Category: ट्रेंडिंग न्यूज

trendlyne-news

 सिंधुदुर्गातल्या ५२ मंदिरांचा होणार कायापालट…!

सिंधुदुर्गातल्या ५२ मंदिरांचा होणार कायापालट…! ४ कोटी २१ लाखांचा निधी मंजूर…! सिंधुदुर्ग: जिल्हा वार्षिक योजनेतील क वर्ग यात्रा स्थळ विकास योजनेअंतर्गत २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी ४ कोटी २१ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. जिल्ह्यातील ५२ मंदिरांचा पर्यटन दृष्ट्या कायापालट होणार आहे आणि या मंदिरांचे रूपडे बदलणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील   मंदिरांचा विकास आणि कायापालट करण्यासाठी दरवर्षी जिल्हा नियोजन मंडळाकडून निधी उपलब्ध करून दिला जातो. या निधीतून मंदिर परिसराचे सुशोभीकरण, संरक्षण भिंत उभारणे, पेव्हर ब्लॉक बसवणे भक्तनिवास बांधणे, पिण्याच्या पाण्याची  योजना यासारखी कामे केली जातात.त्यानुसार २०२५-२६ मध्ये जिल्ह्यातील ५२ मंदिरांच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी या कामांसाठी हा निधी मंजूर केला असून या योजनेची अंमलबजावणी जिल्हा परिषदेच्या वतीने ग्रामपंचायत विभागाकडून करण्यात येत आहेत तालुका निहाय  कामांचा तपशील..! कणकवली : गांगो मंदिर फोंडाघाट,  (१५ लाख ),  गांगो – लिंग मंदिर, घोणसरी, (१५ लाख ), गांगेश्वर मंदिर लोरे (१० लाख ) देवगड : आरेश्वर मंदिर, आरे (२० लाख ),  हेदुलाई मंदिर,खुडी(२५ लाख), पावणाई मंदिर, किंजवडे (१० लाख). कुडाळ : भराडी मंदिर, वाडीवरवडे,  (५ लाख ),श्री स्वामी समर्थ मठ (६ लाख), सिद्ध महादेव मंदिर, केरवडे- नारुर(७ लाख ), गिरोबा मंदिर, बिबवणे (३ लाख ), सिमरा देवी मंदिर, रानबांबुळी (१५ लाख ), श्रीकृष्ण मंदिर, सोनवडे (५ लाख ),  पावणाई मंदिर, मोरे, (५ लाख ), देव कलेश्वर मंदिर, नेरूर (१० लाख), गिरोबा मंदिर, बिबवणे(५ लाख ), सातेरी मंदिर, अंजीवडे (५ लाख ),  लक्ष्मीनारायण मंदिर, आवळेगाव(५ लाख ), स्वयंभू मंदिर,पांग्रड(५ लाख), जटाशंकर मंदिर, केरवडे- नारूर(५ लाख ),  कलेश्वर मंदिर,नेरूर,  (१५ लाख ), गिरोबा  मंदिर, भडगाव बुद्रुक(१ लाख ), रामेश्वर मंदिर, आकेरी, (५ लाख ), लिंगेश्वर मंदिर, सोनवडे (५ लाख ). मालवण : मिर्लेश्वर -भगवती मंदिर, बुधवळे, (१४ लाख),लिंगेश्वर मंदिर, गुरामनगरी (६ लाख),भगवती मंदिर, देवली, (५ लाख ), गिरोबा मंदिर, नांदरुख (५ लाख ),गांगेश्वर मंदिर आडवली (५ लाख ), रामेश्वर -पावणाई मंदिर,असगणी, (४ लाख ), लिंगेश्वर मंदिर, श्रावण(४ लाख ), गांगेश्वर मंदिर, राठीवडे, (१५ लाख ) सावंतवाडी : सातेरी -माऊली मंदिर, नेतर्डे (१५ लाख ), पावणाई -रवळनाथ मंदीर पारपोली, (१० लाख)माऊली मंदिर, कवठणी,…

फेरीवाल्यांकडून ८० रुपयांवरून थेट २४० रुपये आकारल्याने संताप

फेरीवाल्यांकडून ८० रुपयांवरून थेट २४० रुपये आकारल्याने संताप भाजप नगरसेविका नीला सोन्स यांचा महानगरपालिका आणि ठेकेदारंविरुद्ध एल्गार मिरा – भाईंदर / अरविंद जोशी मीरा-भयंदर महानगरपालिका अधिकृत फेरीवाल्यांना हटवण्याचा कट रचत असल्याचा एक गंभीर प्रकरण समोर आला आहे. महानगरपालिकेने उभारलेल्या मंगलनगर आणि रामदेव पार्क येथील भाजी मार्केटमध्ये व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांपुढे मोठे संकट उभे राहिले आहे. आतापर्यंत फेरीवाल्यांकडून प्रतिदिन ८० रुपये आकारले जात होते, परंतु महानगरपालिकेने त्यात थेट १५० टक्क्यांनी वाढ करून २४० रुपये केले आहेत. या अचानक झालेल्या दरवाढीमुळे फेरीवाल्यांमध्ये मोठी चिंता आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. फेरीवाल्यांनी या निर्णयाचा निषेध करत महानगरपालिकेला एक निवेदन सादर केले होते, परंतु त्यांच्या म्हणण्यानुसार, पोलिसांनी त्यांना नोटीस दिली आहे की, जर त्यांनी २४० रुपयांनुसार रक्कम भरली नाही, तर त्यांना जागा खाली करावी लागेल. भाजप नगरसेविका नीला सोन्स या संपूर्ण प्रकरणात फेरीवाल्यांच्या समर्थनार्थ पुढे आल्या आहेत. काल, मंगलनगर भाजी मार्केटमध्ये पोहोचलेल्या फेरीवाल्यांनी त्यांना घेराव घातला आणि आपल्या समस्या मांडल्या. नीला सोन्स म्हणाल्या की, मार्केट बांधताना बांधकामाचा खर्च भागवण्यासाठी कंत्राटदाराने ८० रुपये घेणे अपेक्षित होते, पण आता अतिरिक्त वसुली केली जात आहे. त्यांनी असा आरोप केला की, गेल्या दोन वर्षांपासून घेतलेल्या रकमेची कोणतीही पावती फेरीवाल्यांना देण्यात आलेली नाही, त्यामुळे पैशांच्या हिशोबावर शंका आहे. त्या पुढे म्हणाल्या की, वसुलीतून १०० रुपये नगरपालिकेला आणि १४० रुपये कंत्राटदाराला दिले जातील. मंगलनगर मार्केटमध्ये सुमारे १८० फेरीवाले आहेत, ज्यांच्याकडून लाखो रुपये वसूल केले जातात. नीला सोन्स यांनी सुचवले की, या डिजिटल युगात नगरपालिकेने थेट ऑनलाइन वसुली करावी आणि मधला कंत्राटदार काढून टाकावा, जेणेकरून फेरीवाल्यांना दिलासा मिळेल.

काळीजादू / जादूटोणा केल्याच्या संशयातून अपहरण करणाऱ्यांना अटक

काळीजादू / जादूटोणा केल्याच्या संशयातून अपहरण करणाऱ्यांना अटक मिरा भाईंदर:- जादूटोणा केल्याच्या  गैरसमजातून  ६२ वर्षीय व्यक्तिचे अपहरण करून त्याला बेदम मारहाण करणाऱ्याना दोन जणांना नवघर पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे  भाईंदर पूर्वच्या नवघर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यात भाईंदर पूर्व परिसरात राहणाऱ्या ६२ वर्षीय सोलंकी नामक व्यक्ती यांचे पाच जणांनी आपल्या ओळखीच्या व्यक्तीवर काळी जादू केल्याच्या संशयातून त्याचे अपहरण केले होते. पोलीसांनी दिलेल्या माहितनुसार सोलंकी यांना एका चारचाकी गाडीत बसवून त्यांना गाडी मध्ये अमानुष मारहाण करण्यात आली होती. त्यांच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकत, चाकूने देखील त्यांच्या शरीरावर जखम करण्यात आली आहे. त्यानंतर त्यांना त्र्यंबकेश्वर येथे सोडून देत आरोपींनी पळ काढला होता. त्यानंतर सोलंकी यांनी ओला गाडी बुक करत भाईंदरला येत नवघर पोलिसांकडे मदती करता धाव घेत घडलेली सर्व घटना सांगितली. त्यांनतर पोलीसांनी त्यांना उपचाराकरता रुग्णालयात पाठवत अपहरण करणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल करत आरोपींचा शोध सुरू केला होता. नवघर पोलिसांनी माहितीच्या आधारे आरोपींच्या शोध घेण्यास सुरुवात केली असता  आरोपी काशिमीरा परिसरात लपल्याची गुप्त माहिती सूत्रांकडून पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार पोलीसांनी त्या ठिकाणी जात, सापळा रचत लपून बसलेल्या आरोपींना ताब्यात घेतले. पोलिसांनी एकूण चार जणांना ताब्यात घेतले असून एकाचा शोध अजून सुरू आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींपैकी दोन जण पोलीस रेकॉर्डरच्या आरोपी असून त्यांना कोर्टात हजर केल्यानंतर सोमवारपर्यंत पोलीस कस्टडी  दिलेली आहे तर  दोन जणांना नोटीस देऊन सोडण्यात आले आहे.

उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन यांची अण्णा बनसोडे यांच्या शिष्टमंडळाने घेतली सदिच्छा भेट

उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन यांची अण्णा बनसोडे यांच्या शिष्टमंडळाने घेतली सदिच्छा भेट उपराष्ट्रपती यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी चैत्यभूमी येथे येण्याचे शिष्ट मंडळाचे निमंत्रण.. मुंबई: भारताचे उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांची महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या शिष्टमंडळाने उपराष्ट्रपती भवन येथे सदिच्छा भेट घेतली. या भेटीत १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त चैत्यभूमी येथे उपस्थित राहण्याची विनंती उपराष्ट्रपतींना करण्यात आली. या विनंतीला सकारात्मक प्रतिसाद देत उपराष्ट्रपतींनी तत्काळ होकार दर्शवला. यावेळी त्यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून कार्यरत असताना चैत्यभूमीला दिलेल्या भेटींच्या आठवणींना उजाळा दिला. तसेच दादर येथे सुरू असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक कामाबाबतही त्यांनी शिष्टमंडळाकडे माहिती घेतली. स्मारकाच्या कामाला अधिक गती मिळावी यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, बोधगया संबंधित प्रश्नावरही शिष्टमंडळाने उपराष्ट्रपतींसोबत औपचारिक चर्चा केली. या प्रसंगी शिष्टमंडळाकडून उपराष्ट्रपतींना गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा भेट देण्यात आल्या. या भेटीत सुनील मगरे, सिद्धार्थ बनसोडे, नागसेन कांबळे, भदंत राहुल बोधी, बाळासाहेब करडक, आनंद चंदनशिवे, संजय अवसरमोल, शिल्पकार अनिल सुतार,सुबोध भारत, विजय अंभुरे आणि रामनाथ दवणे आदी उपस्थित होते.

घरे नाहीत, भाडेही नाही; विकासकावर होणार कारवाई – संजय केळकर

घरे नाहीत, भाडेही नाही; विकासकावर होणार कारवाई – संजय केळकर अनिल ठाणेकर ठाणे: गेली दहा वर्षे रहिवाशांना हक्काची घरे आणि नियमित भाडे देण्यास असमर्थ ठरलेल्या कोपरी येथील विकासकावर कारवाई करण्याचे एसआरए विभागाने मान्य केले आहे. आमदार संजय केळकर यांनी अधिवेशनात याबाबत प्रश्न उपस्थित केला होता तसेच एसआरए कार्यालयावर मोर्चा नेण्याचा इशारा दिला होता. यावेळी माजी उपमहापौर सुभाष काळे, अशोक भोईर, नगरसेवक दीपक जाधव, सुरेश कांबळे, राजेश गाडे, विशाल वाघ, उपस्थित होते. ठाणे पूर्वेत कोपरी येथे एसआरए प्रकल्प सुरू असून गेली दहा वर्षे येथील रहिवाशांना त्यांच्या हक्काची घरे मिळालेली नाहीत, शिवाय सुमारे पाच कोटी रुपयांचे भाडेही विकासकाने थकवले आहे. विशेष म्हणजे विकासकाने सेल इमारतीमधील घरांची विक्रीही सुरू केली असून रहिवाशांना हक्काची घरे देण्यास टाळाटाळ करत आहे. या प्रकरणी केळकर यांनी अधिवेशनात आवाज उठवला होता. अखेर चार दिवसांत विकासकावर कारवाई न झाल्यास रहिवाशांचा मोर्चा एसआरए कार्यालयावर नेण्याचा इशारा  केळकर यांनी दिला. त्यामुळे विभागाच्या सीईओंनी विकासकावर कारवाई करण्याचे मान्य केल्याची माहिती केळकर यांनी दिली. ठाण्यात बाधितांना रेंटल इमारतीत तात्पुरती घरे देण्यात आली असून या घरांची दुरवस्था झाली आहे. गेली अनेक वर्षे त्यांना बीएसयूपी योजनेत हक्काची घरे मिळालेली नसून आता रेंटल इमारतीतील घरेही खाली करण्याच्या नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. हा रहिवाशांवर अन्याय आहे. त्यामुळे किती कुटुंबे बाधित झालेली असून किती जणांना घरे मिळालेली आहेत, महापालिकेकडे किती घरे उपलब्ध असून किती जण प्रतीक्षा यादीत आहेत याचा एकत्रित आराखडा करण्याची गरज असून लवकरच याबाबत अधिकाऱ्यांची बैठक घेऊन चर्चा करणार असल्याची माहिती केळकर यांनी दिली.जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात मुंबईतील आदर्श स्टॉलधारक संघटनेचे पदाधिकारीही उपस्थित होते. ब्रिटिशकालीन हजारो स्टॉल धारकांना फेरीवाला ठरवणारा अन्यायकारक निर्णय महापालिकेने घेतला असून हजारो कुटुंबे रस्त्यावर येण्याची भीती व्यक्त होत आहे. याबाबाबत आमदार केळकर यांनी सातत्याने महापालिकेशी पाठपुरावा करून अधिवेशनातही त्यांची बाजू मांडली. येत्या गुरुवारी मुंबई महापालिकेत अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आल्याची माहितीही केळकर यांनी दिली. तसेच सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देऊनही गेली दहा वर्षे विकासकाने रहिवाशांना घरे दिली नसल्याची तक्रार रहिवाशांनी केली असून याबाबतही पाठपुरावा करणार असल्याचे केळकर म्हणाले. या कार्यक्रमात फायनान्स कंपन्यांनी केलेली फसवणूक आणि इतर अनेक समस्यांबाबत सुमारे ७०० लोकांनी उपस्थित राहून केळकर यांच्याकडे निवेदने दिली.

अनुकंपा : उमेदवारांची प्रतिक्षा यादी प्रसिध्द

अनुकंपा : उमेदवारांची प्रतिक्षा यादी प्रसिध्द निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांची माहिती अलिबाग : (अशोक गायकवाड )—जिल्हाधिकारी कार्यालयाच्या स्तरावर ठेवण्यात येणाऱ्या एकत्रित गट-क संवर्गातील सामायिक अनुकंपा प्रतिक्षा यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या उमेदवारांची प्रतिक्षा यादी (विवरणपत्र-अ) व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या स्तरावरील गट ड संवर्गाची अनुकंपा प्रतिक्षा सुचीतील नियुक्तीच्या प्रतिक्षेत असलेल्या उमेदवारांची यादी (विवरणपत्र व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर, संबंधित नियुक्ती प्राधिकारी यांच्या कार्यालयात व जिल्हा संकेतस्थळ (www.raigad.gov.in) यावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे. या यादीतील नाव व क्रमांकाबाबत उमेदवारांची कोणतीही हरकत/आक्षेप असल्यास, उमेदवारांनी संबंधित नियुक्ती प्राधिकारी यांच्यामार्फत आपले हरकत अर्ज १५ एप्रिल२०२६ पर्यत या कार्यालयाकडे सादर करावेत. १५ एप्रिल२०२६ नंतर आलेल्या आक्षेपांचा विचार केला जाणार नाही, याची नोंद घेण्यात यावी, असे निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांनी कळविले आहे.

महसुल विभागाच्या गैरकारभारा विरोधात अशोकराव टाव्हरे यांचा आंदोलनाचा इशारा

महसुल विभागाच्या गैरकारभारा विरोधात अशोकराव टाव्हरे यांचा आंदोलनाचा इशारा रमेश औताडे मुंबई  : पुणे जिल्ह्यातील खेड येथील तत्कालीन तहसीलदार यांनी एका प्रकरणी भोगावटा एक ची कार्यवाही अनाधिकाराने करूनही कारवाई नाही. महसुल विभाग ज ५ यांनी तीन पत्र एक वर्षापुर्वी देऊनही जिल्हाधिकारी पुणे  यांचा अहवाल शासनास जात नाही या व इतर विषयांबाबत प्रशासन दिरंगाई करीत असल्याने सामाजिक कार्यकर्ते, कवी-लेखक अशोकराव टाव्हरे यांनी १ एप्रिल पासून जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे व तसे निवेदन संबधितांना दिले आहे. सामाजिक क्षेत्रात कार्यरत असल्याने अनेक नागरिक समस्या घेऊन येतात.काहींना अनेक हेलपाटे मारूनही तहसील व प्रांत कार्यालय खेड दाद देत नाही.जुन्नर-आंबेगाव चे प्रांत यांच्यावर शुक्रवारी झालेली कारवाई काय अधोरेखित करीत आहे? १५५ अन्वये चुकीचे आदेश दिल्याबाबत महसुलमंत्री व जिल्हाधिकारी पुणे यांच्याकडे केलेल्या एका,तक्रारींमध्ये उपविभागीय अधिकारी,खेड यांनी जुलै २०२५ मध्ये १० दिवसात अहवाल देण्यासाठी तहसीलदार खेड यांना पत्र देऊनही अद्याप अहवाल पाठविण्यात आला नाही असे टाव्हरे यांनी निवेदनात म्हटले आहे. एका प्रकरणी अप्पर जिल्हाधिकारी पुणे यांनी उपविभागीय अधिकारी खेड यांचा आदेश नऊ वर्षापुर्वी रद्द करूनही आजतागायत अंमल नाही.अप्पर जिल्हाधिकारी व अप्पर आयुक्त यांच्या आदेशात स्पष्ट बाबी नमुद असुनही राजकीय दबावातून नोव्हेंबर २०२५ मध्ये तहसीलदार खेड यांचेकडील चौकशी पुर्ण होऊनही अर्जदारांना न्याय नाही.खेडमधील महसुल विभागातील एक मोठा अधिकारी व त्याची केबिन एजटांसाठी खुली असते.  एजंट,पुढारी आले का ते थेट अँटी चेंबरमध्ये साहेबाला न विचारता जातात व नंतर साहेबही अँटी चेंबरमध्ये जातात व खुप वेळ गोपनीय चर्चा होत असते, नागरिक मात्र वाऱ्यावर अशी स्थिती आहे असा आरोप अशोकराव टाव्हरे यांनी केला आहे.नागरिकांना न्यायासाठी न्यायालयातच जावे लागत असेल तर प्रशासन कशासाठी? उपविभागीय अधिकारी खेड कार्यालयात अनेक सामान्य नागरिकांच्या केस सुनावणी पुर्ण होऊनही निकाल पुर्ण होत नाही.दोन महिन्यापुर्वी काहींनी सांगितल्यानंतर टाव्हरे यांनी उपविभागीय अधिकारी,प्रांत खेड यांची भेट घेतली तर अपिल विभागाचे क्लार्क यांना केस नं व माहिती सांगा ,आठवड्यात होईल असे सांगितले,त्यांना अनेकदा भेटल्यानंतर माहित नाही,फाईल पाठविली अशी उत्तरे दिली जात आहेत असे टाव्हरे यांनी म्हटले आहे. जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे धरणे आंदोलन १ एप्रिलपासून करणार असल्याचे अशोकराव टाव्हरे यांनी सांगितले असून जर प्रशासनावर कोणताही अंकुश नसेल,महसुलमंत्री तीन महिन्यात आदेश झाले पाहिजे किंवा नागरिकांसाठी तातडीने जिल्हाधिकारी यांना देखी निर्देश देतात,परंतु अधिकारी गांभीर्याने घेत नाहीत ही वस्तुस्थिती असल्याचे त्यांनी विशद केले आहे.

अखिल भारतीय चेस मास्टर्स (सीझन ३) बुद्धिबळ स्पर्धा

श्रेयांश, पलाशचा विजयी फॉर्म कायम मुंबई, ३० मार्च: श्रेयांश सोमैयाने (३ गुण) सर्वोत्तम फॉर्म कायम राखताना अखिल भारतीय चेस मास्टर्स (सीझन ३) अखिल भारतीय चेस मास्टर्स (सीझन ३) बुद्धिबळ स्पर्धेमध्ये सलग तिसरा विजय नोंदवला.  पेडर रोड येथील मुंबई चेस सेंटरमध्ये सुरू असलेल्या स्पर्धेत पहिल्या बोर्डवर सोमैयाने पुन्हा एकदा काळ्या सोंगट्यांनी खेळताना अथर्व पोलेकरवर (२ गुण) मात दिली. पाचव्या बोर्डवर, पलाश मापाराने (३ गुण) काळ्या सोंगट्यांनी खेळताना प्रेयस वाघमारेचा (२ गुण) पराभव करत सलग तिसऱ्या विजयाची नोंद केली. एएफएम सोहम पवारने (३ गुण) देखील अनिश एस कश्यपचा (२ गुण) पराभव करत तिसरा गुण मिळवला. निकाल – दुसरी फेरी (टॉप-10): अथर्व पोळेकर (2) पराभूत वि. श्रेयांश सोमय्या(3) – 0-1;तनुज, दयाल (2.5) बरोबरी वि. एआयएम आकाशकुमार यादव (2.5) – 0.5-0.5; दीपक सोनी (2) पराभूत वि. आश्वी अंकित अग्रवाल (3)- 0-1; एएफएम सोहम पवार (3) विजयी वि. अनिश एस कश्यप (2) – 1-0; प्रेयस वाघमारे (2) पराभूत वि. पलाश मापारा (3)- 0-1; तिस्या अपूर्वा पट्ट (2) पराभूत वि. प्रतीक यादनिक (3)- 0-1; ईशान जथान (2) पराभूत वि. एजीएम राजवीर नहार (3)– 0-1; मेहुल तांडेल (२) पराभूत वि. अनिरुद्ध आनंद अय्यर(३) – ०-१; अहान कातरुका (3) विजयी वि. अभिजय बरुआ (2) – 1-0; पंकज बोरसे (2.5) बरोबरी एएफएम ओंकार विश्वास गायकवाड (2.5) – 0.5-0.5. 00000000

३ एप्रिलला भोंदूगिरीचा बुरखा फाडणार

नाशिकमध्ये ‘अंनिस’ची राज्यस्तरीय बुवाबाजी विरोधी संघर्ष परिषद ३ एप्रिलला भोंदूगिरीचा बुरखा फाडणार हरिभाऊ लाखे नाशिक: महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय संघर्ष परिषदेत भोंदूगिरी आणि फलज्योतिषाच्या दुष्परिणामांवर मंथन होणार आहे(छायाचित्र – AI Generated) महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने राज्यस्तरीय फलज्योतिष आणि बुवाबाजी विरोधी संघर्ष परिषद ३ एप्रिल, सकाळी १० वाजता येथील खुटवड नगरातील सीटु भवनात आयोजित करण्यात आल्याची माहिती राज्य कार्याध्यक्ष संजय बनसोडे आणि राज्य प्रधान सचिव डाॅ. ठकसेन गोराणे यांनी दिली आहे. परिषदेचे उद्घाटन खासदार वर्षा गायकवाड यांच्या हस्ते होणार आहे. परिषदेत प्राचार्य डॉ. नितीन शिंदे, सेवानिवृत्त पोलीस उपायुक्त बाबासाहेब बुधवंत, मानसोपचार तज्ज्ञ डॉ. जयंत ढाके, डी. एल. कराड, ॲड. रंजना गवांदे, दादा चांदणे, महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे राज्य अध्यक्ष माधव बावगे, राज्य कार्याध्यक्ष संजय बनसोडे मार्गदर्शन करणार आहेत. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने ३६ वर्षात हजारो बुवाबाबांचे काळे कृत्य उघडकीस आणले आहे. संघटनेच्या प्रयत्नामुळेच जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत काही भोंदूंना शिक्षा झाली आहे. यामध्ये वेगवेगळ्या जाती-धर्माचे भोंदू आहेत. भोंदूगिरी कशी चालते, राज्यात कोणत्या भागात भोंदू सक्रिय आहेत, यासह वेगवेगळ्या पैलुंवर राज्यस्तरीय परिषदेत चर्चा करण्यात येणार आहे. परिषदेच्या समारोपप्रसंगी लोकप्रबोधनार्थ शहरातून फेरी काढण्यात येणार आहे. वाजी रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादनानंतर परिषदेचा समारोप ज्येष्ठ साहित्यिक तथा महाराष्ट्र अंनिसचे राज्य उपाध्यक्ष उत्तम कांबळे यांच्या भाषणाने होईल. परिषदेचे नियोजन डॉ. ठकसेन गोराणे ,विनायक सावळे, कृष्णा चांदगुडे, प्रा. आशा लांडगे, अरुण घोडेराव,सुरेश बोरसे, राजेंद्र फेगडे आदी करीत आहेत. परिषदेसाठी राज्यभरातून तीनशेहून अधिक प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

रुग्णवाहिका एकाच जाग्यावर दीड तास बंद , रुग्णाच्या जीविताशी खेळ

रुग्णवाहिका एकाच जाग्यावर दीड तास बंद , रुग्णाच्या जीविताशी खेळ पालघर विभागात १०८ रुग्णवाहिन्यांबाबत गंभीर तक्रारी योगेश चांदेकर पालघरः राज्यातील आपत्कालीन आरोग्यसेवेचा कणा मानल्या जाणाऱ्या १०८ रुग्णवाहिका सेवांची अवस्था सध्या अत्यंत वाईट आहे. जिल्ह्यात सध्या १०८ च्या २९ रुग्णवाहिका कार्यरत असल्याचे सांगितले जात असले तरी त्या रुग्णवाहिकांची स्थिती अतीशय दयनीय आहे त्यामुळे अनेक रुग्णवाहिका तांत्रिक बिघाडामुळे मध्येच बंद पडतात. त्यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत डहाणू तालुक्यातील वरोर येथे अशीच एक रुग्णवाहिका क्रमांक MH१४ CL.०६८४ रस्त्यात दीड तास बंद पडली होती; परंतु पर्यायी व्यवस्था वेळेत न केल्याने रुग्णाचे हाल झाले. राज्यात ग्रामीण तसेच दुर्गम भागात आणि महामार्गावर रुग्णाला तातडीने उपचार मिळावेत, यासाठी राज्य सरकारने १०८ सेवा सुरू केली. ग्रामीण व दुर्गम भागामध्ये ही सेवा हीच जीवनरेषा मानली जाते; परंतु गेल्या अनेक वर्षापासून १०८ रुग्णसेवेबाबत अतिशय गंभीर स्वरूपाच्या तक्रारी येत आहेत. तांत्रिक बिघाडामुळे या रुग्णवाहिका कुठेही बंद पडतात. काही वाहनांची देखभाल वेळेवर न झाल्याने त्या बंद अवस्थेत आहेत, तर काही वापरण्यास अयोग्य ठरत आहेत. त्यामुळे रुग्णांना तातडीने रुग्णवाहिका उपलब्ध होत नाहीत. जिल्ह्याच्या ठिकाणी रक्त आणि ऑक्सिजन का नाही? पालघर हे जिल्ह्याचे ठिकाण असून या ठिकाणी सर्व आरोग्य सुविधा उपलब्ध व्हायला हव्यात. राज्य आणि केंद्र सरकार आदिवासी विभागातील रुग्णसेवेसाठी हजारो कोटी रुपये खर्च केल्याचा दावा करीत असले, तरी प्रत्यक्षात मात्र आदिवासी विभागातील रुग्णसेवेकडे फारसे गांभीर्याने पाहिले जात नाही. गेल्या आठवड्यातच याबाबत उच्च न्यायालयाने ताशेरे ओढले होते, तर भाजपच्या आमदार चित्रा वाघ यांनी विधान परिषदेत पालघर जिल्ह्यातील रुग्णसेवेचा पंचनामा केला होता. या पार्श्वभूमीवर आज पालघर येथे अनुसया मंगल्या भोईर यांना तातडीने रक्ताची तसेच ऑक्सिजनची गरज होती; परंतु पालघर येथे या सुविधा उपलब्ध होऊ न शकल्याने या महिलेला डहाणू येथे पाठवण्यात आले. जिल्ह्याच्या ठिकाणी रक्त आणि ऑक्सिजन का उपलब्ध होऊ शकला नाही, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत असून, जिल्ह्याच्या ठिकाणाहून तालुक्याच्या ठिकाणी रुग्णालयाला रेफर करण्याचा अजब प्रकार पालघरमध्ये झाला. रुग्णवाहिकेसोबत डॉक्टरही नाही रक्त आणि ऑक्सिजन पालघरला उपलब्ध न झाल्याने १०८ रुग्णसेवेच्या रुग्णवाहिकेतून या वयोवृद्ध महिलेला डहाणूला पाठवण्यात आले; परंतु पालघरपासून काही अंतरावर गेल्यानंतर मध्येच ही रुग्णवाहिका बंद पडली. ती सुरू करण्याचा प्रयत्न करूनही त्यात अपयश आले. पर्यायी रुग्णवाहिकेची मागणी करूनही ती दीड तासापर्यंत उपलब्ध होऊ शकली नव्हती. रक्त आणि ऑक्सिजनची तातडीची गरज असतानाही या महिलेला उपचारासाठी तसेच थांबून राहावे लागले. विशेष म्हणजे तातडीच्या आणि गुंतागुंतीच्या वेळी अशा रुग्णवाहिकेसोबत डॉक्टर देणे आवश्यक असतानाही या रुग्ण महिलेसोबत डॉक्टर दिलेला नव्हता. त्यामुळे पालघरचा आरोग्य विभाग किती निष्क्रिय आहे आणि किती बेपर्वाईने काम करतो हे यातून दिसून आले. आरोग्य विभागाकडून हेळसांड रुग्णवाहिका चालकाने पर्यायी रुग्णसेवेसाठी प्रयत्न केला; परंतु त्यालाही फारसा प्रतिसाद मिळाला नाही. पालघर जिल्ह्यातील आरोग्यव्यस्थेची स्थिती अधिकच चिंताजनक झाली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रे, ग्रामीण रुग्णालय आदीमध्ये डॉक्टरांची कमतरता असते. वेळेवर ‘ऑन कॉल’ डॉक्टर उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे एका गर्भवती महिलेला उपचारासाठी कसे दोन-तीन तास फिरावे लागले आणि शेवटी खासगी रुग्णालयाचा आधार घ्यावा लागला, हे गेल्याच महिन्यात उघडकीस आले होते. त्यानंतर जिल्हा शल्य चिकित्सकांनी या प्रकरणी चौकशी करून त्याचा अहवाल आरोग्य उपसंचालकाकडे पाठवला असला, तरी अद्याप त्यावर कार्यवाही झाली नसताना आता पुन्हा रुग्णसेवेच्या हेळसांडीचा प्रकार उघडकीस आला आहे. मुले, महिला, वयोवृद्धांना फटका आदिवासी, दुर्गम भागामध्ये रुग्णसेवा तातडीने पोहोचणे आवश्यक आहे; परंतु अशाच भागामध्ये रुग्णवाहिका वेळेत पोहोचत नसल्याने गंभीर रुग्णांना जीव गमावा लागण्याच्या घटना वारंवार घडल्या आहेत. विशेषतः गर्भवती महिला, वृद्ध नागरिक आणि लहान मुलांना या परिस्थितीचा सर्वाधिक फटका बसला आहे. स्थानिक नागरिकांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी याबाबत प्रशासनाकडे वारंवार तक्रारी केल्या असल्या, तरी त्यावर अद्याप ठोस उपाययोजना झालेली नाही. आरोग्य विभागाने तातडीने रुग्णवाहिकाची दुरुस्ती, आरोग्य विभागात पुरेसे मनुष्यबळ आणि आरोग्य केंद्राची उभारणी करण्याची आवश्यकता आहे. आ. वाघ यांनी विधान परिषदेत उपस्थित केलेल्या पालघर जिल्ह्यातील  डहाणू व अन्य ठिकाणच्या आरोग्य संदर्भातील तक्रारीची आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी गांभीर्याने दखल घेतली असल्याचे सांगितले असले, तरी प्रत्यक्षात मात्र अजून आरोग्य विभाग पुरेसा हललेला दिसत नाही, हे आजच्या घटनेवरून स्पष्ट झाले आहे. १०८ रुग्णवाहिका बंद पडल्यामुळे महिलेला एक ते दीड तास उपचारा अभावी ताटकळत रहावे लागले ही बाब गंभीर आहे याबाबत योग्य ती कार्यवाही केली जाईल. रुग्णवाहिकेमधील महिलेवर योग्य उपचार करावे याबाबत डहाणू उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी यांना सूचना केल्या आहेत. १०८ रुग्णवाहिकेच्या दयनीय अवस्थेबाबत वारंवार तक्रारी प्राप्त होत आहेत वरीष्ठ कार्यालयाला अनेकदा अहवालही पाठवले आहेत डॉ.रामदास मराड, जिल्हाशल्य चिकित्सक पालघर