Category: ट्रेंडिंग न्यूज

trendlyne-news

 चिमुकलीच्या डोळ्यांत फुलला आशेचा नवा प्रकाश!

ठाणे सिव्हिल रुग्णालयाची कौतुकास्पद कामगिरी अनिल ठाणेकर ठाणे : एखाद्या चिमुकलीच्या डोळ्यांत पुन्हा प्रकाश फुलणे, यापेक्षा मोठे समाधान डॉक्टरांसाठी दुसरे कोणते असू शकत नाही. जन्मापासूनच जग धूसर पाहणाऱ्या सात वर्षीय मुलीच्या आयुष्यात ठाणे जिल्हा शासकीय (सिव्हिल) रुग्णालयाने आशेचा नवा किरण आणला असून, यशस्वी शस्त्रक्रियेमुळे आता तिला दोन्ही डोळ्यांनी स्पष्ट दिसू लागले आहे. मुरबाड येथील छोट्या मुलीला जन्मजात दोन्ही डोळ्यांना मोतीबिंदू होता. त्यामुळे तिचे बालपण इतर मुलांपेक्षा वेगळे ठरत होते. गेल्या वर्षी तिच्या एका डोळ्यावरील मोतीबिंदूची शस्त्रक्रिया यशस्वी झाली होती. त्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार आणि अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धीरज महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली दुसऱ्या डोळ्याचीही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करण्यात आली. या शस्त्रक्रियेत उच्च दर्जाच्या कृत्रिम लेन्स बसविण्यात आली असून या मुलीला आता दोन्ही डोळ्यांनी स्पष्ट दिसत असल्याची माहिती नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. शुभांगी अंबाडेकर यांनी दिली. जन्मजात मोतीबिंदू असलेल्या लहान मुलावर शस्त्रक्रिया करणे हे वैद्यकीयदृष्ट्या मोठे आव्हान असते. मात्र ठाणे सिव्हिल रुग्णालयातील डॉक्टरांच्या कौशल्यामुळे मुलीच्या आयुष्यातील अंधार दूर झाला. सर्वसामान्य कुटुंबातील या चिमुकलीला नव्या दृष्टीसह उज्ज्वल भविष्याची आशा मिळाली आहे. या शस्त्रक्रियेसाठी नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. शुभांगी अंबाडेकर, भूलतज्ज्ञ डॉ. प्रियांका महांगडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. चौकट जन्मजात मोतीबिंदूचे वेळेत निदान आणि उपचार झाल्यास मुलांची दृष्टी वाचू शकते. लहान मुलाला नीट दिसत नसल्याचा संशय आल्यास, डोळ्यात पांढरेपणा दिसल्यास किंवा प्रकाशाकडे प्रतिसाद कमी असल्यास कोणताही विलंब न करता नेत्रतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. – डॉ. कैलास पवार (जिल्हा शल्य चिकित्सक ठाणे)

महावितरणचे शनिवारी ७२ ग्राहक मेळावे

स्मार्ट मीटरमुळे बिल वाढल्याची तक्रार? हरिभाऊ लाखे नाशिक : राज्यात महावितरणकडून बसविल्या जाणाऱ्या स्मार्ट मीटरवरून मोठे वादळ उठले आहे. हे मीटर बसवल्यानंतर देयकांत वाढ झाली, बळजबरीने ते बसविले जात असल्याच्या तक्रारी होत आहेत. त्या विरोधात आंदोलने होत असून स्मार्ट मीटर काढून जुने मीटर बसविण्याचा आग्रह धरला जात आहे. स्मार्ट मीटरमुळे निर्माण झालेला संभ्रम आणि संशय दूर करण्यासाठी आता खुद्द महावितरणने पुढाकार घेतला आहे. स्मार्ट मीटरविरोधात नाराजी वाढत असल्याने नाशिक मंडळातील २८, मालेगाव मंडळातील १५ आणि अहिल्यानगर मंडळातील २९ अशा महावितरणच्या एकूण ७२ उपविभागीय कार्यालयांमध्ये शनिवारी सकाळी ११ ते सायंकाळी ४ या वेळेत ग्राहक संवाद मेळावा पार पडणार आहे. मेळाव्यांना संबंधित महावितरणचे कार्यकारी अभियंते, अतिरिक्त कार्यकारी अभियंते, उपकार्यकारी अभियंते व अधिकारी उपस्थित राहून ग्राहकांच्या शंकांचे निरसन करतील. तसेच स्मार्ट मीटरसंदर्भात असलेल्या शंकांची व वीज देयकांबाबतच्या तक्रारींची तपासणी करून त्यांचे निराकरण करण्यात येणार आहे. यावेळी स्मार्ट मीटरचे फायदे, वैशिष्ट्ये, कार्यपद्धती आणि अचूकतेविषयी माहिती देण्यात येणार आहे. स्मार्ट मीटरच्या अचूकतेबाबत किंवा कुठल्याही कारणाने आलेल्या वाढीव वीज देयकांबाबतच्या तक्रारींचे महावितरणकडून प्राधान्याने निराकरण करण्यात येणार आहे. परिमंडळात पावणे आठ लाख स्मार्ट (टीओडी) मीटर नाशिक परिमंडळात आतापर्यंत एकूण ७ लाख ६५ हजार ७०९ सर्व वर्गवारीच्या वीज ग्राहकांकडे स्मार्ट (टीओडी) मीटर बसविण्यात आले आहेत. यामध्ये नाशिक मंडळात ३ लाख ३८ हजार ८५५, मालेगाव मंडळात १ लाख १५ हजार ३७३ आणि अहिल्यानगर मंडळात ३ लाख ११ हजार ४८१ मीटरचा समावेश आहे. स्मार्ट मीटरचे फायदे व माहिती जाणून घेतल्यानंतर नाशिक परिमंडळातील मोठ्या प्रमाणात वीज ग्राहकांनी स्वेच्छेने स्मार्ट मीटर बसविण्यासाठी प्रतिसाद दिल्याचा दावा महावितरणने केला आहे. औद्योगिक ग्राहकांना साकडे? स्मार्ट (टीओडी) मीटर हे पूर्णतः अचूक असून सामान्य वीज ग्राहकांसाठी फायदेशीर असल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे. दिवसा वीज वापरावर प्रति युनिट ८५ पैशांची सवलत मिळविण्यासाठी स्मार्ट टीओडी मीटर उपयुक्त ठरले आहेत. औद्योगिक ग्राहकांकडे अनेक वर्षांपासून अशा प्रकारचे मीटर वापरात असल्याने वीज ग्राहकांनी मेळाव्यांना उपस्थित राहून वस्तुस्थिती जाणून घ्यावी, असे आवाहन नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता सुंदर लटपटे यांनी केले आहे. 000000000

मुसळधार पावसात महापालिकेची आपत्कालीन मदत यंत्रणा फिल्डवर

नवी मुंबई : नवी मुंबईत १ जुलैपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असून ५ जुलैपासून अवघ्या पाच दिवसांत ७५२.२५ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. ताशी ६० ते ७०…

 राज्य कबड्डी संघटनेचे कबड्डी दिन पुरस्कार जाहीर

 दिनकर पाटील, शंकुतला खटावकर यांना जीवन गौरव मंगेश वरवडेकर यांना क्रीडा पत्रकार पुरस्कार मुंबई : मैदानावर कबड्डीपटूंवर अन्याय होताच आपल्या लेखणीला धार देणारे, खेळाडूंचा आवाज दाबताच व्यवस्थेला जाब विचारणारे आणि कबड्डीपटूंच्या हक्कासाठी प्रसंगी व्यवस्थेशी दोन हात करणारे आणि कबड्डीतील अन्यायाविरुद्धचा संताप आपल्या बातम्यांमधून सातत्याने मांडणारे दै. ‘सामना’चे क्रीडा पत्रकार मंगेश वरवडेकर यांच्या लढाऊ पत्रकारितेचा महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेने गौरव केला आहे. संघटनेने आपल्या २६ व्या कबड्डी दिनाचे औचित्य साधत त्यांना ज्येष्ठ पत्रकार पुरस्कार जाहीर केला असून त्याचबरोबर आपल्या विविध पुरस्कारांचीही घोषणा केली. तसेच कबड्डीसाठी आयुष्य झिजवणारे दिनकर पाटील (सांगली) आणि शकुंतला खटावकर (पुणे) यांना प्रतिष्ठेच्या कबड्डी जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. ज्येष्ठ खेळाडू, पंच, प्रशिक्षक, कार्यकर्ते, पत्रकार आणि गुणवंत कबड्डीपटूंवर यंदा पुरस्कारांचा अक्षरशः वर्षाव करण्यात आला आहे. येत्या १५ जुलै रोजी दुपारी ३ वाजता रत्नागिरीतील स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात रत्नागिरी जिल्हा कबड्डी संघटनेच्या वतीने हा दिमाखदार पुरस्कार वितरण सोहळा होणार असल्याची माहिती राज्य कबड्डी संघटनेने पत्रकाद्वारे दिली आहे. कबड्डी दिन पुरस्कार विजेते कबड्डी महर्षी शंकरराव (बुवा) साळवी कबड्डी जीवन गौरव पुरस्कार  : दिनकर पाटील (सांगली), शकुंतला खटावकर (पुणे). ज्येष्ठ पत्रकार : मंगेश वरवडेकर (दै. सामना), अलताफ कडकाले (दै. सकाळ) ज्येष्ठ कार्यकर्ते पुरस्कार : आत्माराम घेगडे, बंडूकांबळे, भरत मुळे, गिरीश नाईक, डॉ. दत्तात्रय शिंपी, वल्केश राऊत, खंडबाराव नाईक, प्रकाश पाटील, सय्यद अजगर अली पटेल, विलास सावंत. ज्येष्ठ पंच पुरस्कार : प्रकाश मोरे, रविंद्र लाड, अरुण पवार, अनिल शेजवळ, सूर्यकांत मुटके, वाल्मिक बागुल,मधुकर साळुंखे, हिरामण भोईर, बाळकृष्ण कडूस, रामदास गोळे. ज्येष्ठ खेळाडू पुरस्कार : सुरेश मोरे, शशिकांत कोरगांवकर, रवींद्र लवेकर,तुळसीदास रोकडे,ब्रह्मनाथ मेंगडे, सुदाम जोगदंड, अलका कारखानीस, मदन गायकवाड, रमेश देवाडीकर स्मृती श्रमयोगी कार्यकर्ता पुरस्कार- दीपक कांदळगांवकर (उपनगर), डॉ. शिवशंकर कापसे (हिंगोली), अरुणा गावडे (कोल्हापूर) कृतज्ञता पुरस्कार- निवृत्ती देसाई, सोपान काकडे, सदानंद जोशी, अभिजित राणे. फिदा कुरेशी स्मरणार्थ ज्येष्ठ प्रशिक्षक- नारायण गायकवाड (ठाणे),सुहास कदम (मुंबई उपनगर) किशोर व कुमार गट शिष्यवृत्ती विजेते किशोर गट : सुरज राठोड (रत्नागिरी), प्रशांत अकीगे (कोल्हापूर), ध्रुव डोंगरे (पालघर). किशोरी गट : आरती खांडेकर (पुणे), सेजल काकडे (नाशिक), ज्ञानेश्वरी ढवण (अहिल्यानगर), कुमार गट : शुभम बिटके (पुणे), जीतसिंग सैनी (ठाणे), अतुल जाधव (परभणी). कुमारी गट : संजना भोईर (पालघर), वैभवी जाधव (पुणे), सानिका पाटील(सांगली).…

शालेय स्पर्धेत विजेतेपदाची हॅटट्रिक

दिल्लीत महाराष्ट्राचा डंका करंडक आयुक्त दीपक सिंगला यांच्याकडे सुपूर्त पुणे :  भारतीय शालेय स्पर्धा महासंघाच्या शालेय क्रीडा स्पर्धेत सलग तिसऱ्यांदा सर्वसाधारण विजेतेपदाची हॅटट्रिकचा पराक्रम महाराष्ट्राने केला आहे. विजेतेपदकाचा करंडक क्रीडा व युवक कल्याण विभागाच्या आयुक्त दीपक सिंगला यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला आहे. नुकत्याच दिल्लीत संपन्न झालेल्या भारतीय शालेय स्पर्धा महासंघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत महाराष्ट्राला विजेतेपदाच्या करंडकाने गौरविण्यात आले. शालेय खेळ महासंघाचे अध्यक्ष दिपक कुमार यांच्या हस्ते उपसंचालक संजय सबनीस, उपसंचालक उदय जोशी, सहाय्यक संचालक चंद्रशेखर साखरे व  क्रीडा अधिकारी अरुण पाटील यांनी राज्याचा वतीने विजेतेपदाचा करंडक स्वीकारला. याप्रसंगी देशभरातील राज्य प्रतिनिधी उपस्थित होते. याबरोबरच महाराष्ट्र राज्याने शालेय आशियाई व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी भारतीय संघाच्या निवड चाचणीचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल ही राज्याचा गौरव करण्यात आला गतविजेत्या महाराष्ट्राने अपेक्षेप्रमाणे सर्वोत्तम कामगिरी करीत ६९ व्या राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेतही  महाराष्ट्राने सर्वसाधारण विजेतेपदाचा पराक्रम केला आहे. १८७ सुवर्ण, १६९ रौप्य, १९०कांस्य अशी एकूण ५४६ पदकांची लयलूट करीत  महाराष्ट्राने अव्वल स्थानाचे शिखर सर केले आहे. पुण्यातील शिवछत्रपती क्रीडा संकुलात विजेतेपदकाचा करंडक क्रीडा व युवक सेवा संचलनालय आयुक्त दीपक सिंगला यांच्याकडे सहसंचालक सुधीर मोरे, उपसंचालक उदय जोशी यांनी सूपूर्त केला आहे. यावेळी उपसंचालक संजय सबनीस, क्रीडा अधिकारी अरुण पाटील उपस्थित होते. महाराष्ट्राच्या खेळाडूंचे अभिनंदन करून आयुक्त दिपक सिंगला म्हणाले की, वरिष्ठ, युवा गटाप्रमाणेच शालेय स्पर्धेतही महाराष्ट अव्वल आहे. या यशाचे खेळाडूंसह त्यांचे प्रशिक्षक, पालक, संघटक या सर्वांनीच कौतुकास्पद कामगिरी केली आहे. ही परंपरा कायम राखण्यासाठी खेळाडूंच्या पाठी शासन खंबीरपणे उभे असेल. हरियाणा ,दिल्ली या बलाढ्य संघांना मागे टाकून महाराष्टाने सलग दुसऱ्या वर्षी विजेतेपदाला गवसणी घातली आहे.  हरियाणाने १२१ सुवर्ण,  ९६ रौप्य, ९६ कांस्य पदकांसह एकूण ३१३ पदके जिंकून दुसरे स्थान प्राप्त केले. दिल्लीचा संघ  १०७ सुवर्ण,  ११६ रौप्य, ९४ कांस्य पदकांसह एकूण ३१७ पदके जिंकून तिसर्या स्थानावर राहिला. स्पर्धेत महाराष्ट्राचे २५२८ क्रीडापटू सहभागी झाले होते. ४२ खेळातील १५५ क्रीडा प्रकारात महाराष्ट्राच्या खेळाडूंच्या यशाचा डंका देशभरात वाजला आहे. शालेय गट, १८ वर्षांखालील युवा गट व वरिष्ठ गटात  विजेतेपदाची हॅटट्रिक महराष्ट्राने केली आहे. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा,खेलो इंडिया युवा स्पर्धा प्रमाणेच राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेतील पदकविजेत्यांना क्रीडा व युवक सेवा संचलनालकडून रोख बक्षिस देण्याची परंपरा आहे. सुवर्ण, रौप्य व कांस्य पदक विजेत्यांना अनुक्रमे रू.११२५०, रू.८९५०, रू.६७५० तसेच सहभागी खेळाडूंनाही रू. ३७५० रूपयांचे रोख शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येत आहे.

वेंगसरकर क्रिकेट अकादमीच्या आरुष कोल्हेची इंग्लडमध्ये चमक

मुंबई : दिलीप वेंगसरकर क्रिकेट अकादमीचा १५ वर्षीय आयुष्य कोल्हे याने यंदाच्या इंग्लंड दौऱ्यात आपल्या अष्टपैलू कामगिरीने छाप पडली आहे. इंग्लंडमधील लीड्स येथील डॉक्टर समीर  पाठक जे तेथील क्रिकेट बियॉंड  बाऊंड्रीज या…

पीटीकेएसची दमदार कामगिरी; १९ पदकांची कमाई

पुण्यातील ३ऱ्या ऑस्ट्रेलियन लेव्हल-वाइज जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत पुणे : पुण्यातील इन्फिनिटी जिम्नॅस्टिक एलएलपी येथे आयोजित करण्यात आलेल्या तिसऱ्या ऑस्ट्रेलियन लेव्हल-वाइज जिम्नॅस्टिक्स आमंत्रित स्पर्धेत पीटीकेएस (PTKS)च्या जिम्नॅस्ट्सनी उत्कृष्ट कौशल्य, शिस्त आणि सातत्यपूर्ण…

शिळगाव स्मशानभूमीतील पाणी तुंबण्याच्या समस्येची नगरसेविका वेदिका पाटील यांनी केली पाहणी

दिवा : मुसळधार पावसामुळे शिळगाव स्मशानभूमी परिसरात निर्माण झालेल्या पाणी तुंबण्याच्या समस्येची नगरसेविका वेदिका साहिल पाटील यांनी ठाणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसमवेत प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावर तुंबलेल्या पाण्यामुळे नागरिकांना…

लुईसवाडी एसआरए प्रकल्पावरील सर्व आरोप फेटाळले

तीन वर्षांत लाभार्थ्यांना हक्काची घरे देण्याचा दावा ठाणे : अजिंक्य महाराष्ट्र सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या प्लॉट क्रमांक ६७ वरील एसआरए पुनर्विकास प्रकल्पाविरोधात करण्यात येणारे सर्व आरोप निराधार असून, विरोधकांकडून जाणीवपूर्वक दिशाभूल करणारी माहिती पसरवली जात असल्याचा आरोप संस्थेचे सल्लागार अशोक वैती यांनी केला. प्रकल्पात लाभार्थ्यांवर कोणताही अन्याय होणार नसल्याची ग्वाही देत सामाजिक बांधिलकी जपत शाळा आणि धार्मिक स्थळाची मोफत उभारणी करण्यात येणार असल्याचाही दावा त्यांनी केला. या पत्रकार परिषदेला विकासक फैजल अन्सारी, मुख्य प्रवर्तक दत्ता कदम व सहपरिवर्तक उपस्थित होते. ठाण्याच्या लुईसवाडी, काजुवाडी येथील अजिंक्य महाराष्ट्र सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या प्लॉट क्रमांक ६७ मधील झोपडपट्टी पुनर्विकास (एसआरए) प्रकल्पाबाबत सुरू असलेल्या विविध आरोप-प्रत्यारोप आणि संभ्रमाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी काजूवाडी येथील आदिती डेव्हलपर्स कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन संस्थेचे सल्लागार अशोक वैती यांनी वस्तुस्थिती स्पष्ट केली. या झोपडपट्टी पुनर्विकास (एसआरए) प्रकल्पात १७१ पात्र झोपडीधारक आणि एक मंदिर असे एकूण १७२ लाभार्थी आहेत. साऊथ फिल्ड रिॲल्टी एलएलपी या विकासकाची नियुक्ती प्रचलित सहकार कायदा आणि एसआरएच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार सर्वसहमतीने करण्यात आली आहे. सर्व पात्र लाभार्थ्यांना ११ महिन्यांचे आगाऊ भाडे अदा करण्यात आले असून, उर्वरित भाड्याचे धनादेश एसआरए प्राधिकरणाकडे जमा करण्यात आले आहेत. त्यामुळे भाड्याबाबत विकासका विरोधात कोणतीही तक्रार नसल्याचा दावा अशोक वैती यांनी केला. दरम्यान, आगाऊ भाडे स्वीकारल्यानंतरही येथील २६ झोपडीधारकांनी घरे रिकामी केली नव्हती. त्यामुळे त्यांच्याविरोधात एसआरएच्या कलम ३३/३८ अंतर्गत नियमानुसार कारवाई करण्यात आली. संबंधितांना योग्य सुनावणीची संधी देण्यात आली होती. या प्रक्रियेमुळे तब्बल सहा महिन्यांचा विलंब झाला, असेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र, या आदेशाविरोधात विरोधक प्रफुल्ल पांडुरंग कदम यांनी कोणतेही अपील दाखल केलेले नसुन स्थगिती आदेशही (स्टे)  मिळवलेला नाही. तरीही कदम यांनी पत्रकार परिषद घेऊन केलेले आरोप हे त्यांचे वैयक्तिक मत आहे, त्याचा अजिंक्य महाराष्ट्र सहकारी गृहनिर्माण संस्थेशी कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट करून अशोक वैती यांनी, “धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या आशीर्वादाने आणि आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प आम्ही यशस्वीपणे पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. ज्या प्रकल्पावर शिंदे साहेब स्वतः लक्ष ठेवणार आहेत, त्या ठिकाणी कुणावरही अन्याय होणार नाही, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. तर, पावसाळी अधिवेशनात विधिमंडळाच्या पटलावर एसआरए प्रकल्पांबाबत उपस्थित झालेल्या मुद्द्यांचा संदर्भ देत वैती म्हणाले की, काही प्रकल्पांमध्ये अनियमिततेच्या तक्रारी असू शकतात; मात्र अजिंक्य महाराष्ट्र सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या लाभार्थ्यांवर कोणताही अन्याय झालेला नाही. तरीही दिशाभूल करणारे आणि प्रतिष्ठेला धक्का पोहोचवणारे आरोप केल्यास संबंधितांविरोधात प्रशासकीय कार्यवाही तसेच कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही अशोक वैती यांना पत्रकार परिषदेत दिला. यावेळी संस्थेचे सहप्रवर्तक सिताराम कांबळे यांनीदेखील विकासकाविरोधात संस्थेची आणि रहिवाश्यांची कोणतीही तक्रार नसल्याचे स्पष्ट केले. Box : एसआरए प्रकल्पाचे बुधवारी भूमिपूजन अजिंक्य महाराष्ट्र सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या ह्या प्रकल्पाचे भूमिपूजन बुधवारी ८ जुलै रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत होत असुन या प्रकल्पात सामाजिक बांधिलकी जपण्यात येत असल्याचे अशोक वैती यांनी सांगितले. तसेच, पुनर्वसनासोबतच इथे भव्य मंदिर व दहावीपर्यंतची शाळा मोफत उभारण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे येथील उद्यानाची व्याप्तीही वाढविण्यात येणार असून प्रकल्प तीन वर्षांत पूर्ण करून सर्व लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काचे घरकुल देण्याचा प्रयत्न असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

१६२ कोटींना कंपनीची जागा विकून कंपनीला प्रचंड नफा , मात्र २४ कामगारांच्या मृत्यूनंतरही २४ कोटींची देणी मिळेनात!

अनिल ठाणेकर ठाणे, ठाणे येथील ‘विंडसर मशिन्स लिमिटेड’ कंपनीच्या ९९ कामगारांची गेल्या २५ वर्षांपासून रखडलेली २४ कोटी रुपयांची थकबाकी आणि हक्काच्या पैशांची वाट पाहता-पाहता २४ कामगारांनी गमावलेला जीव, हा अतिशय गंभीर मुद्दा आज महाराष्ट्र विधान परिषदेत मांडला गेला. भाजपचे विधान परिषदेचे आमदार व माजी मंत्री  प्रमोद जठार यांनी ‘पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन’च्या माध्यमातून या अन्यायग्रस्त कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी सभागृहाचे आणि शासनाचे लक्ष वेधले. या प्रकरणाची गंभीर दखल घेत राज्याचे कामगारमंत्री आकाश फुंडकर यांनी कारवाई करण्याचे आश्वासन सभागृहात दिले. हिंदु जनजागृती समितीच्या ‘सुराज्य अभियाना’च्या वतीने या ९९ कामगारांवरील अन्यायाचा विषय आमदार  प्रमोद जठार, तसेच कामगारमंत्री आणि कामगार सचिव यांच्या निदर्शनास आणून देण्यात आला होता. सुराज्य अभियान याचा पाठपुरावा करत आहे. हा मुद्दा सभागृहात मांडताना आमदार जठार यांनी कंपनीकडून झालेल्या अन्यायी कारभाराचा पाढा वाचला. वर्ष २००० ते २०२६ या २५ वर्षांच्या काळात कंपनीने ९९ कामगारांना त्यांच्या पगार, ग्रॅच्युइटी आणि बोनस अशा नऊ वेगवेगळ्या घटकांच्या न्याय्य रकमेपासून वंचित ठेवले आहे. कंपनीने ठाण्यातील आपली मालमत्ता १६२ कोटी रुपयांना विकून प्रचंड नफा कमावला; मात्र ज्यांच्या कष्टावर कंपनी उभी राहिली, त्या वयोवृद्ध आणि आजारी कामगारांना केवळ ४.५ कोटी रुपयांची नाममात्र रक्कम देऊन त्यांची बोळवण करण्यात आली. एवढेच नाही, तर कंपनीने कामगारांचे ७.४१ कोटी रुपये अनधिकृतपणे ‘राईट-बॅक’ (Write-Back) करून मोठी आर्थिक फसवणूक केली असल्याचा आरोप त्यांनी केला. हक्काच्या पैशांची वाट पाहता-पाहता ९९ पैकी २४ कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून उर्वरित कामगार मृत्यूच्या उंबरठ्यावर असल्याची भीषण वास्तविकता त्यांनी सभागृहासमोर मांडली. आमदार जठार यांनी शासनाकडे ठोस मागण्या केल्या. कामगारांच्या हक्काची २४ कोटी रुपयांची संपूर्ण थकबाकी वसूल करण्यासाठी शासनाने कृती करावी, या प्रकरणी विधान परिषदेचे उपसभापती यांच्या नेतृत्वाखाली कामगार प्रतिनिधी, कामगारमंत्री, कामगार आयुक्त आणि कंपनी व्यवस्थापन यांची तातडीने एक उच्चस्तरीय बैठक आयोजित करावी आणि कंपनीने केलेला पीएफ घोटाळा, तसेच आर्थिक गैरव्यवहारांची ‘आर्थिक गुन्हे शाखेमार्फत’ सखोल चौकशी करण्यात यावी, अशी आग्रही भूमिका त्यांनी मांडली. आमदार जठार यांनी मांडलेल्या या वास्तवानंतर पीठासीन अधिकारी  संजय खोडके यांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेत कामगारमंत्र्यांना सरकारची भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले. यावर राज्याचे कामगारमंत्री फुंडकर यांनी सरकारने याची गंभीर दखल घेतली आहे, असे सांगून पुढील कारवाईच्या दृष्टीने सभागृहाला आश्वस्त केले. या चर्चेअंती आमदार  जठार यांनी अन्यायग्रस्त कामगारांचे निवेदन कामगारमंत्र्यांकडे सुपूर्द केले. आता शासनाच्या या आश्वासनानंतर उर्वरित कामगारांना त्यांच्या हयात असताना न्याय मिळणार का, याकडे संपूर्ण कामगार वर्गाचे लक्ष लागून आहे.