापौरांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिले. विविध ठिकाणी सुरू असलेल्या नालेसफाईच्या कामांचा आढावा घेत कामांची गुणवत्ता आणि गती यावरही त्यांनी भर दिला. प्रभागातील विकासकामे वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण व्हावीत यासाठी भाजपाचे चारही उमेदवार सातत्याने पाठपुरावा करत येत असून नागरिकांच्या सुरक्षिततेला आणि सुविधांना सर्वोच्च प्राधान्य दिले जात असल्याचे महापौर नितीन पाटील यांनी यावेळी सांगितले. या पाहणी दौऱ्यावेळी पनवेल भाजपा ओबीसी सेल अध्यक्ष सतिश पाटील, माजी नगरसेवक गणपत म्हात्रे, माजी नगरसेविका हेमलता म्हात्रे, भाजपा पनवेल मंडल सरचिटणीस रुपेश नागवेकर, उपाध्यक्ष अतुल भगत, प्रभाग अध्यक्ष गणेश म्हात्रे, भाजपा नेते शैलेश म्हात्रे, रोहीत आठवणे, रुपेश आंबोलकर, अभिजित जाधव, सचिन गमरे, युवा मोर्चा अध्यक्ष कुणाल पाटील व स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते, महानगरपालिका अधिकारी तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. भाजपा उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्ष मयुरेश नेतकर यांनी सांगितले कि, प्रभाग १४ मधील नागरिकांना पावसाळ्यात कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये यासाठी महापौर नितीनभाई पाटील यांच्या नेतृत्वाखाली सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. प्रत्येक प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी भारतीय जनता पक्ष सदैव जनतेसोबत उभा आहे.

महागाईच्या विरोधात शिवसेनेचा गोरेगाव येथे जोरदार एल्गार

नेते पदाधिकाऱ्यां सोबत सर्वसामान्य जनता देखील आंदोलनात सहभागी मुंबई : महागाईच्या विरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गोरेगाव (पश्चिम) रोड ते रत्ना हॉटेल शेजारी केलेल्या एल्गार आंदोलनात नेते व पदाधिकाऱ्यांसोबत सामान्य जनता देखील मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्याचे दिसून आले. देशासह राज्यात पेट्रोल, डिझेल, एलपीजी व सीएनजी गॅसची मोठ्या प्रमाणात दरवाढ झाल्याने सर्वसामान्यांचे वाढत्या महागाईने कंबरडे मोडले आहे. सर्वसामान्य माणसाच्या जीवनावर गंभीर परिणाम झाला असून जीवनावश्यक वस्तूही महाग झाल्या आहेत या महागाईच्या विरोधात शिवसेनेने रस्त्यावर उतरून एल्गार पुकारला असून गुरुवारी झालेल्या आंदोलनात पक्षातील नेते, कार्यकर्ते तसेच सर्वसामान्य जनता देखील आंदोलनात रस्त्यावर उतरल्याचे चित्र दिसून आले. यावेळी कार्यकर्त्यांनी रस्त्यावर चूल पेटवून आंदोलनास सुरुवात केली गॅस चा बाटला ठेवत महागाई विरोधात घोषणा देऊ लागले त्याच बरोबर मोदी सरकारच्या विरोधात पोस्टर, बॅनर फडकावत ‘मोदी सरकार हाय हाय’ घोषणा दिल्या शिवसेना विभाग क्र. ३ च्या वतीने केलेल्या या आंदोलन शिवसेना नेते व माजी उद्योग मंत्री सुभाष देसाई व शिवसेना नेते, विभाग प्रमुख, आमदार सुनिल प्रभू यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या आंदोलनात आमदार अनंत (बाळा) नर, विभाग संघटक शालिनी सावंत, विभाग समन्वयक दीपक सुर्वे,विधानसभा प्रमुख विश्वनाथ सावंत, प्रशांत कदम, विधानसभा संघटक राजू पाध्ये, नगरसेवक अंकित प्रभू , सुहास वाडकर, तुळशीराम शिंदे, जितेंद्र वळवी, कैलाशनाथ पाठक, नगरसेविका लक्ष्मी भाटीया, योगिता कदम, पुष्पा कळबें, लोणा रावत, शिवानी परब, सर्व वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसह, जेष्ठ शिवसैनिक सर्व संलग्न संघटना कार्यकर्त्यांसह नागरिक मोठ्याप्रमाणात उपस्थित होते  महायुती सरकारच्या विरोधात केलेल्या या आंदोलनात शिवसेनेचे विभाग प्रमुख आमदार सुनील प्रभू यांनी पेट्रोल डिझेलच्या किमती वाढल्याने  बैलगाडीतून प्रवास करीत आंदोलन करायचे ठरवले असता तेथेच स्थानिक पोलिसांनी त्यांना तसे करण्यास मनाई केली. यानंतर हातगाडी घेत आंदोलनास सुरवात केली. यावेळी पत्रकारांशी बोलताना सुनील प्रभू यांनी सांगितले की आज सर्वसामान्य माणूस या महागाईच्या विळख्यात सापडला आहे.  केंद्र व राज्य सरकारचा निषेध करत लवकरात लवकर दरवाढ मागे घ्यावी तसे न केल्यास ठिकठिकाणी आंदोलन केले जाईल असा इशारा दिला.

शिवभक्त राजू देसाई यांनी दिला धडा

– शिवचरित्रातून युवकांना शिकण्यासारखे भरपूर मुंबई  : आजकाल छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरित्राच्या नावावर चुकीचा इतिहास शिकविण्यात येतो. ज्या गोष्टी घडलेल्याच नाहीत त्या दंतकथा पुढे आणण्यात येतात. छत्रपती शिवाजी महाराज…

बुद्धभूमी फाउंडेशन प्रकरणी भीमशक्ती सामाजिक संघटना आक्रमक

दोषींवर कडक कारवाई करून बुद्धभूमीचा पुनर्विकास करण्याची मागणी कल्याण : माजी सामाजिक न्याय मंत्री तथा विद्यमान खासदार चंद्रकांत हांडोरे यांच्या नेतृत्वाखाली भीमशक्ती सामाजिक संघटना यांच्या माध्यमातून भीमशक्ती प्रदेश सरचिटणीस तथा महिला काँग्रेस प्रदेश सरचिटणीस ऍड. अपेक्षा दळवी व त्याचप्रमाणे भीमशक्ती कल्याण डोंबिवली जिल्हाध्यक्ष ऍड. अजिंक्य साळवे यांच्या माध्यमातून बुद्धभूमी फाउंडेशन या ठिकाणी घडलेल्या घटनेचा तीव्र कठोर शब्दात जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला.  याप्रकरणी दोषींवर कडक कारवाई करून बुद्धभूमीचा पुनर्विकास करण्याची मागणी यावेळी करण्यात आली असून संबंधितांवर कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ऍड.अपेक्षा दळवी यांनी दिला आहे. यावेळी भीमशक्ती संघटना जिल्हा कार्याध्यक्ष ऍड. गुलाब खंदारे, फुले शाहू आंबेडकर चळवळीचे ज्येष्ठ नेते अरुण पाठारे, भीमशक्ती संघटनेचे ऍड. संजय जाधव, ऍड. पंकज कांबळे, सामाजिक कार्यकर्ते शशांक जाधव, भीमशक्तीचे संकेत धनराव, अण्णा पंडित, मंगेश इंगळे आदी पदाधिकारी उपस्थित होते. कल्याण परिसरातील बौद्ध बांधवांचे श्रद्धास्थान आणि धार्मिक, सांस्कृतिक केंद्र असलेली ‘बुद्धभूमी’ याठिकाणी करण्यात आलेल्या कारवाईमुळे स्थानिक बौद्ध समाज आणि सर्वसामान्य जनतेच्या धार्मिक भावनांना तीव्र ठेच पोहोचली आहे. त्यामुळे याप्रकरणी दोषींवर तात्काळ कारवाई करून दोषींवर अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा  आणि धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी तात्काळ गुन्हे दाखल करुन त्यांना अटक करण्यात यावी. जागेचा पुनर्विकास शासकीय खर्चाने पुन्हा पूर्ववत करुन देण्यात यावे. भविष्यात अशा धार्मिक स्थळांची सुरक्षा राखण्यासाठी या परिसराला कायमस्वरुपी सुरक्षा पुरविण्यात यावी. जर ही कारवाई प्रशासकीय निष्काळजीपणामुळे किंवा दबावाखाली झाली असेल, तर संबंधित जबाबदार अधिका-यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे. या मागण्यांची दखल घेऊन पुढील ७ दिवसांत योग्य ती कारवाई करावी. अन्यथा संपूर्ण कल्याण शहरात लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ऍड. अपेक्षा दळवी यांनी दिला आहे. 0000000000

 एमआयडीसी निवासी होणार हिरवेगार

 उष्मा आणि प्रदूषणाचे प्रमाण होणार कमी कल्याण :  डोंबिवली एमआयडीसी निवासी मध्ये ठेकेदारांकडून काँक्रिट रस्ते, नाले गटारी इत्यादी बनविताना त्यांना अडसर ठरणारी काही झाडे तोडण्यात आली तर काही झाडांच्या मूळ, खोडाला खोदकाम करताना धक्का बसल्याने ती पडली होती. काही झाडे ही भोवताली काँक्रिट अतिक्रमणाने वेढल्याने व खोडाला जखडून ठेवल्याने तसेच त्यामुळे पाणी न मिळाल्याने तर काही झाडे इतर अनेक कारणांनी मरणासन्न अवस्थेत झाली आहेत. या सर्व कारणांमुळे एमआयडीसी निवासी मधील असलेल्या झाडांची संख्या कमी झाली होती. याचा काही प्रमाणात फटका यावेळी विशेष उन्हाळ्यात येथील नागरिकांना जाणवला. मागच्या वर्षी पेक्षा यावर्षी थोडा उष्मा आणि प्रदूषण वाढलेले दिसले. जागतिक पर्यावरण 5 जून याचे निमित्त साधून आणि त्यानंतर येणाऱ्या पावसाळ्यात एमआयडीसी निवासी मध्ये काही सामाजिक संघटना मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करणार आहेत. त्यामुळे काही कारणांने कमी झालेल्या या झाडांची कमतरता भरून काढण्याचा मनोदय या सामाजिक संघटनांनी घेतला आहे. कल्याण – शीळ आणि सर्व्हिस रोड मधील एमआयडीसीने दिलेल्या त्यांच्या ग्रीन बेल्ट मोकळ्या भूखंडावर नानासाहेब पुणतांबेकर स्मृती न्यास तर्फे शैल गंगा मिलापनगर शहरी वन प्रकल्प  होत आहे. यामुळे एक प्रकाराचे छोटे देशी वृक्षांचे जंगल येथे निर्माण होणार आहे. त्यामुळे विविध पक्षांच्या अधिवास या भागात वाढणार आहे. शिवाय कल्याण शीळ हायवे वरील वाहतुकीमुळे होणारे प्रदूषण आणि वाहनांच्या कर्णकर्कश्य आवाजाचे प्रदूषण हे काहीसे कमी होणार असल्याने या शहरी वन प्रकल्पाच्या समोर राहणाऱ्या रहिवाशांना त्याचा फायदा मिळणार आहे. निवासी विभागांतील प्रसिद्ध अशी सामाजिक संघटना असलेली शिवप्रतिमा मित्र मंडळ यांच्या तर्फे निवासी भागात सर्वेक्षण करण्यात येऊन जेथे झाडांची नितांत आवश्यकता आहे किंवा जेथे पूर्वी झाडे होती पण काही कारणाने ती तोडली किंवा पडली अशा जागी झाडे लावण्याचा संकल्प केला असून साधारण अंदाजे ५० झाडे लावण्याचे त्यांनी ठरविले आहे. विशेष म्हणजे शिवप्रतिमा मित्र मंडळाकडून ही झाडे सात ते आठ फूट उंच असलेली देशी झाडे लावण्यात येणार आहेत. मिलापनगर रेसिडेंड्स वेलफेअर असोसिएशन आणि सायकल सखी ग्रुप यांच्या तर्फे पण निवासी परिसरात येत्या पावसाळ्यात वृक्षारोपण करण्यात येणार आहे. एकंदर या संघटनांच्या वृक्षारोपणाने या निवासी नगरीचा सौंदर्यात वाढ होणार असून वाढत असलेली उष्णता/धग आणि प्रदूषणावर काहीसे नियंत्रण या वृक्षारोपणामुळे होणार आहे. 0000000

दुषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात, मुलांमध्ये वाढतेय संसर्गाची भीती

राज भंडारी नवी मुंबई : गेल्या आठवड्यापासून नवी मुंबईतील काही भागांमध्ये दूषित पाणीपुरवठ्याच्या तक्रारी वाढत असून नागरिकांना विविध आरोग्य समस्यांचा सामना करावा लागत आहे. पाण्याला दुर्गंधी येणे, गढूळपणा, पाण्याचा रंग बदलणे आणि चव बदलणे अशा तक्रारी रहिवाशांकडून केल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर पोटाचे विकार, अतिसार, उलट्या, ताप आणि त्वचारोगाच्या तक्रारींमध्ये वाढ होत असल्याची माहिती आरोग्यतज्ज्ञांनी दिली आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, अनेक ठिकाणी नळातून येणारे पाणी पिवळसर किंवा गढूळ दिसत असून ते पिण्यास अयोग्य असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. काही कुटुंबांनी खबरदारी म्हणून बाटलीबंद पाणी किंवा पाणी उकळून वापरण्यास सुरुवात केली आहे. तज्ज्ञांच्या मते, दूषित पाण्यात जीवाणू, विषाणू किंवा परजीवी असू शकतात, ज्यामुळे गॅस्ट्रोएन्टरायटिस, टायफॉइड, हिपॅटायटिस-ए आणि इतर जलजन्य आजारांचा धोका वाढतो. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आधीपासून इतर आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांना याचा अधिक धोका असतो. मेडिकव्हर हॉस्पिटल्स, खारघर, नवी मुंबईचे वरिष्ठ फिजिशियन, इंटेन्सिव्हिस्ट आणि डायबेटोलॉजिस्ट डॉ. श्रीराम रघुनाथ नावडे  यांनी सांगितले की, दूषित पाण्यामुळे सर्वाधिक प्रमाणात अतिसार, उलट्या, पोटदुखी आणि ताप यांसारख्या तक्रारी दिसून येतात. सतत जुलाब किंवा उलट्या झाल्यास शरीरातील पाण्याची कमतरता निर्माण होऊ शकते, जी गंभीर ठरू शकते. नागरिकांनी पाणी गाळुन व उकळूनच प्यावे. पोटाचे विकार दोन दिवसांपेक्षा जास्त काळ टिकल्यास किंवा लघवीचे प्रमाण कमी झाल्यास तातडीने वैद्यकिय सल्ला घ्यावा. तसेच मदरहुड हॉस्पिटल, खारघरचे बालरोग व नवजात शिशू तज्ज्ञ डॉ. अमित पी. घावडे यांनी सांगितले की, लहान मुलांची रोगप्रतिकारक क्षमता पूर्णपणे विकसित झालेली नसल्याने दूषित पाण्यामुळे त्यांना अतिसार, उलट्या आणि तापाचा त्रास लवकर होऊ शकतो. सध्या ओपीडीत दाखल होणाऱ्या १०० पैकी १५ मुलांमध्ये दुषित पाण्यामुळे होणाऱ्या आरोग्याच्या समस्या आढळून येत आहेत. दुषित पाण्यामुळे होणाऱ्या अतिसारामुळे मुलांमध्ये डिहायड्रेशन वेगाने वाढू शकते तर पोटाच्या संसर्गाशी संबंधित तक्रारींमध्ये सुमारे १५ ते २० टक्के वाढ झाल्याचे दिसून येते. पालकांनी विशेष खबरदारी घेत मुलांना उकळलेले, स्वच्छ पाणी द्यावे, मुलांना हातांची स्वच्छता बाळगण्यास प्रोत्साहन द्या आणि मुलांमध्ये सुस्ती, डोळे खोल जाणे किंवा लघवी कमी होणे तसेच इतर असामान्य लक्षणे दिसल्यास त्वरित वैद्यकीय मदत घ्या. नागरिकांनी संबंधित यंत्रणेकडे पाणीपुरवठ्याच्या गुणवत्तेबाबत तक्रारी नोंदवल्या असून पाण्याची तपासणी आणि पुरवठा यंत्रणेची पाहणी करण्याची मागणी केली जात आहे. तज्ज्ञांच्या मते, समस्या पूर्णपणे सुटेपर्यंत नागरिकांनी पिण्याचे पाणी उकळून वापरणे, उघड्यावर विकली जाणारी कापलेली फळं व उघड्यावरच्या अन्न पदार्थांचे सेवन टाळणे आणि स्वच्छतेच्या नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. अशी घ्या काळजी * पाणी किमान 10 मिनिटे उकळून घ्या व त्यानंतर थंड करुन प्या. * घरी असलेले वॉटर फिल्टर नियमित स्वच्छ करा. * हात साबणाने स्वच्छ धुवा. * उघड्यावरचे अन्न आणि कापलेली फळे यांचे सेवन करणे टाळा. * अतिसार किंवा उलट्या झाल्यास ओआरएस आणि पुरेशा प्रमाणात द्रवपदार्थांचे सेवन करा. * लक्षणे गंभीर असल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.

फणसोलीचा सुपुत्र संविधान चंदने भारतीय सैन्यात दाखल

प्रतिकूल परिस्थितीवर मात करत देशसेवेचे स्वप्न साकार; मुरबाड तालुक्यात अभिमानाचे वातावरण राजीव चंदने मुरबाड : तालुक्यातील फणसोली गावचा सुपुत्र संविधान रविंद्र चंदने याची भारतीय सैन्यदलात निवड झाल्याने गावासह संपूर्ण मुरबाड तालुक्यात आनंद…

ठाणे-पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी आकाश पाटील यांची निवड

कल्याण  : दि.ठाणे-पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत “ठाणे तालुका” मतदारसंघातून युवा नेतृत्व आकाश  पाटील यांची बिनविरोध निवड झाली असून सहकार क्षेत्रात नव्या पिढीच्या नेतृत्वाला संधी मिळाल्याची भावना व्यक्त…