Category: ट्रेंडिंग न्यूज

trendlyne-news

बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर कल्याणमध्ये पोलिसांचे पथसंचलन

दुर्गाडी किल्ला परिसरात कडेकोट बंदोबस्त, पोलिस प्रशासन सतर्क कल्याण : बकरी ईदच्या नमाजच्या पार्श्वभूमीवर तसेच हिंदुत्ववादी संघटनांकडून देण्यात आलेल्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर कल्याण पोलिसांनी बुधवारी सायंकाळी शहरात पथसंचलन केले. विशेषतः दुर्गाडी किल्ला परिसर आणि संवेदनशील भागांमध्ये पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. कल्याणमधील ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्यावर असलेल्या दुर्गामाता मंदिराशेजारील ईदगाहमध्ये दरवर्षी मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने बकरी ईदची नमाज अदा करतात. नमाजसाठी मोठी गर्दी होत असल्याने रस्त्यावरही नमाज अदा केली जाते. याच पार्श्वभूमीवर मंदिर प्रवेश आणि पूजा-अर्चनेचा मुद्दा दरवर्षी चर्चेत येत असतो. काही हिंदुत्ववादी संघटनांचा आरोप आहे की नमाजच्या वेळी हिंदू भाविकांना मंदिरात प्रवेश रोखला जातो. तसेच नमाज सुरू असताना घंटानाद होऊ नये म्हणून मंदिरातील घंटादेखील बांधण्यात येतात. या मुद्द्यावरून दरवर्षी आंदोलन केले जाते. सुमारे ४० वर्षांपूर्वी शिवसेनेचे तत्कालीन जिल्हाप्रमुख धर्मवीर आनंद दिघे यांनी नमाजच्या वेळी मंदिर प्रवेशाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर दरवर्षी ईदच्या काळात पोलिस प्रशासन विशेष सतर्कता बाळगत आहे. यंदा भाजपच्या वतीनेही नमाजच्या वेळी मंदिर प्रवेशाची मागणी केल्याने पोलिस प्रशासनाची धावपळ वाढली आहे. कोणतीही अनुचित घटना घडू नये तसेच नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी यासाठी पोलिसांनी पथसंचलन केले. दरम्यान, पोलिसांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आणि अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. ०००००००

अमृत महोत्सवी मोहिते ट्रॉफी शालेय कॅरम स्पर्धा १ जूनला

मुंबई :  आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी-ग्रुप व राष्ट्रीय मिल मजदूर संघातर्फे अमृत महोत्सवी क्रीडापटू गोविंदराव मोहिते ट्रॉफी १६ वर्षाखालील शालेय मुलामुलींसाठी विनाशुल्क कॅरम स्पर्धा १ जून रोजी आयोजित करण्यात आली आहे. परेल…

 टिटवाळा स्टेशन परिसरात वाहतूक शाखेची धडक कारवाई

५३ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई, ४० हजार ७०० रुपयांचा दंड वसूल कल्याण : टिटवाळा स्टेशन परिसरातील वाढती वाहतूक कोंडी, अनधिकृत पार्किंग आणि नियमांचे सातत्याने होणारे उल्लंघन याविरोधात स्वतंत्र वाहतूक शाखेकडून मोठी कारवाई करण्यात आली असून विविध मोटार वाहन कायद्यांतर्गत एकूण ५३ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत नो पार्किंगमध्ये उभ्या करण्यात आलेल्या तब्बल ४० दुचाक्यांवर कारवाई करण्यात आली असून ट्रिपल सीट प्रवास करणाऱ्या एका वाहनचालकावर, वाहन चालविताना परवाना जवळ न बाळगणाऱ्या चार जणांवर तसेच विनायूनीफॉर्म वाहन चालविणाऱ्या सात वाहनचालकांवरही दंडात्मक कारवाई करण्यात आली. या संपूर्ण मोहिमेत एकूण ४० हजार ७०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. कल्याण तालुका पोलीस ठाण्यांतर्गत वाहतूक शाखेकडून टिटवाळा स्टेशन परिसरात ही विशेष मोहीम राबवण्यात आली. वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार पी. बी. घोरपडे, पोलीस शिपाई निलेश मोरे, पोलीस शिपाई अमित पवार आणि महिला पोलीस शिपाई वैशाली ढेरे यांनी ही कारवाई केली. स्टेशन परिसरातील बेशिस्त पार्किंग आणि वाहतुकीमुळे निर्माण होणाऱ्या अडचणींवर नियंत्रण आणण्यासाठी ही मोहीम राबवण्यात आल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, टिटवाळ्यासह ठाणे ग्रामीण परिसरासाठी स्वतंत्र वाहतूक शाखा सुरू करण्याची मागणी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे शहराध्यक्ष ॲड. जितेंद्र जोशी यांनी सातत्याने लावून धरली होती. वाढती लोकसंख्या, झपाट्याने वाढणारा शहर विस्तार, स्टेशन परिसरातील गर्दी आणि वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत असल्याने त्यांनी या प्रश्नावर प्रशासनाचे लक्ष वेधले होते. ००००००००

ठाणे महानगरपालिकेच्या विद्यमाने महापालिकेच्या कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात माजी पंतप्रधान ‘पंडित जवाहरलाल नेहरु’ यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभ‍िवादन करण्यात आले. यावेळी उपायुक्त जी.जी. गोदेपुरे, दीपक झिंजाड, प्र. उपमाहिती जनसंपर्क अधिकारी प्राची डिंगणकर, सुरक्षा अध‍िकारी घनश्याम फर्डे यांच्यासह महापालिकेचे कर्मचारी उपस्थित होते.

 दिव्यातील वीज समस्येने नागरिक त्रस्त

स्थानिक नगरसेवकांनी लक्ष देण्याची मागणी दिवा, दि. २७ मे : कडक उन्हाळ्यात दिवा परिसरात वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. उकाड्यामुळे लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक यांचे हाल होत असून स्थानिक नगरसेवकांनी पुढाकार घेऊन तातडीने वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. दिव्यात वाढत्या वीज चोरीचा फटका सामान्य नागरिकांना बसत असल्याचे बोलले जात आहे. उन्हाळ्यात विजेची मागणी मोठ्या प्रमाणात वाढल्याने ट्रान्सफॉर्मरवर अतिरिक्त ताण येत असून त्यामुळे वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. अनेक ठिकाणी ट्रान्सफॉर्मर बंद पडल्याने किंवा तांत्रिक बिघाड झाल्याने वीज पूर्ववत होण्यासाठी दोन ते तीन तासांचा कालावधी लागत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. विशेष म्हणजे मोठ्या लोकवस्तीच्या भागासाठी एकाच ट्रान्सफॉर्मरवर भार असल्याने त्याची देखभाल आणि दुरुस्ती वारंवार करावी लागत आहे. दिव्यातील काही भागात दिवसातून एक ते दोन वेळा वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान, पिण्याच्या पाण्याच्या वेळेतही वीजपुरवठा बंद होत असल्याने अनेकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी वाढत असून स्थानिक लोकप्रतिनिधींनी आणि संबंधित वीज कंपनीने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी दिवेकरांकडून जोर धरत आहे. ०००००००

 सानवी तिडकेचा चुरशीच्या लढतीत विजय

अवाडा-ऑटर्स क्लब अखिल भारतीय स्क्वॉश स्पर्धा मुंबई, २७ मे: वांद्रे येथील ऑटर्स क्लब कोर्टवर खेळल्या गेलेल्या अवाडा-ऑटर्स क्लब अखिल भारतीय स्क्वॉश स्पर्धेत १६ वर्षांखालील मुलींमध्ये सानवी तिडकेने चुरशीच्या लढतीत पहिला…

 निरंकारी राजमाताजी मेमोरियल क्रिकेट टूर्नामेंट संपन्न

कल्याण : संत निरंकारी मिशनच्या विद्यमाने २३ व २४ मे रोजी  विलेपार्ले स्थित धनजीभाई मेहता ग्राउंडमध्ये निरंकारी राजमाताजी मेमोरियल महिला क्रिकेट टूर्नामेंटचे यशस्वी आयोजन करण्यात आले. त्यामध्ये मुंबई परिक्षेत्रातील एकंदर २२…

 १४ वर्षीय आरव आहुजा याचा  पोहण्याचा विक्रम

पिरवाडी बीच ते ट्रॉम्बे जेट्टी दरम्यान २३ किमी खुला समुद्र पार करत केला विक्रम कल्याण :  डोंबिवलीतील पवार पब्लिक स्कुल येथील इयत्ता नववीत शिकणाऱ्या १४ वर्षीय मास्टर आरव आहुजा याने खुल्या समुद्रातील पोहण्यामध्ये उल्लेखनीय कामगिरी करत रायगड येथील पिरवाडी बीच ते मुंबईतील ट्रॉम्बे जेट्टी दरम्यान एकल समुद्र पोहण्याचा पराक्रम यशस्वीरित्या पूर्ण करणारा पहिला जलतरणपटू होण्याचा मान मिळवला आहे. आरवने अपूर्व जिद्द, शारीरिक क्षमता आणि मानसिक ताकद दाखवत सुमारे २३ किलोमीटरचे अंतर अवघ्या ४ तास १४ मिनिटांत पूर्ण केले. अरबी समुद्रातील आव्हानात्मक परिस्थितीला सामोरे जात त्याने संपूर्ण पोहण्यादरम्यान उल्लेखनीय चिकाटी आणि आत्मविश्वासाचे प्रदर्शन केले.आरव हा ऑलिम्पिक स्पोर्ट्स सेंटर, पलावा येथे कार्यरत असलेल्या रुपाली रेपाळे स्विमिंग अकॅडमीमध्ये प्रशिक्षण घेत असून तो दररोज सुमारे ३ ते ४ तास कठोर सराव करतो. विशेष म्हणजे, वयाच्या ९व्या वर्षी जेव्हा त्याने पोहण्यास सुरुवात केली, तेव्हा त्याला पाण्याची भीती वाटत होती. मात्र सातत्यपूर्ण प्रशिक्षण, पालकांचे प्रोत्साहन आणि प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे त्याने त्या भीतीवर मात करत खुल्या समुद्रातील पोहण्यामध्ये विशेष प्राविण्य मिळवले. आरवने यापूर्वीही राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय यश संपादन केले आहे. नुकत्याच कोची येथे पार पडलेल्या ओपन नॅशनल स्विमॅथॉन स्पर्धेत त्याने १० कि.मी. शर्यतीमध्ये रौप्यपदक पटकावले. तसेच पोरबंदर येथे झालेल्या राष्ट्रीय खुल्या जलतरण स्पर्धेत १० कि.मी. गटात कांस्यपदक जिंकले आहे. याशिवाय राज्यस्तरीय खुल्या जलतरण स्पर्धांमध्येही त्याने अनेक पदके आणि गौरव संपादन केले आहेत. ही ऐतिहासिक समुद्र पोहण्याची मोहीम आरवची पहिलीच एकल लांब पल्ल्याची समुद्रातील पोहण्याची मोहीम होती, त्यामुळे या यशाला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. या पोहण्यादरम्यान त्याला जोरदार वारे, उंच भरती आणि खवळलेल्या समुद्राच्या लाटांचा सामना करावा लागला. मात्र सर्व अडचणींवर मात करत त्याने यशस्वीरित्या हे आव्हान पूर्ण केले. या कामगिरीदरम्यान शेवटच्या टप्प्यात डॉल्फिन माशांनी आरवच्या सोबत पोहत त्याच्या या यशात एक विस्मरणीय आणि प्रेरणादायी क्षण निर्माण केला. ही संपूर्ण मोहीम महाराष्ट्र स्टेट अमेचुअर अॅकव्याटीक असोसिएशन यांच्या निरीक्षणाखाली पार पडली असून सर्व अधिकृत नियम, सुरक्षा निकष आणि प्रक्रियांचे काटेकोर पालन करण्यात आले. आपल्या यशाबद्दल बोलताना आरवने आपल्या आई-वडिलांचे त्यांच्या सततच्या पाठिंबा आणि प्रोत्साहनाबद्दल आभार मानले. तसेच त्याने आपले प्रशिक्षक  रुपाली रेपाळे आणि अनिरुद्ध महाडिक   यांचे मार्गदर्शन आणि मेहनतीबद्दल विशेष आभार व्यक्त केले. तसेच संघटनेचे सचिव राजेंद्र पालकर यांनी दिलेल्या प्रोत्साहनाबद्दलही त्याने कृतज्ञता व्यक्त केली. तसेच कराबी थायलंड ओपन वॉटर स्वमिंग २ किलोमीटर स्पर्धा सिल्वर व ५०० मीटर स्पर्धेत सिल्वर मेडल मिळवले.

नगरसेविका राजोल पाटील यांच्या पुढाकाराने नागरिकांसाठी विविध शासकीय दाखले शिबिराचे आयोजन

(राजेंद्र साळसकर) मुंबई  – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या प्रभाग क्रमांक ११४ मधील नगरसेविका राजोल संजय पाटील यांच्या पुढाकारातने नागरिकांच्या सोयीसाठी विविध शासकीय दाखले उपलब्ध करून देणारे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सर्वसामान्य नागरिकांना सरकारी कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागू नयेत, आवश्यक कागदपत्रांची प्रक्रिया सुलभ व्हावी तसेच ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी व कामगार वर्गाला एकाच ठिकाणी विविध सेवा मिळाव्यात या उद्देशाने हे शिबिर राबविण्यात येत आहे. या शिबिरामध्ये उत्पन्नाचा दाखला, ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र, अधिवास दाखला (डोमिसाईल सर्टिफिकेट), स्थानिक वास्तव्याचा दाखला तसेच आधार कार्डाशी संबंधित सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. अनेक वेळा नागरिकांना विविध दाखल्यांसाठी सरकारी कार्यालयांमध्ये वारंवार जावे लागते, आवश्यक कागदपत्रांची माहिती नसल्यामुळे अडचणी निर्माण होतात. त्यामुळे वेळ व पैशाचा अतिरिक्त खर्च होतो. या पार्श्वभूमीवर नागरिकांना योग्य मार्गदर्शन व तत्काळ सेवा देण्यासाठी हे शिबिर उपयुक्त ठरणार असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे. उत्पन्नाचा दाखला मिळविण्यासाठी रेशन कार्ड, आधार कार्ड, मागील तीन वर्षांचे आर्थिक प्रमाणपत्र किंवा आयकर विवरणपत्र, तसेच वीज बिल किंवा इतर आवश्यक कागदपत्रांची आवश्यकता असणार आहे. ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्रासाठी रेशन कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड, जन्मतारीख दर्शविणारे कागदपत्र, शाळा सोडल्याचा दाखला आदी कागदपत्रे आवश्यक असतील. अधिवास दाखल्यासाठी मतदार ओळखपत्र, शैक्षणिक पुरावे, बँक पासबुक तसेच मागील दहा वर्षांच्या वास्तव्याचे पुरावे मागविण्यात येणार आहेत. स्थानिक वास्तव्याच्या दाखल्यासाठी देखील विविध ओळखपत्रे व दीर्घकालीन वास्तव्याचे पुरावे आवश्यक राहणार आहेत. याशिवाय आधार कार्डाशी संबंधित नोंदणी व दुरुस्तीची सुविधाही नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. हे शिबिर २५ ते २९ मे या कालावधीत सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत आयोजित करण्यात आले आहे. शिबिराचे ठिकाण ज्येष्ठ नागरिक कार्यालय, ९० फूट रोड, लालबहादूर कंपाऊंड, अशोक केदार चौक, भांडुप (प.) असे असून परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन नगरसेविका राजोल पाटील यांनी केले आहे. या उपक्रमामुळे नागरिकांचा वेळ वाचणार असून विविध सरकारी प्रक्रियांबाबत जागरूकता निर्माण होण्यासही मदत होणार आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक व रोजंदारीवर काम करणाऱ्या नागरिकांना या शिबिराचा मोठा फायदा होणार असल्याची भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.

महाराष्ट्रात अनुसूचित जाती समन्वय अभियानास प्रारंभ

रमेश औताडे मुंबई: आम्ही संगतीत आणि पंगतीत सोबत बसत नाही हा दूरूभाव अनुसूचित जातीच्या विविध घटकांना खटकत असतो, मग आम्ही यांच्या जवळ गेलो तर रोटी बेटीची सोयरिक साधतील का? तसेच रिपब्लिकन ऐक्याचे ग्रहण अजुन सुटले नसताना आमच्या फाटाफुटी मुळे उपवर्गिकरणाच्या चर्चेला बळ मिळत आहे. असे मत आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे यांनी केली ते त्यांच्या वाढदिवसानिमित्त अनुसूचित जाती समन्वय अभियानाच्या प्रारंभ करताना बोलत होते. बागडे यांच्या निवासस्थानी मातंग समाजातील महिला कार्यकर्त्यांनी शुभेच्छा देण्यासाठी सम्राट अशोक सेनेचे अध्यक्ष रवी भाऊ शेंडे, माजी जिल्हा परिषद सदस्य दिनेश बनसोड, गर्जना संघटनेचे अध्यक्ष भाई महेश ठाकूर, आंरिमोचे नेते धर्माजी बागडे, ओबीसी नेते राजू पांजरे, राष्ट्रीय संघटक देवेंद्र बागडे, रिपाइं आठवले शहर अध्यक्ष विनोद थुल, सेवानिवृत्त वित्त लेखा अधिकारी म्हाडा चे जयदेव चिंवडे, मातंग मोर्चा चे नेते मनोहर इंगोले, चर्मकार समाजाचे नेते व सुप्रसिद्ध शायर तन्हा नागपुरी, आंरिमो नागपूर विभागीय अध्यक्ष प्रवीण आवळे, सामाजिक कार्यकर्ते गौतम तिरपुडे, संजय मोटघरे,सुधिर मोटघरे, हंसराज उरकुडे,माजी नगरसेवक अमर बागडे, युवा नेते सुरज ढोणे, पंकज पाटील, गौतम बागडे, सुदर्शन, वाल्मिकी मोर्चा चे नेते सुभाष बढेल, चरणदास गायकवाड,नरेश खन्ना, वैशाली तभाने, संगिता चंद्रिकापुरे, डॉ सुधा जनंबधू,जुलैखा बेगम रुबिना खान,सरिता थुल, अनिता थुल,भागनबाई मेश्राम, सुशिला जनंबादे, जयश्री मसराम यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.रमेश दुपारे यांनी केले तर आभार प्रदर्शन पुण्यशील बोदिले यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अंतुल गंगापूरकर,भोजराज नंदागवळी अमोल बागडे यांनी केले. ०००००००